पानिपत…


पानिपत….जे नाव नुसत ऐकल कित्येक मराठ्यांच्या काळजात कुठे ना कुठे एक ठोका चुकतोच…सव्वा लाख बांगडी फुटली अस वर्णन ज्याच केल जाते…मराठय़ांसाठी एक आख्यायिका बनलेल्या अश्या ह्या मराठय़ांच्या आणि एकूणच सबंध भारताच्या इतिहासावर सखोल परिणाम करणाऱ्या पानिपतच्या महासंग्रामाला येत्या १४ जानेवारी रोजी अडीचशे वर्षे पूर्ण होत आहेत.त्यानिमित्ताने गेल्या रविवारी विले पार्ले येथील जनसेवा समितीने साठ्ये महाविद्यालयात सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ‘पानिपतचा रणसंग्राम’ हा अभ्यासवर्ग आयोजित केला होता.विश्वास पाटील यांच पानिपत वाचल्यापासून पानिपत हा विषय माझ्यासाठी अधिकच जिव्हाळ्याचा झालेला असल्याने जेव्हा ह्या कार्यक्रमाबद्दल रोहनच्या बझावर कळले तेव्हा मी तिथे जायचच अस ठरवून टाकल होत.

खरच विश्वास पाटील ह्यांच पानिपत वाचतांना ज्याच्या अंगावर काटा येत नाही तो खरा मराठा नव्हेच,इतक सुंदर शैलीत त्यांनी हे पुस्तक लिहल आहे.पुस्तक वाचतांना कित्येक वेळा आपल रक्त अस सळसळते कि आता आपण उठून लढायला जाव अस वाटते. “बचेंगे तो और भी लढेंगे” म्हणत मृत्युला सामोरे जाणारया दत्ताजींचा व इब्राहीमखानाचा शेवट तसेच लढाई हरल्यावर झालेले मराठ्यांचे हाल हे प्रसंग त्यांनी असे उभे केले आहेत कि ते वाचतांना अगदी भरून येत,आत कुठे तरी आपण रडतो पण त्याबरोबरच संतापाची, त्वेषाची भावनाही उफाळून येते.ज्या भाऊचे कौतुक तत्कालीन उत्तरेतील लोकांनी केले व ते आजही करत आले आहेत,त्या भाऊला त्याच्याच मातीत वेडा ठरवले गेले.त्या भाऊंची बाजूही अगदी योग्यरीत्या ह्या कांदबरीत मांडली आहे. ‘पानिपत’ जरी कांदबरी स्वरुपात असल तरी ते नुसत्या ऐकीव कथांवर आधारित नाहीये. विश्वास पाटलांनी त्यासाठी खूप संशोधन केल आहे आणि त्यांची मेहनत पुस्तक वाचतांना आपल्याला नक्कीच जाणवते. ह्यावर्षी त्यांना पानिपताची ३० वी आवृत्ती काढावी लागत आहे ती नुसती नाही.


सुहास त्याच्याबरोबर आलेले त्याचे मित्रवर्ग अर्चना ,धानद,प्रसन्न आणि मी असे आम्ही पाच जण कार्यक्रमाला गेलो होतो.अर्थातच कार्यक्रम परतेपर्यंत ते माझेही मित्र झाले होते. 🙂 रविवार सुट्टीचा,मजेचा दिवस असूनही सभागृह पूर्ण भरल होत.त्यातही तरुणांची संख्या जास्त होती,रविवारचा एक सबंध दिवस इतक्या लोकांनी ह्या पानिपत अभ्यासवर्गाला वाहिला हे पाहून खरेच बरे वाटले.कोण म्हणते मुंबईत मराठी माणूस राहिला नाही म्हणून…अस त्यावेळी उगाच वाटून गेल.ह्या कार्यक्रमाची मिडीयाने देखील दखल घेतली होती.बरयाच वृत्तपत्राचे प्रतिनिधी तसेच स्टार माझाचे प्रसन्न जोशी स्वत: कार्यक्रमाला उपस्थित होते.

कार्यक्रम बरोबर १० वाजता सुरु झाला होता. प्रस्तावना आणि पाहुण्यांच्या स्वागात संभारंभ आटोपल्यावर ज्येष्ठ इतिहास अभ्यासक श्री.निनादराव बेडेकर हयांनी पानिपतच्या रणसंग्रामामागील पार्श्वभूमीवर व्याख्यान दिले. त्यांची वक्तृत्व शैली खरच खूप सुंदर आणि जबरदस्त आहे,त्यात त्यांनी इतिहास अगदी घोळून पिला आहे त्यामुळे तारखां पासून ते छोटे छोटे संदर्भ अन व्यक्ती सगळच त्यांना तोंडपाठ आहे.त्यांच्या बोलण्यात दीड तास कसा भुर्रकन उडाला कळलेच नाही.त्यानंतर मिळालेल्या १० मिनटाच्या विश्रांतीच्या काळात आम्ही ट्रेकिंगसाठी वळवळणारे पाय मोकळे करण्यासाठी सभागृहाबाहेर आलो. 🙂 तेव्हा तिथे तीन वर्षापूर्वी सुहास आणि त्यांची भेट झालेल्या पार्श्वभूमीवर निनाद बेडेकर स्वत:हून आमच्याकडे आले आणि आम्हा सर्वांशी हस्तालोंदन केले.आमच्या सुदैवाने आम्हाला काही क्षणासाठी कां होईना त्यांच्याशी इतक्या जवळून प्रत्यक्ष बोलायला मिळाल.


त्यानंतर युद्धाचा बराच अनुभव असलेले,लष्करातील निवृत्त अधिकारी मेजर जनरल शशिकांत पित्रे ह्यांचे व्याख्यान झाले.त्यांनी त्यांच्या लष्करी नजरेतून पानिपत संग्रामाचे युद्धशास्त्रीय पैलू ,दोन्ही बाजूंच्या व्यूहरचना आदी विविध स्लाईडसच्या सहाय्याने चांगल्याच उलगडून दाखवल्या.पानिपत युद्धाच्या विश्लेषणांबरोबरच कोणत्याही युद्धावर परिणाम करणार्या काही ठळक महत्वाच्या बाबींची माहिती दिली.त्यानंतर पेटपुजा उरकल्यावर निनादरावानी त्यांच्या ऐतिहासिक पत्रांच्या अभ्यासातून त्यांना कळलेल्या अनेक लहान-मोठ्या किस्स्यांची जोड देत, त्यांच्या खास शैलीत पानिपतचा रणसंग्राम आमच्या डोळ्यापुढे उभा केला.त्यानंतर इतिहासाचे गाढे अभ्यासक पांडुरंग बलकवडे ह्यांनी युद्धानंतर निर्माण झालेली परिस्थिती आणि मराठा साम्राज्यावर युद्धाचा झालेला परिणाम या विषयांचा उहापोह आपल्या व्याख्यानातून केला.बोलतांना त्यांच्या त्वेष वाखाखण्याजोगा होता.आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची आठवण न ठेवणार्या आजच्या पिढीला त्यानी चांगलेच शाब्दिक फटके दिले.शेवटी प्रश्नोत्तरांचे सत्र चांगलेच रंगले व त्यानंतर यथावकाश कार्यक्रमाची सांगता झाली.तिथून निघाल्यावर आम्ही एक छोटेखानी खादाडी कार्यक्रम केला हे ही इथे नमूद करावेसे वाटते मला. 🙂

पानिपत रणसंग्रामाला १४ जानेवारी २०११ रोजी अडीचशे वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने पानिपतच्या योद्धयांना मानवंदना देण्यासाठी पानिपत रणसंग्राम स्मृती समिती व विवेक व्यासपीठ ह्यांच्या संयुक्त विध्यमाने ‘पानिपत वीरभूमी अभिवादन यात्रा’ आयोजिण्यात आली आहे. पानिपत अभिवादन यात्रेमध्ये पानिपतची युद्धभूमी, कुरूक्षेत्र, दिल्ली, आग्रा, वृंदावन आणि मथुरा येथील ऐतिहासिक स्थळांना ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञांबरोबर भेट देण्याचा कार्यक्रम आखण्यात आला आहे.महाराष्ट्रातील अधिकाधिक तरुण, नागरिकांनी यात्रेमध्ये सहभागी होऊन रणसंग्रामातील योद्धयांना मानवंदना देण्याचे आवाहान समितीकडून करण्यात आले आहे.ह्यासंदर्भात अधिक माहितीसाठी सा. विवेक कार्यालय मुंबई (०२२) २४२२ ०९४५१,१४४०,५३६९ आणि सा. विवेक कार्यालय पुणे (०२०) २४४८ १३९२ इथे संपर्क साधावा.

तर अश्या ह्या पानिपताला खूप जुना इतिहास आहे. महाभारतात पांडवांनी ज्या पाच शहरांची निर्मीती केली. त्यापैकि एक शहर पांडुप्रस्थ म्हणजेच आजचे पानिपत होय.पानिपत हे ठिकाण दिल्लीपासून ८५ कि.मी. अंतरावर हरयाणा राज्यात आहे.या पानिपतात तीन युद्धे लढली गेली पानिपतचे पहिले युद्ध १५२६ मध्ये दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोधी आणि बाबर मध्ये लढले गेले.पानिपतचे दुसरे युद्ध १५५६ मध्ये हेमू आणि मुघलांच्यात लढले गेले.ह्या दोन्ही युद्धात मुघलांची सरशी झाली.तिसरी लढाई झाली ती आपली…पानिपतचे हे तिसरे युद्ध झाले नसते तर कदाचित अहमदशाह अब्दाली हा भारताचा शासक झाला असता व भारत आज एक इस्लामिक राज्य असत.तसही ह्या तीनही युद्धापैकी एकाही युद्धाचा निकाल वेगळा असता तर भारताचा इतिहास वेगळा असता,हे वेगळ सांगण्याची गरज नाही.

पानिपतावरील ह्या युद्धाचा महाराष्ट्रातील जनमानसावर निश्चितच खोल परिणाम झाला होता.त्यामूळे ह्या युद्धा संदर्भातील अनेक बाबी पुढे म्हणी व वाक्यप्रचार म्हणून मराठीत रुढ झाल्या आहेत.पानिपत होणे (अगदी वाईट पराभव होणे ह्या अर्थी ),संक्रांत कोसळणे (संक्रातीच्या दिवशी हे युद्ध झाल्यामुळे मोठे संकट येणे ह्या अर्थाने ही म्हण वापरतात) ,पाचावर धारण बसणे (युद्धापूर्वी भाऊंच्या सैन्यात जी महागाई होउन जी भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली होती त्या संदर्भात),´विश्चास गेला पानिपतात` हे वाक्य तर अगदी सर्रास वापरले जाते,’१७६० काम काय करत बसला आहेस’ ह्यातील १७६० चा संदर्भही १७६० साली मराठ्यांनी संबध भारतात ज्या विविध मोहिमा आयोजल्या होत्या, त्याबाबत आहे.खरतर पानिपत हा तेव्हापासून मराठी संस्कृतीचा कसा कां होईना एक अविभाज्य घटकच बनलेला आहे.

मी जे काही वाचल आहे त्यावरून माझ्या मते पानिपत संग्रामातील पराभवाची कारणे खालील प्रमाणे आहेत.

१. सर्वात पहिलं आणि सर्वात महत्वाच कारण म्हणजे भाऊंना नको असतांनाही केलेला यात्रेकरुंचा आणि बुणग्यांचा भरणा.ह्यांची संख्या सैन्यापेक्षा अधिक होती,मराठ्यांच्या मंद हालचालीस,उपासमारीस एकूणच पानिपतच्या पराभवात ह्यांचा मोठा वाटा होता.ह्यांच्या रक्षणासाठी बरेच सैन्य उगाच खर्ची पडल.
२. सपाट भूमी असल्याने इब्राहिमखान गारद्याने सांगितलेल्या गोलाईच्या पद्धतीने लढाई खेळायचे ठरवलेले असतांना विठ्ठल विंचूरकर आणि दमाजी गायकवाड गोल तोडून बाहेर पडणे हा एक मोठा टर्निंग पोईंट होता युद्धाचा,कारण त्या मुळे अफगाण सैन्याला भारी पडत असलेल्या इब्राहीमखानाच्या तोफा बंद कराव्या लागल्या.
३. ह्या पराभवाचा ठपका मल्हारराव होळकरांवरही ठेवता येईल लढाई संपायच्या आत त्यांनी मैदान तर सोडलेच पण मुख्य म्हणजे हे युद्ध ज्या नजीबाने घडवून आणले त्याला आधीच मल्हाररावांनी हातात असतांना जीवन दान दिल होत.
४. वारंवार पत्र लिहूनही वेळेवर कुमक न पाठवलेल्या नानासाहेबांचाही ह्या पराभवात मोठा वाटा आहेच.
५. उत्तरेकडील एकाही सत्तेकडून मदत मिळवण्यास आलेले अपयश.

६. कुंजपुरायात पकडलेल्या अफागाण्यांवर इतक्या कमी कालावधीत विश्वास दाखवून त्यांना सैन्यात घेण,कारण त्यांनी युद्ध भरात असतांना मागे लुटालूट सुरु केली व अफगाणी सैन्यानेच मागून हल्ला केल्याचे वाटून

मराठा सैन्यात उगाच गोंधळ निर्माण होऊन सैन्य विस्कटल

७. अब्दालीने ज्याप्रमाणे राखीव सैन्याची एक तुकडी मागे ठरवली होती, जी अब्दालीच्या विजयाची शिल्पकार ठरली.तशी एखादी राखीव तुकडी मराठ्यांनी ही ठेवायला हवी होती.

८. भावनात्मक होऊन हत्तीवरून खाली उतरून भाउंनी केलेली चूकही आपल्याला चांगलीच महागात पडली.कारण ते तिथे न दिसल्याने ते पडले असे वाटून सैन्यातला गोंधळ अजून वाढण्यास मदत झाली.

९ . मराठा सैन्यात परस्पर विरोधी असलेले गट.

१० . मोठी रसद घेऊन येत असलेल्या गोविंद पंताच पकडल जाण,दुपारनंतर सूर्याची डोळ्यावर आलेली किरण,अब्दालीच्या उंटावरील लवचिक तोफांचा अभाव अश्या अनेक गोष्टी ह्या पराभवास कारणीभूत होत्या.पानिपत म्हटले, की आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो तो फक्त पराभवाचा इतिहास….नामुष्की,हळहळ ,दु:ख…पण लक्षात ठेवा, पानिपतचा लढा महाराष्ट्रासाठी नव्हता तो होता संपुर्ण हिदुंस्थानासाठी,अवघ्या हिदुंस्थानासाठी मराठ्यांच्या एका संबध पिढीने दिलेलं बलिदान होत ते..ह्या गोष्टीचा सार्थ अभिमान बाळगायला नको कां ?… किंबहुना मला तर वाटते आपण ते युद्ध हरूनही जिंकलो होतो,कारण….

१) सर्वात प्रथम म्हणजे त्याकाळच्या जगातल्या एका मोठ्या शक्तीशाली आणि अनुभवी बादशहाशी मायभूमीच्या रक्षणासाठी आपण एकट्याने न भिता टक्कर घेतली होती.

२)युद्ध झाल्यावर अब्दालीने दिल्लीच्या बंदोबस्तासाठी मराठ्यांनाच परत कायम केले,ह्यातच सगळ आल.

३)ह्या युद्धानंतर अब्दाली किंवा इतर कोणांही अफगाणी सेनापतीला ह्या मार्गाने भारतावर परत आक्रमण करायची हिंमत झाली नाही.

४)पराभवानंतर काही काळातच माधवरावपेशवेमहादजीशिंदे ह्यांनी मराठ्यांचे उत्तरेतील गतवैभव पुन: प्रस्थापित केले व सुमारे पंचवीस वर्षे भगवा झेंडा अखंड दिल्लीच्या किल्ल्यावर फडकत ठेवून ‘दिल्लीचे तख्त राखिले’.

अनेक लोकांच अस म्हणण आहे कि पुराणातली वांगी पुराणात ठेवा आजच काय ते बोला, पण मी म्हणतो मराठी शूरांनी त्या वेळी गाजविलेल्या मर्दुमकीचा ,त्यांच्या शौर्याचा जाज्वल्य इतिहास,त्यांचे बलिदान नव्या पिढीला कसे कळणार.त्यांचे हे कार्य विसरून कसे चालेल,ह्याचा अभिमान बाळगायला हवा,त्यांचा दुर्दम्य आत्मविश्वास, पराभवानंतरही खचून न जाता घेतलेली गरुडझेप ह्यापासून आपण काहीतरी स्फुर्ती,प्रेरणा घ्यायला हवी.वयाच्या अवघ्या अठ्ठाविसाव्या वर्षी अनंत अडचणींना तोंड देत,हिदुंस्थानासाठी मायभूमीपासून इतक्या दूर जाऊन अगदी धीरोदात्तपणे झुंझार लढा देवून वीरगती पत्करलेल्या तरीही त्याच्या मायभूमीने वेडा ठरवलेल्या,दुर्दैवाने एका मोठ्या शोकांतिकेचा धनी बनलेल्या, पानिपतच्या रणभूमीवर आजही एखाद्या कोपरयावर विचारमग्न होउन बसलेल्या भाऊच्या मनावरील भार आपल्याला थोडा कां होईना कमी करायचा आहे….

सदाशिवराव भाऊ

 

44 thoughts on “पानिपत…

  1. येता येता माझा हा कार्यक्रम थोडक्यात हुकला बघ… 😦

    पानिपत पण आपला अभिमान आहे… ह्या लढाईनंतर अब्दालीच काय कुठलाच परकीय शासक भारतावर चाल करून आला नाही… हा आपला सर्वात मोठा विजय..

    दुर्दैवाने आपण ह्याकडे फक्त पराभव या दृष्टीकोनातून बघतो… ‘करेंगे या मरेंगे’ ऐवजी ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ हा मूलमंत्र बाजीराव शिकला तो शेतशिवरायांच्या राजकारणातून… तो त्याने दिला होळकर – शिंदे – पवार – गायकवाड यांना.. तोच वापरून होळकर पानिपतच्या बाहेर पडला का??? प्रश्नच आहे..!!!

    उत्तरेकडील एकाही सत्तेकडून मदत मिळवण्यास आलेले अपयश हा मराठ्यांचा सर्वात मोठा पराभव होता.. मुळात आपला सर्वात मोठा पराभव तोच आहे.. मराठे देशभर सत्ता गाजवून सुद्धा उत्तरेच्या राजकारणात फक्त लुटारू म्हणून आज नावाजले गेले ही १८व्या शतकातील सर्वात मोठी चूक होती… ज्याला Grand Strategy ती निश्चित करण्यात शाहू(?) आणि नानासाहेब कमी पडले. पुढे मात्र महादजी शिंदे यांनी मराठ्यांची ताकद उत्तरेच्या राजकारणात पुन्हा आणली… त्यानंतर कुठल्याही परकीय सत्तेने भारतावर हल्ला केला नसला तरी तोपर्यंत इंग्रजांनी आपले जाळे विणले होते.. त्यानंतर अवघ्या ३०-४० वर्षात महादजी आणि नाना फडणवीस यांच्या मृत्यूबरोबर मराठा सत्तेमधला समजूतदार पणा संपला आणि १८०२ मध्ये तर वसईचा तह करून दुसरा बाजीराव नाममात्र पेशवा बनला..

    • हो रोहना ,तुला त्याच दिवशी संध्याकाळी निघायचं होत ना …धन्स रे तुझ्यामुळेच ह्या कार्यक्रमाबद्दल कळाल..

      मल्हारबा पळताना नक्की काय परिस्थिती होती त्यांच्या मनात काय होत ते नक्की सांगता येणार नाही पण नजीब नावाच्या सापाला पाळून त्यांनी नक्कीच मोठी घोडचूक केली होती .

      मराठे पण लुटतात ,अब्दाली पण लुटतो तेव्हा दोघे आपसात लढून एकाचा काटा निघावा अशी भूमिका घेऊन उत्तरेतील अनेक राजे तटस्थ राहिले….म्हणजेच आपण उत्तरेतले प्रदेश जिंकलो तरी तिथल व्यवस्थापन तेवढ नीट करू शकलो नाही,हे नक्की …शेवटी हैदाराचा मुलगा टिपू सुलतानाने जेव्हा इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी मराठ्यांना आव्हान केले,तेव्हा आपणही त्याच्यासोबत गेलो नाही … 😦

  2. देवा अरे अप्रतिम पोस्ट आहे… पानिपत हा कायम जिव्हाळ्याचा विषय आहे…. तू केलेले विवेचन उत्तमच…

    आत्ता ईतकेच सांगते की पोस्ट एकदा वाचून समाधान झालेले नाही म्हणून मी पुन्हा जातेय पोस्ट वाचायला…

    >>>>खरच विश्वास पाटील ह्यांच पानिपत वाचतांना ज्याच्या अंगावर काटा येत नाही तो खरा मराठा नव्हेच +100

    कार्यक्रमाला तूला जायला मिळाले… जावेसे वाटले याचे कौतूक रे!!

  3. पिंगबॅक पानिपत… | indiarrs.net Classifieds | Featured blogs from INDIA.

  4. पानिपत, ह्या नावातच मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा आहे. जरी आपण हरलो असलो तरी जसे मराठे लढले त्याची दखल सार्‍या जगाने घेतली. त्या शूरवीरांना माझा सलाम…मी जनसेवा समितीच्या त्या कार्यक्रमाची सीडी मिळवायचा प्रयत्‍न करतो आहे. ती मिळाली की देईन पाठवून तुला 🙂
    पुन्हा एकदा अभिनंदन खूप छान पोस्ट लिहली आहेस…

    • धन्स यार ..आमची सगळी व्यवस्था तूच तर केली होतीस त्यादिवशी…..मी त्या सीडीची आतुरतेने वाट पाहतोय… 🙂
      दाखल घेण्यासारखेच लढलो रे आपण ….पण मराठ्यातले आपापसातले कलह थोडे कमी असते तर इतिहास थोडा वेगळाच असता रे….

  5. खूप सुंदर लेख आहे. रविवार सकाळ सप्तरंग मध्येही विश्वास पाटील यांचा छान लेख आलेला आहे. खूप वेळा ठरवूनही मी पानिपत अजून पूर्ण वाचू शकले नाही.. प्रत्येक पानागणिक ओळी-ओळींवर डोळे भरून येतात…..

    • पानिपताचे युद्ध मराठे का हरले ह्याची कारणमीमांसा वाचली…ती खरी असण्याची जितकी शक्यता आहे..त्यापेक्षाही एक गोष्ट जास्त महत्त्वाची आहे असे मला वाटते.. ही गोष्ट माझ्या एका हिंदी मित्राने मला तो त्यावेळी वाचत असलेल्या पुस्तकात दाखवली होती ती अशी की…अब्दालीने मराठ्यांच्या सैन्यावर गाईंचे तांडे सोडले..गाईला माता मानणारे मराठे त्यामुळे थिजून गेले..गाईला कसे मारणार? त्यामुळे त्यांनी त्यावेळी शस्त्रे म्यान केली आणि तिथून माघार घेतली आणि त्याचाच फायदा घेऊन बेसावध मराठ्यांवर शत्रूने अचानक हल्ला करून हाहा:कार उडवला….इत्यादि.
      खूप वर्षांपूर्वी हे वाचले होते त्यामुळे आता संदर्भ देणे कठीण आहे…मात्र पानिपत युद्धाबद्दल इतर भाषेतल्या इतिहासाचाही शोध ह्या निमित्ताने घ्यावा असे मी सुचवू इच्छितो.

      • नाही देवा असा संदर्भ कुठे ही नाही….
        हे युद्ध फक्त पराक्रम आणि कौशल्य याच बळावर लढल् गेला. दोन्ही बाजू बळकट होत्या म्हणाल तर मराठे जास्तच पण शेवटी एका तासात बाजी पलटली हेच आपल दुर्दैव 😦

        • हो देवकाका सुहास म्हणतो त्याप्रमाणे हे युद्ध फक्त पराक्रम आणि कौशल्य याच बळावर लढल् गेला. दोन्ही बाजू बळकट होत्या….बखरी मध्ये वैगेरे अश्या अनेक कथा वैगेरे फुलवून दाखवल्या जातात पण त्यांना तितकासा आधार नसतो,याउलट पुण्यात कोट्यवधी ऐतिहासिक पत्रे आहेत त्यात असा संदर्भ असता तर आपल्या इतिहासकारांनी नक्कीच त्याची दाखल घेतली असती …बाकी दत्ताजी शिंदेंचा गोहत्येमुळेच नजीबावर विशेष राग होता …. काहीही असो पण अगदी दुपारपर्यंत आपण त्यांना पूर्णत: भारी पडलो होतो ह्याबाबत कुठेही दुमत दिसत नाही …

  6. सर्वप्रथम खूप चांगला लेख पोहोचवल्याबद्दल अभिनंदन. त्या निमित्ताने . .

    पानिपत हा शब्द ऐकून थोरले बाजीराव पेशवे याचे शौर्य किती मोठे होते याची कल्पना येते. दुर्दैवाने आपल्या समाजात शौर्याच्या कथा कमी आणि मस्तानी च्या कथा जास्त आठवल्या जातात.

    पराभवाची कारणे हि पूर्णत: पटली – अगदी त्यांचा अनुक्रमाने सुद्धा!
    कारण सर्वात पहिलं कारण म्हणजे सेने मध्ये असलेले दीड लाख पेक्षा जास्त सैन्याच्या बायका- पोरं, गुर-ढोरे हेच होय. ऐन युद्धाच्या वेळेस सांभाळायच कि लढायचे हा प्रश्न त्या अति प्रचंड सेनेला पडला असेल. ,माझ्यामते हीच मोठी चूक.

    दुसरी चूक म्हणजेच अर्धचंद्राकृती पद्धतीने आखलेली रणनीती – जी गायकवाड यांच्या दीडशहाणेपणा मुळे भोवली हेच आहे.

    shewatee itihaasabaddal kaay आहे – कि yane हे karaylaa paahije होते – kinwaa amuk amuk kele हे chukle – ase boloonahi kaahi upayog nasto. shewti त्या welachyaa paristhiti मध्ये kaay nirnay ghetla, to yogya hotaa कि ayogya – हे management chya 7 thinking caps theory मध्ये bassonach paahane yogya hoil.

    changlaa wishay niwadlyaa बद्दल dhanywaad!

    • अर्जुनराव दवबिंदुवर स्वागत आणि आवर्जून दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आभार ….
      थोरल्या बाजीरावांनी आयुष्यात एकाही लढाई हरली नाही ,त्यांचा उत्तरेत जबरदस्त दरारा होता…पण घरातल्या लोकांनी मात्र त्यांना उगाच नाही त्या कारणामुळे मानसिकरीत्या हरवले …खरच ते इतके बाजार बुणगे नसते तर भाऊ ना मुळात त्यांचा मुख्य प्लानच बदलावा लागला नसता… असो खरच आता अस झाल असत तस झाल अस बोलून काही फायदा नाही पण त्यांच्या पराक्रमापासून आपण स्फुर्ती नक्की घ्यायला हवी ….

  7. देवेन,
    नमस्कार.
    अप्रतिम लेख. सहज सुंदर माहिती. महाराष्ट्राच्या जनमानसावर झालेला परिणाम
    फारच सुंदर शब्दात मांडला आहे.
    धन्यवाद.

  8. खूप वर्षांपूर्वी वाचल होत ‘पानिपत’ – पुन्हा त्याची आठवण आली. परत वाचायला हव!
    लेख चांगला माहितीपूर्ण झाला आहे, पराभवाचे विश्लेषणही चांगले केले आहे तुम्ही.

  9. आपला लेख वाचून पुन्हा एकदा पानिपत डोळ्यासमोर उभा राहिला आणि आठवली ती गोलाची लढाई तोडण्याची आपल्याच लोकांनी केलेली चूक… नाहीतर पानिपत चा निकाल काही वेगळाच लागू शकला असता…
    पानिपतच नाव काढलं की मराठेशाहीचा अभिमान वाटतोच, रक्त सळसळतच… पण पराभवाचं वाईट सुद्धा वाटतं…
    पानिपत बद्दल बोलावे तेवढे थोडेच… मी काही दिवसापुर्वी आपला “स्वामी” नावाचा लेख वाचला होता… आपल्याला आठवत असेल तर तेंव्हा मी माझ्या अभिप्रयात पानिपत चा उल्लेख केला होता… आणि आपल्यात अप्रत्यक्षरित्या “तू तू मै मै” झाला होता की स्वामी श्रेष्ठ की पानिपत :)…. असो… अशी चर्चा व्हायला हवी… पानिपत असो किंवा स्वामी… आपण त्यांचा अभ्यास करून आत्ताच्या आणि पुढच्या पिढीला दण्यान प्रभोधन करायला हवं…
    पानिपत (आणि स्वामी) ची आठवण करून दिल्या बद्दल धन्यवाद… आपलं लिखाण असाचं चालू ठेवा…. आमच्या हातून किमान अभिप्राय लिहीण्याचं कार्य परमेश्वर करवून घेओ…

    • निलेशजी, ह्या पुस्तकात आहेच तशी जादू…..खरच ह्या पासून आपण शिकावे, स्फुर्ती घ्यावी आणि हे सगळ पुढच्या पिढीपर्यंतही पोहोचवावे …नक्कीच आपल्या सारख्या अभिप्रायानेच लिहिण्याचा हुरूप वाढत असतो …ह्या दवबिंदूवर असाच लोभ असू द्या ….

      >>>>मला वाटते स्वामी आणि पानिपत दोन्ही कादंबरया आपापल्या जागी श्रेष्ठ आहेत त्यांची तुलना करता येणार नाही कारण त्या दोन्ही वेगवेगळ्या व्यक्ती आणि घटनांवर लिहल्या गेल्या आहेत.पानीपत वाचुन जसा अंगावर काटा येतो तसच स्वामी वाचल्यावर माधवरावांबद्दल वाईट वाटुन गहिवरल्यासारखे होते.विश्वास पाटील आणि रणजीत देसाई दोघांचीही लेखनशैली उत्तमच आहे.

      हे माझ तिथल उत्तर तुम्हाला पटल असेल अशी आशा बाळगतो…..

  10. सुंदर लेख ! माझी मॅच आडवी आली रे या दिवशी!
    एनीवेझ तुझ्या पोस्ट वरुन कार्यक्रम मिस्ड केला असं नाही वाटत! आता पहिलं काम म्हणजे पाटील साहेबांचं पानीपत वाचणं !

  11. अप्रतिम लिहले आहेस मित्रा…. पानिपतला एकदा भेटली होती…. तेव्हा जे मनात स्पंदन निर्माण झाले होते ते च स्पंदन हा लेख वाचताना निर्माण झाले.

  12. ‘अति धार्मिकता’ हे ही एक महत्त्वाचे कारण होते. त्यामुळेच यात्रेकरुंचा भरणा वाढला. शिवाय इकडे उत्तरेत आलोच आहोत तर श्रीकृष्णाने गीता सांगितली त्या कुरुक्षेत्राचे दर्शन घ्यावे म्हणून अगदी पेशव्यांसहित झाडून सगळे सरदार तिकडे गेले आणि इकडे अब्दालीच्या सैन्याने स्थानिकांच्या मदतीने यमुना पार करुन मराठी सैन्याची रसद तोडली.

  13. >>सर्वात पहिलं आणि सर्वात महत्वाच कारण म्हणजे भाऊंना नको असतांनाही केलेला यात्रेकरुंचा आणि बुणग्यांचा भरणा.

    अगदी बरोबर. पानिपतच्या पराभावाला हे कारण सगळ्यात जास्त जबाबदार आहे असं मी पानिपत वाचलं तेंव्हा मला तरी वाटलं. भाऊ उत्तरेकडे जातोय म्हटल्यावर तो वारीलाच चाललाय ह्या थाटात बायका मुले त्यांच्या बरोबर निघाली. ह्या लोकांना पोसताना सैन्यावर उपास मारीची वेळ आली आणि हे बरोबर असल्याने भाऊला वेळ प्रसंगी युद्धाच्या दृष्टीकोनातून काही धाडसी निर्णय घेता आले नाहीत. हे वाचताना मला प्रचंड चीड आली होती. वेळ काय आहे आणि आपण करतोय काय ह्याची जाणीव नसलेल्या त्या अंधश्रद्धाळू लोकांमुळे असंख्य लोकं आणि मुकी जनावरे प्राणास मुकली. ह्या असल्या आप्त्-स्वकीयांपेक्षा भाऊसाठी प्राण पणाला लावणारा इब्राहीम गारदी कितीतरी श्रेष्ठ.
    दुसरं म्हणजे मल्हाररावांनी नजीबाला जीत्ता सोडला नसता तर पानिपत घडलेच नसते. एका दयेची फार मोठी किंमत चूकवावी लागली.

  14. बरेच दिवसांनंतर दवबिंदूवर पानीपतचा लेख वाचतांना विस्म्रुतीत गेलेले पानीपत परत वाचावेसे वाटू लागले आहे.याच पार्श्वभुमीवर इ टी. व्ही. वरील बाजीराव मस्तानी सिरीयल पहावी असे सुचवावेसे वाटते
    तो आपल्या विजयाचा इतीहासच आहे

  15. lahan tondi motha ghas ghetoy,

    abdaline ji aaplya sainyachi vyavstha keli kiva tyachi durdushti hi bhaula vaprta aali nahi,

    panipatvar jaun don adich mahine abdali chi wat bagnyapeksha tajya damane aakrman kel asat tar kadachit vijay aaplya hatat hota

    • गुरुदासजी , आपल दवबिंदुवर स्वागत… आणि प्रतिक्रियेबद्दल आभार ….
      आपण सांगता ते बरोबर आहे ,…पण भाऊना जलद हालचाली करण शक्य नव्हत त्या लवाजम्यामुळे …आणि वर हेच मी पराभवाच पहिलं कारण म्हणून लिहल आहे …
      >>>>सर्वात पहिलं आणि सर्वात महत्वाच कारण म्हणजे भाऊंना नको असतांनाही केलेला यात्रेकरुंचा आणि बुणग्यांचा भरणा.ह्यांची संख्या सैन्यापेक्षा अधिक होती,मराठ्यांच्या मंद हालचालीस,उपासमारीस एकूणच पानिपतच्या पराभवात ह्यांचा मोठा वाटा होता.ह्यांच्या रक्षणासाठी बरेच सैन्य उगाच खर्ची पडल.

  16. hi Deven…..suchavavese vatate..zala to itithas hota…..pan panipat ek Itihas ahe…sagalya Jar Tar chya goshti re…pan apan tya pasun barech kahi shiknya sarkhe ahe……Panipat Kadambarit ek vakyka ahe….shevati shevati shrimant Nansaheb jeva Tatya Vinchurkarkana bolatat tyanchya cadmad afgan sainyabaddal, “hach tar marathi mansatla dosh ahe.galyavarun supari fireparyant amhala mansech olakhata yet nahit. jeva olakhata yetat teva payakhalun dharani sarakaleli aste.” ——– aplya Itihasapasun khup kahi shiknyasarkhe ahe. Amche purvaj Delihichya mhanje akhand Hindusthanchya rakshanasathi dhavale hote….ani aaj hech Delhikar amhala bol lavatat.

Leave a reply to vidyanand उत्तर रद्द करा.