किल्ला कोहोजचा…


२२ ऑगस्टला मिशन तांदुळवाडी पुर्ण केल्यावर मागोमाग ४-५ सप्टेंबरला रतनगडाचे प्लॅनिंगही झाले होते,पण  तरीही मला ट्रेकिंगचा किडा असा चावला होता कि २९  ऑगस्टलाही कुठेतरी जावेच असे वाटत होते.मग काय अनुजाला फ़ोन करुन विचारले २९ चे काही प्लॅन आहेत का…ती ने दुसरया दिवशी कोहोजला जायच अस कळवल.लागलीच २९ ची सुट्टी मंजुर करुन घेतली.रतनगडसाठी हा आठवडा आराम म्ह्णुन दीपकने मिशन कोहोजमधुन माघार घेतली होती.शनिवारी संध्याकाळी फ़ोनवर बोलण होइपर्यंत येणार असलेल्या सुहासने रात्री १२:३० चॅटवर अचानक पुण्याला जाव लागत असल्याने येउ शकत नसल्याचा बॉंब टाकला.तेव्हा बाहेर मुसळधार पाउस सोबतीला ढगांचा गडगडाट आणि विजांचा जोरदार कडकडाट चालु झाला होता.पण तरीही माझा निर्णय ठाम होता.मी त्याला म्हणालो, ” आता पडतोयस पण तेच उद्या माझा उत्साह बघुन घाबरुन पळशील परत तांदुळवाडीसारखा…” हे ऐकुन तो परत एकदा तेव्हासारखाच हसला.

नेहमीसारखीच फ़क्त ३-४ तासांची झोप घेत सकाळी सव्वासातच्या सुमारास पालघर गाठल.तिथे बसस्थानकाजवळच एका हॉटेलात आमचा गृप म्हणजेच वसई ऍडवेंचर क्लबचे सहा आणि अनुजा असे सात जण चहाचा आस्वाद घेत होते.मी त्यांना जॉइन करुन त्या सकाळच्या शांत आणि ओल्या वातावरणात त्या गरमागरम चहाचे घुटके घेत त्यांची ओळख करुन घेतली.अंकल,डीप,रोशन,बाब्या,कुलदीप,रुपाली,अनुजा आणि मी अशी आमची फ़ौज हया मिशनमध्ये सहभागी होती.चहा झाल्यावर लगेचच ०७:३० पालघर-कल्याण बस पकडली.तो आपला धो धो कोसळतच होता.मला अजुनही त्याच हे नाटकच वाटत होत.पण त्याच्या मनात आज काही वेगळच होत.वसई ऍडवेंचर क्लबवाले सगळे एकाच पोशाखात असल्याने कंडक्टर ने ’कुठे मॅच खेळायला चालले’ अस विचारुन चांगलाच जोक केला.मुसळधार कोसळत्या पाउसात मॅच…बसमध्ये अश्याच त्यांच्या आधीच्या ट्रेकच्या गंमती एकत सुमारे सव्वाआठ म्हणजे पाउणतासभरात आम्ही वाघोटे फ़ाट्याजवळ उतरलो.तसे हया गडावर जाण्याचे तीन मार्ग आहे एक नाणे गावातुन दुसरा अंबीत गावातुन तर तिसरा हा आम्ही जात असलेला वाघोटे फ़ाट्यावरुन.

धुक्यात हरवलेला कोहोज...

वाघोटे फ़ाट्यावरुन धुक्यात हरवलेल्या कोहोजचे मनोहारी दर्शन घडत होते.तिथे डीप हयांनी सगळ्यांना चांगले मुठभरुन चणे-शेंगदाणे वाटले.सगळ्यांनी  ते फ़स्त केल्यावर त्यांनीच गडासाठी आणलेला खाउ म्हणजेच बी-बियाणे आजुबाजुला पेरण्यासाठी सगळ्यांना वाटली ट्रेकिंग करतांना .डीप ह्यांच निसर्गप्रेम खरच वाखाखण्याजोग होत.रस्त्यात कोणत्याही वनस्पतीच नाव विचारा, त्याच्या सर्व गुणधर्मासोबत त्याबद्दल माहिती मिळालीच म्हणुन समजा.काही वनस्पतींबद्दल रस्त्यात तर ते स्वत:हुन माहिती देत होते.तसेच त्यांनी एक मोठी पिशवी सोबत घेतली होती.जिथे जिथे प्लॅस्टिकसदृश्य कचरा आढळायचा ते हया पिशवीत भरुन घेत.खरच डीप ह्यांना माझा सलाम.आमच्या फ़ौजेला लीड करणारे अंकलही खुप अनुभवी ट्रेकर होते आणि त्यांनाही बरीच माहिती होती रानावनांबद्दल.वाघोटे फ़ाट्यावरुन मध्ये शिरल्यावर काही वेळातच एक ह्रदयाच्या आकाराचे छान तळ लागल.त्याला कॅमेरयात कैद करुन पुढे भातशेतीच्या बांधावरचा रस्ता आम्ही पार केला.दरम्यान पाउस थोडा कमी झाला होता.

’दिल’ च्या आकाराचे तळे...

भातशेतातुन मार्ग काढणारे आम्ही ट्रेकर्स...

पुढे  दाट झाडी असलेला एक बर्यापैकी मोठा चढ चढुन  आम्ही एका मोठ्या तळ्यापाशी (सरकारने बांधलेला एक छोटा डॅम ) पोहोचलो.ते शांत तळ,त्यात पडणारे पाउसाचे तुषार,मागे धुक्याबरोबर लपाछुपी खेळणारे दिमाखात उभे असलेले डोंगर,त्यांची तळ्यात पडणारी प्रतिमा,सभोवतालचा आल्हाददायक हिरवळ मनाला एकदम प्रसन्न करुन गेली.त्या तळ्यात एक विहीरही होती.मध्येच काही पक्षी पाण्यात मस्त सुर मारत होते.हया पक्ष्यांबद्दलही आमच्या कंपुतील वरिष्ठ लोकांत चर्चा झाली होती पण मी त्या वातावरणात असा हरवलो होतो कि आता त्याबद्दल  काहीच आठवत नाही.(त्याच  त्यांनी सांगीतलेल नाव  आठवत नाही ह्यापेक्षा हे बर वाटते ना… 🙂  ) एव्हाना पाउस एकदम रुद्रावतार घेउन बरसायला लागला होता.तळ्यावरुन निघतांना अंकलनी मस्त लहानपणीच्या आठवणी जागृत करणारया लिबुंच्या गोळ्या सगळ्यांना वाटल्या.आम्ही त्या चघळत पुढे चढाई करत होतो.

हेच ते मनमोहक तळ...

थांबत,चढत काही भाग चढल्यावर एक मोकळा भाग लागला तेथुन गडमाथा खुप जवळ दिसत होता आणि खाली तळ्याचाही मस्त नजारा दिसत होता.हयापुढची वाट अतिशय खाच-खळग्याची होती.जंगलही अतिशय दाट होते आणि पावसाळी वातावरणामुळे चांगलेच बहरलेले होते.त्यात सतत तो मुसळधार कोसळणारा पाउस.तसा सकाळपासुन तो सोबतीला असल्याने एव्हाना आम्हाला त्याची चांगलीच सवय झाली होती.त्या वाटा  तुडवत छॊटे-मोठे चढ चढत गर्द झाडीतुन मार्ग काढत आम्ही वरच्या पठारावर पोहोचलो.पाउस नसता तर ह्यातला बराच भाग चढतांना आमचा चांगलाच धुर निघाला असता.असो पण त्या मोकळ्या हिरव्यागार पठारावर पसरलेल्या धुक्यांचा गालिचातुन पुढे जातांना आतापर्यंत आलेला थोडाफ़ार थकवाही पळुन गेला होता.त्या पठारावर थोड चालल्यावर आम्हाला कुसुमेश्वराच मंदिर लागल .मंदिराच्या मागे पाण्याची दोन टाके होती.मंदिरा्च्या अगदि समोर अनेक प्लॅस्टिकची ताट व इतर सटरफ़टर साहित्य पडल होत डीप हयांनी त्या सगळ्यांना त्यांच्या पिशवीत सामावुन घेतल. हयात आम्हीही थोडीफ़ार मदत त्यांना केली.मंदिराच्या आत संपुर्ण भिंतीवर अनेक विकृत लोकांनी त्यांची नाव, वेगवेगळी चिन्ह काढली आहेत.खरच खुप संताप येतो हे सर्व पाहिल कि, भिंतीवर देवीची एक मुर्ती अहे तिच्या आजुबाजुची जागाही हया *#$@ नी सोडलेली नाहीये.

कुसुमेश्वराचे मंदिर...

किल्ल्याची काही चिन्ह...

दगडात खोदलेली पाण्याची टाक

मंदिरात नुकताच आमच्यासमोर गावातील काही मुल पुजा करुन वर गेली होती.त्यांनी तिथे ठेवलेल्या अर्ध्या नारळाच्या प्रसादाचा उपभोग घेत तिथे बराच वेळ रेंगाळल्यावर आम्ही पुढच्या मार्गाला लागलो.पुढे काही अंतर कापल्यावर डाव्या हाताला मारुतीच एक छोटस मंदिर लागल.तर उजवीकडे दोन-तीन ठिकाणी दगडात खोदलेली पाण्याची टाक पाहावयास मिळाली.इथुन पुढे एक चढाव चढल्यावर हया किल्ल्याच्या किल्लेपणाची जाणीव करुन देणारा पडका बुरुज व पायरया लागतात.तिथुन आत शिरल कि वर समोर हया गडावरील आकर्षण ठरलेला माणसाच्या आकाराचा दिसणारा पाषाण आपल लक्ष वेधुन घेतो.खरच बघण्यासारखाच आहे हा सुळका.समस्त गडाची टेहळणी करणारा पहारेकरीच जणु. तिथुन थोड वर चढल कि  आपण हया पाषणाजवळ पोहोचतो.हया पाषाणासमोर पाण्याची टाक आहेत.पुतळ्याच्या डाव्या बाजुला काही अंतरावर कृष्णाचे मंदिर आहे.कुठल्याही गडावर  कृष्णाचे मंदिर असल्याचे माझ्या माहितीत तरी नाही. मग इथे हे का बांधलेल आहे.त्याच उत्तर काही समजु शकल नाही.अश्या प्रकारे १२:३० च्या आसपास म्हणजे रमत गमत तीन तासात  आम्ही कोहोज सर केला होता.

हाच तो मानवाकती पाषाण...

त्याला साथ देणारा बाजुचा दुसरा पाषाण...

गड तर सर झाला होता पण पोटापाण्याच काय.सगळ्यांना अगदि सडकुन भुका लागल्या होत्या.त्यात माझ कालच बोलण जास्तच मनावर घेउन एका क्षणाचीही उसंत न घेता हा तुफ़ान बरसत होता.आणि गडावर आडोश्यासाठी काहीही नव्हते. मग काय त्या मानवाकृती पाषाणाच्या मागच्या बाजुला सगळे दाटीवाटीने उभे राहिले आणि त्या छोटा्श्या जागेत कसरत करत उभ्याउभ्यानेच चपाती-पनीर बुर्जी,ब्रेड,जाम,बटर,नानकट,सफ़रचंद,सरबत अशी मस्त खादाडी केली. मी आणि डीप सोडुन इतर रावणांनी अंड आणि सुक्या मच्छीवरही ताव मारला होता.चपाती भाजी पाण्यात भिजत असल्याने सुक्या भाजीत आपोआप आमटी तयार झाली होती.मस्त ओली खादाडी करुन पोटातल्या कावळ्यांना शांत करुन  आम्ही गड उतरायला सुरुवात केली.

उघड्यावरील मारुतीची मुर्ती...

ख्ररतर गडावरुन एरवी दिसणारया सभोवतालच्या नजारयाला अखंड पाउस आणि धुक्यामुळे आम्ही मुकलो होतो.पण हया ओल्या धुसर वातावरणाचीही वेगळीच मौज होती.पावसामुळे कोणीही कॅमेरा बाहेर काढला नव्हता.पण मी स्वत:ला आवरु शकत नव्हतो आणि कॅमेरयाची रिस्क घेउन मध्येमध्ये भोवतालच्या निसर्गाला ’स्माईल’ म्हणत होतो.त्या दगडी मानवाला सलाम ठोकत मगाशी चढलेल्या पायरया उतरुन पुढे चालल्यावर थोड्याच अंतरावर उजव्या बाजुला उघड्यावर मारुतीची एक मुर्ती दिसली. वर चढतांना ही माझ्या नजरेतुन सुटली होती.तिथुन थोड्याच वेळात आम्ही त्या मोकळ्या पठारी भागावर पोहोचलो.तिथे एका कोपरयावर थोड्यावेळ विसावलो.सतत कोसळणारया पावसामुळे इथे बरेच धबधबे निर्माण झाले होते.बाब्या म्ह्णाला तो मागच्या वेळी इथे आला होता तेव्हा इतका वारा होता कि तो समोरचा धबधबा मध्येच चक्क उलटा वाहायचा.बर बाब्याची ही सहावी वेळ होती कोहोजला येण्याची.तसे मी सोडुन इतर सातही जण मात्तबर ट्रेकर होते.ते फ़ेसाळणारे छोटेमोठे धबधबे तसेच डोळ्यात साठवुन आम्ही पुढील मार्गाला लागलो.

हुश्श...

पुढे मात्र आम्हाला वेगळच दृश्य पाहायला मिळाल.आम्ही ज्या वाटेवरुन आलो होतो त्या वाटेने आता वाहत्या ओढ्याचे रुप घेतले होते.त्या पाण्याला बरयापैकी वेगही होता.त्यात मी सँडल घातलेली असल्याने छोटीमोठी दगड पाण्यावर स्वार होवुन माझ्या पाय आणि सँडल्सच्या मध्ये विराजमान होत होती आणि माझ्या पायाच्या कोमल तळव्यांचा 🙂  आस्वाद घेत होती.खरच खुप त्रास दिला त्या दगडांनी.पाय झटकुन एकाला त्याच्या त्या गादीवरुन हटवल कि लगेचच दुसरे दगड चढाई करुन त्याची जागा घेत होते.बरेच लहान-मोठे ओढे जिकडे-तिकडे वाहत होते एकमेकांना मिळत होते.त्यामुळे आम्ही एकदा वाटही चुकलो पण वेळेवरच ते कळल्यामुळे परत योग्य मार्गाला लागलो होतो.बाजुला एक मोठा पाण्याचा भयावह प्रवाह राजधानी एक्सप्रेक्सच्या वेगात सळसळ करत वाहत होता.त्याच रुप खरच छातीत धस करणार होत.आम्ही त्या वाटा अश्याच तुडवत असतांना अनुजाला बहुदा आठवल कि अजुन तिने एकही गोल केलेला नाही आणि तिला राहवल नाही मग काय तिने लागलीच एका चांगल्या गोल ची नोंद करुन टाकली.तांदुळवाडीलाही तिने परतीच्या वाटेवऱच गोल केला होता, एकुण असे सिद्ध झाले कि सेकंड हाफ़ मध्ये तिचा खेळ बहारतो.  🙂

गोल करण माझा हक्क आहे आणि.... 🙂

अशीच मजल दरमजल करत आम्ही सकाळच्या त्या तळ्याजवळ पोहोचलो.पाहतो तर काय मघाशी तळ, तळ्याच्या बाजुला बांधलेला बांध, आम्ही जातांना वापरलेली वाट सगळे एकजीव होवुन गेले होते.पाण्याला बराच फ़ोर्सपण होता कसेबसे तोल सावरत आम्ही पुढल पाउल कुठे पडते आहे हयाचा अंदाज घेत तिथुन बाहेर पडलो.कुलदीपने तिथे दगडांच्या साहाय्याने पाण्यात आठ-दहा टप्पे मारणारे बेडुक आम्हाला दाखवले.तिथुन बाब्याने हा रस्ताही खाली जातो म्हणत आम्हाला दुसर्याच एका वाटेवरुन नेले.त्याला एक दोन ठिकाणी फ़ाटे होते पण आम्ही बाब्याच्या मागे चालत होतो.पावसाने बाब्याची गफ़लत केली होती आणि व्हायच तेच झाल आम्ही रस्ता चुकला होतो.इथे तिथे वाटेचा अंदाज घेत आम्ही भा्तशेती असलेल्या परिसरात पोहोचलो तिथे जिथे रस्ता बंद होत होता तिथे कुंपण ओलांडुन शिरकाव करत होतो.तिथे आम्हाला एक गोठा लागला दोन म्हशी तिथे बांधलेल्या होत्या.आम्हाला जरा हायस वाटल.पण कसल काय तिथुनही वाटेचा काही मागसुम लागत नव्हता.

थोड पुढे गेल्यावर जाताना दिसलेल एक खोपट दुर दिसत होत तिथे जायच होत पण दुसरया बाजुला वाहन जवळच दिसत होती तेव्हा बाब्याचाच पुढाकाराने आम्ही ती वाट निवडली.पण त्याचा हा ही निर्णय चुकीचाच निघाला, आम्ही त्या रस्त्याला समांतर असे मध्ये मध्ये जात होतो. सुमारे पंधरा-वीस मिनटे असेच चालल्यावर एक वाहता ओहळ लागला.तो ओलांडल्यावर डीप हयांनी अतिशय आनंदाने तिथे असलेल्या  फ़्लेमिंगो नावाच्या वनस्पतीबद्दल माहिती सांगीतली.(बघा  सगळ विसरलो नाही मी.हे नाव लक्षात ठेवल कि नाही  🙂 ) थोड्याच वेळात आम्ही मुख्य रस्त्यावर पोहोचलो.वाघोटे फ़ाट्यापासुन काही अंतर पुढे आलेलो असल्याने परत त्या डांबरी रस्त्यावरुन पायपीट करत वाघोटे फ़ाट्याजवळ पोहोचलो.

हेच ते डीप...

फ़्लेमिंगो...

तिथे मस्त गरमागरम चहा-बिस्किटांची मेजवानी झॊडली.माझ्या आणि रुपालीच्या नशिबाने (आम्ही दोघेही बोइसरचेच होतो) आम्हाला तिथे बोइसर बस मिळाली.बसमध्ये अनुजाने चॉकलेटस वाटली. ती चघळत मस्त ताणुन दिली .त्यानंतर सुमारे पाचच्या आसपास बोइसर कधी आल कळलच नाही.तिथे सर्वांचा निरोप घेत घरी परतलो.पाउस अजुनही तसाच चालु होता.आज अगदि सुरुवातीपासुनच त्याने माझी साथ अजिबात सोडली नव्हती.आयुष्यात अ्सा सलग ७-८ तास तेही मुसळधार पावसात पहिल्यांदाच इतका नखशिखांत भिजलो होतो.घरी आल्यावर मस्त गरम पाण्याने आंघोळ केली आणि गरमागरम कॉफ़ीचा आस्वाद घेत आज घेतलेली सुट्टी सार्थक झाल्याचा आनंद साजरा केला.दिवसभर भिजलो असलो तरी आजारी पडणार नाही ह्याची शाश्वती होती.का सांगु मनापासुन भिजल कि पाउसही आपली काळजी घेतो.असो  पोर्तुगीज,इंग्रज आणि मराठ्यांच्या  राज्यांचा साक्षीदार असलेला कोहोज एकदातरी भेट देण्यासारखा आहे.आजुबाजुचा हिरवाईने नटलेला,पावसामुळे अधिकच खुललेला निसर्ग हयामुळे सध्या तर तो खरच खुप मोहक झाला आहे.त्यात वर तो मानवरुपी दगड  उन-पाउस-वारयाचा मार सहन करत नव्या नव्या ट्रेकर्संना हाक घालत त्यांची वाट पाहत उभा आहे…त्याच्या हाकेला साद दयाल ना…

(अधिक छायाचित्र पाहण्यासाठी  इथे भेट दया… )

26 thoughts on “किल्ला कोहोजचा…

 1. जबराट!
  यार तू आणि सुझेनं काय चालवलंय काय राव! एकामागोमाग एक ट्रेकच्या भन्नाट पोस्टा! मलाही घेऊन चला कधीतरी ट्रेकला!

 2. दे दना दन ट्रेक वारी सुरू आहे लेकांची…लय भारी.

  तांदूळवाडी झाला…कोहोज झाला….आता बहूतेक अशेरी गडाचाच नंबर लागणार.

 3. सही सही.. एकही रविवार वाया घालवायचा नाही असा चंगच बांधलाय वाटतं तुम्ही लोकांनी..
  फोटो मस्तच रे..

  मी दोनदा रायगड अशाच मुसळधार पावसात केला होता त्याची आठवण आली 🙂

 4. उर भरून येतो तुमच्यासारख्या नशीबवान भटक्यांना पाहून. सलग भटकंती, तीही पावसाळ्यात !!
  चालुद्या…..बाप्प्पा पाठीशी राहो सदैव तुमच्या. बाकी पोस्ट छान जमलीये !!

  • दवबिंदुवर स्वागत आणि आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार्स…
   इच्छा तिथे मार्ग…लवकरच तुमची इच्छा पुर्ण होवो…तुमच्यासारख्यांना हेवा वाटण्यासाठीच हे इथे लिहतो … 🙂

 5. देवा आता मात्र निषेध बरं का….. हे बघ भटका पण पोस्टा नको रे……

  विद्या चल लवकर जाऊ आपणही भारतात पुन्हा सगळे एकत्र भटकूया!!!

 6. काय मस्त भटकलात रे!!!! कोहोज छानच वाटत आहे. मी आमच्या काळात तिकडे कधी गेले नाही. फोटो आणि वर्णन अप्रतिम!!!
  तुझा आणि माझा ब्लॉग एकच रंगाचा!!!!! असुदे!!!! माझा भाऊ न तू मग आपले सेम सेम ब्लॉग!!!!!

 7. तुमचे हे सलग ट्रेक्स वाचून मला माझे जुने काही दिवस आठवले…ट्रेक नाही पण ट्रेल्स खूप केले होते…अगदी जवळ जवळ सर्व विकांत…असा अख्खा दिवस भिजून आल्यावर मग गरम पाण्याने अंघोळ आणि त्यानंतर गरम चहा कॉफी याची चव न्यारी लागते नाही…
  ता.क. डोळे बरे झाले असतील तर अजून हिरवळीचे उरलेले विकांत पण भटकंती करून घे. मग ऑक्ट. हिट सुरु झाली की आराम करशीलच..:)

  • हो ग दिवसभर भिजल्यावर गरम पाण्याने आंघोळ वर गरमागरम कॉफ़ी..एकदम झक्कास…..शक्य तितके विकांत भटकंती करायची आहेच…डोळे पण बघ ना कसे भरुन आले निसर्गसौंदर्य पाहुन…. 🙂

 8. पिंगबॅक कामणदुर्ग……एक चकवा. « दवबिंदु

 9. पिंगबॅक भेट अशेरीभाईंची … | दवबिंदु

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s