कामणदुर्ग……एक चकवा.


तांदुळवाडी,कोहोज आणि रतनगड अश्या मोहिमांवर सलग तीन रविवार सत्कारणी लावुन त्यापुढचा एक रविवार बाप्पांच्या चरणी अर्पण केला.पण लगेचच पुढच्या रविवारी ’थांबला तो संपला’ हया तत्वावर कामणदुर्गसाठी मोर्चेबांधणी केली.हि मोहिम करायची हयावर अगदी शनिवारी रात्री शिक्कामोर्तब झाला,कारण कुठेतरी जायचच हा इरादा पक्का होता.खरतर हया कामणदुर्गाचे नाव  ऐकले नव्हते,त्यामुळे असेल छोटा-मोठा अस वाटल होत.पण त्याने पुढे ’छोटा बच्चा समझ के हमसे…’ म्ह्णत  आमचा चांगलाच घाम काढला,ते पुढे लिहतोच.तर कामणदुर्ग हा वसई तालुक्यातील कामण गावाजवळील सुमारे २१०० फ़ुट उंचीचा एक टेहळणीचा किल्ला.ठाणे-घोडबंदर मार्गावरुन उत्तरेला पिरॅमीडच्या आकारासारखा दिसणारा आणि लक्ष वेधुन घेणारा हा किल्ला.तसेच पश्चिम रेल्वेने प्रवास करतांना वसईजवळ ट्रेनमधुनही तो आपल्याला दर्शन देत असतो.असे असुनही तो तितकासा ओळखीचा आणि प्रसिद्ध नाहीये.तसे मलाही जास्त प्रसिद्ध नसलेले,गर्दी नसलेलेच किल्ले जास्त आवडतात ट्रेकिंगसाठी.नाहीतर आज-काल बरेचसे किल्ले केवळ टुरीस्ट स्पॉट बनुन राहीले आहेत…

रात्री केवळ दोन तासाची झोप घेउन सकाळी उठलो.एकदा वाटल द्यावी परत मस्त ताणुन,पण लगेच मनाला ’ आवरा’ म्हणत तयारी करत निघालो.रस्त्यातच अनुजाचा फ़ोन आला कि तब्येत ठिक नसल्याने ती येणार नाही.पाठोपाठ दीपकही काही अपरिहार्य कारणामुळे येवु शकत नसल्याच कळाल.तर मी,सुझे आणि वॅकचे (वसई ऍडवेंचर क्लब) सहा असे आठ जण वसईला भेटलो.त्या आठ जणात सुहास , मी आणि  अंकल,रोशन,योगेश,कुलदीप ही कोहोजवालीच टीम तर दोघेजण नवीन होते.कामणदुर्गला जाण्यासाठी वसई हुन भिवंडी बाजुला जाणारया बसमधुन चिंचोटीला उतरुन तिथुन रिक्षा करुन कामण गावात जाता येते.तर काही बस कामण गावातुनही जातात.आमच नशीब चांगल होत.सव्वा सातच्या सुमारास एसटी कसेबसे घुसलो.आम्ही दरवाज्याजवळच अवघडुन उभे होतो.मुंगीला शिरायलाही जागा नसतांना पुढील दोन थांब्यावर अजुन आठ-दहा माणस आत कोंबली गेली.कंबर एकदम आखडुन आली होती,त्या अवस्थेतच पाउणेआठ-आठ दरम्यान कामण गाठल.

कामणला पोहोचताच तिथल समोरचच एक छोटस हॉटेल ताब्यात घेतल.मग तिथे वडा-पाव,भजी,चहा असा हल्लाबोल करत पोटातील कावळ्यांशी तह केला.पोटोबा वैगेरे उरकुन सव्वाआठला कामण सोडुन आम्ही गडाकडे कुच केल.गावातुन थोड बाहेर पडल्यावर कामणदुर्ग अगदी समोरच दिमाखात उभा असलेला दिसला.तिथे सुरुवातीपासुनच वेगेवेगळी फ़ुल हसुन आमच स्वागत करत होती.काही वेळ चालल्यावर आम्हाला एक ओढा ओलांडावा लागला.शेतातल्या बांधावरुन पुढे एका पाण्याच्या प्रवाहाला समांतर असलेल्या छानश्या पायवाटेवरुन पायपीट करत सुमारे तासभरात गडाच्या पायथ्याशी पोहोचलो.दरम्यान रस्त्यात कॅमेरयांची क्लिकाक्लिकी चालु होतीच.

तिथे सुरुवातीपासुनच एकदम उभी चढण होती.कितीतरी वेळ त्या चढावावर चढुनसुद्धा तो संपायच नावच घेत नव्हता.काही अंतरावर रोशनने त्याच्याकडील भुक लाडुंचे पाकिट काढले.त्याचा आस्वाद घेउन आम्ही आमची चढाई सुरुच ठेवली.रस्त्यात डासांचाही खुप त्रास होत होता,आणि त्यात अर्ध्या बाह्यांचा टीशर्ट घालुन त्यांना मोकळ आव्हान देणारा मी एकटाच शहाणा होतो. 🙂 पुढे फ़ुलांची एक वॅली लागली तिथे पाच-सात मिनटे थांबुन आम्ही तशीच पुढे आगेकुच केली.सुर्यनारायणालाही कोणी डिवचल होत कि काय कुणास ठाउक पण भयंकर तापला होता तो.सारखा घसा कोरडा पडत असल्याने आमचा पाण्य़ाचा साठाही कमी कमी होत होता.मोजकी झोप,डासांचा उच्छाद,सुर्यदेवांचा कोप,वारयाचा अभाव,निरंतर चढण,सारखी लागणारी तहान,घाम हया सर्वांमुळे काही क्षण एखादी शिक्षा भोगत असल्यासारख देखील वाटत होत.त्यातल्या त्यात रस्त्यात दिसणारी सुंदर फ़ुले आणि आमचे पीजे आम्हाला काही प्रमाणात दिलासा देत होते.

काही भाग तसाच पुढे चढल्यावर आम्हाला एक मोकळा भाग लागला.तिथुन भाईदंरचा पुल अगदी स्पष्ट दिसत होता.तिथे थोडा वेळ जमीनीला समांतर झालो.अंकल आणि माझ्याकडील चॉकलेटसचे वाटणी झाली.त्यानंतर पुढे अंकल आणि आज माझी ओळख झालेले दोन नवीन मेंबर त्यांच्यामागे काही अंतरावर मी आणि रोशन तर मागे अगदी आरामात येणारे सुहास,योगेश आणि कुलदीप अश्या आमच्या तीन तुकड्या पडल्या.तिथुन पुढे आम्हाला  आमच्या उंचीपेक्षा जास्त उंचीचा बराच गवताळ भाग लागला.त्यानंतर बांबुच जंगल लागल.सावलीमुळे सुर्यनारायणांचा त्रास इथे थोडा कमी होता,बाकी संकटे होतीच सोबतीला. त्याच वेळी सुहासने फ़ार्मात येउन दरीजवळ एक मस्त जीवघेणा गोल केला.त्याच्या जीवावर आल होत पण पँटीवर निभावल. 🙂 माथा अगदी जवळ आला असतांना रोशनने सांगीतल आता हया डोंगराला बगल देउन आपल्याला खाली उतरायच थोड आणि समोर तो दिसतो आहे ना तो आहे कामणदुर्ग, तो आपल्याला चढायचा आहे.मी ते वाक्य डोक्यात दोन-तीनदा रीपीट केल.वर तो सुर्यदेव इतका तळपत-चमकत असतांना डोळ्यासमोर इतर तारे चमकायचा काही प्रश्नच नव्हता पण मनातल्या मनात एक चक्कर मात्र येवुन गेली. 🙂

थोड खाली उतरल्यावर परत लागणारा तो चढाव खरच अगदी प्रचंड वाटत होता पण मागे हटणारयातले आम्ही नव्हतोच मुळी कधी.मजल-दरमजल करत कामणदुर्गाच्या माथ्यासमोरील मोकळ्या जागेत पोहोचलो.त्या जागेच्या थोडस आधी एक छोटासा दगडी भाग होता तिथे बाजुला चांगली वाट असतांना ती न दिसल्याने मी कसरत करुन त्या दगडावरुन उगाचच स्पायडरमॅनगीरी केली.वर पोहोचल्यावर स्वत:वरच मस्त खिदळुन हसलो.एव्हाना सगळ्याच गाड्या  धापा टाकत होत्या.इंधनाची सक्त गरज होती,त्यात त्या नवीन दोघेजण दुपारी ड्युटी जॉइन करण्यासाठी इथुनच परतणार होते.मग काय सगळ्यांनी आपापल्या पोतड्या उघडल्या.जवळजवळ सगळ्यांकडचच पाणी संपलेल असल्याने खाताना, खावे कि न खावे हा प्रश्न पडला.त्याचवेळी ’खाण्यासाठी जन्म आपुला ’ हयाचे स्मरण झाल्यामुळे तो प्रश्न तसाच पडत -धडपडत समोरच्या दरीत सामावुन गेला.सुहासने तिथे जास्त काही खाल नाही पण मी मात्र खादाडीचा चांगलाच समाचार घेतला.कलेजी फ़्राय,बुरजी-चपाती,सॅंडविच,ब्रेड-चटणी,नानकटस,बिस्किटे वैगेरे बरीच विविधता खादाडीत होती.

पोटोबा तुडुंब भरल्यावर थोडासा आराम करुन नवीन दोघे परतीच्या वाटेला लागले तर आम्ही आमची पुढील चढाई सुरु केली.भरपेट खादाडीमुळे सुस्ती,उन,तहानेने जीव कासावीस,त्रास द्यायला इथे डासांएवजी भुंगे हयातुन मार्ग काढत आम्ही एका रॉकी पॅच जवळ पोहोचलो.तिथुन वर पाहिल्यास बस हे चढल की झाल अस वाटत होत तेव्हा इच्छाशक्ती वाढुन ते पटापट चढुन गेलो.वर गेल्यावर पाहतो तर कामणचा माथा अजुन थोड बाजुला जाउन परत वरती चढुन येणार होता.अंकलनी त्याच्यांकडे राखुन ठेवलेल्या दुसरया पाण्याच्या बाटलीतल पाणी प्यायला दिल्यावर थोडा जीवात जीव आला.बाकीचे चार जण बरेच मागे राहीले होते.मग अंकल आणि मी थोडा आराम केला.सगळे आल्यावर परत पुढे चालल्यावर दगडात कोरलेली एक मुर्ती आम्हाला दिसली,आणि तिथुन थोड जवळच पाण्याची दोन टाके लागली. त्यानंतर परत एक  दगडी कातळ आमच्या समोर आली.हया दगडी कातळी जास्त कठिण नसल्या तरी एकदम सोप्याही नव्हत्या.एका बाजुला दरी असल्याने काळजी घेणे क्रमप्राप्त होते.त्यावर दिसत असलेल्या सुकलेल्या मळीवरुन पाउस पडला तर ही आपला चांगलाच समाचार घेणार हे अगदी स्पष्ट होते.आम्ही सगळे ती कातळ सुरळीत चढुन एकदाचे गडमाथ्यावर पोहोचलो.

आम्ही त्या माथ्यावर पोहोचलो तेव्हा दुपारचे सुमारे दीड वाजले होते.कामण गाव सोडुन आम्हाला तब्बल सव्वा-पाच तास लागले  होते. गडमाथ्यावरचा सर्वात वरचा टेकडीला शीव व त्याखालच्या टेकडीला नंदी असे संबोधुन कामणदुर्गाला नंदी माळ असेही म्हटले जाते.गडमाथ्यावर एका पाण्याच्या टाक्याखेरीज दुसर काहीही नाही.त्या टाक्याच्या सभोवताली सगळ्यांनी आपापले देह  जमीनीला समर्पीत केले. मी आणि सुहासने त्या टाक्यातील पाण्याने अर्धी आंघोळच केली.खुप बर वाटल त्या पाण्याने.मग अमृतासारखे ते पाणी मनसोक्त गटागटा प्यायलो.पाण्यात दोन साप,काही किडे,खुप मासे होते, पण पाणी छान होत.आणि तसाही दुसरा पर्यायच नव्हता. 🙂

आम्ही सगळे तिथे पडलेलो असतानाच,सकाळपासुन आमची परीक्षा घेणारया निसर्गाने आम्ही त्यात उत्तीर्ण झालो हे सांगण्यासाठी आणि बक्षीस म्ह्णुन खुप ढग आमच्याकडे पाठवुन दिले होते.त्या ढगांचा सुखद गारवा त्या क्षणी जो अनुभव देत होता तो शब्दात व्यक्त करण्यासारखा नक्कीच नाही.त्या गारव्याने सकाळपासुन आलेला  सगळा ताण ,थकवा पुर्ण निघुन गेला.त्या स्वर्गीय वातावरणात योगेशने त्याच्याकडील रव्याच्या लाडुचा डब्बा उघडला.त्यांची लज्जत चाखत आमच्या गप्पा चालु होत्या.एक छोटासा नानेटी नावाचा  साप सारखा पाण्याबाहेर डोक काढुन आमच्या गप्पा एकत होता.माझी पाण्याची बातली रिकामी झाल्यावर ती भरायला मी पाण्यात हात घालणार इतक्यात माझ लक्ष माझ्या अगदी अगदी जवळ माझ्याकडे प्रेमाने डोळे वटारुन पाहणारया दीवड हया सापाकडे गेल.आणि त्याच प्रेम मला कळलच नाही मी दचकुन एकदम उभाच राहीलो.त्यानेही मग लागलीच हिरमोड होवुन पाण्यात डुबकी घेतली. 🙂

थोडा वेळ तिथे आराम केल्यावर अडीचच्या सुमारास आम्ही उतरायला सुरुवात केली.दगडी कातळींचा भाग आरामात उतरल्यावर आम्ही मघाशी खादाडी केलेल्या ठिकाणी थोडी फ़ोटुग्राफ़ी केली,आणि पुढील मार्गाला लागलो.आजसकाळपासुन तो मला भेटला नव्हता.तेव्हा त्यालापण माझी आठवण आली आणि आला तो भेटायला.सकाळी उन्हात माझे झालेले हाल आठवुन तो एकदम ढसा ढसा रडु लागला.आम्ही कामण गावात जाईपर्यंत त्याचे अश्रु तसेच कोसळत राहीले.उतरतांना मी बहुतेक वेळ अंकल बरोबरच गप्पा मारत उतरलो.त्यांनी १९७७ पासुन त्यांनी ट्रेकिंगच हे अविरत व्रत सुरु केल्याच सांगीतल.खरच मानल यार त्यांना.सकाळी उन ज्या तीव्रतेने त्रास देत होत तेवढच हया पावसाने आम्हाला झोडपल होत. त्यात मी आणि सुहास पावसासाठी काहीही घेतलेल नसल्याने मस्त नखशिखांत भिजलो.पाना,फ़ुला,वाटांच रुपडच पावसाने एकदम बदलुन टाकल होत.चार-सव्वाचार ला आम्ही खाली पोहोचलो.तिथुन तासभरात कामणमध्ये पोहोचुन गरमागरम वडा-पाव आणि चहा वर ताव मारला अन परतीच्या वाटेला लागलो.

हया ट्रेकमध्ये कामणवरच निसर्गसौन्दर्य पाहुन माझ्या डोळ्यात सामावु शकलो नाही ते पाहतांना डोळे एकदम भरुन आले.आणि त्यांनीच आधी मी  नाही म्हटलेल्या २५ सप्टेंबरच्या ट्रेकसाठी बहाणा मिळवुन दिला.तसा तिकोना ट्रेक ही खुद्द श्रीमंत,सेनापतींची सोबत असल्याने खुपच मस्त रंगला.त्याबद्दल सेनापतींचीही डिटेलातली पोस्ट येइलच.मला तरी इतक्या मल्टीस्टारकास्ट असलेल्या ट्रेकबद्दल लिहण झेपणार नाही.तसही मला हया ट्रेकिंगच्या पोस्टमध्ये तोच तो पणा  जाणवु लागल्यामुळे, शिवाय कं  मुळेही ह्यापुढे ट्रेकवर लिहायच काही काळ थांबवायचा विचार आहे….(थांबण्याबद्दल लिहल आहे मी पुर्ण बंद करण्याबद्दल नाही,तेव्हा एकदम निश्चिंत होवु नका…  🙂 ) तेव्हा भेटुच लवकर ,अश्याच कोणत्या तरी गडाच्या सोबतीने….


Advertisements

16 thoughts on “कामणदुर्ग……एक चकवा.

 1. मलाही जास्त प्रसिद्ध नसलेले,गर्दी नसलेलेच किल्ले जास्त आवडतात ट्रेकिंगसाठी.नाहीतर आज-काल बरेचसे किल्ले केवळ टुरीस्ट स्पॉट बनुन राहीले आहेत…+१

  हे अगदी बरोबर आहे.

  फ़ुलांचे फ़ोटु मस्त आलेत…BDW ज्या फ़ुलामुळे डोळ्यात लाली आली ते फ़ुल कुठ आहे??? त्याचा फ़ोटु नाही टाकला. 😉

 2. आयला.. पुन्हा ट्रेक? तू आणि सुहास तर फुल सुटले आहात यार.. झक्कास यार..

  पोटातल्या कावळ्यांशी तह !!!! हे हे .. हे जाम भारी होतं.

  • एकदा हे वेड लागल की लवकर सुटत नाही..तुला तर हयाच्या प्रत्यय असेलच…बाकी ट्रेकला पोटातील कावळ्यांशी तह करावा लागतो रे…ते ही गेल्यावेळची गडावरची खादाडी आठवुन आता लवकर पटतात… 🙂

 3. >>>>अरे आवरा…
  सारखे ट्रेक्सचे लेख वाचूनच मला दमायला व्हायला लागलंय! +1

  निषेध!!!

  बाकि डोळ्यांमधे लाली भरणारं ते/ती फुलं नव्हतं हे मान्य करू का आम्ही 😉

  • निषेध स्वीकारुन पुढील एक महिना ट्रेक्स बंदची घोषणा करण्यात येत आहे…..
   ते/ती काही नव्हत,तो पुर्ण निसर्गच होता ग जो पाहुन माझे डोळे भरुन आले…. 🙂
   आणि अस काही असल्यावर तुझ्यासारख्या काही लोकांना अगदी आवर्जुन कळवीन…

 4. फोटू मस्त आलेत.. कामणदुर्गाला जास्त प्रसिद्ध करू नकोस रे देचुदा.. नाहीतर त्याचापण “सिंहगड” व्हायचा…मी तर जाणारच !!

  • आशाजी,मी सुद्धा आधी एकल नव्हत कामणदुर्गाच नाव.बाकी तिथे फ़ुल खरच खुप छान होती,तीच गड चढायला उर्जा देत होती.आपल्या प्रतिक्रियेवद्दल आभारी आहे…

टिप्पण्या बंद आहेत.