मिशन तांदुळवाडी.


खरतर ही मिशन गेल्या रविवारी पुर्ण केली.नेहमीच्याच कं मुळे ह्यावरची पोस्ट मात्र राहुन गेली.(हयावेळी माझ्या एकटयाचाच कं नाही तर मला अजुनही ट्रेकची छायाचित्र न पाठवणारया माझ्या ट्रेकमित्रांचा कं ही तेवढाच कारणीभुत आहे हयाची नोंद घ्यावी… 🙂 ) परवा सर केलेल्या कोहोजबद्दल लिहायला घेतल होत पण लक्षात आल गेल्या आठवड्यात केलेल्या तांदुळवाडीबद्दल आपण अजुन लिहलेल नाहिये.मागे जानेवारीत मी केलेल्या सात दिवसाच्या मेगा ट्रेकमधील दोन दिवसांबद्दल ब्लॉगमध्ये लिहल.पुढील पाच दिवसांचा लेखाजोखा अश्याच कं मुळे राहुन गेला.म्हणुन मग त्वरीतच तांदुळवाडीचा हा बॅकलॉग पुर्ण करायला घेतला.तसही काय आहे सगळ्याच गोष्टी वेळेवर झाल्या तर  त्याची मजा येत नाही ना… 🙂

तर २२ ऑगस्ट ही तारीख सुहासला मी अगदि देउन टाकली होती.त्याच्याबरोबर दोन ट्रेकला काही कारणांमुळे जाउ शकलो नव्हतो त्यामुळे २२ ला कुठेही गेलास तरी येइन अस त्याला सांगीतल होत.त्याने शुक्रवारी तांदुळवाडीला जायच आहे अस सांगीतल.पण हया बेताच्या आड त्याची तब्येत आली आणि तो रविवारी येउ शकला नाही.तसा मी ही रविवारी सकाळी उठल्यावर सुस्तावुन काही क्षणांसाठी न जाण्याच ठरवल होत पण दैनंदिन जीवनाला सोडुन एक दिवस निसर्गाच्या कुशीत विसावण्याची इच्छा असलेल्या माझ्या उत्साही मनाने हया सुस्तावलेल्या मनावर विजय मिळाला आणि मी सज्ज झालो हया मान्सुनमधील माझ्या पहिल्या ट्रेकला.तो सुद्धा सगळ्या अनोळखी लोकांसोबत.हो आम्ही एकुण सहाजण होतो त्यातील फ़क्त अनुजाशी देवकाकांच्या कट्ट्यावर एखाद-दोनवेळा बोलण झाल होत.बाकी सगळे माझ्यासाठी नवीनच होते.तर दीपक,प्रथमेश,अनुजा,हिताक्षी,तेजस्वी आणि मी असे सहाजण हया मिशनमध्ये सहभागी झालो होतो.

सुरुवात...

नयनरम्य तळ.

आधी ठरवल्याप्रमाणे सकाळी ०७:३० च्या सुमारास सफ़ाळे रेल्वेस्टेशनवर पेपरस्टॉलजवळ  भेटलो.अगदि दोन-चार वाक्य बोलुन होतात न होतात तोच अनुजाने बॅगमधुन खमंग बटाट्याची भाजी  असलेल सँडविच खायला देउन माझ तोंड बंद केल.खादाडीची सुरुवात तर जोरदार झाली होती.मग आम्ही स्टेशन समोरील ओम टी सेंटर कडे मोर्चा वळवला.तिथे खुपच मोठया ग्लासमध्ये चहा दिला जातो त्यामुळे मी आणि दीपकने कटिंगच चहा घेतला. अनुजाने मात्र तिथे चहाचा मनसोक्त आस्वाद घेतला.हा ट्रेक प्रामुख्याने सफ़ाळ्यावरुन तांदुळवाडी हया गावात जाउन केला जातो.पण आम्ही माज म्हणुन सफ़ाळ्यावरुनच डोंगर-ओढे ओलांडत जंगलातील मार्गाने किल्लाच्या पायथ्याशी पोहोचायच ठरवल.तिथे जातांना रस्त्यात मस्त एक मोठ कृत्रीम तळ लागल.तळ,भोवतालची हिरवळ,भरुन आलेल आभाळ आणि त्यामागे दिमाखात उभा असलेला तांदुळवाडीचा दुर्ग सगळच कस आल्हाददायी वाटत होत.दीपकला त्याचा पेटंट शब्द ’ऑस्सम’ वापरण्यास हमखास संधी तिथे मिळाली होती. तिथे बर्यापैकी फ़ोटोसेशन उरकुन आम्ही पुढे निघालो तिथे आम्हाला खुपच चिख्खल असलेला एक रस्ता लागला.तिथे दीपकच्या आतला फ़ुटबॉलपट्टु जागृत झाला मग काय तो गप्प राहणार होता तिथेच एक सुरेख ’गोल’ची नोंद करुन मोकळा झाला तो.  🙂

यस्स्स्स्स..पहिला गोल माझाच.

तिथुन थोड पुढे बर्यापैकी चढाव लागला मग एका  झर्यात असलेल्या दगडांवर क्षणभर विश्रांतीसाठी बसलो.तिथेच माझ दुर्दैव आड आल.मी सर्वांना ५ स्टार कॅडबरी खायला दिली.तेव्हापासुन आजतागायत दीपक आणि अनुजा ’अरे..सुरेश’ (५ स्टार ची जाहिरात पाहीली असेलच तुम्ही) करत मला जे पिडत आहेत त्याबद्दल काय सांगु.हयांच्यासाठी कॅडबरी आणली आणि हे मलाच चिडवतात.भलाई का जमाना ही नही रहा.. 🙂 पुढील वाट मस्त दाट जंगलातली होती.पण सर्वात पुढे चालणारा प्रथमेश कित्येक वेळा इथे आला असल्याने त्याला जंगलाची आणि तांदुळवाडी किल्ल्याची चांगलीच माहिती होती .माकडांचा हुप-हुप आवाजाच्या सोबतीने काळ्या-पांढररया खेकड्यांच दर्शन घेत आम्ही ती वाट तुडवली आणि गडाच्या पायथ्याशी पोहोचलो.तिथे  एका मोठया खडकावर बसुन खालील तांदुळवाडी गाव न्याहाळत दीपकने आणलेल्या भाकरवडी आणि चकली वर तोंडसुख घेतल आणि नव्या उत्साहात किल्ला चढण्यास सुरुवात केली.

एक विसाव्याचा क्षण...

तिथे सुरुवातीलाच आम्हाला एक छोटासा ओढा लागला.त्या ओढ्यात तेजस्वीने हाताने पाण्यातला एक भला छोटा मासा पकडण्याचा पराक्रम गाजवला.पण खाण्यासाठी तो खुप लहान असल्याने भुतदयेने त्याला पाण्यात परत सोडण्यात आले. पुढे काही अंतर चढुन झाल्यावर आम्ही यथावकाश बैठक मारली.हया सुरुवातीच्या चढावानेच माझा तरी चांगलाच घाम काढला होता.तिथे थोडा वेळ गप्पा गोष्टी करुन आम्ही पुन्हा किल्ला चढण्यास सुरुवात केली.प्रत्येक थोड्या चढावानंतर माथा थोडा जवळ आल्याचा आनंदात पाउले पुढे पडत होती.पुढे एक खडकाळ भाग आम्हाला लागला.त्या भागात चांगलाच चढ होता.मी तिथे आघाडीवर होतो.तो भाग चढल्यावर मी इतका दमलो कि सरळ तिथल्याच एका खडकावर बॅग उशाला घेउन मस्त आडवा झालो.

जाने क्या ढुंढता है...

आला रे पाउस आला...

एकामागोमाग सगळी इंजिन धापा टाकत तिथे आली.तेवढयात मी सकाळपासुन मनात ज्या गोष्टीसाठी देवाकडे साकड घालत होतो ती गोष्ट घडली.अचानक चोहोकडुन ढग भरुन आले.क्षणापुर्वीच्या स्वच्छ तांदुळगडाला धुक्याच्या साम्राज्याने अलगद आपल्या कवेत घेतले.हवेत मस्त गारवा आला.आणि मला हवाहवासा असा तो पाउस रिमझिम करत सुरु झाला.अहाहा काय वर्णाव ते दृश्य.धुक्यात हरवुन ’कुक’ करुन मध्येच आपला सुंदर चेहरा दाखवणारा गडमाथा,खालचा आणि सभोवतालच्या हिरवागार प्रदेशाचा मस्त नजारा,पाउस आणि धुक्याच थंड आल्हाददायक वातावरण हयामुळे मला जो आनंद झाला तो शब्दात काय सांगु पण एक मात्र नक्की तिथे आतापर्यंत आलेला थकवा कुठच्या कुठे पळाला होता.मी मनोमन ट्रेक वसुल झाल्याच स्वत:शीच जाहिर केल.मला नेहमी फ़सवणारया त्याने आज माझी साथ दिली होती.मी त्याचे लाख लाख अभार मानले.पाहतो तर काय तो माझ्याकडे बघुन हसत होता.मला वाटल माझ्या आनंदाला कारणीभुत झालेला तो माझ्या आनंदात सहभागीही झाला आहे.पण त्याच्या मनातल मला तेव्हा थोडेच ना समजणार होत.

भोवतालच्या निसर्गसौंदर्याला आव्हान-१

भोवतालच्या निसर्गसौंदर्याला आव्हान-२

आधीपेक्षा कितीतरी पटीने अधिक उत्साहात आम्ही पुढील वाटचाल सुरु केली.थोड चढल्यावर एक एका बाजुला दरीमय भाग असलेला भाग आला पण तिथे गवताची उंची बर्यापैकी वाढलेली असल्याने दरीपासुन थोड का होइना मानसिकदृष्ट्या संरक्षण वाटत होत.पाउस पडत असल्याने तोल सावरतच आम्ही तो भाग पार केला.त्यानंतर एक तीव्र चढ लागला तो चढल्यावर मस्त मोकळ पठार लागल.पठारावरील हिरव्या रंगाची उधळण मन वेधणारी होती.तिथे एक मध्येच एक चौकट राजासारख एक वेगळच सुकलेल झाड होत तिथे दीपक,तेजु आणि मी त्या झाडाला स्वत:बरोबर कॅमेरयात बंदिस्त केल.   तिथुन काही अंतर कापल्यावर आम्हाला एकमेकाला लागुन असलेल्या आठ पाण्याच्या टाक्या लागल्या.हया टाक्या बारा महिने पाण्याने भरल्या असतात.सकाळी ८.१५ सफ़ाळे सोडुन १२.१५ च्या सुमारास म्हणजे रमरगमत चार तासात आम्ही तांदुळगडाचा माथा गाठला होता. तिथे मस्त मोकळी जागा होती.पोटातल्या कावळ्यांनीही सिग्नल दिला होताच मग त्या टाक्यांच्या काठावरच मुगाची भाजी-भाकरी,श्रीखंड- पुरी(आईला सकाळ सकाळ त्रास देउन हे आणल होत),बुरजी-पाव हयांवर यथेच्छ ताव मारला.अर्थातच श्रावण असल्याने मी आणि हिताक्षी हयांनी बुरजी खाली नाही.पोटोबा तुडुंब भरल्यावर दीपक,अनुजा आणि हिताक्षी हयांनी मस्त ताणुन दिली.

हेच ते झाड.

आमची खादडी...

प्रथमेश,तेजस्वी आणि मी  मात्र उभ्या पाषाणात मध्यावर असलेली पाण्याची टाक बघायला तिथुन थोड खाली उतरलो.तिथे खाली एका खडकावर बसुन ती टाक पाहिली.वर जास्त वारा नव्हता पण तिथे मस्त वारा सुटला होता मग त्या खडकावरच १०-१५ मिनटे आम्ही गप्पा मारत बसलो.प्रथमेशने सांगीतल कि त्यांच्या ग्रुपने एकदा त्या उभ्या कातळावरुनही तांदुळवाडी सर केला आहे.तिथुन आम्ही वेगळ्या वाटेने आधी लागलेल्या पठारावर पोहोचलो तिथे एक गरुड आम्हाला पाहावयास मिळाले.पण आमची थोडी चाहुल लागताच ते उडुन गेले.मग आम्ही परत टाक्यांजवळ आलो.आम्ही तिथे गेल्यावर हिताक्षी आणि दीपक लगेच उठले पण अनुजा मात्र कुंभकर्णासारखी झोपुनच होती.थोडा वेळ तिथे बसुन गप्पा मारल्यावर अनुजाला उठवुन आम्ही ती जागा सोडायच ठरवल.निघण्याआधी दीपकने आणलेल्या केकवर श्रावणातील चार रावणांनी हल्लाबोल केला.माझ्या सिक्स सेन्सला हयाची चाहुल बहुतेक कालच लागली होती कारण मी न ठरवता काल एगलेस केक घेउन आलो होतो.मग मी आणि हिताक्षीने त्या एगलेस केकवर ताव मारुन तो पुढे पास केला.

पाण्याची टाक.

गडमाथ्यावरील तळ.

एव्हाना तेथील वातावरणात बराच फ़रक पडला होता.आकाश एकदम मोकळ झाल होत.मघाशी अवघ्या तांदुळगडाला कवेत घेणार धुक कुठच्या कुठे विरुन गेल होत.आम्ही तिथुन थोड पुढे गेल्यावर तिथे एक तळ लागल.त्याच दर्शन घेउन थोड्याच वेळात आम्ही  एकदम मोकळ्या जागेत आलो.इथुन खाली वैतरणा नदीचे दुथडी भरून वाहणारे नागमोडी पात्र,खाली असणारी वेगवेगळी गाव,हिरवीगार आखीव शेत,दुरवर दिसणारया डोंगररांगा हयांच विहंगम दृश्य पाहायला मिळत होत.तिथे हवाही चांगली होती.मग तिथे आम्हाला सर्वाना समोरच निसर्गसौंदर्य न्याहाळत जमीनीला अंग टेकवावस न वाटाव तर नवलच.पण हाय रे दैवा, झोप लागते न लागते तोच वरुन नुकताच ढगांच्या विळख्यातुन मुक्त झालेला सुर्यनारायण त्याच अस्तीत्व आम्हाला जाणवु द्यायचा प्रयत्न करु लागला होता.हा पुर्ण मोकळा भाग असल्याने सर्वांनाच त्याचा त्रास होवु लागला होता.’त्या’ च्या त्या मघाशच्या हास्याच रहस्य मला आता उलगडल होत.तो कधीच सुधारणार नव्हता.आम्ही तिथुन निघायच ठरवल.पण थोड्यावेळा पुर्वी फ़ोटोग्राफ़ी करत बाजुला गेलेल्या प्रथमेश परत आला नव्हता.आम्ही त्याच्या नावाने हाका मारल्या पण काही उत्तर आले नाही मग तेजस्वीने थोड बाजुला जाउन बघीतल तर हे महाशय सावलीत शांत झोपले होते.

सुर्यनारायणाच्या कृपेने सुमारे अडीजच्या सुमारास आम्ही वेगळ्या मार्गाने गड उतरायला सुरुवात केली.थोड्याच वेळात आम्हाला एक अजुन पाण्याची टाकी लागली.त्याच्या बाजुला अजुन एक खड्डा होता.इथे खजिना आहे असे समजुन हा खोदण्यात आला आहे असे प्रथमेशने सांगीतल.प्रथमेशने तशी गडावर बरीच माहिती दिली होती पण आमच्या छोटयाश्या डोक्यात ती किती सामावणार होती तेही ८-१० दिवस गेल्यावर.असो तर पुढे ४-५ पायरया आणि दगडांची एक छोटीसी भिंत पाहायला मिळाली.हा मार्ग बर्यापैकी सोपा होता पण घसरत्या वाटा असल्याने थोडी काळजी घ्यावी लागत होती.आम्ही चढलो तो भाग पुर्ण मोकळा होता तर हया भागात दाट वन होत.तिथेच उतरतांना सकाळपासुन गोल करण्यास उत्सुक असलेल्या अनुजाने एक मस्त गोल करुन दीपकने सकाळी केलेल्या गोलाची १-१ अशी बरोबरी केली.बाकी सकाळी तो गोल करण्यासाठी दीपकला त्याच्या सॅमसंग कॉफ़ीचा (कॉर्बी नाही कॉफ़ीच ..का ते त्यालाच विचारा… 🙂 )  आवाज गमवावा लागला होता.पुढे आम्हाला तांदुळवाडी गाव कि सफ़ाळे कुठे जायच हा प्रश्न पडला. मी आणि तेजस्वी कुठुनही चालेल अशी भुमिका घेतली.प्रथमेश डायरेक्ट सफ़ाळ्याला जाउ म्हणत होता तर अनुजाला सकाळच्या घाणेरड्या चिखलाचा कंटाळा आला असल्याने ति तांदुळवाडीलाच जाउ अस बजावत होती.अखेर तांदुळवाडीला जायचा निर्णय घेतला गेला.

पुढील मार्गात प्रथमेशकडुन लीड करायचा चार्ज  कॅप्टन तेजस्वीने स्वत:च्या खांद्यावर घेतला.मजल दरमजल करत आम्ही एका मोकळ्या पठारावर पोहोचलो.तिथे एका वाहता प्रवाहात मस्त तोंड धुवुन घेतल.तिथे घटकाभर विश्रांतीसाठी थांबलो.त्या जागेवरुन गडमाथ्याच अतिशय मोहक दर्शन होत होत.ते कॅमेरयात बंदिस्त करुन आम्ही पुढे निघालो.पुढे एका ठिकाणी एक मार्ग खाली जात होता तर एक पठारावर थोडा वर जात होता.अनुजाने आपण वरच्या रस्त्याने जाउन बघु असे सांगीतले.ति बरोबर होती थोड्याच वेळात त्या वाटेवरुन खालच तांदुळवाडी गाव दिसु लागल होत.तिथुन काही वेळातच सुमारे साडॆचाऱच्या सुमारास आम्ही खाली गावात पोहोचलो आणि तिथल्या विहीरीवर हातपाय आणि तोंड धुवुन फ़्रेश झालो.

विहीरीच्या बाजुलाच अनुजाच्या ओळखीच एक घर होत त्यांच्याकडे मस्त सरबताचा पाहुणचार घेत आम्ही गाव सोडुन चालत चालत वरई नाक्यावर गेलो.तिथे जातांना दीपकच चिंचप्रेम उफ़ाळुन आल होत, रस्त्यात लागणार प्रत्येक चिंचेच्या झाडाची दखल तो घेत होता.नाक्यावर पोहोचल्यावर तिथे केसी कोला (लोकल ब्रँड) ,त्यावर चहा,ब्रेड आणि चिप्स अशी खादाडी यथावकाश पार पाडली.त्यानंतर  चहा आणि कोलाच  मिश्रीत फ़्लेवर असलेल्या एका मस्त ढेकरीनेपोटातील सम्रुद्धतेची ग्वाही दिली. पुढील बस सहा वाजता होती आणि दीपकला पनवेलला जायच होत त्यामुळे तो जरा बैचेन झाला होता.त्यात मी डायरेक्ट जंगलातुन गेलो असतो तर केव्हाच सफ़ाळ्याला पोहोचलो असतो अस त्याला आणि अनुजाला उगाच पीडत होतो.पण दीपकच नशीब चांगल होत.एक जीप आम्हाला तिथे मिळाली,आणि  काही वेळातच आम्ही सफ़ाळे गाठल.तिथे आम्ही तांदुळवाडी मिशन पुर्ण झाल्याच घोषीत केल आणि खुप आठवणींचा साठा बरोबर घेउन  एकमेकांचा निरोप घेतला.

सुमारे अठरशे फूट उंचीवर असलेल्या मराठे, पोर्तुगीज, इंग्रज हयांची सत्ता अनुभवलेल्या या किल्ल्याच्या डोंगरमाथ्यावर त्या टाक्या सोडल्या तर ऐतिहासिक अश्या फ़ार कमी खुणा राहिल्या आहेत.पण तिथुन इतर वेळी माहित नाही पण हया पावसाळ्यात तरी निसर्गाच जे विलोभनीय दर्शन घडत ते खरच अवर्णनीयआहे. हया पावसाळ्यातील हा माझा पहिलाच ट्रेक असल्याने घरी गेल्यावर माझे जवळजवळ सर्वच अवयव मोठ्यामोठ्याने बोलायला लागले होते पण माझ मन मात्र त्यांच काही ऐकत नव्हत ते हरवल होत गडावरील सुखद आठवणीत…

(अजुन छायाचित्र पाहायची इच्छा असल्यास इथे भेट द्या.)

Advertisements

40 thoughts on “मिशन तांदुळवाडी.

 1. पिंगबॅक Tweets that mention मिशन तांदुळवाडी. « दवबिंदु -- Topsy.com

 2. फोटो आधिच पाहिलेले असले तरी वर्णनाबरोबर पुन्हा पहाताना मजा आली….. सहीच 🙂

 3. मस्तच यार..खूप मिस केला..
  पण तू केलेला वर्णन करून सगळा ट्रेक अनुभवला, चिखल सोडून 😉

 4. ट्रेकींगची एकदा चटक लागली की गड-किल्ले भटकायचे हे वेड काही केल्या कमी होतच नाही.अप्रतिम वर्णन आणि फोटू पण मस्तच…..

  तांदूळवाडी गावाजवळच वैतरणा आणि सुर्या नदीचा संगम ही बघण्यासारखाच आहे.

  • “ट्रेकींगची एकदा चटक लागली की गड-किल्ले भटकायचे हे वेड काही केल्या कमी होतच नाही.”
   अगदि १००% खर…आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार..
   मी खात्रीने सांगु शकत नाही पण तो संगम वरुनही पाहावयास मिळतो. (दोन नद्यांचा संगम दिसला पण प्रथमेशला त्याबद्दल विचारायच राहुनच गेल )
   परत कधी फ़ेरी झाल्यावर आवर्जुन पाहावा लागेल.

 5. देवेंद्र, या ट्रेकच्या विस्तृत माहितीबद्दल धन्यवाद! छान वर्णन केलं आहेस. अश्या कितीतरी जागा महाराष्ट्रात आहेत पण आपलं पर्यटन विभाग साधी दखलही घेत नाही.

 6. देवेन्द्र जितकी मज्जा आपन ट्रेक ला केली तितकिच मज्जा वाचताना ना पण आली रे

  • माझ्या कंटाळ्यामुळे तुमच्यातल कोणी हयावर आधी लिहेल अस वाटुन निश्चिंत बसलो होतो पण तुम्हीसुदधा माझ्यासारखेच आळशी..मग काय नाइलाजाने लिहाव लागल सगळ पुराण… 🙂

 7. सही रे सही.. वर्णन आणि फोटू दोन्ही.. फोटू तर आधीच बघितले होते पण वर्णनाबरोबर बघताना अजून मजा आली.. “भोवतालच्या निसर्गसौंदर्याला आव्हान” हे भारी होतं 😀

 8. देवेंद्रा मी आत्ताच अचानक तुझा ब्लॉग पाहीला (म्हणजे हे पोस्ट) फारच धमाल केलीत तुम्ही. माझ्या पूर्वाश्रमीच्या आठवणी जाग्या झाल्या. हो पूर्वाश्रमीच्याच कारण आता पावसात थोडं जरी भिजलं तरी सखो येतोच. पण मस्त आठवणी ताज्या झाल्या.

 9. आपला लेख आवडला, छायाचित्रे तर सुंदरच आहेत. मी सुमारे १२ वर्षांपूर्वी तांदूळवाडीला गेलो होतो, तेव्हाच्या पावसात मी सुद्धा छायाचित्रे काढली होती.
  छायाचित्रांचा, निसर्गरम्य स्थळांचा आनंद आपण आपल्याला अमूल्य अशी दृष्टी असल्यामुळेच घेऊ शकतो पण ज्यांना ती नाही त्यांचे काय?अशा सव्वा कोटींपैकी तीस लाखांना आपण नेत्रदान करून ती देऊ शकतो. १९८१ पासून मी नेत्रदान प्रचार करीत असून नेत्रदानावरील सविस्तर माहितीसाठी माझा ब्लॉग पहा. ई मेलने माहितीपत्रके हवी असल्यासही संपर्क साधा. – श्री.वि.आगाशे,ठाणे.
  blog – http://www.netradaan.blogspot.com
  email – shreepad.agashe@gmail.com

 10. पिंगबॅक कामणदुर्ग……एक चकवा. « दवबिंदु

 11. पिंगबॅक भेट अशेरीभाईंची … | दवबिंदु

टिप्पण्या बंद आहेत.