इश्क मेरा , दर्द मेरा ….

त्याच  तिच्यावर अगदी जीवापाड प्रेम होत.त्याने तिला तस सांगीतलही होत, पण तिला त्याच्यात काही विशेष रस नव्हता.त्याला मात्र कधी ना कधी ती आपल्याला हो म्हणेल अस वाटत होत .त्याच नाव रोहन राठोड आणि ती सुप्रिया , तसा तो ही काही वाया गेलेला रस्त्यावरचा मवाली  मुलगा वैगेरे  नव्हता तर  तो आयआयटी गुवाहाटी सारख्या नामांकित शिक्षणसंस्थेत अभियांत्रिकीच शिक्षण घेत होता.पण काय असते ना ह्या जगात प्रत्येकाच्या नशिबात प्रेम लिहलेलच असेल अस नाही ना.त्यात ह्याच दुर्दैव अस कि त्याला कर्करोग झालेला आहे  आणि तो आता उपचाराच्या बाहेर गेलाय हे त्याला कळते.त्याला मरणाची काही वाटत नाही पण आता आपण तिच्यापासून दूर होणार ही गोष्ट त्याला खूप हेलावून टाकते.त्यातच तो तिच्यासाठी एक गाण लिहतो आणि ते गाण जेव्हा तो गाऊन रेकॉर्ड करतो त्याच्या पंधरा दिवसांनी तो हे दुष्ट जग सोडून जातो.प्रेमाच्या शोधात…एका वेगळ्याच जगात….कधीही परत न् येण्यासाठी…मागे राहते ते फक्त त्याच गाण….तिच्यासाठी लिहलेल …

ते गाण…….

‘एम्प्टीनेस’

Ho love of mine..
with a song and a whine..
You’re harsh and divine..
like truths and a lie..

but the tale end’s not here..
I’ve nothing to fear..
for my love is yell of giving an hold on…
in the bright emptiness..
in the room full of it..
is a cruel mistress ho ho o…

I feel the sunrise..
that nest all hollowness..
for i have nowhere to go and im cold..

And i feel so lonely yea..
There’s a better place from this emptiness..
And i’m so lonely yea..
There’s a better place from this emptiness..

yeiyeiyeiya….
Aa..aa.. aa…..

तुने मेरे जाना.
कभी नही जाना..
इश्क मेरा, दर्द मेरा …..

तुने मेरे जाना.
कभी नही जाना..
इश्क मेरा, दर्द मेरा ….

आशिक तेरा ..
भीडमे खोया रेहता है
जाने जहा …
पुछो तो इतना केहता है..

And i feel so lonely yea..

There s a better place from this emptiness..
And i’m so lonely yea..

*******##***********##****************##***************##**********************##******************##****************

गजेंद्र वर्मा … मुंबईतला अवघ्या २१ वर्षाचा एक  मुलगा, संगीताची त्याला खूप आवड , त्याने सहा गाणी स्वत:हून ‘कपोंज’ केली होती आणि त्याला त्यांचा एक अल्बम काढायचा होता.त्याआधी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्याने काही लोकांना ती गाणी पाठवली होती. पण त्याने अल्बम काढायच्या आधीच इंटरनेटवर त्यातील एक गाण एका वेगळ्याच हृदयस्पर्शी कथेसह अवतरल.ते तिथे कस आल ते त्याला कळत नव्हत आणि नेटवर ते दुसर्याच्या नावाने इतक प्रसिद्ध झाल होत कि त्याच्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नव्हत .तेव्हा त्याने लवकरात लवकर  तो अल्बम प्रदर्शित करायचं ठरवलं…

त्या अल्बममधील दुसर एक गाण ….

(खूप सुंदर आहे हे ‘एम्प्टीनेस’ सारखच ,विडीयो ह्या गाण्याचा नसला तरी चांगला ‘सिंक्रोनाइज’ झालाय ..जरूर पहा,ऐका … )

*******##***********##****************##***************##**********************##******************##*************

गजेंद्र वर्मा … मुंबईतला अवघ्या २१ वर्षाचा एक  मुलगा, संगीताची त्याला खूप आवड , (वाचा ,वाचा ..बाय मिस्टेक दुसऱ्यांदा   नाहीये हे .. :)   )त्याने सहा गाणी स्वत:हून ‘कपोंज’ केली होती आणि त्याला त्यांचा एक अल्बम काढायचा होता.गाणी तर छान होतीच पण खरच अल्बम काढला तर त्याची कोणी एवढी दखल घेईल का..शिवाय येणारा आर्थिक खर्च …आणि  कित्येक अल्बम असेच येऊन जातात… मग आता काय करायचं हा विचार करताना त्याच्या डोक्यात एक सुपीक कल्पना आली …….

*******##***********##****************##***************##**********************##******************##*************

काहीही असो , हे गाण खूप खूप सुंदर आहे आणि म्हणूनच  ते मला न आवडण्याचा प्रश्नच येत नाही.मी ५-६  महिन्यापूर्वी परत  एकदा काही दिवस   गिटार  क्लासला गेलो होतो तेव्हा तिथे मी सर्वात पहिल्यांदा हे गाण ऐकल आणि ‘लव अॅट फर्स्ट साईट’ म्हणतात तस ह्या गाण्याच्या प्रेमात पडलो .खरतर बरीच  गाणी काही वेळा ऐकल्यावर चांगली वाटायला लागतात पण ह्यासारखी काही गाणी असतात कि जी ऐकताक्षणीच आपल्याला आवडतात.त्यादिवशी घरी आल्यावर लगेच ते  गाण नेटवर मिळते का हे  बघण्यासाठी गुगलबाबाला विचारले असता ती वरील हृदयस्पर्शी आणि गाण्याचा ‘इम्पॅक्ट’ कितीतरी  अधिक पटीने वाढवणारी माहिती मिळाली.पण काही अजून लिंक्स पडताळल्यावर सत्य परिस्थिती समजली ,लाखो लोकांच्या हृदयाला हात घालणारा ‘रोहन राठोड’ कधीच अस्तित्वात नव्हता.

आयआयटी गुवाहाटीने असा कोणीही ‘रोहन राठोड’ त्यांच्या इथे कधीही नव्हता आणि वरील प्रसंग दुसर्या कोणाही मुलाबरोबर तिथे घडलेला नाही असे स्पष्ट केलेले असतांना देखील अजूनही  लाखो  लोक जाणूबुजून असो कि कसेही पण रोहन राठोडच्या अस्तीत्वाबाबतचे हे सत्य स्वीकारायला तयार नाहीत. कितीतरी लोकांनी त्याला समर्पित करून ह्या गाण्यांच पूर्ण हिंदी गाणही काढल आहे. तर रोहन गेल्यावर सुप्रियाची मनोव्यथा मांडणारीही कित्येक गाणी युट्युबवर सापडतात.त्यातील मला आवडलेल्या विडियो खाली जोडतो आहे.तो ही जरूर पहा,गाण तर सुंदर आहेच पण विडीयोही छान तयार केला आहे.

आजकाल चित्रपटाबाहेरील गाणी तितकीशी ऐकली जात नाहीत कारण अनेक हिंदी गाण्याचे अल्बम्स आजकाल नुसते येऊन जातात.जास्तीत जास्त थोडे रीमिक्स्चे अल्बम चालतात पण एक काळ होता , म्हणजेच माझ्या  लहानपणाचा :) जेव्हा अनेक गायकांच्या चित्रपटातील गाण्यांबरोबरच त्यांच्या नवीन अल्बम्सचीही अगदी आतुरतेने वाट पाहिली जायची.तसेच इतरही नवीन गायकांचे अल्बम्स चांगले असल्यावर ठीकठाक खपत होते.पण आता अल्बम काढण बरचस सोप असल तरी ( पैसा बोलता है… :) ) तरी त्याला लोकप्रियता मिळण खूप कठीण होऊन बसल आहे .ह्या गोष्टीचा ह्या प्रकरणावर  बराचसा प्रभाव असावा असे मला तरी वाटते .

हे गाण खर तर अजून सर्वासमोर आलेल नाहीये पण इंटरनेटशी ‘कनेक्ट’ असलेल्या लोकांमध्ये मात्र हे गाण भलतच लोकप्रिय आहे.फेसबुकवर ह्या गाण्याची जवळपास दोन लाख लोक असणारे एक आणि  तसेच अजून एक लाखावर लोक असणारे एक ‘फॅनपेज ‘ आहे. ह्या गाण्याच्या हजारो लोक असलेल्या ‘फॅनपेज ‘ चा तर खुपच सुळसुळाट आहे.नेटवरील माहितीनुसार सुमारे १५ लाखाहून जास्त दर्शक ह्या गाण्याला आतापर्यत मिळालेले आहेत.वेगवेगळ्या सिनेमातील दृश्ये ,छायाचित्रांचे स्लाईड शो वापरून तयार केलेले  ह्या गाण्याचे तब्बल ३०० हुन अधिक विडीयोज युट्युबवर आपल्याला पाहायला मिळतात.ह्या प्रकरणाची दखल हिंदुस्थान टाईम्समध्येही मागे घेतली गेली होती. मी सुद्धा ह्या गाण्याचा चांगलाच प्रसार करतो आहे , आतापर्यंत अनेक लोकांना मी हे गाण ऐकवलं आहे आणि  ज्यांना ज्यांना हे गाण ऐकवल आहे त्यातील कोणीच अजून ते आवडलं नाही अस म्हटलेलं नाही… :)

कधी अस्तीत्वात नसूनही अमर झालेल्या रोहन राठोडचा ‘एम्प्टीनेस’ तुमच्या आवडत्या गाण्याच्या यादीतील  एखादी जागा भरतो  का ते आता तुम्हीच बघा…

बाबुजी…

काही माणसांचा जन्म होतो तोच मुळी  काही तरी असामान्य कार्य करण्यासाठी…आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत अश्या व्यक्तींचा विचार करतांना जी काही नाव येतात त्यातलं एक नाव ‘बाबुजीं’च…तस पाहिलं तर  प्रतिभा तर खूप लोक घेऊन येतात ह्या जगात  पण ती जोपासण्यासाठी परिश्रम घेण्याच सगळयांनाच जमत नाही. बाबुजींनी  मिळालेल्या प्रतिभेला कठोर मेहनतीची जोड देवून यशाची उत्तुंग शिखरे कशी गाठायची ह्याचे खूप मोठे उदाहरण आपल्यासमोर ठेवले आहे. मराठी चित्रपटसंगीताच्या क्षेत्रात तब्बल पाच दशकाहून अधिक काळ राज्य करणार्या ह्या अवलियाचा आज स्मृतीदिन आहे.त्यांना मानवंदना देण्यासाठी  हा छोटासा लेखप्रपंच.

आपण त्यांना सुधीर फडके किंवा ‘बाबुजी’ म्हणून ओळखत असलो तरी त्यांचे खरे नाव ‘रामचंद्र विनायक फडके’ आहे. हो ‘आहेच ‘ लिहायचं मला. कारण त्यांच्या असंख्य गीतातून ते नेहमीच आपल्याबरोबर राहिले आहेत. तर बाबुजींचा जन्म २५ जुलै १९१९ ला कोल्हापुरात झाला.सुधीर फडके यांचे वडील विनायक फडके कोल्हापूरचे नामांकित वकील होत व त्यांच्या देशभक्तीमुळे ते ‘कोल्हापूरचे टिळक’ म्हणून ओळखले जात. त्यांना संगीताची आवड असल्याने त्यांनी बर्याच रेकॉर्डसघरी आणायचे.बाबुजीना संगीताची आवड लागली ती ह्यामुळेच.ते गाणी ऐकायचे व हुबेहूब त्याची नक्कल करायचे.त्यांचे मामा डॉ. भालचंद्र पटवर्धन ह्यांनी भाच्यातील उपजत गुण ओळखून त्याला श्री. विनायकबुवा पाध्ये यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे प्राथमिक शिक्षण घेण्यास दाखल केले.अल्पावधीतच त्यांनी प्रतिभेला मेहनतीची जोड देत शास्त्रीय संगीतावर चांगलाच प्रभुत्व मिळवलं.पाध्ये ह्यांचा आपल्या ह्या शिष्यावर खूप विश्वास होता म्हणूनच त्यांनी आपल्या विद्यालयात भरलेल्या अ.भा. संगीत परिषदेत देशभरातील गवय्यांना “तुम्ही जो राग सादर कराल तो राग माझा हा शिष्य हुबेहूब सादर करील” अस जाहीर केल.आणि त्यावेळी त्यांच्या शिष्याने त्यांच ते म्हणण चूकीच होऊन दिल नाही.

१९२८ मध्ये बाबुजींची आईच आजारपणात निधन झाल.ह्या गोष्टीचा बाबुजींच्या वडिलांनी खुपच धसका घेतला व वकिली करण सोडून दिल.पुढे आर्थिक परिस्थिती खुपच बिकट झाल्यामुळे ते आपल्या मामांकडे राहायला गेले व तिथून त्यांच्या विकासासाठी त्याना मुंबईला पाठवण्यात आले.मुंबईत शालेय शिक्षणाबरोबरच महाराष्ट्र संगीत विद्यालयातून संगीताचे शिक्षणही चालूच ठेवले.तिथे सरस्वती संगीत विद्यालयात दरवर्षी होणाऱ्या शास्त्रीय संगीताच्या स्पर्धेत तर त्यांनी आपल्या विद्यालयातर्फे भाग घेऊन परीक्षक असलेल्या उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब ह्यांच्याकडून मुक्तकंठाने प्रशंसा मिळवली व बरोबरच प्रथम पुरस्कारही पटकावला.पुढे १९३३ मध्ये बाबुजी कोल्हापुरात परतले व श्रीकृष्ण संगीत विद्यालयात गायन-शिक्षक म्हणून रुजू झाले.ह्या विद्यालयाचे प्रमुख श्री. न. ना. देशपांडे ह्यांनीच बाबूजींचे ‘सुधीर’ हे नामकरण केले.

हिंदी सिनेमातील बाबूजींच एक अजरामर गीत

१९३६ मध्ये वडिलांच्या निधनानंतर मुंबईत परतल्यावर ते संघाच्या कार्यालयातच राहत.त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा प्रभाव होता. गोवा मुक्ती आंदोलनात त्यांनी सशस्त्र भाग घेतलेला होता.पुढे अनेक राज्यात फिरताना त्यांनी संघाच्या प्रचारकाची भूमिकाही नेटाने पार पाडली. मुंबईत आकाशवाणीवर त्यांना गायक म्हणून कंत्राटी नोकरी मिळाली होती ती सांभाळून ते संघाची अनेक काम करत . १९३९ साली  त्यांना  ‘विझलेली वात’ ह्या नाटकाला संगीत दिग्दर्शन  करायची संधी मिळाली.रसिकांनी त्यांच्या कामाला चांगलीच दाद दिली.पुढे संघातील काही अधिकार्यांनी पैशांच्या बाबतीत फसवणूक केली व त्यामुळेच गैरसमजामुळे मामांच्या घराचे दरवाजेही त्यांच्यासाठी बंद झाले होते .त्यानंतर सुमारे तीन महिने बाबुजींनी  फुटपाथवर दिवस काढले.रेडियोची कंत्राटे मिळणेही खूप कमी झाल्याने त्यांना दोन वेळच्या जेवणाचाही प्रश्न पडायचा.उदरनिर्वाहासाठी गायनाच्या शिकवणीबरोबरच कांदाभजीचा धंदाही त्यांनी करून पाहिला.पण दोन्हीही नीट चालू शकले नाही ते दिवसच वाईट होते.  वर क्षयासारखा  आजार  तरीही त्यांनी न डगमगता मिळेल ती बिदागी स्वीकारून अनेक राज्यांमध्ये भटकंती करून त्यांचे प्रयोग करायला सुरुवात केली.हे दौरे करताना तेथील स्थानिक संगीतातील  नवी नवी शिकवण घेत आपली   संगीत साधनाही त्यांनी  चालूच ठेवली होती .

देशभर भटकंती सुरु असतानाच त्यांना कलकत्त्याला  ‘दि इंडिया रेकॉर्ड कंपनी’त नोकरी मिळाली. मग त्यांनी  तिथेच स्थायिक व्हायचा ठरवल होत.पण नियतीच्या मनात काही औरच होत , भावाच्या आजारपणामुळे त्यांना कोल्हापुरात परताव लागल.त्याचवेळेस मुंबईतील एच. एम. व्ही. कंपनी कोल्हापूरला  रेकॉर्डिंगसाठी आली होती. गदिमांच्या ‘दर्यावरी नाच करी होडी चाले भिरीभिरी’ असे बोल असलेले गाणे गायची संधी त्याना मिळाली व गदिमांशी ओळखही झाली.ज्या ओळखीने पुढे गाढ मैत्रीचे रूप घेऊन इतिहास घडवला.  १९४१  ते १९४५ त्यांनी  ‘एच एम वी ‘ सोबत काम केल. १९४६ साली ‘प्रभात चित्र संस्थे’त   संगीत दिग्दर्शक म्हणून काम करायची संधी मिळाल्यावर खर्या अर्थाने त्यांची स्वतंत्र कारकीर्द सुरु झाली.आणि तिथून त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.गायक आणि संगीतकार ह्या दोन्ही क्षेत्रात त्यांनी आपळी वेगळी छाप सोडली .हिराबाई बडोदेकर, बालगंधर्व हे त्यांचे आदर्श होते.त्यांनी तब्बल १११ चित्रपटांना संगीतबद्ध केले. त्यापैकी २१ चित्रपट हे हिंदी भाषेतील आहेत. बालगंधर्व, पं. भीमसेनजी, हिराबाई बेडोदेकर,किशोर कुमार, मोहम्मद रफी, लता मंगेशकर, आशा भोसले आदी दिग्गज गायक-गायिकांनी बाबुजींनी संगीत दिलेली गीते गायली आहेत.बाबुजींनी दुसर्या संगीतकारांचीही अनेक गीते गायली.आणि ती गाताना समोरील संगीतकाराला जे नक्की हवं ते गळ्यातून आल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे.गाताना भावानांबरोबरच स्पष्ट उच्चार काढणे ते कटाक्षाने पाळत.

बाबुजींच्या पत्नी म्हणजेच ललिता फडकेही उत्तम गायिका होत्या पण बाबुजींच्या संसाराचा गाडा  हाकताना त्यांच गायन हळूहळू  मागे पडत गेल.त्यांची काही गाणी तुम्हाला इथे ऐकायला मिळतील.

श्री व सौ. सुधीर फडके

त्यांनी पाच दशके अथक परिश्रम करत जे संगीतरुपी मंदीर बांधले त्याचा कळस म्हणजे त्यांनी संगीतबद्ध केलेळे गदिमांचे ‘गीतरामायण’ .ह्या गीतारामायाणातूनच बाबुजी घराघरात शिरले.गदिमांच्या शब्दाना ओघवत्या चाली देवून त्यांनी लोकांसमोर रामायण अक्षरशः उभे केले. बाबुजींनी गीतरामायणाचे भारतात व परदेशांत असे मिळून  सुमारे १८०० प्रयोग केले.तसेच १९५५-५६ मधे पुणे आकाशवाणीवर त्यांनी सलग ५६ आठवडे हे  ‘गीत रामायणा’ सादर केल.गीतरामायणाचे पुढे अनेक भाषात भाषांतर झाले पण ही सर्व भाषांतरे बाबुजींच्या मुळ चालीवरच गायली गेली.बाबुजींच्याच दैवी आवाजाने महाराष्ट्रावर जणू मोहिनीच घातली होती. त्या काळी गीतरामायण आकाशवाणीवरून प्रसारित होत असताना लोक रेडिओ संचाची पूजा करायचे आणि गाणी ऐकायचे. रसिकांनी नेहमीच त्यांच्या गायनाला दाद देत पुरस्कृत केले असताना त्यांच्यावर संगीत नाटक अकादमी पुरस्कार,सह्याद्री रत्न,दीनानाथ मंगेशकर पुरस्कार , लता मंगेशकर पुरस्कार  तसेच हा माझा मार्ग एकला  या चित्रपटासाठी मिळालेले राष्ट्रपतीपदक अश्या पुरस्काराची नेहमीच बरसात होत राहिली.

बाबूजींची काही गाणी ह्या  दुव्यावर आपल्याला ऐकायला मिळतील .कदाचित तुमची अनेक आवडती गाणी ह्यात असतील पण ती बाबुजींनी गायलीत हे तुम्हाला माहिती नसेल.

त्यांचे संगीतावर मनापासून प्रेम होते आणि म्हणूनच त्यांनी  मराठी चित्रपट संगीताची अथक  सेवा केली.त्यांचे पुत्ररत्न  म्हणजेच श्री.श्रीधर फडके ही सुद्धा  त्यांनी संगीतसृष्टीला दिलेली अजून एक अनमोल भेट. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे त्यांचे प्रेरणास्थान होते. त्यांच्यावरचा चित्रपट बनवणे हे त्यांच एक मोठ स्वप्न होत .त्यासाठी  बाबूजींनी खूप कष्ट घेतले. लोकांकडून वर्गणी घेऊन  त्यांनी निष्ठेने हा चित्रपट पूर्णही  केला. हा  चित्रपट प्रदर्शित झाल्यावर काही दिवसातच म्हणजे २९जुलै २००२ रोजी त्यांनी इहलोकाची यात्रा संपवली.पण ते आपल्यापासून कधीच दूर होऊ शकणार नाहीत .त्यांच्या गाण्यांतून ते नेहमीच आपल्याला भेटत राहणार आहेत. मंगेश पाडगावकरांच्या आणि बाबुजीनीच स्वरबद्ध केलेल्या  ओळी लिहाव्याश्या वाटतात…

अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती
दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची नाती॥