महाराष्ट्राचा ‘एव्हरेस्ट’ सर- ‘ऑफबीट’ वाटेने ….


जानेवारी महिन्यात ‘दोराईकट्टा’ हे उत्तर कर्नाटकातल सर्वात उंच शिखर पादाक्रांत केल्यानंतर माझ्या ट्रेक मोहिमेला चांगलाच ‘ब्रेक’ लागला. आपल्या नेहमीच्या गैंग बरोबर  कधी न जमल्यामुळे, तर कधी न कळल्यामुळे ट्रेकिंगला जाण झालच नाही आणि त्यामुळे मला तब्बल पाच महिन्याचा मोठा ट्रेकोपवास करावा लागला.(छायाचित्रात बघाच माझा ‘लुक’ कसा बदललाय ते  ह्या उपवासामुळे .. 😉 ) हे जर आधीच माहीत असत तर मी सोनिया सरकार समोर ह्या ट्रेकोपषणाबद्दल आधीच जाहीर केल असत आणि एव्हाना कदाचित सरकार पडलही असत. 🙂 तर असा हा मोठा ट्रेकोपवास थाटामाटात सोडायला हवा होता आणि त्यासाठी  ‘कळसूबाई ‘ सारखा चांगला पर्याय समोर आल्यावर तर अधाशीपणे तुटून पडणे आलेच…

तर झाल अस माझ्या  कंपनीतल्या एका जवळचा  मित्र मिलिंद ह्याने विकांताला कुठेतरी  ट्रेकला जाउया म्हणून सांगितले. मला पण मान्सून ट्रेकची सुरुवात करायचीच होती आणि बरोबर सुट्टीही होती मग लागलीच नेटवर गुगलबाबांची मदत घेतली.त्यांनी ऑफबीट सह्याद्री च्या  कळसूबाई ट्रेक बद्दल माहिती दिली.कळसूबाई शिखर सर करायचा खूप दिवसांपसून मानस होता. पण मुहूर्त निघत नव्हता. मिलिंदला ह्याबाबत माहिती दिल्यावर तो लगेच हो म्हणाला पण ऐनवेळी  त्याच्या घरी काही काम निघाल्याने त्याच येण रद्द झाल.मग ‘टू बी ऑर नॉट टू बी ‘ करत शेवटी  कसही करून  जायचाच अस मनाशी ठरवलं.तरीही निघायच्या दिवशी म्हणजे शनिवारी संध्याकाळी कंटाळ्याची एक मोठी लहर आलीच तिच्यात जवळपास १-२ तास ट्रेक कॅन्सल म्हणून जगलो.पण नंतर अचानक आतून आवाज आला ‘कंटाळा झटक ,सह्याद्रीच सर्वात उंच शिखर तुला हाक देत आहे …’ मग मात्र सह्याद्रीच्या ओढीने झटपट तयारी करून एकदाच  घर सोडलं आणि ११ वाजता ऑफबीट सह्याद्री ला जॉइन झालो.

सव्वा बाराच्या सुमारास आमच्या गाडीने दादर सोडलं.त्यानंतर प्रिती पटेल ह्या आमच्या ग्रुप लीडरने सर्वाची थोडक्यात ओळख करून घेतली आणि मग लागलीच अंताक्षरीचा कार्यक्रम सुरु झाला .ठाणे-मुलुंड इथून येणारया ट्रेकर्सना पीक-अप करत चांगला तासभर अंताक्षरीचा कार्यक्रम रंगल्यावर हळूहळू एकएक जण पेंगू लागले .त्यानंतर तीन-साडेतीनच्या  सुमारास बस एका ठिकाणी थांबली आणि टी-ब्रेक जाहीर झाला.मन सांगत होत चहा प्यायला चल पण शरीर काही जुमानत नव्हत आणि शेवटी शरीराचा विजय झाला,त्या चहाची ‘कुर्बानी’ द्यावी लागली.अशीच तुटक तुटक झोप घेत सकाळी सहाच्या आसपास आम्ही इंदुरे गावी पोहोचलो.

इंदुरे गावात उतरून आम्ही चांगले फ्रेश झालो आणि मग इडली,कांदेपोहे,पुरणपोळी आणि चहा असा जंगी नाश्ता झाला.खरतर कळसुबाईचा ट्रेक बहुतांशी ‘बारी’ ह्या गावातून केला जातो पण ऑफबीट-सह्याद्रीने आपल नाव सार्थ ठरवत जास्त न मळलेल्या  ह्या मार्गाची निवड केली होती.साडेसातच्या सुमारास आम्ही इंदुरे गाव सोडून आम्ही समोर पसरलेल्या महाकाय सह्याद्रीचे आव्हान स्वीकारत त्यावर चढाई सुरु केली.दरम्यान बर्याच लोकांबरोबर ओळखी झाल्या. त्यातल्या त्यात  मिहीर थत्ते,हृषीकेश देशपांडे आणि सौरभ भिसे ह्या तिघांशी खास ओळख झाली होती.भरपूर चिख्खल असलेली सरळ वाट तुडवत आम्ही हळूहळू वर चढायला लागलो होतो.मग मात्र असा सरळ चढाव होता कि सगळेच ‘हुश्श’ करायला लागले होते.काही वेळाने एक पठार लागल तिथे आमही सर्व गोलाकार बसलो व सर्वानी आपापला इंट्रो करून दिला व त्यानानातर आयोजकांनी आम्हा सर्वाना काही  महत्वाच्या  सुचना दिल्या  आणि आम्ही लागलीच पुढे कुच केल.

हवेत छान गारवा होता , अधून मधून पाउस पण एखाद बटन चालू-बंद केल्यासारखा ये जा करत होता,डोंगरानेही हिरवा शालू पांघरायला सुरुवात केलेली होती.अश्या ह्या वातावरणात लहान-मोठे चढ चढत आमची इंजिन पुढे जात होती.पुढे मात्र एक अतिशय निसरडा चढ आला.चिखलामुळे तो असा झाला होता कि विचारू नका त्यात खाली दरी आणि वरून पाउस चालूच ,जीव मुठीत घेऊन एकदम मिलिटरी स्टाईलने रस्त्यात येणारया खुरटया झाडांचा आधार घेत कसाबसा आम्ही तो पार केला.आतापर्यंत ‘सिरीज’ मध्ये असणारे आम्ही ह्या ठिकाणी ‘पैरेलल’ झालो होतो कारण  जो तो वर जाण्यासाठी कमी निसरडी वाट पकडायचा प्रयत्न करत होता .इथे दोन-चार लोकांनी ‘गोल’ करून धरतीमातेला साष्टांग नमस्कारही घातला पण फायनली आम्ही तो टप्पा पार केला. ऑफबीट ह्या शब्दाचा अर्थ आम्हाला एव्हाना चांगलाच कळायला लागला होता.  🙂

खालून भिमाकाय दिसणारा तो कडा आता  हळूहळू आमच्या नजरेच्या टप्प्यात आला होता.त्या उर्मीतच ‘आता थोड्या वेळातच  आम्ही तुला काबीज करू आणि मग ते कळसुबाईच शिखर जास्त लादूर असणार नाही ‘ अस त्याला नजरेने खुणावल असता त्याने फक्त एक मंद स्मित केले.तिथून काही अंतरावर  आम्हाला मोठे मोठे दगड असलेला एक उभा चढ लागला.तिथे  दगड आणि जमिन दोघही आम्हाला साथ द्यायला तयार नव्हते,अजिबात ‘ग्रीप’ मिळत नव्हती.तिथून आम्ही काही वीर एकमेकाना हात देत कसेबसे वर चढलो.पण पुढे मात्र तिथे दोर सोडावा लागला.काही वेळातच अजून एक मोठा पण सोपा चढ चढत आम्ही एका पठारावर पोहोचलो.तिथे पोहोचल्यावर बराच थकवा आला होता आणि मग जमीनीला समांतर होण्यापासून मी स्वत:ला रोखू शकलो नाही .आणि तिथल्या अतिशय गार वातावरणामुळे माझा डोळा कधी लागला कळलच नाही. हृषीकेशने मला उठवलं तेव्हा चांगली २०-२५ मिनटांची झोप होऊन गेली होती.तिथून उठूच नये अस वाटत होत पण  ‘थांबला तो संपला ‘ हे सांगून आणि कळसूबाई शिखराचा लोभ दाखवत मनाला कसबस पटवल.

सुस्तीतच पुढची चढाई चालू असतांना अचानक वरून जोरदार कोलाहल एकू आला .लोक इतक ओरडताहेत म्हणजे कळसुबाईच शिखर गाठल वाटत त्यांनी असा विचार करत मन प्रसन्न होऊन गेल.’अब दिल्ली दूर नही’ च्या  आनंदात पुढचा बराच चढ सरळ रस्ता असल्यासारखा चढून गेलो आणि एका मोकळ्या पठारावर पोहोचलो.आमच्याबरोबरचे सगळे जण तिथेच थांबले होते तेच मघाशी ओरडत होते आणि त्याच कारण म्हणजे तिथे असलेला प्रचंड वारा.’रौद्र रूप’,’तुफान’,’सोसाट्याचा’ अश्या सर्व विशेषणांच्या पार होता तो तिथे.तो नीट उभही राहू देत नव्हता आणि असे टोले लगावत  होता कि  मला माझ वजन अचानक कमी झाल्यासारख वाटायला लागल होत. आजवर अनेक ट्रेक केले पण इतका बेभान वारा मी यापूर्वी कधी अनुभवला नव्हता.त्याने हळूहळू इतका जोर पकडला कि आम्हाला तिथे घोळका करून एकमेकांचा आधार घ्यावा लागला .त्या पठारावर मध्ये एक छोटस तळ  आहे व उघड्यावरच मारूतीची एक मूर्ती आहे. क्षणभर वाटून गेल इथे आपल्या पुत्राला भेटायला साक्षात पवनदेव तर नाही ना आले …

काही वेळ त्या पठारावर घालवल्यावर हळूहळू सवत:ला सावरत आम्ही पुढील पायपीट सुरु केली.आम्हाला लीड करत असलेल्या राजसला अजून किती वेळ लागेल अस विचारल्यावर आलो तेवढच अंतर अजून बाकी आहे अस तो म्हणाला.मग मनाला परत एकदा ‘बुस्टअप’ केल शरीराला ग्लुकोन-डी  दिल आणि पुढील मार्गाला लागलो.काही वेळाने  एका डोंगराला वळसा घालून पुढे गेल्यावर  एक अतिशय कठीण घळई लागली,माझ्या पुढील तीन चार जण त्या घळईत शिरकाव करून वर चढत असतानाच वरून राजसच्या  ओरडण्याचा आवाज आला.त्याने थोडस खाली येऊन तिथे बाजूला थोडस चालून वर चढायला दगडी पायरया आहेत त्या दाखवल्या.मग आम्ही घळईत शिरलेल्या त्या चार-पाच जणांना हात देत बाहेर काढल.त्या घळईतून दोर टाकल्याशिवाय वर जाण खरच खूप अवघड होत.त्या घळईवीराना बाहेर आल्यावर चिडवल असता ते म्हणाले ‘वी ट्रायड  डी ऑफबीट वे’ .. 🙂

त्या दगडी पायरया चढून झाल्यावर चांगलाच थकवा आला होता म्हणून वर थोडी विश्रांती  घेतली.एक बर होत तेथील आल्हाददायक  वातावरणामुळे एवढे चढ चढूनही  एकतर फारसा थकवा येत नव्हता  आणि आला तरी अल्पश्या विश्रांतीनंतर लगेच कुठच्याकुठे पळत होता.पण त्या पाउस- वाऱ्यामुळे चढताना कॅमेऱ्याची क्लीकाक्लीकी करायची जास्त संधी आम्हाला मिळाली नव्हती.लक्ष्य दूर असल तरी नजरेला दिसत असल कि कस बर वाटते पण इथे इतक वर येऊनही कळसूबाईच्या शिखराच दर्शन होत नव्हत त्यामुळे थोडासा मनाचा हिरमोड झाला होताच पण तरीही पाउल मात्र चालत होती.कित्येक मोठेमोठे चढाव पायाखाली घालून मजल-दरमजल केल्यावर बाराच्या सुमारास  आम्हाला एक शिडी लागली.धुक्यामुळे काही दिसत नव्हत पण राजस म्हणाला ही शिडी चढली कि आपण कळसूबाईच्या शिखरावर असणार,तेव्हा त्याच्यावर  विश्वास बसत नव्हता. पण शिडी चढून गेल्यावर मात्र मी अक्षरश: हवेत तरंगायला लागलो . समोर कळसूबाईच मंदीर होत,आम्ही खरच महाराष्ट्रातील सर्वात उंच ठिकाणी पोहोचलो होतो. छाती अभिमानाने भरून आली होती.’आज मै उपर आसमा नीचे ‘ सारखी कितीतरी गाणी मनात वाजत होती.तेव्हाचा आनंद शब्दात व्यक्त करण्यासारखा नव्हताच.तिथले एक एक क्षण मनात साठवून घेत होतो.तिथे मग देवीच्या चरणी माथा ठेवून  धन्य धन्य  झालो.

@ cloud 9...

आमच एक दुर्दैव अस होत कि सभोवताली धुक्याच साम्राज्य असल्याने त्रिंबक रांग, भंडारदरा तलाव,कुलंग, अलंग, मदनगड, हरिश्चंद्रगड अश्या अनेक गडांच्या तिथून होणार्या दर्शनाला आम्ही मुकलो .तिथे असताना एकदा भूगोलाच्या पुस्तकाचीही आठवण येऊन गेली.आतापर्यंत  अगदी बेभान होऊन तिथे फिरणार्या मला थोडस भानावर  आल्यावर लक्षात आल इथे पाउस आणि प्रचंड  वाऱ्याबरोबर विलक्षण गारवा ही आहे.अतिशय थंडीमुळे विंडचिटरच्या मध्येही अंगावर काटा आला होता तिथे लक्ष गेले.निसर्गाच वातानुकुलीत यंत्र ‘कुलेस्ट’ मोडवर काम करत होत. त्यातच पोटातील कावळ्यांनीही बोंबाबोंब सुरु केली होतीच,आणि तिथे जेवण करणे अशक्य होते.त्यात नेहमी आनंद देणारा वारा आज आमचा शत्रू बनून आव्हान देत होता. मग आम्ही देवीचा निरोप घेत उतरायला सुरुवात केली.थोड खाली आल्यावर आम्हाला निळ्या रंगाची एक झोपडी अन विहीर लागली झोपडीत अन झोपडीच्या आडोशाला अस करून आम्ही पेटपुजा उरकली.झोपडीतल्या आजोबांनी सांगितलं ते चहा -भाजी वैगेरे करतात तिथे पण त्यांनी आज आणलेलं सगळ सामान संपल होत.त्यामुळे आम्ही एका स्वर्गीय आनंदाला मुकलो .झोपडी चांगलीच उबदार होती . त्यामुळे झोपडीच्या आतील आणि बाहेरील वातावरणात कमालीचा वेगळेपणा होता.त्या झोपडीने आम्हाला चांगलीच तरतरी दिली होती. ती झोपडी सोडून बाहेर यावस वाटत नव्हत,पण निघण भाग होत .

विहीर,झोपडी आणि मागे कळसूबाईच शिखर ...

उतरताना आम्ही ‘बारी ‘ गावात उतरणार होतो आणि ह्या मार्गावर आम्हाला फारसा त्रास झाला नाही कारण अर्ध्याहून अधिक भाग हा रेलिंग,शिड्या,दगडी पायऱ्या असाच होता . शिवाय इतर वाटही चांगली मळलेली होती.वारा अन पाऊसामुळे अजून काहीच फोटो काढून झाले नव्हते आणि  फोटो नसले तर तो ट्रेक कसला आणि वार्याचा जोर ओसरलेला असला तरी  पाउस अधूनमधून चालूच होता मग थोडीशी रिस्क घेवून जरा पाउस थांबला कि क्लीकाक्लीकी सुरु करायचो आणि जमेल तेवढी दृश्य कॅमेऱ्यात बंद करायचा प्रयत्न करत होतो.चढतानाची वाट पूर्ण निर्मनुष्य होती तर उतरतांना अनेक ठिकाणी गावातील लोक दिसत होती.एका ठिकाणी इतक्या उंचावरही शेती असल्याच दृश्य दिसलं.तिथेच आम्ही मस्त गरमागरम चहाचा आस्वाद घेतला.अजून खाली उतरल्यावर कळसूबाईच खाली असलेल मंदीर लागल.तिथून मग चिख्खलाने बरबटलेल्या वाटांवरून पायपीट करत व पुढे शेतांच्या बांधावरून एका छोट्याश्या  वाहत्या  ओढ्यावर  जवळ पोहोचलो तिथे बुटांना लाभलेला डबल सोल तिथे उतरवला आणि तोंड वैगेरे धुवून बारी गावात पोहोचलो.तिथे जग जिंकल्याच्या आनंदात,दिवसभराच्या आठवणी चघळत    मस्त गरमागरम कांदापोहे आणि चहा ह्यांचा आस्वाद घेतला आणि भरल्या तना-मनाने एक विलक्षण ,विस्मरणीय  अनुभव देणारया सह्याद्रीरांगाना दुरून  सलाम ठोकत परत लवकरच  कुठल्या तरी गडाच्या निमित्ताने भेटायचं वचन देवून परतीच्या वाटेला लागलो.

शाळेत असतांना कधीतरी प्रश्नपत्रिकेत आलेली  ‘——- हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे’ ही रिकामी जागा मी त्या दिवशी खर्या अर्थाने भरली होती….

Advertisements

18 thoughts on “महाराष्ट्राचा ‘एव्हरेस्ट’ सर- ‘ऑफबीट’ वाटेने ….

 1. अल्टिमेट लिहिलं आहेस.

  पवनदेव-पवनपुत्र, निसर्गाच वातानुकुलीत यंत्र ‘कुलेस्ट’ मोडवर, ‘वी ट्रायड डी ऑफबीट वे’ वगैरे सगळं एकदम झक्कास झक्कास 🙂

  शेवटचं वाक्य तर सगळ्यात खतरनाक.. अभिनंदन राजे !

 2. Deven..

  Great write up.. I was abt to join for this trek last Sunday.. my frnd yohesh was there..

  Its been really long time I hvnt seen that mountain.. its time.. 🙂

  • धन्स सेनापती ….
   तुमच दर्शन तिथ झाल असत तर आमच आनंद अजून कैक पटीने वाढला असता…
   रोहणा ,बाकी तू आता मनात आणलास तर असा जाऊन येशील तिथे… 🙂
   योगेश नावाचा एक मुलगा होता त्याचे मित्र त्याला ‘यो रोक्स’ म्हणायचे ..

 3. मस्त लिहिलंय देवेन एकदम! जिवंत वर्णन . .. आणि मुख्य म्हणजे ‘उपवास’ सोडलात ते बर केलत .. आता असेच भटकत रहा आणि अर्थातच त्याबद्दल लिहीत रहा 🙂

 4. शाळेत असतांना कधीतरी प्रश्नपत्रिकेत आलेली ‘——- हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे’ ही रिकामी जागा मी त्या दिवशी खर्या अर्थाने भरली होती….

 5. मजा आली वाचायला … मस्त लिहीले आहेस…. हिरवेगार छाचि इतके भारी दिसतायेत….प्च..!माझाही खूप दिवसांचा ट्रेकोपवास झालाय तो आता कधी सोडतो असं झालंय

  • सागरा खर आहे …
   कधीकधी वाटत का उगीच इतका त्रास घ्यावा वैगेरे पण एकदा वरती पोहोचल कि सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतात ….
   भटकंत व्हा … 😉

 6. देवा अप्रतिम लिहीलयेस… शेवट तर आहाहा… 🙂

  फोटो मस्त एकदम….

  ता.क. लिहीत रहा रे….

  • तन्वी ताई, खूप खूप धन्स ग …
   जरूर लिहित राहीन ग तू आहेसच ना पाठीशी …
   एक सांगू आज दवबिंदूचा दुसरा बर्थडे आहे…. 🙂

 7. >>शाळेत असतांना कधीतरी प्रश्नपत्रिकेत आलेली ‘——- हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे’ ही रिकामी जागा मी त्या दिवशी खर्या अर्थाने भरली होती….

  सही….मस्त रे…
  आता सुरुवात इतकी छान तर वर्षभर किती छान छान ट्रेक्स होतील…:) लिहिता राहा…म्हणजे आमच्यासारख्यांना निदान दुरून साजरे का होईना पण डोंगर दिसतील…:D

टिप्पण्या बंद आहेत.