वाढता वाढता वाढे….

काल संध्याकाळी नेहमीप्रमाणेच आमच कटट्यावरची सभा भरली होती.हो कटटयावरची लोकसभाच,आमच्या येथील बस स्टॉपचा हा कट्टा असाच कधी लोकसभेच सभागॄह तर कधी क्रिकेटच्या निवडसमीतीच बैठक स्थान अशी अनेक रुप घेत असतो.इथे अगदी सगळ आमच्या हातातच असल्याच्या आविर्भावात आम्ही विविध विषयावर चर्चा करीत असतो.मग इथे कधी संसदेतले नेते होवुन देशातील गहन प्रश्नावर,विविध धोरणांवर चर्चा,तर कधी निवड समीतीचे अध्यक्ष होवुन त्या खेळाडुला घ्यायला पाहिजे होत, हयाला काढुन टाकायला हव अशी चर्चा  तर कधी समीक्षक होवुन एखाद्या सिनेमाच विश्लेषण आमच्या बोलण्याने काही फ़रक पडत नाही हे माहित असुनसुदधा  रंगतच असत. तर  दोन दिवसापुर्वीच वर्तमानपत्रात सरकारने सरकारी कर्मचारयांचा महागाई भत्ता ८ % नी वाढवला,ही बातमी तुम्ही वाचली असेलच.हयावर आमच्या सभेतील खाजगी क्षेत्रात काम करणारा मा्झ्या  एका मित्राने ” मजा आहे बुवा तुमची “असे विधान केले.त्यावर आमच्यात झालेल्या चर्चेतील मी मांडलेले मुद्दे जसे आठवतील तसे या पोस्ट्मध्ये लिहतो.

मी त्याला म्हटल मित्रा आमचे हे वाढवलेले पैसे परत कसे घ्ययचे ते हयांना बरोबर माहित आहे आणि ते एखाद्या मार्गाने  हे वाढवलेल्या पैश्यांपेक्षा अधिक पैसे आमच्याकडुन कसे काढतील ते कळणार सुदधा नाही.आणि ही महागाई भत्ता वाढ म्हणजे अजुन पुढेही महागाई अशीच मारुतिच्या शेपटीसारखी वाढतच राहणार याचे इंडिकेशन आहे याची नोंद घ्यायला हवी.म्ह णुन मी म्हणतो हि महागाई भत्ता वाढ नको तर हया महागाईलाच कमी करा.कारण जरी दरडोई उत्पन वाढले असले तरी महागाई त्यापेक्षा कित्येक पटींनी वाढलेली आहे,जीवनावश्यक वस्तुंचे भाव गगनाला भिडत आहेत, त्यामुळे मध्यमवर्गीयांनाच जगण कठिण झालेल असतांना गरीब बांधवांची तर गोष्टच करायला नको.महत्वाचे म्हणजे हि महागाई चैनीच्या गोष्टींबाबत कमी झालेली आहे तर जगण्य़ासाठी मुलभुत गरजा असलेल्या क्षेत्रात चांगलीच फ़ोफ़ावलेली आहे.मला कळत नाही दारु,तंबाखु,कार यांसारख्या चैनीच्या वस्तुंवर भाववाढ का केली जात नाहिये. अन्नधान्याच्या किमती आकाशाला भिडत असतांना त्याचा फ़ायदाही आपल्या शेतकरी बांधवांना  हो्तो आहे अस नाही तर शेतकर्यांकडुन माल जुन्या भावाला घेउन ग्राहकांना मात्र तोच माल अवास्तव दरात देउन उद्योजक-दलाल यात आपला खिसा भरत आहेत.हा असमतोल असाच वाढत राहिला तर सर्वसामन्यांनी जगायच तरी कस…?

आंतरजालावरुन...

हया महागाईचा परिणाम व्यक्तीच्या खाजगी तसेच सामाजिक जिवनावर होतो.बायका-मुलांच्या लहानमोठ्या गरजादेखील पूर्ण करणे अशक्य झाल्याने कौटुंबिक सौख्य लाभत नाही तर तणाव वाढतच जातो.मग आजवर इमानेतबारे काम करणार्या त्या व्यक्ती समोर दोनच मार्ग उरतात, आत्महत्या किंवा चोरी .यातील काही लोक पहिला मार्ग अवलंबतात तर काहीजण आजवर जपलेल्या आपल्याच चारित्र्याचा खुन करुन दुसरा मार्ग धरतात. यामुळे एकुणच  वैयक्तिक व सामाजिक जीवनाचा नाश होतो आहे.कच्च्या तेलाचे भाव वाढत असल्याने काही दे्श पेट्रोलला पर्याय म्हणून जैविक इंधन तयार करण्यासाठी धान्याचा उपयोग करत आहेत.आपल्याच देशात कित्येक लोकांना खायला अन्न नसतांना धान्यांपासून मद्यनिर्मिती करण्यास समंती मिळते आहे.कधी अतिवृष्टी ,कधी अनावृष्टी तर कधी अवेळी पाउस या बिघडलेल्या नैसर्गीक समतोलामुळे  धान्य उत्पादन घटत आहे.साठेबाजही आपली कामगिरी चोख बजावत आहेत. त्यामुळे एकुणच धान्यपुरवठा कमी पडून जगभरात धान्याच्या किमती वाढल्या आहेत.

आंतरजालावरुन.

तसेही गेली काही वर्षे आपल्या देशात शेती क्षेत्राकडे थोडे दुर्लक्ष झाले.क्रिकेटजगतातील बक्कळ पैसे देणारे क्षेत्र आपल्या कॄषीखात्याला अधिक महत्वाच न वाटल तर नवलच. त्यामुळेच बरयाच योजना फ़क्त कागदोपत्रीच आहेत.तर काही लागु होवुन सुदधा त्यांच मुळ ध्येय गाठण्यात अपयशीच ठरल्या आहेत.मंदीतही देशाची अर्थव्यवस्था समर्थपणे हाताळणारे मनमोहन सिंग सरकार इथे मात्र क्लीन बोल्ड झाले आहे.आता त्यांना कुठेही महागाईबाबत विचारल असता ते विकासदराच्याच गोष्टी करतांना दिसतात.असंख्य लोक भुकेने मरत असतांना,चांगल्या सामाजिक मुल्यांचा र्हास होत असतांना, काही मुठभर लोकांच भल करणारा विकासदर काय चाटायचा आहे.एका बाजुला आर्थिक विकास दर तसेच सेन्सेक़्स वाढतो आहे आणि त्या बरोबरच किंबहुना अधिक प्रमाणात महागाईमुळे लोकांतील असंतोष सुदधा वाढतो आहे.मला तर वाटते मनमोहन सिंग यांनी थोड बॅकफ़ुटवर येउन लोकांच्या प्राथमिक गरजांकडे लक्ष दिले पाहिजे.हा प्रश्न दिसतो तेवढा साधा नाहि याचे भान सरकारने ठेवायला हवे.कारण हा महागाईचा भस्मासुर जर असाच सातव्या आकाशाला भिडत राहिला तर पुढे त्याचे खुपच वाईट परिणाम दिसुन येतील हे काही वेगळ सांगायला नको.आधीच दहशतवाद, भ्रष्टाचार आणि इतर समस्यांनी ग्रासलेला समाज कधी पेटुन उठेल ते सांगता येत नाही. कारण जेव्हा एखादी गोष्ट अति होते, जिवावर उठते तेव्हा होते  क्रांती….

माझे विचार आमच्या सभेतील सदस्यांना तरी पटले…यावर तुमचे विचार आणि मत अवश्य कळवा…

(मागे या माहागाईची आरती वाचनात आली होती.छान आहे इथे भेट देउन पहा)