दिवाळी…..अशी नको!


परत एकदा आली आहे दिवाळी
थंड वारे वाहतील आता हिवाळी
खायला लाडु, चकल्या अन शंकरपाळी
माझ्यासाठी मात्र ही आहे खुपच निराळी

सर्व घालत आहेत नवे कपडे
माझ्या काळजाचे मात्र होत आहेत तुकडे
आनंद पसरला आहे चोहिकडे
मग माझ्या नशिबात का हे अश्रुंचे सडे?

दारासमोर मस्त रांगोळीची उधळण
माझ्या आयुष्याची झाली धुळधाण
ते अभंग्यस्नान अन सुगंधी उटण
अन त्यातच माझ सर्वस्व लुटण

निष्काळजीपणे वाजवल्याने हेच फ़टाके
सहन करावे लागत आहेत मला हे चटके
बाहेर मुल वाजवत आहेत फ़टाके
माझ्या मनाला मात्र पडत आहेत फ़टके

रोषणाई सोबत झाला होता मोठा आवाज
पण मग कधी दिसला नाही थोडासाही प्रकाश
ना कधी किंचितही ऐकला स्वरांचा साज
आनंदाच्या,उजेडाच्या हया सणात
केवळ अंध:कारच पसरला आहे आज

तेव्हाच मेल होत हे मन
चालु आहेत आता फ़क्त स्पंदन
तरी देवाला करतो वंदन
लवकरच सु्टावे हे प्राणांच बंधन…..

दिवाळीत निष्काळजीपणाने फटाके उडवतांना डोळे-कान गमावलेल्या मुलाच्या भूमिकेतून लिहीलेली माझी हि कविता याआधी दीपज्योती हया दिवाळी अंकात प्रकाशीत झालेली आहे,खुप छान दिवाळी अंक आहे जरुर वाचावा.

दवबिंदुच्या समस्त वाचकांना हि दिवाळी आनंदाची,सुखाची भरभराटीची आणि सुरक्षित जावो हि शुभेच्छा….!!!

आंतरजालावरुन साभार...

Advertisements

16 thoughts on “दिवाळी…..अशी नको!

 1. देवेन !!! खरंच खूप विषण्ण करणारी आहे ही कविता. तुला ज्या भावना पोचवायच्या आहेत त्या अगदी योग्य रीतीने पोचतात. आवडली असं म्हणत नाही पण खरंच उत्तम !

   • >>कविता म्हणजे देवेन्द्र चा हातखंडा.

    नाही हो महेंद्रजी शाळा-कॉलेजात मागच्या पानावर खरड्लेल्या कविता (?) सोडल्या तर आता मोजुन ६-७ कविताच लिहल्या आहेत हो.पण तरीही तुमची प्रतिक्रिया सकारात्मक घेउन अजुन चांगल्या कविता लिहण्याचा प्रयत्न करेन.(घातल्याच कोणी शिव्या तर तुमच्याकडॆ बोट दाखवुन मोकळा होइन… 🙂 )

 2. देवेन एकदम मन सुन्न करायला लावणारी कविता…
  कोणाच्या मजेतुन कायमची सजा मिळते काही लोकांना…
  दिवाळीच्या शुभेच्छा..

 3. नमस्कार
  छान लिहिलीत कविता. बरे वाटले.
  राग येणार नसेल तर सुचवू ? सत्य आहे तुम्ही म्हणता. दिवाळीची संकल्पनाच वेगळे रूप घेत आहे. ते मीनमिणारे शांत दिवे, मोहक रंगोळ्या, घरी केलेला गरम गरम नि चवदार फराळ, आपटबार वा किल्ली- खिळा आणि आग्पेटीतील काड्याचा गुल ह्यांचा आवाज धमाका. खूपशी शांतता, मजा आणि आनंद ह्यात जाणारे चार दिवस दिवाळीचे. सारे सारे रंग रूप बदलत आहे. मान्य परंतु आनंद मात्र तोच आहे.
  ते जाणलं पाहिजे. फक्त सकारात्मक दृष्टी बाळगा. काळ चक्रमय असल्या मुळे बदल होणारच. फक्त गाभा अर्थात आत्मा तोच राहील हे बघावे.
  धन्यवाद.
  भगवान नागापूरकर
  ( जीवनाच्या रगाड्यातून – ब्लॉगकरते )

  • भगवानजी, आपल बोलण योग्यच आहे पण आजकाल बर्याच ठिकाणी सण फ़क्त ’फ़ॉर्मॅलिटीह’ म्हणून साजरे केले जातात.शिवाय त्यांना बाजारी स्वरुपही आल आहे.त्याने हजाराची माळ लावली काय मी पाच हजाराची लावतो.आपल्या मुलांना जास्तीत जास्त फ़टाके पुरवण्यात पालकांना आनंद होतो पण त्या फ़टाक्यांमुळे जे वायु आणि धवनी प्रदुषण होत आहे ते त्यांच्या लक्षात येत नाही.
   >>ते मीनमिणारे शांत दिवे, मोहक रंगोळ्या, घरी केलेला गरम गरम नि चवदार फराळ, आपटबार वा किल्ली- खिळा आणि आग्पेटीतील काड्याचा गुल ह्यांचा आवाज धमाका. खूपशी शांतता, मजा आणि आनंद ह्यात जाणारे चार दिवस दिवाळीचे.ह्यातही आनंद मिळतोच ना….

 4. कवितेचा विषय योग्यच असून आपण भावना प्रखरपणे व्यक्त केल्या आहेत. हे सर्व सर्वांनाच कळत असते पण वळत नाही हेच फार खेदजनक आहे. एकूणच सर्व सणांना भलतेच बाजारी स्वरूप आल्याचा हा परिपाक आहे.
  -श्री.वि.आगाशे

    • खरतर आमचा एक नातेवाईक हया फ़टाक्याचा बळी झालेला आहे म्हणजे त्याची श्रवणक्षमता खुपच कमी झालेली आहे आणि हे त्याला आयुष्यभरासाठी मिळालेल आहे.त्याला डोळ्यासमोर ठेवुन हयाची दाहकता मांडायची होती मला.आणि हि कविता एकदम इन्स्टंट लिहुन पाठवली होती देवकाकांना (शिर्षकही दिल नव्हत ते सुद्धा देवकाकांनीच दिल ),त्यामुळे मला वाटल कदाचित तुला आवडली नसेल….असो आता तुझ्या भावना पोहोचल्या रे… 🙂

 5. दवबिंदू प्रमाणे शुद्ध, निर्मल , आणि पारदर्शक असे तुमचे विचार आहेत.मला तुमच्या कविता खूप आवडल्या.मराठी ब्लॉग कसा
  असावा..ती एक कल्पना न ठेवता तुम्ही प्रत्यक्ष साकार केली आहे

  • भारती, दवबिंदुवर आपल स्वागत…!
   इतक्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल खुप खुप आभार्स…!
   खरच खुप मोठी कॉम्प्लीमेंट दिलीत तुम्ही हया दवबिंदुला…
   हे सगळ निरंतर असच ठेवायचा प्रयत्न करीन मी..

टिप्पण्या बंद आहेत.