मॅड

लहानपणापासून माझा सर्वात आवडता छंद आहे तो पुस्तक वाचण्याचा.हलकफुलक्या कथां असलेली पुस्तक ,ऐतिहासिक कादंबऱ्या,धीरगंभीर वास्तववादी पुस्तक,माहितीपर पुस्तक अश्या अनेक प्रकारच्या पुस्तकांचा मी आजवर खूप आस्वाद घेतला आहे.लहानपणी माझे मित्र मला नेहमी म्हणायचे, आम्हाला ही शाळेची पुस्तकच वाचायलाच जीवावर येते आणि तू इतकी जाडजाड पुस्तक कशी वाचत बसतो.मॅडच होत ते त्यांना काय माहीत कि खरतर पुस्तक वाचायला कुठे लागतात ती मनापासून उघडली कि  स्वत:हूनच ती आपल्याला सगळ सांगत राहतात.आपल्यासमोर सगळी दृश्य जिवंतपणे उभी करतात. तर अश्या ह्या माझ्या पुस्तकवेड्याच्या मनात एक कोपरा खास वपुंच्या पुस्तकांसाठी निरंतर राखून ठेवलेला आहे आणि तसाच एक वेगळा कोपरा ‘शाळा’ व ‘दुनियादारी’ ह्या पुस्तकांसाठी राखून ठेवलेला होता.गेली कितातरी वर्ष ही दोन पुस्तक त्या कोपरयात गुण्यागोविंदाने राज्य करीत होती.

पण काही दिवसापूर्वीच त्यांना त्यांच राज्य ‘लंप्या’ बरोबर वाटून घ्याव लागल. कोण लंप्या ? तुमच्यापैकी अनेक जण कदाचित ओळखत असाल ह्या लंप्याला पण महिन्याभरापूर्वी पर्यंत मी तरी ह्याला ओळखत नव्हतो.एकाच दिवशी मनाली (स्वच्छंदी) आणि रश्मी (मनस्वी) ह्या दोघींच्या ब्लॉगवर सर्वप्रथम ह्या मॅड लंप्याची मॅड ओळख झाली.मग काही दिवसातच मी हळुवारच लंपनच्या मॅड भावविश्वात प्रवेश केला आणि मग काय मला तो एकदम   ‘बेष्ट’च वाटला.आणि शेवटी ते काय म्हणतात ना त्यातली गत लंप्याने थोड्याश्या  मॅड असलेल्या मला पूर्ण  मॅड केल,’कम्प्लेट’ मॅड… अश्या त्या मॅड लंप्याची मी तुम्हाला इथे ओळख करून देणार आहे. साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण….

तर  ‘लंप्या’ म्हणजेच ‘लंपन’ हा प्रकाश नारायण संत ह्यांच्या कथासंग्रहामधील नायक – कर्नाटकातील कारवार नजीकच्या एका छोट्याश्या गावात आपल्या आजी-आजोबांबरोबर राहणारा अगदी कोवळ्या वयाचा एक शाळकरी मुलगा.त्याच स्वत:च एक वेगळच जग आहे. आजूबाजूचे सगळे सजीव-निर्जीव घटक त्याला  ह्या ना त्या कारणाने  मॅड वाटतात. अनेक छोट्या छोट्या गोष्टीचं निरीक्षण करायची त्याची मॅड सवय आहे.एकदा का  हात डोक्यामागं घेऊन तो एखाद्या गोष्टीकडे पाहू लागला कि मग त्याला वेळ-काळाचे काही भान राहत नाही. त्याच्या डोक्यातील चक्र नेहमी चालूच.प्रत्येक गोष्टीचा तो एकोणविसशे  वेळा विचार करतो. त्या निरीक्षणावरून तो अनेक भन्नाट  ‘लॉजिक’  लावतो.छान छान गाणी गायची त्याला भारी हौस.वाचनाची तर त्याला  प्रचंड आवड, अगदी पुस्तकवेडा . त्याला नेहमी दहा बारा तासांऐवजी खरं तर एकोणीस-तास झोपावस वाटत. कधीतरी आईपासून दूर राहत असल्याने तो थोडासा हळवाही होतो.त्याला त्याची शाळा  खूप आवडत असते कारण ह्याच शाळेत त्याच्या आईने शिक्षण घेतलेलं असत.त्याची एक मैत्रीणही आहे सुमी नावाची ,का कोण जाणे पण हिची नुसती आठवण आली तरी त्याला पोटात काहीतरी गडबड झाल्यासारख वाटते.तर असा आहे हा आमचा लंप्या.

हा निरागस,अल्लड,आपली अचाट कल्पनाशक्ती वापरणारा आणि थोडासा संवेदनशील लंपू आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातो. त्याची आजी-आजोबा, आ‌ई-बाबा,सुमी, बाबूराव, मनी आणि लहान बाळ बिट्ट्या, कणबर्गी गंग्या, टुकण्या ,संप्या, परळ्या, यमज्या, हणब्या, एशी, केबी,वंटमुरीकर देसाईंचा बोका, ‘लक्ष्मी’ झाड, तिथलं तळं, ‘हंपायर’ जंब्या कटकोळ,लंप्याचा गामा पैलवान खेकडा,ड्रिलचे मास्तर हत्तंगडी,आचरेकरबाई,म्हापसेकर सर ,सायकलचं  दुकान चालवणारा टी. जी.  कासारगोड ,नकादुतले खंडागळे मामा,सोन्याबापू,तेलसंगी,हिंडलगेकर अण्णा,साउथ इंडियन तुंगभद्रा,सांबप्रसादच घर,दुंडाप्पा हत्तरगीच्या टांगा ,लंपूला त्याच्यासारखाच एकटा वाटणारा गुंडीमठ रोड अश्या कितीतरी जणांची तो त्याच्या भावविश्वातून ओळख करून देतो.आणि ही सगळी सजीव-निर्जीव पात्र आपल्यासमोर जिवंत उभी राहतात.आपण एकवीसशे त्रेचाळीस वेळा सगळ परत परत वाचत राहतो.लंपूही आपला हात धरून आपल्याला सगळीकडे हिंडवत राहतो.हळूहळू काळ-वेळेचे, जागेचे, वयाचे सगळे बंध निखळून पडतात. त्याच्याबरोबर मॅडसारख भटकत असताना तो  आपला खास कि काय तसा मित्र होऊन जातो.अनेक धागे जुळत जातात. आणि मग अचानक कधीतरी आपणच लंप्या होऊन जातो.

लंप्याला आपल्याशी अशा प्रकारे जोडण्याचे सगळे श्रेय प्रकाश नारायण संतांच्या अप्रतिम लेखनशैलीला जाते.त्यांचे वडिल उत्तम ललितलेखक होते तर त्यांच्या आई इंदिरा संत ह्यांच्याबद्दल काही वेगळ सांगायला नको.वयाच्या सतराव्या वर्षीच ललित लेखनास सुरुवात करणाऱ्या प्रकाश नारायण संतांनी ह्या घराण्याला अजून एका उंचीवर नेऊन ठेवले.त्यांनी अडनिड वयातील मुलांच्या भावविश्वाचे अगदी  सूक्ष्म निरीक्षण केले असल्याचा साक्षात्कार ही पुस्तक वाचतांना आपल्याला वारंवार होतो.कथेची उत्तम बांधणी ,अगदी जिवंत वाटणारी वर्णन ,साधी सरळ भाषा, कानडी वळणाच्या मराठी बोलभाषेचा जागोजागी  छान वापर, ह्या त्यांच्या ह्या लेखनातील अगदी जमेच्या बाजू .ते उत्तम चित्रकारही होते. त्यांच्या पहिल्या तीन पुस्तकांसाठी त्यांनी स्वतःच रेखाटने केली होती. ‘मॅड‘ हे मॅड विशेषण कशासाठीही वापरणं,आपल्याला अगदी त्या वयात घेऊन जाणारया शब्दरचना ,वेगवेगळ्या संख्यांचा वाक्यातला उपयोग, आडवयातील मुलाच्या नजरेतून विविध गोष्टी मांडण्याच प्रचंड कौशल्य,लंपनच वेगवेगळया लोकांबरोबर जुळवलेले हळुवार ऋणानुबंध सगळ सगळ आपल्यावर एक वेगळीच जादू करते.मी ह्याचवर्षी कारवार भागाला भेट दिलेली असल्याने ह्या पुस्तकातील अनेक वर्णनांना चांगलाच ‘रिलेट’ करू शकलो.

गोट्या खेळतांनाचा प्रकाश नारायण संतांनी सांगितलेला भन्नाट मंत्र इथे टाकावासा वाटतोय ….

पंचापांडू – सह्यादांडू – सप्तपोपडे – अष्ट जिंकिले – नऊनऊ किल्ले – दश्शा पेडा – अकलकराठा बाळू मराठा – तिरंगी सोटा – चौदा लंगोटा – पंधराशी परिवळ – सोळी घरिवल – सतरम सीते – अठरम गरुडे – एकोणीस च्यकच्यक – वीसा पकपक – एकवीस कात्री – बावीस रात्री – तेवीस त्रिकाम फुल – चोवीस चोर – पंचवीस मोर

वनवास, शारदा संगीत, पंखा, झुंबर ह्या चार पुस्तकातून लंपनच भावविश्व  तरलपणे उलगडून दाखवतांना ते आपल्याला मनमुराद आनंद देतात.ही चार पुस्तक म्हणजे एक आगळावेगळा खजिनाच आहे.ह्या चार पुस्तकांचं वैशिष्ट्य म्हणजे ह्यातल कोणतेही एक पुस्तक वाचल तरी ते अपूर्ण वाटत नाही.पण एकदा का तुम्ही ह्या लंपनच्या भावविश्वात शिरलात कि चारही पुस्तक कशीही मिळवून तुम्ही ती मॅडसारखी वाचून काढेपर्यंत किंवा त्यानंतरही तुम्ही लंपनला सोडत नाहीत आणि तो ही तुम्हाला सोडत नाही. ही सगळी पुस्तक वाचतांना आपल्याला निखळ आनंद  देतात पण त्याच बरोबर अनेक कथांच्या शेवटी घडलेल्या घटना मनाला चटका लावून जातात.’झुंबर’ मधील ‘स्पर्श’ ह्या कथेत आपल्या वडिलांच्या मृत्युची जाणीव झालेला लंपन  तर अंगावर काटा आणतो.खूप हुरहूर लावून जाते ती कथा. लंपनच्या आयुष्यातील तरूणपणाच्या दिवसांवर संतांना एक कादंबरी लिहायाची होती पण ‘झुंबर’ हा कथासंग्रह प्रकाशित होण्यापूर्वीच त्यांच निधन झाल, आणि मराठी रसिक एका अतिशय चांगल्या कादंबरीला मुकला अस मला वाटते.खरच संतांचा तरुणपणाचा लंपन कसा असता… ह्याच उत्तर कधीच मिळणार नाही ह्याची खात्री असूनही  ह्याबद्दल  कधीकधी खूप विचार करतो मी …

लहानपणापासून सत्याण्णव हजार चारशे त्रेचाळीस  पुस्तक वाचलेली असतांना  इतका चांगला कथासंग्रह  वाचनात  कसा आला नाही ह्याच मला खूप आश्चर्य वाटलं.आणि मला लंप्याची ती ओळ आठवली, “माझ्यासारखा मॅड शोधुनही सापडणार नाही. असला मॅड म्हणजे दहा गुणिले दहा भागिले शंभर! मी. एकच!”.  मग माझ्यासारखे अजूनही काही पुस्तकवेडे महाभाग असतील ज्यांची लंप्याशी ओळख झालेली नसेल  अस वाटलं आणि  त्यांच्यासाठी हा लेखप्रपंच.खरच कधीतरी अगदी मॅड सारखे काहीतरी वाचत सुटाव अस वाटल  तर लंपनच्या मॅड  भावविश्वात जरूर प्रवेश करा … एक वेगळाच मंतरलेला मॅड अनुभव तुम्हाला मिळेल…

“लंप्याच्या भाषेत सांगायच म्हणजे, ‘एकदा नाही, दोनदा नाही तर अठ्ठावीसशे तीस वेळा जरी ह्या कथा ‘ मॅड सारख्या वाचल्या’ तरी त्या ताज्याच वाटतील. एक निराळ्याच शैलीचा आणि वाचकाशी चट्कन संवाद साधून त्यालाही लंप्याच्या वयाचा करून टाकणारा कथासंग्रह मराठीत येतो आहे ह्या आनंदात मी आहे…..”- इति पुल.

 

एक अधुरी आणि खरी प्रेमकहाणी…

पुस्तकाच पहिल पान उघडल तिथे लिहल होत….

Not everyone in this world has the fate to cherish the fullest form of love.
some are born,just to experience the abbreviation of it.

म्हणजे जगात सगळ्यांनाच परिपुर्ण प्रेमाचा आनंद उपभोगण्याच नशिब लाभत नाही,तर काही लोकांचा जन्म फ़क्त प्रेमाच संक्षीप्त रुप अनुभवण्यासाठीच झालेला असतो.मग वाचायला घेतल हे प्रेमाच संक्षीप्त रुप.पुढच्या पानावर लेखकाने लिहल होत..हे पुस्तक त्या मुलीच्या प्रेमळ आठवणींना अर्पण जिच्यावर मी प्रेम केल पण लग्न करु शकलो नाही.पुढे शायरी होती.

तेरे जाने का असर कुछ ऐसा हुआ मुझपे
तुझे ढुंढते ढुंढते, मैने खुद को पा लिया…अनामिक

मग सरळ पुस्तक वाचायला सुरवात केली.अरे हो पुस्तकाच नाव राहिलच तर मी हे सगळ लिहतो आहे ते  रविंदर सिंग याच ’आय टु हॅड ए लव स्टोरी ’  पुस्तकाबद्दल जे मी कालच वाचुन काढले. आणि वाचल्यावर का माहित नाही पण खुप अस्वस्थ झालो.माझच कोणीतरी मला सोडुन गेल्यासारख वाटल होत मला काल.असो आताही थोडा एकटेपणा वाटतो आहे मन उदास झाल आहे नक्की काय ते खरच मला मांडता येत नाहिये इथे.खरतर काल हया पुस्तकाचा शेवट होता होता डोळ्यात पाणी आल होत माझ्या.( थोडा हळवा आहे मी) हया पुस्तकाचा इम्पॅक्ट आहेच तसा.

हया पुस्तकाचा लेखक रविंदर सिंग हा इन्फ़ोसिसमध्ये काम करणारा २६ वर्षाचा युवक आहे.तो काही नियमीत लेखक नाहिये त्याच आतापर्यंत तरी हे एकमेव पुस्तक. त्याने त्याच मन हलक करण्यासाठी लिहलेली  (आपल्या मनाला चटका लावुन जाणारी) त्याची प्रेमगाथा हया पुस्तकात त्याने मांडली आहे.त्यामुळेच पुस्तकाची भाषा सहज आणि सोपी आहे.पुस्तकाची सुरवात होते ती चार मित्रांच्या रियुनियन च्या प्रंसगाने.कामासाठी वेगळे झालेले कॉलेजातील हे मित्र एकत्र येतात जुन्या आठवणींना उजाळा देत देत ते लग्नाच्या मुददयावर येतात.कोणाच काही ठरल का ते एकमेकांना विचारतात.मग रविंदरचा एक मित्र त्याला शादी.कॉम बददल सांगतो.त्यानेही जाहिरात बघितलेली असतेच हया संकेतस्थळाची.मग हे माहाशय तिथे बरयाच जणींना रिकवेस्ट पाठवतात. हया संकेतस्थळावर  अस भटकतांना त्याला खुशी नावाची एक मुलगी भेटते.

पुढे एकमेकांची मोबाइल नंबरची देवाण घेवाण होते.त्यांच्यात बरयाच गोष्टी सारख्या असतात.(अगदी जन्मापासुन)आणिअस बोलता बोलता एकमेकांना न भेटताच ते एकमेकांच्या प्रेमात पडतात.हळुहळु दोघे आपापल्या घरीही हयाबाबत कळवतात.दोघांच्या घरची संमती दे्खील मिळते.दिवसामागे दिवस जातात पण दोघांची प्रत्यक्ष भेट होत नाही,कारण तो असतो भुवनेश्वरला तर ती फ़रिदाबाद्ला.मग त्याला महिन्याभरासाठी कामानिमीत्त यु.एस. ला जायच असते.त्याची फ़्लाईट दिल्लीवरुन असते.मग त्यांच तिथे भेटायच ठरते.जसा फ़ोटो आहे तशीच असेल का वैगेरे हुरहुर  लागलेली असतांनाच त्यांची भेट होते.तो तिच्या घरी जातो.यु.एस. हुन परतल्यावर तिच्या घरचे रविंदरच्या घरी येतात.साखरपुड्याची तारीख निश्चित होते.खुशी इतकी खुश असते कि मला साखरपुड्याची तयारी करायची आहे म्हणत ति त्याच्याबरोबर फ़ोनवर नीट बोलत सुदधा नाही.साखरपुड्याची तारिख अगदी जवळ आलेली असतांनाच खुशीला एक अपघात होतो.उपचार चालु असतांना ४-५ दिवसांनंतर खुशी जगाचा निरोप घेते.रविंदरला एकटा सोडुन….

हा पुस्तकाचा सारांश असला तरी पुस्तकातील बरेच प्रसंग वाचण्यासारखे आहेत.अर्ध्यापेक्षा जास्त पुस्तक वाचतांना आपण हे पुस्तक का वाचतो ते कळत नाही.पण तेच शेवटी आपल्याला सुरुवातीला वाचलेल्या प्रसंगाची आठवण आल्याशिवाय राहात नाही.रविंदरच्या भावविश्वात आपण पुर्णत: गढुन जातो. नारायण मुर्ती यांनी हे पुस्तक वाचुन दिलेली प्रतिक्रिया खुप बोलकी आहे ते म्हणतात.. “Simple,honest and touching”

तर रविंदरच्या हया संक्षिप्त  प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी हे पुस्तक जरुर वाचा…