आयत्या बिळावर नागोबा…


खर तर अश्या घटना माझ्या बाबतीत खुप कमी होत असतात म्ह् णुन हि घटना  ब्लॉगजगतातील मित्रांसमोर मांडण्यापासुन स्वत:ला रोखु शकलो नाही.तर त्याचे झाले असे आमच्या इथे नुकताच क्रिकेटची इंटरसेक्शनल स्पर्धा होती. १६ संघाच्या समावेश असलेली ही स्पर्धा तब्बल दोन महिने चालली.आमच्या  बसमध्ये, ऑफ़िसमध्ये, कँटीनमध्ये हया स्पर्धेबाबतच बोलल जात होत.हया स्पर्धेने एकुणच वातावरण भारावुन गेल होत.अस सगळ असल तरी हया स्पर्धेशी एखाद-दोन सामन्यांना जाउन थोडा आरडाओरडा (चीअर अप) करण्या पलिकडे माझा काही विशेष संबध न्वहता.कारण क्रिकेट खेळण सोडुन आता ३ वर्षे झाली होती.

हे लिहत असतांनाच ते लहानपणाचे दिवस आठवले.क्रिकेटला सर्वस्व अर्पण केलेले…हो खरच जळी-स्थळी फ़क्त क्रिकेटच दिसायच असे ते दिवस होते.क्रिकेटर्सची वर्तमानपत्रात,मासिकात येणारी छायाचित्रे कापुन वहिवर चिकटवायचो.माझ्या अश्या ४-५ दुर्मीळ   : )  संग्रह वहया तयार झाल्या होत्या.(त्यातली एक आतासुदधा आहे माझ्याकडे ) शाळेच्या दप्तरातसुदधा अभ्यासाची एखादी वही विसरली जायची पण एकतरी संग्रहवही आठवणीने घेतली जायची.आमच्या वर्गातल्या मुलींमध्येही क्रिकेटची खुपच क्रेझ होती.त्यामुळे आमच्या हया छंदाला विशेष खतपाणी मिळाल होत …  🙂 कधी क्रिकेटचे सामने सुरु असले की दुपारच्या सुट्टीत डब्बा (म्हणजे डब्ब्यातील अन्नपदार्थ …स्टीलाहारी नाहिये हो मी.. 🙂 ) कसातरी झटपट खाउन बाहेर एका दुकानात जाउन मिळेल तेवढा सामना बघण्यात काय मजा यायची..अहाहा..शाळेतुन घरी आल्यावरही लगेच मैदानावर धाव घेतली जायची.तेव्हा बिगफ़न आणि सेंटरफ़्रेश हया च्युईंगम सोबत क्रिकेटपटुंचे येणारे ट्रंप कार्ड जमा करण्यासाठी ती च्युईंगम आवडत नसुन सुदधा (बिग बबल,बुमर ही त्यावेळची आमची आवडती च्युईंगम) खायचो.षटकार हे साप्ताहिक,शनिवारी सकाळ मध्ये येणारी ’ जल्लोष’ ही क्रिकेटविषयक पुरवणी वाचतांना जो आनंद मिळायचा तो अवर्णनीय…

रविवार तर काही विशेष असायचा.अगदि शुक्रवार-शनिवारपासुनच रविवारचे डोहाळे आम्हाला लागायचे.मग रविवारी  पहाटे ०९ ला उठुन 🙂 इतर क्षुल्लक गोष्टी कशातरी आटपुन स्वारी वळायची ती मैदानावर.कधी क्रमांकाने,कधी आमच्यातच दोन टीम करुन तर कधी बाहेरच्या संघाबरोबर अस क्रिकेट रंगायच.रविवारी फ़क्त जेवायला घरी जायचो आणि जेवल्यावर परत मैदानावर.क्रिकेटची नशा-धुंदी अशी असायची कि त्या वर तळपणारया आगीच्या गोळ्यालाही आम्ही जुमानायचो नाही.तो आग ओकणारा सुर्यदेव आम्हाला तापवायचा-थकवायचा अथक प्रयत्न करुन शेवटी स्वत:च थकुन मावळतीला जायचा पण आमचा खेळ चालुच असायचा.आमच्याइथे असलेल्या टेनिसकोर्टवर रात्री बॉक्सक्रिकेटही रंगायच.तसे त्यावेळी बरेच मैदानी खेळ खेळायचो काही तर आमच्या सुपिक डोक्याच्या पोतडीतुनही काही खेळ तयार होत.त्या सगळ्यांवर लिहायला गेल तर एक स्वतंत्र पोस्ट होइल.टाकेन कधी वेळ काढुन त्यावर एक पोस्ट कारण त्यातले बरेचसे खेळ आजच्या पिढीला माहित नसतीलच.

असो तर इतके खेळ खेळुनही आम्ही ’ दिल’ दिल होत ते या क्रिकेटलाच.अस रात्रंदिवस विविध खेळ खेळुन सुदधा आमचा शैक्षणिक विकास कधी खुंटला न्वहता.१ ली ते सातवीपर्यंत आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मी कधी पहिला क्रमांक सोडला न्वहता.पुढे मात्र काही मुलींचा पिच्छा पुरवावा लागला.चांगलीच दमछाक केली त्यांनी माझी 🙂 अहं म्हणजे तसा नाही हो.मुलांमध्ये मी पहिल असायचो पण वर्गात नाही. दहावीलासुदधा आमच्या रा.हि.सावे विद्यालयात मुलांमध्ये मी पहिला होतो पण सर्वांमध्ये सातवा. 😦 पुढे बारावीला मात्र मी थेट तिसर्या क्रमांकावर झेप घेतली.तसेच भौतिकशास्त्र आणि मराठी या दोन विषयात कॉलेजध्ये पहिला होतो.  तुम्हाला वाटेल काय हा उगाचच स्वत:ची स्तुती करत बसला आहे पण त्याच काय आहे वरील उनाडक्या वाचल्यावर उगाचच आमच्याबद्दल कोणाचा काही गैरसमज होवु नये ना म्हणुन हे स्पष्टीकरण. ( मिल गया मौका मार दिया चौका दुसर काय…तशी काही गरज न्वहती हे लिहायची.. पण असच मनात आल…ब्लॉग आपला आहे ..की बोर्ड समोर आहे..मग स्वत:च्या दैदिप्यमान 🙂 कर्तुत्वाची ओळख नको का करुन द्यायला आपल्या ब्लॉगमित्रांना…) हे सगळ आता लिहता लिहता अगदि उत्स्फ़ुर्तपणे लिहल गेल आहे तेव्हा हे तुम्हाला जर वाचायच नसेल तर आता नाही वाचल तरी चालेल. 🙂

सध्या तर सगळीकडे आयपीएलचे वारे वाह्त आहेत.कधी कधी अस होत की आपल्याला एखादा मित्र भेटतो पण हाय-हेल्लो आणि इकडच-तिकडच थोडफ़ार बोलण झाल्यावर पुढे काय बोलायच हे सुचत नाही,त्यावर सध्या आयपीएल हे जालीम औषध आहे.अरे कालची मॅच पाहिलिस का…? हा प्रश्न तुम्हाला पुढे बराच वेळ तुमच्या मित्राबरोबर गुंगवुन ठेवतो.मी सुदधा सध्या या आयपीएलच्या  ’फ़िवरने ’ आजारी पडलो आहे किंबहुना या आयपीएलच्या नशेमुळेच मी ब्लॉगजगतापासुन आणि जेणेकरुन तुमच्यासारख्या ब्लॉगर मित्र-मैत्रीणींपासुन दुरावलो आहे.तरीही दोन गो्ष्टी मला खटकतात त्या म्हणजे मार्चमध्ये होत असलेल या स्पर्धेच आयोजन आणि मनोरंजन करापासुन या स्पर्धेची मुक्तता.तुम्हाला माहिती आहेच आपल्या इथे बहुतांशी वार्षीक परीक्षा या काळातच असतात.आणि आयपीएल सामने म्हणजे बहुतेक मुलांचा जीव कि प्राण.त्यामुळे साहजिकच परीक्षेचा अभ्यास करतांना त्यांच लक्ष इथेच वळत असते.माझ्या काकांच्या मुलाची आता परीक्षा चालु आहे आणि ते महाशय आयपीएलचा एकही सामना सोडायला तयार नसतात म्हणुन हे लिहावस वाटल.असे बरेच विद्यार्थी असतील याबाबतही वाद नाही.तेव्हा या स्पर्धेच आयोजन १५ एप्रिल नंतर केल तर उत्तम अस वाटते.आपल्याला वाटुन काय होते पण इथे वर्डप्रेसने चकटफ़ु ब्लॉग दिला असल्याने मला जे वाटल ते लिहल.तसेही आता मिक्सर आल्यामुळे वाटायचे दिवस गेले आहेत. 🙂

आठवणींच्या हिंदोळ्यावर झोके घेत या पोस्टच्या मुळ विषयापासुन बराच भरकटत गेलो.लिहायला घेतल तेव्हा एकच घटना समोर होती पण लिहतांना माझे मन उधाण वारयाचे  जिथे जात होते ते खरडत राहिलो  तेव्हा आता या अथांग मनाला आवर घालत ज्यासाठी हि पोस्ट लिहायला घेतली तिथे वळतो.तर त्याच झाल अस कि हया वर उल्लेख केलेल्या स्पर्धेच्या उपउपांत्य सामन्याच्यावेळी आमच्या संघातले ३ खेळाडु उपलब्ध न्वहते.आणि एक जागा तशीही खाली होती संघात.तेव्हा मला खेळणार का म्ह णुन विचारल गेल.मी त्यांना स्पष्ट शब्दात सांगीतल मी गेल्या तीन वर्षात क्रिकेटच्या मैदानात उतरलेलो नाही.तरीही त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवत मला संघात घेतल. तो सामना आम्ही अगदि सहज जिंकला.त्यात माझी काही उल्लैखनीय कामगिरी न्व्हती. काही जण तर मला चिडवत पण होते कि नुसत उन्हात क्षेत्ररक्षण करायला संघात घेतल म्हणुन.मी सुदधा त्यांना संघासाठी वाटेल ते अस म्हणत २-४ डायलॉग ऐकवले होते. तर हाच आमचा संघ पुढे अंतीम विजेता ठरला.आणि ’त्या ’ सामन्यामुळे मी अगदि ऑफ़िशीअली संघाचा सदस्य झालो होतो.मग काय मिळाली फ़ुकटची प्रसिद्धी.जिंकलेल्या संघाचा सदस्य असल्याने आमच्या केंद्र निर्देशकांच्या हस्ते सगळ्यांसमोर वैयक्तीक बक्षीस (आमच्या घरात आलात तर समोरच भिंतीवर एक टोल वाल घड्याळ तुमच्या नजरेस पडॆल तेच हे बक्षीस), जिंकलेल्या चषकासोबत जल्लोष वैगेरे.शिवाय हया सर्व घटनांचे फ़ोटो आता आमच्या इन्ट्रानेटवरही टाकले जातील.

तेव्हा्च माझ्या मनात विचार आला होता ज्यासाठी दोन महिने या मैदानात २२६ खेळाडु झटत होते ते मला अगदि काहीही न करता मिळाले होते.पुर्वानुभवाप्रमाणे  बर्याच गोष्टीमध्ये अगदि जीवापाड मेहनत करुन सुदधा त्याच योग्य फ़ळ मला मिळाल नाहिये…पण यावेळी मात्र देवाच्या (मी नाही तो वरचा सर्वव्यापी ईश्वर) कॄपेने  मी अनपेक्षीतपणे  ’आयत्या बिळावर नागोबा  ’ झालो आहे…

Advertisements

9 thoughts on “आयत्या बिळावर नागोबा…

  1. तेच म्हटल कुठे होतात आपण इतके दिवस…साहेब क्रिकेट विश्वात गेला होतात तर 🙂
    जसा तू क्रिकेट वेडा तसा मी पण. शाळेत असताना चित्रकलेची मोठी वही फक्त फोटो चिटकवून भरून जायची. पोस्ट वाचून एक मात्र कळला, हुशार आहेस की मित्रा अभ्यासात तू 🙂 लगे रहो 🙂

    • तसा नेहमीच कुठेतरी व्यस्त असतो मी पण त्यातुन वेळ काढुन ब्लॉगला देतो तोच वेळ आता क्रिकेटला दिला जातो आहे…बाकी तो सगळा आता इतिहास आहे मित्रा… 🙂

  2. पिंगबॅक ’नेटभेट’ मध्ये मी…… « दवबिंदू

  3. मला अगदी सारे आमच्या घरातलेच वाचतेय असे वाटत होते…. 🙂 बाकी शिर्षक एकदम पर्फेक्टच आणि पुन्हा एकदा अभिनंदन!

टिप्पण्या बंद आहेत.