धगधगती पस्तीस वर्षे….


आज १५ ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्यदिन… स्वातंत्र्यदिनानिमीत्त तुम्हा सर्वांना हार्दिक शु्भेच्छा…

स्वातंत्र्यदिनाबरोबरच अजुनही एक महत्वाची घटना आजच्या दिवसाला ३५ वर्षापुर्वी घडली होती.तर आजपासुन बरोबर पस्तीस वर्ष आधी त्याचा जन्म झाला.बाळ चांगल गुट्गुटीत होत पण पहिल्या दोन आठवड्यात ते अस आजारी पडल कि सर्वांनी त्याची आशाच सोडली होती.पण त्यानंतर त्या बाळाने अशी काही झेप घेतली कि आज ३५ वर्षानंतरही ते अगदि चिरतरुण राहिल आहे.हुशार वाचकांना ऐव्हाना लक्षात आल असेलच मी कशाबद्दल बोलतो आहे ते.मी इथे लिहत आहे ते १५ ऑगस्ट १९७५ साली प्रदर्शीत झालेल्या आणि अवघ्या हिंदी चित्रपटसॄष्टीतील आख्यायिका बनलेल्या शोले सिनेमाबद्दल…हो तोच जय-वीरुचा शोले,ठाकुर-गब्बरचा शोले,बसंती- धन्नोचा शोले,कालिया-सांबाचा शोले…सुरुवातीला अगदि टोकाची टिका सहन करायला लागलेला व फ़्लॉपचा शिक्का बसलेला हा चित्रपट पुढे लोकांनी मात्र  इतका डोक्यावर उचलला कि त्याने हिंदी चित्रपटजगतात एक नविन इतिहास रचला.शोले च्या यशात  सर्वात जास्त कारणीभुत होती ती गोष्ट म्हणजे माउथ पब्लीसीटी…

खरतर शोले हया सिनेमाचा आवाका इतका आहे कि त्यातील प्रमुख नट तर सोडाच पण अगदि अल्प काळ पडध्यावर वावर असलेले सांबा,मौसी,सुरमा भोपाली हयासारखी सगळीच पात्र आपल्या चांगलीच लक्षात राहतात किंबहुना हया चित्रपटानंतर बर्याच अभिनेत्यांना हया चित्रपटातील व्यक्तीरेखांच्या नावावरच ओळखले जाउ लागले.यातील गब्बर,ठाकुर,जय, वीरु, बंसती,धन्नो,कालिया, सांबा अश्या सगळ्याच व्यक्तीरेखा हिंदी सिनेमात अजरामर झाल्या आहेत.

तस पाहायला गेल तर काय होत हया सिनेमात. एक डाकू एका पोलिस अधिकार्‍याच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या करतो. मग तो पोलिस  दोन भुरट्या चोरांच्या  मदतीने त्या डाकुचा सूड घेतो.बस एवढच, पण हयादोन ओळीच्या कथेला सलीम जावेदची मजबुत पटकथा ,आरडींच सुरेख संगीत,चित्रीकरण, लोकेशन्स,चुरचुरीत संवाद,ते संवाद फ़ेकण्याची विविध पात्रांची लकब-शैली,बहुढंगी पात्रे आणि त्यांचा जोरदार अभिनय, आणि एवढ्या मोठ्या स्टारकास्टची अगदि व्यवस्थीत हाताळणी यांची जोड लाभल्यामुळेच शोले अफ़ाट लोकप्रियता मिळण्यास पात्र ठरला.

शोलेचा प्रभाव असा आहे कि हा चित्रपट सिनेमा आवडत नसलेल्यानी पण  एकदातरी तो पाहिला असेलच,आणि सिनेमा आवडणार्यांनी तो फ़क्त एकदाच पाहिला असेल असे मला वाटत नाही. हयातल्या अमिताभच्या मृत्युमुळे कितीतरी लोक चित्रपटगॄहातच रडल्याच सांगीतल जाते.मला आठवतय मी जेव्हा लहानपणी शोले पहिल्यांदा पाहिला होता तेव्हा त्याप्रसंगी मलाही खुप गहिवरुन आले होते.(पण मी रडलो नव्हतो हं .. 🙂 ) हया चित्रपटाच्या पहिल्या आठवड्याच्या प्रतिसादानंतर अमिताभ कभी कभी च्या सेटवर शशी कपुरच्या खांद्यावर डोक ठेवुन ’पिक्चर डुब गई’ म्हणून रडला होता.छोटासा रोल केलेल्या सचिनने सिप्पींकडुन पैसे घ्यायचे नाकारले तेव्हा त्यांनी बळजबरीने त्याला तेव्हा ए.सी. भेट दिला होता. जय वीरूच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी बसंतीच्या मौसीकडे जातो तो प्रसंग सलीमजावेदच्या खरया आयुष्यातला होता.जावेदसाठी हनी इरानीच्या आईशी बोलणी करण्यासाठी सलीम अश्याच प्रकारे गेला होता.तसेच पिक्चरच्या क्लायमॅक्सला जय मरणार नव्हता. अश्या बर्याच आख्यायिका हया चित्रपटाशी जुळलेल्या आहेत.

शोलेतील गाण्यांच्या बाबतीत बोलायच झाल तर आरडींनी तसेच किशोर कुमार हयांनी आपल्याला एकदम खुश केल आहे हया चित्रपटात.  यारी दोस्तीच्या गोष्टी आल्या कि  ’ये दोस्ती हम नही’ शिवाय त्या पुर्ण होत नाहीत.होळीला  ’होलि के दिन’ चांगलच चिटकलेल आहे.’कोइ हसिना जब’ हे अल्लड गीत आणि ’महबुबा ओ महबुबा ’ हे त्यावेळच सुपरडुपर आयटम सॉंग ही छान जमली आहेत.तसच “बसंती इन कुत्तो के सामने मत नाचना ” हया वीरुच्या दमदार डॉयलॉगची साथ लाभलेल,गब्बरच्या अड्ड्यावर जमीनीवर विखुरलेल्या कांचावर हेमामालिनीच नृत्य असलेल ’ जब तक है जान ’ कोणी विसरेल का.गाण्यांबरोबरच चित्रपटाच पार्श्वसंगीतही तेवढच जबरदस्त आहे.अमिताभच एकांतात वाजवलेल ते माउथ ऑरगन आजही मला खुप आवडते.

चित्रपटातील संवादाबद्दल तर बोलायलाच नको.शोलेतले बरेचसे संवाद घरात,ऑफ़िसात गप्पांमध्ये सर्रासपणे येत असतात.’कितने आदमी थे’ ,’इतना सन्नाटा क्यो है भाई ’, ’मौसीजी’,’जो डर गया, समझो मर गया’,’ ये हाथ नही फासी का फंदा है’,’ ये हाथ मुझे दे दे ठाकूर’,’आधे दाये जाओ, आधे बाये जाओ, बाकी मेरे पीछे आओ’,’ तुम्हारा नाम क्या है बसंती? ’ हे ’पचास पचास कोस दूर गाव मे जब बच्चा रोता है, तब उसकी मां कहती है, बेटा सो जा, नही तो गब्बर आ जायेगा ’ ,’ये भी बच गया ’,‘ये रामगडवाले कौनसी चक्की का आंटा खाते है‘ असे सगळेच संवाद एकाहुन एक भन्नाट शैलीत चित्रपटात आपल्याला पाहायला मिळतात.हयातले कितीतरी संवाद बोलतांना म्हणीप्रमाणे वापरले जातात इतके ते जनमानसात रुळले आहेत. शोलेच्या यशात त्यातील संवादाचा खुप मोठा वाटा होता हे कोणीही नाकारणार नाही.

आज इतक्या वर्षांनीही ‘शोले‘ ताजा वाटतो, हेच ’ शोलेच ’ सर्वात मोठ यश आहे.कोणाला त्यातील हाणामारी आवडते कोणाला त्यातील संवाद ,तर कोणाला जय-वीरुची मैत्री, कोणाला धर्मेंद्र-हेमाच रांगड प्रेम, तर कोणाला अमिताभ जयाच मुक प्रेम,कोणाला गब्बरची दहशत पण अश्या सगळ्यांनीच शोले वर मनापासुन प्रेम केल.त्याकाळात ५०-६० लाखात चित्रपट बनत असतांना तब्बल दिड-दोन कोटींची ’ रिस्क’ घेउन ही कलाकृती निर्माण करणारया सिप्पींना आपला सलाम.अस असल तरी १९७५ साली फिल्मफेअर पुरस्कारात  ‘शोले‘च्या वाट्याला एकमेव सर्वोत्कृष्ट संकलनाचा पुरस्कार आला.त्याच फिल्मफेअरने  आता  ‘५० वर्षांतील सर्वोत्कृष्ट चित्रपट’ म्हणून या चित्रपटाला गौरविले.बी.बी.सी.ने या चित्रपटाची शतकातील एक सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून निवड केली आहे.एवढच काय सीबीएसई च्या पाचवी इयत्तेत शोले वर एक धडा दिला गेला आहे.हयासंदर्भात मागे शोलेची प्रश्नपत्रिका मेलमध्ये आली होती ति इथे चिटकवतो.

सूचना :
१. एकूण ८ प्रश्न असतील. (आदमी १ और प्रश्न ८!!)
२. सर्व प्रश्न सोडवणाऱ्याला पचास हजार इनाम दिले जाईल.

प्रश्न १ : खालीलपैकी एका विषयावर ४ पाने निबंध लिहा ….(१५ हजार)
* धन्नोची स्वामीनीनिष्ठा
* खरा नायक कोण : जय की विरू?
* मी गब्बर असतो तर?
* रामगढचे निसर्गसौंदर्य

प्रश्न २ : खालीलपैकी २ प्रश्नांची उत्तरे २ ते ३ पाने लिहा……(१० हजार)
* ठाकूर बल्देव सिंग आणि डाकू गब्बर सिंग यांच्यातील दुश्मनीची कारणे सांगा. तसेच ठाकूरने गब्बरला पकडण्यासाठी जय आणि विरू यांचीच निवड का केली?
* गब्बरने रामगढच्या वासीयांवर केलेले अत्याचार तुमच्या शब्दांत सांगा.
* जयने विरूसाठी केलेला त्याग उदा: दोन्ही बाजूला समान छाप असलेल्या नाण्याचा वापर आणि जय- विरूची दोस्ती यावर चित्रपटाएवढे प्रदीर्घ उत्तर लिहा.
* विरू आणि बसंतीची प्रेमकहाणी.

प्रश्न ३ : टीपा लिहा. शब्दमर्यादा- रेल्वे स्थानकापासून ते रामगढपर्यंत बसंतीने जितक्यावेळा “यूं तो हमे फ़िजूल बात करने की आदत नही ” म्हटले आहे तितकी……………………………………………..(८ हजार)
* सूरमा भोपाली आणि जेलर यांचे विनोद .
* विरूचे मद्यप्राशन करून जलकुंभारोहण.
* रामलाल: एक आदर्श निष्ठावंत.
* होळी उत्सवातील नाट्यमय घडामोडी.

प्रश्न ४ : एका वाक्यात उत्तरे द्या …………………………….(२ हजार)
* जय नेहमी कोणते वाद्य वाजवत असे ?
* बसंती चांगला नवरा मिळावा म्हणून कोणत्या देवाची प्रार्थना करत असे?
* जय-विरूला पकडून देण्यासाठी सरकारने किती इनाम लावले होते?
* अहमद-इमामचा मुलगा नोकरीसाठी कोणत्या गावी जात असतो? (ही हा हा कसं वाटतंय पेपर सोडवताना )

प्रश्न ५: गाळलेल्या जागा भरा. ……………………………….(६ हजार)
*ये हात मुझे दे दे…………….. . (टीप: नीट विचार करा. हात देण्याआधी नव्हे. उत्तर लिहिण्याआधी)
*तुम्हारा नाम क्या है………………….?
*तेरा क्या होगा ,………………..?
*अरे ओ ……….. कितना इनाम रखे है रे सर्कार हमपे?
*चल ……… आज तेरी ……….. की इज्जत का सवाल है। (टीप : दोन गाळलेल्या जागा आहेत. दोन उत्तरे आहेत. दोघींच्या इज्जतीचा सवाल होता. त्यामुळे फ़क्त दोन उत्तरे ओळखली तरी पूर्ण गुण मिळतील.)

प्रश्न ६ : कोण कोणास म्हणाले ते लिहा. ……………………..(३ हजार)
* इतना सन्नाटा क्यूं है भाई?
* लोहा गरम है मार दो हथोडा।
* यूं तो १० -२० को तो हम भारी पड ही सकते है।
* सूंअर के बच्चो।
* हमारी जेल मे सुरंग???
* पहली बार सुना है ये नाम।

प्रश्न ७: खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर द्या. ……………(४ हजार)
* गब्बरला पकडण्यासाठी वर्तमानपत्रामध्ये जाहीरात द्यायची आहे. त्याचा मसुदा तयार करा. ( शब्दमर्यादा: इनामाची रक्कम /१०००)
* गावकऱ्यांना धमकावण्यासाठी गब्बरला एक पत्र/चिठ्ठी तयार करून द्या .

प्रश्न ८: समजा रामगोपालवर्मा ऎवजी तुम्हाला शोले चा रिमेक बनवायची संधी दिली आहे . त्या अनुषंगाने खालील प्रश्नांची उत्तरे द्या. उत्तरे चांगली असतील तर सरदार साबासी देगा……………………………..( ५ हजार)
* बसंतीच्या घोड्याचे/घोडीचे नाव काय ठेवाल?
* रामलालला ५व्या वेतन आयोगानुसार बढती/पगारवाढ द्याल काय?
* विरूला पाण्याच्या टाकीऎवजी कुठे चढवाल?
* जयला बनावट नाणी वापरल्याबद्दल जेलमध्ये टाकाल काय?
*हा प्रश्न तुमच्यासाठी राखीव, तुमच्या निर्मितीक्षमतेसाठी. काहीही उत्तर द्या

हया चित्रपटात  गब्बरची भुमिकेसाठी खरतर संजीवकुमारने हट्ट केला होता पण सिप्पींनी तो रोल डॅनीला ऑफ़र केला होता.पण गब्बर होण्याच भाग्य अमजद खानच्याच नशिबात लिहल होत.त्यानेही ही व्यक्तीरेखा अशी साकारली, अशी जिवंत केली की त्या गब्बरसिंगला हिंदी चित्रपटसॄष्टी कधीच विसरणार नाही.खलनायकाच पात्र असुनही इतकी लोकप्रियता मिळवणारा हा विरळाच.पुढे अमिताभही हया गब्बरच्या प्रेमात पडला त्यातुनच चित्रपटरसिकांसाठी अगदि थर्ड डिगरीची शिक्षा ठरलेल्या रद्दड ’ रामगोपाल वर्मा कि आग’ चा जन्म झाला.मला वाटते कोणी कितीही प्रयत्न केला तरी असा ’शोले ’ होणे नाही.झाले बहु ,होतीलही बहु परि या सम हा…..हे शोले कधीच शांत होणार नाहीत,असेच धगधगत राहणार…!

काय म्हणता वरील शोलेपुराण वाचुन शोले पाहायची इच्छा झाली,तर मग पाहा एक झलक…

Advertisements

14 thoughts on “धगधगती पस्तीस वर्षे….

 1. शोले हा फक्त एक चित्रपट नसून
  अनुभव आहे.
  हसणे आहे.
  रडणे आहे.
  भूत आहे.
  देव आहे.
  दानव आहे.
  चर्चा आहे.
  प्रेम आहे.
  आशा आहे.
  निराशा आहे.
  ….
  …….
  ह्या भूतलावर जे जे म्हणून आहे ते ते सगळे शोले आहे.

 2. आपकी याददाश को दाद देनी पडेगी सांबा…कितने साल बीत गये का उत्तर एक सेकंद मे दे दिया..:)
  मजा आ गया…..

 3. देवेन आज रात्री शोले बघून साजरा करणार हा दिवस..आताच रायगडला जाउन आलो आणि तुझी ही पोस्ट बघितली..फोटो उद्या टाकेन पण आधी शोले..बस थॅंक्स थॅंक्स यार

 4. अरे माझ्या घरी दोन एलपी रेकॉर्ड्स होत्या डायलॉगच्या. काय दिवस होते ते.. आता सांगितलं की डायलॉग च्या पण रेकॉर्ड असायच्या तर कदाचित खोटं वाटेल.

  • १९७५ साली विकल्या गेलेल्या एकूण तबकड्या व कॅसेट्‌स यातला पन्नास टक्के वाटा शोले‘चे संगीत व संवादाच्या तबकड्यांचा होता. त्यामुळे मला तरी ते अजिबात खोट वाटणार नाही…खरच काय दिवस होते ते (असतील ते )….

 5. >> यातले कितीतरी संवाद बोलतांना म्हणीप्रमाणे वापरले जातात इतके ते जनमानसात रुळले आहेत.

  अगदी अगदी !! याची किती पारायणं झाली आहेत याची काही मोजदादच नाही..

  शोलेचा माझ्या एका मित्राने सांगितलेला एक किस्सा : परीक्षा जवळ आलीये म्हणून त्याचा एक मित्र एकदा रात्री गप्पा मारायला आला नाही नाक्यावर. दुस-या दिवशी त्याला विचारलं कसा झाला अभ्यास.. तर म्हणतो कसा “काय करणार यार. अभ्यासच करत होतो. पण केबल वाल्याने शोले लावला. मग बघायला लागला” 🙂

 6. प्रचंड भारी रे!
  शोले माझा ऑल टाईम फेव्हरेट! अमिताभ मरतो तेव्हा अजूनही दुःख होतं!

 7. ‘शोले’ बद्दल काय बोलावे !! त्या एका शब्दातूनच चित्रपटाबद्दल कळते……मी लहान असताना हा चित्रपट आला आणि ज्या लहान गावात मी होते तिकडे तर घरापासून जवळच सिनेमा थेटर होते तिकडे अक्षरश हा सिनेमा डेरा टाकून बसला,, अस म्हणायला हरकत नाही! शोले अक्षरश सकाळ दुपार संध्याकाळ शिफ्ट मध्ये पाहायला लोक लांब लांबून येत …..आणि मुख्य म्हणजे जितक्या वेळा लागला हा सिनेमा तितक्या वेळा लोकांनी पहिला. थेटर फुल जात होते…..तरीही तेव्हां मी लहान असल्याने बाबांनी पाहू दिला नाही…मग पुढे जेव्हां पहिला तेव्हां कळले कि हा इतका कसा प्रसिद्ध …आज सुद्धा परत पहिला तरी शोले हा शोलेच वाटतो! कंटाळा येत नाही! काहींना तर चित्रपट पाठ आहे …..कलाकार पण काय जबरदस्त घेतले आहेत सगळे…..

  देवेन तुझा पोस्ट नेहमीसारखेच एकदम छान झाले आहे !!! आणि तुला पण स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!…..

टिप्पण्या बंद आहेत.