कायापालट …


फार फार वर्षापूर्वी विहार नावाच एक आटपाट नगर होत.तिथे ‘खालू’प्रसाद नावाच्या राजाचे राज्य होते. नगराच्या नावाप्रमाणेच नगरात सगळे अगदी मुक्त विहार करत.कधीही कोणालाही चाकू भोसका,गोळ्या मारा,घोटाळे करा एकदम बिनधास्त,कसलही भयं नाही.खालू प्रसाद अतिशय मुत्सद्दी राजा होता.त्याला खाण्यापेक्षा चारा खायलाच जास्त आवडायचा.प्रजेला मागासलेल ठेवण्यातच आपल हित कस आहे हे तो पुरेपूर जाणून होता.आपल्या कधी प्रक्षोभक तर कधी विनोदी वाक्चातुर्याने त्याने जनतेला आपल्या खिशात ठेवले होते.तिथली प्रजाही खालुवर खूप खुश असायची.पण नुसत बोलण्याने पोट भरत नाहीत ना, मग तिथे काही उद्योगधंदे नसल्याने पोटापाण्यासाठी तिथली प्रजा आजूबाजूच्या राज्यात प्रामुख्याने यामाराष्ट्र ह्या नगरात जायला लागली.खालू इतका प्रजाहितदक्ष होता कि विहारात राहूनही विहारातून यामाराष्ट्रात स्थलांतरित झालेल्या लोकांची योग्य ती काळजी घ्यायचा.

विकसनशील यामाराष्ट्रातील राज्यकर्तेही विहारातील ह्या जनतेच मतांच्या राजकारणासाठी अगत्याने स्वागत करीत.पण ह्या गोष्टीचा जेव्हा अतिरेक होवू लागला तेव्हा साहजिकच यामाराष्ट्रातील आणि विहारातील स्थलांतरित लोकांमध्ये वाद होवू लागले.मग डब्बू निलाजमी नावाच्या नेत्याने विहारातील लोकांचे हितसंबध जपण्यासाठी मोठा लढा दिला.अपेक्षेप्रमाणे यामाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी त्यांच्यापुढे नमत घेतलं.दरम्यान बिचारया खालुला काही अपरिहार्य कारणामुळे काही काळासाठी तुरुंगात जाव लागल,पण तरीही त्याने खंबीर राहून आपल्या पत्नीला गादीवर बसवून तुरुंगातुनही राज्यकारभार सांभाळला.

जसा जसा काळ पुढे सरकत गेला तस विहारातील जनतेची जास्तच परवड होत गेली आणि हळूहळू त्यांचे डोळे उघडू लागले.त्यामुळे त्यांनी एक पर्याय म्हणून नीतीइष्ट नावाच्या सुशिक्षित नेत्याला आपला राजा म्हणून पुढे आणल.एका स्वातंत्र्यसैनिकाचा पुत्र असलेला नीतीईष्ट नावाप्रमाणेच नीतीनुसार चालणांराच होता.ह्या विहार राज्याची बिमारी दूर करण्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागणार हे त्यांनी जाणल आणि एक एक करत अनेक मोहिमा त्यांनी नुसत्या तोंडी आश्वासनावर किंवा कागदावर न ठेवता प्रत्यक्षात राबवून दाखवील्या.

नीतीईष्ट ह्यांनी त्यांच्या पाच वर्षाच्या राज्यकारभारात सुमारे पन्नास हजार गुंडाना तुरुंगात डांबल. ह्यातील बरयाच गुंडाना राजाश्रायाचा आधार असल्याने झटपट शिक्षा देण्याची सोय त्यांनी केली. त्यामुळे तेथील कायदा व सुव्यवस्था आपोआपच बरयापैकी रुळावर आली.तसेच त्यांनी जनतेला पायाभूत सेवा पुरवणे सर्वात महत्वाचे मानले,त्यादृष्टीने अनेक योजना राबवल्या.वर्षोनुवर्षे ज्या गावात रस्ते नव्हते अश्या गावांना त्यांनी रस्त्याने जोडले.सुमारे १ लाख शिक्षकांची नेमणूक करून अनेक आजारी शाळांचे पुनर्वसन केले.तसेच हजारो नवीन शाळा सुरु केल्या.मुलींना शाळेत जाण्यासाठी मोफत सायकली पुरवून प्रोत्साहन दिले व त्यांमार्फत स्त्री साक्षरतेची टक्केवारी वाढवून दाखवली.गावागावातील ग्रामीण आरोग्य केंद्रांवर विशेष लक्ष पुरवले.

भयभीत,दबलेल्या लोकांना आशेचा नवा किरण दिसला.पाच वर्षांनी परत राजा निवडायची वेळ आली.तेव्हा बाजूच्या राज्यातील एका आक्रमक राजाने आम्ही मदतीला येऊ कां विचारल्यावर नितीईष्ट ह्यांनी त्याला साफ नकार दिला.बाहेरून एका युवराजाने कितीही ‘हूल’ देवून ,खालुने कितीतरी पैसे खायला देवूनही नीतीईष्ट ह्यांचे प्रामाणिक प्रयत्न लोकांनी पाहिले असल्याने जातपात वैगेरे काही न बघता लोकांनी बहुमतांनी त्यांनाच राजा म्हणून निवडले.जर एखाद्या शासकाची जनकल्याणाची प्रामाणिक इच्छांशक्ती लोकांपर्यंत पोहोचली तर लोक खंबीरपणे त्याच्या मागे उभे राहतात ह्याचे एक चांगले उदाहरण विहार मधील जनतेने घालून दिले.

परत राजा म्हणून निवड झाल्यावरही नीतीईष्ट स्वस्थ बसले नाहीत.जनकल्याणाच्या नव्या नव्या योजना ते राबवतच राहिले.त्यांच्या आमदार लोकांना ‘आम’ लोकांच्या कल्याणाकरिता मिळणारया कोट्यावधीचा निधीतील गैरव्यवहार त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तो बंद करायचा निर्णय घेतला.अनेक भ्रष्टाचार प्रकरणाचा पाठपुरावा केला.भ्रष्ट लोकांच्या जप्त घरात शाळा सुरु करायचं ठरवले.स्वत: सगट सगळ्याच नेत्यांच्या संपत्तीच्या चौकशीचे आदेश दिले.राज्यात पूराच संकट आल्यावर बाहेरून येणाऱ्या मदतीवरील राजकारण पाहून स्वाभिमानाने ती मदत नाकारण्याची हिम्मत त्यांनी दाखवली.युवा पिढीशी आंतरजालावर ब्लॉग नामक माध्यमातून थेट संवाद साधला.एकूणच जनतेला दिलेल्या आश्वासनाची जाणीव ठेवून त्यांनी त्या दिशेने योग्य ती पाउले उचलली.कायदा व सुव्यवस्थेची गाडी बर्याच प्रमाणात रुळावर आल्यामुळे अनेक उद्योजकांना आकर्षित करण्यात ते यशस्वी ठरले.

इथे विहारात असे अनेक बदल होतांना यामाराष्ट्रात मात्र तेथील शासकांनी जनतेसमोर वेगळेच ‘आदर्श’ ठेवायला सुरुवात केली.जातीयवाद,प्रांतवाद,मोठे मोठे घोटाळे अश्या किड्यांनी यामाराष्ट्राला ग्रासले आणि यामाराष्ट्रातील अनेक विहारी लोक आपल्या मायभूमीत परत जाण्याचा विचार करू लागले.हा नीतीईष्ट ह्यांचा मोठा विजय होता.अश्या प्रकारे नुसती कोरडी आश्वासन न देता योग्य प्रामाणिक कृती करून यंत्रणा बदलता येते ह्याच उदाहरण नीतीईष्ट ह्यांनी घालून दिले.आजारी विहाराचा आजार त्यांनी कुठच्या कुठे पळवून लावला आणि विहाराचा कायापालट करून दाखविला व विहारात गुंडा एवजी सामान्य जनता निर्भय होऊन विहार करू लागली.

——————————————————————————————————–

गेल्या कित्येक दिवसात आपल्या दुर्भाग्याने आपल्या इथल्या भ्रष्टाचार,पक्षांतर्गत वाद,लाजवणारे महाघोटाळे,जातीय वाद अश्या आपलयाला छी थू करायाल्या लावणार्या,संताप आणणार्या अश्याच बातम्या वाचाव्या लागत असतांना एका माणसाविषयी मात्र आपण त्याचे कौतुक करावे अश्या बातम्या सातत्याने येत आहेत.ती व्यक्ती म्हणजे बिहार (हो तोच बिहार ज्याला आपण आपला दुश्मन क्रमांक एक समजतो ) राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार.आपले इकडचे राज्यकर्ते वेगळेच आदर्श आपल्यापुढे ठेवत असतांना,ह्या माणसाने खराखुरा आदर्श शासक कसा हवा हे त्याच्या कृतीतून सर्वांना दाखवून दिले आहे.

कदाचित नितीश कुमार ही काही घोटाळे करत असतील पण ते अजून जनतेसमोर आले नसतील .पण असे जरी असले तरी आज त्यांनी तिथे जे काही कार्य करून दाखवले आहे ते कौतुकास्पदच आहे.प्रथमच एखाद्या नेत्याच्या कार्याविषयी तो स्वत: न बोलता जनता बोलू लागली आहे.

फोर्ब्‌स इंडिया या प्रतिष्ठीत नियतकालिकाने या वर्षी त्यांना ‘इंडियाज पर्सन ऑफ द इयर’ म्हणून घोषित केले आहे,ते नुसते नाही.याशिवाय २००८ साली सीएनएन तर २००९ साली एनडीटीवी ह्यांनी त्यांना ‘Best Politician of the Year’ म्हणून गौरवले.तर ईकोनोमिक टाईम्सने ह्यावर्षी ‘The Business Reformer of the Year’ म्हणून त्यांची निवड केली.

खरच महाराष्ट्राला किंबहुना पूर्ण देशालाच अश्या नेत्याची गरज आहे.महाराष्ट्रातील नेत्यांनी ह्यापासून काहीतरी बोध घ्यायला हवा अन्यथा एक वेळ अशी येईल कि महाराष्ट्रातील लोकांनाच पोटापाण्यासाठी बिहार मध्ये जावे लागेल….
————————————————————————————————

ही माझी शंभरावी पोस्ट आहे ….. 🙂

22 thoughts on “कायापालट …

  1. वाह अभिनंदन शंभरी भरल्याबद्दल 😉 लिहीत रहा, शुभेच्छा
    विहारमध्ये नीतीशराज आल हे खूप छान झाल. खरच आपल्या देशाला मोदी आणि नीतीशकुमारसारख नेतृत्व हव रे…तरच काही तरी होऊ शकत.

  2. मस्त लिहिलं आहेस. मध्यंतरी बऱ्याच बातम्या, लेखातून नितिशकुमारांबद्दल बरीच माहिती मिळाली.

    >> अन्यथा एक वेळ अशी येईल कि महाराष्ट्रातील लोकांनाच पोटापाण्यासाठी बिहार मध्ये जावे लागेल

    यामाराष्ट्राची सद्यस्थिती पाहता असं होण्याचे चान्सेस मजबूत आहेत दुर्दैवाने 😦

    >> खरच आपल्या देशाला मोदी आणि नीतीशकुमारसारख नेतृत्व हव
    +१

    बाकी शंभरीच्या यशस्वी वाटचालीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन !! अजून अजून ‘दव’ पडत राहो 🙂

    • हेरंबा धन्स रे …कं गेला तर दवाचा पाउसच पाडेन रे…. 🙂
      योगायोगाने आजच्या लोकमतच्या संपादकीय मध्येही नितीशकुमारांवर छान लेख आला आहे…
      खरच त्यांच्याकडून काहीतरी धडे घ्यायला हवेत आपल्या इथल्या नेत्यांनी ….

  3. बिहारमध्ये मी २००५ पासून जाते आहे – विशेषत: तिथल्या ग्रामीण भागात. आज जो बदल तिथे दिसतो आहे, त्याचा प्रवास मला थोडा थोडा पाहायला मिळाला होता त्या सगळ्या भेटींमध्ये. बिहारी माणूस खूप हुशार आहे आणि त्यांना नवी स्वप्न पडायला लागली आहेत – हे माझ्यासाठी खूप आनंददायक होत! आता नितीशजी पुन्हा त्यांचा अपेक्षाभंग करणार नाहीत अशी अपेक्षा! पाहू काय होतेय ते!

    • आमच्या इथे असलेल्या तिकडच्या बरयाच लोकांनी सांगितलं कि ह्यावेळी खरच काम झाली आहेत ,गावागावात पायाभूत सुविधा मिळू लागल्या आहेत….खरच नजर लागाव असाच कार्य ते करीत आहेत ….हे सर्व असच अबाधित चालत रहाव अस मनापासून वाटते ….

  4. >> अन्यथा एक वेळ अशी येईल कि महाराष्ट्रातील लोकांनाच पोटापाण्यासाठी बिहार मध्ये जावे लागेल

    हे होण शक्य आहे यात काही शंका नाही.

    शंभरी भरली की रे तुझी….अभिनंदन 🙂 🙂

    असाच लिहित रहा…शुभेच्छा.

  5. खरच सुंदर मांडणी…
    बऱ्याच नवीन गोष्टी कळाल्या…
    शतक पूर्ण केल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन….
    दिवसागणिक तुमच्याकडून अजून चांगले अजून जास्त येत राहो…

  6. देवा उत्तम पोस्ट ….

    आपल्या नेत्यांचे डोळे उघडणे अवघड कारण झोपेचे सोंग आहे ते…

    सगळ्यात महत्त्वाचे पुन्हा एकदा मन:पुर्वक अभिनंदन १०० उत्तमोत्तम पोस्ट्स लिहील्याबद्दल, आणि अनेक अनेक शुभेच्छा अश्या आणि अनेक पोस्ट्स लिहिण्यासाठी… 🙂

    कं ची काळजी करू नकोस, माझे लक्ष आहे तुझ्याकडे… पोस्ट यायला उशीर झाला की ब्लॉगच्या दारावर पुन्हा टक टक करेनच मी 😉

  7. अप्रतिम..लिहिलंय एकदम….उत्तम पोस्ट !!
    आणि शंभरी पूर्ण केल्याबद्दल तुमचे अभिनंदन देवेंद्र….आणि असेच लिहीत राहा …उत्तमोत्तम…!!

  8. असा ‘नीतीईष्ट’ राजा महाराष्ट्राला मिळाला तर महाराष्ट्राचा देखील ‘कायापालट’ होईल. पण दुर्दैव असे कि सध्या महाराष्ट्रातील नेत्यांसमोर ‘खालू’प्रसाद चा आदर्श आहे.

यावर आपले मत नोंदवा