किल्ले प्रतापगड…

२४ तारखेला रायगडाच्या दर्शनाने धन्य झाल्यावर दुसरया दिवशी म्हणजे २५ फ़ेब्रुवारीला आम्ही स्वारी वळवली ती प्रतापगडाकडे. सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यात महाबळेश्वराच्या पश्चिमेस सुमारे २० किमी अंतरावर सह्याद्री पर्वत रांगेत व जावळीच्या खोर्‍यात घाटमाथ्यावरती ३५५६ फूट उंचीवर हा गड आहे.प्रतापगडाची निर्मिती इ.स. १६५७ मध्ये मोरोपंताच्या देखरेखेखाली झाली.अफ़झल खानाला नेस्तनाबुत करणारया महाराजांच्या प्रतापाची  साक्ष देणारा हा प्रतापगड.राजमाता जिजाबाईंचा सर्वांत आवडता किल्ला  होता तो हा प्रतापगडच.तीन वर्षांपुर्वी हया प्रतापगडाच दर्शन घेतल होत तरीही त्यादिवशी परत एकदा शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाच्या आठवणींना उजाळा देत अवघ्या प्रतापगडासमोर  नतमस्तक होण्यासाठी मी आलो होतो.

गडाच्या पायथ्या पासुन सुरुवात केल्यावर खाली डाव्या हाताला दर्गा शरीफ म्हणजेच अफ़जल खानाच्या कबरीकडे जाण्याची एक पायवाट दिसते.पण दर्गा शरीफ  बंद असल्याचे आम्हाला सांगण्यात आले. काही वेळ चढुन झाल की पुढे गडाच महाद्वार लागत.तिथुन सरळ ध्वज बुरुजाकडे जाणारा रस्ता तर डावीकडे भवानी मंदीराकडे जाणारा रस्ता आहे.महाद्वारापासुन सरळ जाउन काही पायरया चढल्यावर आम्ही ध्वजबुरुजावर पोहोचलो. तिथे आम्हाला महाराजांच्या शौर्यगाथा आठवत भगवा ध्वज अभिमानाने फ़डकतांना दिसला.ध्वजबुरुजावरुन प्रतापगड,दर्गा शरीफ आणि निसर्गसौन्दर्याने नटलेल्या आजुबाजुच्या डोंगरी परिसराचे मस्त नजारा पाहायला मिळाला.ध्वजबुरुजावरुन खाली उतरुन आम्ही भवानी मातेच्या मंदीराकडे वळलो.

भवानी मंदीराकडे जाताना डावीकडे आम्हाला गडाचा जुना दरवाजा लागतो .वरती चढतांना डाव्या बाजुला खाली एक खुपच गढुळ पाण्याचा तलाव दिसतो.पुढे आम्ही भवानीमंदीरात भवानी मातेचा आशिर्वाद घेउन मंदीराच्या मागे असलेल्या हस्तकला केंद्राला भेट दिली.स्त्रियांना भुरळ पाडणारया बरयाच सुंदर वस्तु इथे मिळतात.त्यामुळे बरोबर कोणी स्त्री असल्यास भवानी मंदीराकडूनच परत फ़िरावे.  :) मंदीराकडुन बालेकिल्ल्याकडे जाताना पायरयांच्या दुतर्फ़ा तुमची तहान-भुक शमवण्यासाठी ताक,लस्सी,सरबत तसेच खाण्याची दुकाने आहेत.थोड वर चढल की बालेकिल्ल्याचा दरवाजा लागतो तेथुन आत शिरल की आत समोरच महाराजांची सदर होती तो चौथरा लागतो.तिथुन उजव्या बाजुला पुढे गेल्यास केदारेश्चराचे मंदीर आहे.बालेकिल्ल्याच्या दरवाजाजवळच आम्ही थंड ताकाचा आस्वाद घेतला.तेथुन पुढे डावीकडॆ वळलो.तिथे महाराजांच्या राजवाड्याच्या जागेवर १९५७ साली त्यांचा एक अष्टधातूंचा पुतळा उभारला गेला आहे.तो पाहतांना आपली छाती अभिमानाने फ़ुलल्याशिवाय राहत नाही.त्या पुतळ्या खालीच शिवरायांनी मोगल अधिकारयांना ठणकावलेल्या खालील ओळी कोरल्या आहेत.

‘माझ्या मायभूमीचे रक्षण हे माझे परम
कर्तव्य होय. या भूमीवर आक्रमण करू
पाहणारा, मग तो कोणीही असो कधीच
यशस्वी झाला नाही.’

पुतळ्याच्या उजव्या बाजुला  एक उद्यान बांधलेले आहे.तेथील बाकावर बसुन शिवरायांचा पुतळा पाहतांना मनात एक वेगळच चैतन्य निर्माण होते.त्या बाकावर थोडा विसावा घेउन आम्ही पुतळ्याच्या डाव्या बाजुला तटबंदीच्या दिशेने कुच केले.सभोवतालचा परिसार, कडेलोट आणितटबंदी न्याहाळत तटबंदीला लागुनच अर्धगोल फ़िरत आम्ही मागच्या बाजुने केदारेश्वराच्या मंदीराकडे पोहोचलो.तेथे केदारेश्वराचे दर्शन घेउन परतीच्या मार्गाला लागलो.

आम्ही मागच्या वेळी आलेलो तेव्हा एका वॄदध मार्गदर्शक केला होता त्याने गनीमीकाव्याची एक जागा दाखवली होती जिथुन खाली पाहिल्यास थेट दरी दिसते पण बाजुने नीट पाहिल्यास तिथे एक चोररस्ता दिसतो जो पुढे वरती निघतो.हे मला खाली आल्यावर आठवल.पण ती जागा नीटशी आठवलीच नाही.असो आमची पुर्वाश्रमीची काहितरी पुण्याई असावी कारण शिवरायांच्या दोन महत्वाच्या गडांचे दर्शन पाठोपाठ घेण्याचे भाग्य आम्हाला लाभले.हया गडांच्या भेटीने मनाला खरोखरच विलक्षण प्रसन्नता लाभते.

किल्ले रायगड

ll गोब्राह्मण प्रतिपालक, प्रौढ प्रतापी पुरंदर, क्षत्रीकुलावतंस, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय ll

लहानपणापासुनच शिवाजी महाराजांचे नुसते नाव एकल तरी  एक वेगळाच उत्साह आपल्या अंगात संचारतो.अवघ्या महाराष्ट्राचे स्फ़ुर्तीस्थान आणि आराध्यदैवत असलेल्या महाराजांबद्दल जास्त काही सांगणे न लागे.तर आज तिथीप्रमाणे (फाल्गुन कृष्ण तृतीया) शिवाजी महाराजांची ३८० वी जयंती आहे.त्याचच औचित्य साधुन आमच्या रायगडाच भेटीतील काही फ़ोटो इथे टाकतो आहे.तर  २४ फ़ेब्रुवारी २०१० हा दिवस खरच माझ्यासाठी सोनियाचा दिन होता.कारण बरयाच वर्षापासुन रायगडाला भेट द्यायची जी एक इच्छा मनात होती ती त्यादिवशी पुर्ण झाली.जो गड महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणुन निवडला, ज्या किल्ल्यात या जाणत्या राजाचा राज्याभिषेक सोहळा झाला,अखेरची सात वर्षे त्यांनी ज्या गडावरूनच स्वराज्याचा कारभार पाहिला,त्यांच्या कर्तुत्वाने आजही ते अमर राहिले असले तरी याच गडावर मनुष्यदेह त्यागुन ते अनंतात विलीन झाले अशा रायगडाचे दर्शन घेउन मी खरच धन्य झालो.

रायगड जिल्ह्यातील महाड या गावापासून उत्तरेला सुमारे २५ कि. मी. अंतरावर आणि समुद्र सपाटीपासून जवळजवळ२९०० फूट उंच , सह्याद्रीच्या रांगासोबत दिमाखात उभा असलेला जो पाहुन राजांनी ’ तख्तास जागा हाच गड करावा ‘ असे उदगार काढले तो  हा मराठी इतिहासातील अनेक महत्वाच्या घटनांचा साक्षीदार रायगड खरोखरच पाहाण्य़ासारखा आहे.ज्यांना गड चढायला त्रास होत असेल किंवा वेळेचा अभाव असेल अश्यांसाठी पाचाडगावातून रायगडावर दोरवाटेनेसुदधा जाता येते.गडावर महाराजांचे पवित्र समाधीस्थळ,राज दरबार,गंगासागर तलाव,बाजारपेठ, रंगमहाल,बालेकिल्ला,राणीवसा,महादरवाजा, नगारखाना,अष्ट प्रधान वाडा, जगदीश्वर मंदिर,टकमक टोक,हिरकणी टोक या जागा आपल्याला पहायला मिळतात.

इतिहासकाळी गुन्हेगारांना शिक्षा म्हणून रायगडाच्या ज्या टकमक टोकावरून  कडेलोट केला जायचा त्या टोकावर पोहोचलो तेव्हा तिथे नौसेनेच्या जवानांचा रॅपलिंगचा कार्यक्रम चालु होता.राजदरबारात गेलो कि आपण आपोआपच महाराजांसमोर नतमस्तक होतो. शिवरायांचा राज्यभिषेक ज्या दिवशी झाला होता त्यादिवशी सुर्याची किरण सरळ सिंहासनावर पडतात अस सांगीतल जात.ज्यांच्या एका श्ब्दावर मागेपुढे काहिही न पाहता निस्वार्थ बुदधीने हजारो लोक    आपल्या प्राणाची बाजी लावत त्या अलौकिक राजांच्या समाधीजवळ जाउन आपण खरच कॄत्यकॄत्य होतो.महाराजांच्या समाधीच्या बाजुलाच त्यांच्या कुत्र्याची समाधीही आहे. रायगड फ़िरतांना आपल्याला इतिहासातील अनेक गोष्टींची आठवण आल्याशिवाय राहात नाही.त्यावेळी जे काही आतुन अनुभवतो ते शब्दात मांडता येत नाही.

दोन तास गडावर फ़िरतांना कसे गेलेते कळले सुदधा नाही आणि इतक मनसोक्त भटकुनही मला परत तिथे जावेसे वाटते आहे.महाराजांचा सहवास लाभलेला हा गड खरच प्रत्येकाने पाहायला हवा.आता परत पाउसाळी वातावरणात रायगडाला भेट देण्याचा माझा विचार आहे.असो रायगडासंबधी अधिक माहितीसाठी इथे भेट दया.शिवरायांसंदर्भात विविध माहितीसाठी हा ब्लॉगही जरुर पहा.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा……

शिवरायांचे आठवावे स्वरुप ।
शिवरायांचा आठवावा साक्षेप ।
शिवरायांचा आठवावा प्रताप ।
भूमंडळी ॥