व्हर्टीकल लिमिट…


एक घार आकाशात उडते आहे. उडत उडत तिची सावली एका अगदी सरळ उंच कडयावर पडते.त्या कडयावर पाच गिर्यारोहक वर चढत असतात.त्यात एक बाप,त्याचा मुलगा-मुलगी आणि दोघे इतर.मुलगा त्या घारीचा फ़ोटो काढतो.बाप आणि मुलगा(पीटर)-मुलगी(ऍनी) एकमेकांशी गप्पा मारत वर चढत आहेत.इतक्यात वरचा गिर्यारोहक अचानक सटकुन खाली येतो.सगळे एकमेकांशी दोरीने बांधलेले असल्याने एकामागोमाग सगळे खाली सटकतात.मुलाचा कॅमेरा खाली पडुन फ़ुटतो.शेवटी असलेली मुलगी केवळ सटकत नाही आणि खाली दोरीला हे चार जण लटकलेले.अचानक त्या मुलीला मिळालेला आधार त्या खाचेतुन सटकतो आणि खालच्या खाच्यात अडकतो पण हया धक्क्याने खालचे दोन गिर्यारोहक खाली पडतात.आता मुलगी तिच्या खाली तिचा भाउ आणि खाली वडील असे तिघेच राहतात. ती मुलगी दुसरया खाचेत हुक अडकवायचा अयशस्वी प्रयत्न करत असते.दरम्यान वरचा हुक देखील निसटत आलेला पाहुन वडील मुलाला दोरी कापायचा आदेश देतात.तो तयार होत नाही तेव्हा ” तुला तुझ्या बहिणीला मारायच आहे का…? दोरी काप..” अस ओरडतात.वरुन बहिण ओरडतेय “अस नको करुस…अस नको करुस..” खालून बाप ओरडतोय “दोरी काप… दोरी काप…”आणि अशात शेवटी तो मुलगा दोरी कापतो.बापाचा  मॄतदेह निपचीत खाली जमिनीवर पडतो.

चित्रपटाची सुरुवात होते ती अशी…आपल्या हृदयाचा ठाव घेणारी.चित्रपटाच नाव आहे ’ व्हर्टीकल लिमिट ’.२००० साली आलेला मार्टीन कॅम्प्बेल(कसिनो रोयाल,मास्क ऑफ़ ज़ोरो,गोल्डन आय) हयांनी दिग्दर्शीत केलेला एक साहसपट.काल सकाळी बीएसएनएलच नेट नेहमीप्रमाणे अचानक बंद पडल आणि बाहेर पाउस चालु होता.मग एखाद सिनेमा पाहु असा विचार मनात आला आणि केबलवर हा चित्रपट चालु होत होता.खरतर आधीही पाहिला होता पण अर्धाच.मग काल एकदा पाहायला घेतल्यावर जागचा हललो नाही.खुपच सुंदर सिनेमा आहे.ऍडवेंचर्सनी आणि थरारक दॄश्यानी भरलेला.. मग संपुर्ण चित्रपट पाहिल्यावर वाटल हयाबद्दल ब्लॉगवर लिहूया आणि ही पोस्ट लिहायला घेतली. हया वरच्या घटनेनंतर आपल्या बापाच्या मॄत्युला भाउच जबाबदार आहे अस मानुन ऍनी पीटरशी अबोला धरते.पीटर हया प्रसंगानंतर गिर्यारोहण सोडुन देतो व एक वन्यजीव -छायाचित्रकार बनतो.ऍनी मात्र गिर्यारोहण चालु ठेवुन एक नामांकीत गिर्यारोहक बनते. ऍनी पुढे एका श्रीमंत उद्योजक वॉन हयाने प्रायोजीत केलेल्या पाकिस्तानातील के-२ हया  शिखरावर चढायच्या कार्यक्रमात भाग घेते.वॉन स्वत:ही के-२ चढणार असतो.के-२ जगातील दुसरया क्रमांकाचे उंच शिखर असले तरी तेथील दुर्गम वातावरणामुळे काठीण्य़पातळीवर पहिल्या क्रमांकाला असल्याने ते चढुन वॉनला आपल्या कंपनीला ’ प्रमोट ’ करायचे असते.हे कळल्यावर पीटर बेस कॅम्पवर ऍनीला भेटतो.ती त्याला म्हणते “आपले वडील एक खरे गिर्यारोहक होते.एक खरा गिर्यारोहक कुठे राहण पसंत करत असेल… मी प्रसिद्धीसाठी के-२ चढत नाहिये तर मी चढते आहे ते वडिलांसाठी….”

के-२ चढायचा त्यांचा कार्यक्रम चालु असतांनाच पीटरच्या प्रयत्नांमुळे एक मोठ वादळ येत असल्याच त्यांना कळत.टॉम मॅक्लेरेन ज्याच्यावर हया कार्यक्रमाची जबाबदारी असते तो वॉनला परत फ़िरण्याबाबत सांगतो.पण  वॉन वर चढायचा हट्ट सोडायला तयार होत नाही व जबरदस्ती टॉम आणि ऍनीला पण तसे करायला प्रवॄत्त करतो.मग व्हायचे तेच होते ती लोक त्या वादळात सापडतात आणि एका हिमगुहेत अडकुन पडतात.टॉम हया वादळात गंभीर जखमी होतो.बेसकॅम्पशी त्यांचा संपर्क तुटतो.मग वडिलांनी शिकवलेल्या कोडसनुसार ऍनी रेडियोद्वारे खाली हयाबाबत संदेश पाठवते आणि पीटर त्याबाबत सर्वांना सांगतो.हिमगुहेत अडकुन पडलेल्यांना वाचवायल पीटर एक रेस्क्य़ु टीम बनवायचे ठरवतो हयात स्कीप, मोनिक, करीम, सीरील आणि माल्कम ही जिंदादील जोडी त्याच्याबरोबर यायला तयार होतात.पुढे विक हया जगातल्या सर्वोत्तम गिर्यारोहक त्यांना भेटतो.ज्याने आधीही के-२ अनेक वेळा सर केलेल असते.विक स्कीपला खालुनच मार्गदर्शन करायला सांगतो.मग पीटर-वीक,मोनिक-सीरील,करीम-माल्कम अश्या जोड्या बनवुन हे सहाजण के-२ चढायला निघतात.दरम्यान वॉन स्वत:साठी डेक्स (जीवनावश्यक औषध ) वाचवण्यासाठी टॉमचा खुन करतो.एव्हाना ऍनीही खुप आजारी पडते आणि पीटरला संदेश पाठवते, “तु मेलेला मला चालणार नाही.मला वचन दे तु इथे येणार नाहीस.लवकर  परत खाली जा…”

त्यानंतर अनेक संकटाना तोंड देत पीटर ऍनीचे प्राण कसे वाचवतो..? वडिलांच मरण पीटरला परत जसच्या तस कस अनुभवायला मिळत…? हे सिनेमातच पाहिलेल बर…अनेक साहसदॄश्याने नटलेला व हिमशिखरांची विहंगम साथ लाभलेला हा सिनेमा खरच पाहण्यासारखा झाला आहे.मी हॉलीवुडचे जास्त सिनेमे पाहिले नाहीत त्यामुळे हया चित्रपटातील अभिनेत्यांची नावे माहित नाही (पीटरचा चेहरा ओळखीचा वाटतो) पण सर्वांनीच छान अभिनय केला आहे.बर्याच दृश्यांच सादरीकरण अस झाल आहे कि सिनेमातील थंडी आपण प्रत्यक्ष अनुभवतो.बहिण-भावाच्या भावनीक नातही छान गुंफ़ल आहे हया सिनेमात.के-२ पाकिस्तानात असल्याने “ये क्या बकवास है”,तुम तो अंधे नही हो,मै इसका क्या करु” असे हिंदी संवादही चित्रपटात आहेत.तसेच चित्रपटात भारताचा उल्लैखही आहे.सकाळी तीन वाजता पाकिस्तानातील मेजर रसूल “इटस टाइम टु वेक-अप इंडियन्स” अस म्हणत तोफ़ा चालवायला लावतात. तसेच मेजर रसूल भारतीय चहाची स्तुती करतांना्ही दाखवले आहेत.त्यांच्या तोंडी संवाद आहेत “चहा घेणार का..अर्थातच भारतीय..आमच युदध आहे, पण भारतातील चहा सर्वोत्तम आहे हयाबाबत वाद नाही…”    सुरुवातीला मी वर्णन केलेल्या दॄश्याचा विडियो खाली जोडत आहे.तुम्ही  हा सिनेमा पाहिला नसेल तर तो विडियो पाहुन तो पाहण्याची उत्सुकता तुम्हाला जरुर वाटेल.

तर अश्या  अनेक थरारक प्रसंगांच्या सोबतीने के-२ शिखर चढण्याचा अनुभव घेण्यासाठी एकदा तरी  ’व्हर्टीकल लिमिट’  जरुर पहा.

Advertisements

20 thoughts on “व्हर्टीकल लिमिट…

 1. माझ्या आवडत्या चित्रपट लिस्टींग मध्ये असलेला हा एक सिनेमा..
  एकदम थ्रिलिंग अनुभव आहे. प्रत्येकाने बघायलाच हवा..

 2. सही.. मी पण हा पिक्चर बऱ्याच वर्षांपूर्वी टीव्हीवर बघितला आहे. जाम आवडला होता तेव्हा. पण आता बराच विसरलो आहे.. टाकतो डालोला.

 3. “व्हर्टीकल लिमीट” हा गिर्यारोहणावर आधारीत चित्रपट माझ्या सर्वाधिक आवडीचा आहे.आता पर्यंत कमीत-कमी १० वेळा तरी नक्कीच बघितला असेल.सर्वच कलाकारांचा अजोड अभिनय,सशक्त कथानक,काराकोरम रांगेतील अप्रतिम आणि थरकाप उडवणारी सिनेमेटोग्राफी अशा अनेक गोष्टींमूळे व्हर्टीकल लिमीट बघणारया प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेतो.

 4. आयला,
  हा डेडली दिसतोय…खूपदा पहायला मिळत होता..पण टाळला…का माहित नाही..करंटेपणा म्हणतात तो असावा…
  असो..पहायलाच हवा आता! धन्स रे..

  • स्वप्नील दवबिंदुवर स्वागत आणि प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद…
   माझ्याही मनात आला होता हा प्रश्न आणि एका मित्राबरोबर हया पिक्चर बद्दल बोलतांना मी बोललोही होतो त्याला…

 5. अरे सहीच चित्रपट आहे…खूप वेळा पाहिला आहे!!!
  पोस्ट मस्त झाली आहे…… +1

  (Marathi typing ha aai kadachya laptopcha problem asalyamule halli mjhya comments barechada Ctrl C valya aahet 🙂 )

टिप्पण्या बंद आहेत.