एक हरवलेला चित्रपट….


तुमच अस कधी झालय का कि कधीतरी अचानक ( किंवा अधूनमधून ) तुम्हाला लहानपणी पाहिलेला एखादा सिनेमा,गाण वैगेरे  (बहुतांशी जास्त प्रसिद्ध नसलेलं ) पुसटस आठवते आणि ते पूर्ण पाहायची- ऐकायची जबरदस्त इच्छा  मनात जागृत  होते .एक वेगळीच ओढ निर्माण होते.हा सिनेमा/गाण पूर्ण पाहायला हव अस वाटते. पण पुढे त्या चित्रपटाचा/गाण्याचा  काही संदर्भ लागत नाही.मग त्या क्षणी  काहीतरी हरवल्यासारख आणि  अपूर्ण अपूर्ण अस वाटत राहते.ती छोटीशी आठवण पण एक वेगळीच ‘फिलिंग’ देऊन जाते.मला अशीच  एका सिनेमाची आठवण कधीतरी यायची.डोळ्यासमोर हलकस चित्र उभ राहायच.पण पुढे काही संदर्भच मिळत नव्हता.एकदम कर्ज मधला ऋषी कपूर झाल्यासारख वाटायचं.  🙂 आणि मग तसाच त्याबद्दल विसरून जायला ही व्हायचं .

रेवती आणि ते हिल स्टेशनच वातावरण फक्त असच काहीस आधी आठवायचं.नंतर  हळूहळू आमच्या डिटेक्टिव्ह मेंदूने अमरीश पुरी आणि अन्नू कपूरचा पण छडा लावला . पण सिनेमाच नाव वैगेरे काही आठवत नव्हत.कितीतरी चांगल्या  आणि टूकार  चित्रपटांचाही वारंवार दाखवून चोथा करणारया इडियट बॉक्सवरही पण कधी तो सिनेमा पाहावयास मिळाला नाही.अस असतांना एके दिवशी नेटवर भ्रमंती करत असतांना ह्या सिनेमाची आठवण आली. (टिंग टिडिंग टिंग —पार्श्वसंगीत  🙂 ) समोर गुगलकाका मदतीसाठी होते.त्यांनी माझ्या चेहऱ्यावरील भाव ओळखून लागलीच तू काहीतरी ‘क्लू’ दे मी आहेच अस आश्वासन दिल आणि खरच थोडासा ‘रिफरंस’ देताच  त्यांनी  लगेचच ह्या प्रकरणाचा छडा लावला.तो चित्रपट होता मुस्कुराहट …

बर्याच जणांना हा चित्रपट कदाचित माहिती नसेल.कारण सर्वच चांगल्या चित्रपटांना प्रसिद्धी मिळतेच अस नाही, काही चित्रपट असेच कुठेतरी  हरवण्यासाठीही बनलेले असतात. एकदा चित्रपटाच नाव कळल्यावर तो मिळवण काही कठीण काम नव्हत.मग किती वर्षानंतर पाहिला तो सिनेमा ते नक्की सांगू शकत नाही पण परत एकदा तो आवडला.तो मला लहान असतांना का आवडला होता ह्याचे उत्तर मात्र  मला सांगता येत नाहीये.कारण तेव्हा मी मला आवडणारे अनेक चित्रपट पाहिले होते पण हा असा मनाच्या कुठल्यातरी कोपर्यात असा का जाऊन बसला होता कोणास ठाऊक. तर मुस्कुराहट हा सिनेमा १९९२ साली प्रदर्शित झाला होता. हा प्रियदर्शनचा  पहिला हिंदी सिनेमा होता  हि  माहिती आताच मला मिळाली.अमरीश पुरीला खलनायकाच्या भूमिकेतून बाहेर पडण्यासाठी ज्या सिनेमांनी मदत केली त्यापैकी हा एक अगदी महत्वाचा सिनेमा.


उटी येथील निसर्गरम्य थंड हवेच्या ठिकाणी निवृत्त ‘जस्टीस’ गोपीचंद वर्मा (अमरीश पुरी ) आपल्या घरच्यांपासून वेगळे राहत असतात. गोपीचंद वर्मा हे कठोर शिस्तप्रिय,कर्मठ ,  ‘आकडू’ आणि वयामानाप्रमाणे थोडेसे चिडचिडे झालेले असतात .त्यांच कोणाबरोबरच पटत नसते ,ते सर्वाशी फटकूनच वागतात.३५ वर्षे त्यांच्याकडे नोकरी करत असलेल्या बद्रीप्रसाद चौरासिया (जगदीप ) बरोबर तर त्यांची नेहमीच ‘तुतुमैमै’ चालू असते.त्यांच थोडफार पटते ते प्रीतमशी.प्रीतम (जय मेहता)  हा तेथील एक गाईड आणि वर्मांच्या जुन्या मित्राचा मुलगा. प्रीतम आणि त्याचा फोटोग्राफर मित्र जगन (अन्नू कपूर ) हे नेहमी श्रीमंत व्हायची स्वप्न बघत असतात. अशातच एके दिवशी तिथे एक राजकुमारी नंदिनी (रेवती ) येते.प्रीतम तिचा गाईड बनून तिला तिथली चांगली सैर घडवतो आणि तिथल्या सर्वात महागड्या हॉटेलमध्ये सोडतो.त्याला १०० रुपयाची अपेक्षा असताना त्याला तिच्याकडून हजार रुपये मिळतात.

ह्या राजकुमारीच्या साह्हायाने मोठा माणूस बनायची स्वप्ने बघत तो जगनला खूप डिवचतो. पण तितक्यात प्रीतमने ज्या हॉटेलमध्ये त्या राजकुमारीला सोडलेले असते तिथून एक माणूस त्याला बोलवायला येतो.हॉटेलमध्ये गेल्यावर त्याला कळते आपण  राजकुमारी  समजत असलेली ती तरुणी वेडी आहे. मग नंदिनी ‘जोपर्यत तू माझे पैसे परत देत नाहीस  तोपर्यंत मी तुझ्याबरोबरच राहीन’ म्हणत त्याला खूप पिडते.तिच्या अनेक करामतींनी प्रीतम आणि जगन खूप त्रस्त असतात.तिच्यापासून पिच्छा सोडवण्यासाठी ते अनेक उपाय करून बघतात पण ते त्यात अपयशी ठरतात.पण एके रात्री जगनचा राग अनावर होतो आणि तो प्रीतामला त्याच काहीही एकूण न घेता रात्रीच्या रात्री तिला घेऊन जाण्यासाठी सांगतो.ते दोघे रेल्वे स्टेशन वर जातात व सकाळच्या गाडीची वाट बघत स्टेशनवरच झोपी जातात.

पहाटेच जगन रेल्वेस्टेशनवर पोहोचतो आणि ‘नंदीने मेरी बच्ची’ करत नंदिनीला परत घेऊन जायचं आणि तिचे सर्व हट्ट पुरवायचे अस सांगतो.प्रीतमला काय चालल आहे ते समजत नाही,तेव्हा जगन त्याला वर्तमानपत्र दाखवतो ज्यात नंदिनीला शोधून आणून देणाऱ्याला २५ हजार रुपये बक्षीस असते. जुन्या वर्तमानपत्रातून त्याना कळते बक्षिसाची रक्कम दर काही दिवसांनी वाढवली जातेय तेव्हा ते तीला अजून काही दिवस सांभाळून बक्षिसाची मोठी रक्कम घ्यायच ठरवतात.कोणाला  ह्याबद्दल संशय येउ नये म्हणून ते तिला धोब्यांच्या वस्तीतील एका घरात ठेवतात.तिथे हळूहळू प्रीतमच्या मनात नंदिनीबद्दल जवळीक निर्माण होते.तिथे राहत असतांना नंदिनीमुळेच त्याच समद खान ह्या मोठ्या गुंडाच्या माणसांशी भांडण होते.तेव्हा आता जास्त वेळ थांबून उपयोग नाही हे लक्षात येवून जगन बक्षिसासाठी फोन करायचं ठरवतो.प्रीतम त्याला सांगतो आपण जाणून तर घेऊ त्यांना हि का हवी आहे, ते कोण आहेत  पण जगन त्याच एकत नाही.त्यातच नंदिनी ती वेडी नसल्याचा गौफ्यस्फोट करते .

नंदिनी अनाथालयात वाढलेली असते आणि तिथे तिला एक व्यक्ती नेहमी पत्र आणि चॉकलेटचा डब्बा पाठवत असते शिवाय तिचा खर्चही उचलत असते पण तिला कधीच भेटत नाही .ती स्वत:च  त्या व्यक्तीला ‘स्वीटमॅन’  अस नाव ठेवते.मोठी झाल्यावर आपण ह्या ‘स्वीटमॅन’ची अनौरस संतती असल्याच तिला कळते.त्या ‘स्वीटमॅन’ ने तिच्या नावावर बँकेत मोठी रक्कम ठेवलेली असते.ती मिळालेल्या माहितीनुसार आपल्या ‘स्वीटमॅन’ला एकदातरी भेटावं म्हणून त्यांच घर गाठते.तिथे गेल्यावर तिला कळते कि तिच्यामुळेच ‘स्वीटमॅन’  त्याच्या कुटुंबापासून दूर झालेला असतो.त्या कुटुंबातील व्यक्ती मग संपत्तीसाठी नंदिनीला पकडून वेडाच्या इस्पितळात भरती करतात.तिथून ती संधी मिळताच पळून ‘स्वीटमॅन’ला भेटण्यासाठी इथे आलेली असते, आणि तिचा ‘स्वीटमॅन’ दुसरा तिसरा कोणी नाही तर ‘जस्टीस’ गोपीचंद वर्मा असतो.

एव्हाना जगनने वर्मा कुटुंबियाला नंदिनीची माहिती दिलेली असते.तेव्हा तिला वाचवण्यासाठी व तीची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रीतम तिला दूरची नातीवाईक सांगून  जस्टीस वर्मांकडे  घेऊन जातो व तिला तिथे कामाला ठेवण्यासाठी त्यांना पटवतो.कारण त्याला माहिती असत जगन वर्मांना इतका घाबरत असतो कि तो नंदिनीला जगभर कुठेही शोधायला जाईल पण वर्मांकडे येणार नाही .इथून पुढे वर्मांच्या हृदयात जागा मिळवण्यासाठी ते बद्रीप्रसादचा  ‘गेम’ करतात.सुरुवातीला प्रचंड खटके उडाल्यानंतर नंदिनी हळूहळू वर्मांच पूर्ण व्यक्तीत्व बदलून टाकते. गेली वर्षोनुवर्षे ज्या जागेला वर्मांच एक छोटस हास्यही बघायला मिळाल नव्हत, त्या वर्मांना खळाळून हसण्याचा भाग्य आता त्या जागेला लाभते.वर्मा एक नाव आयुष्य जगायला लागलेले असतात .

दरम्यान जगनची एकएक हाड कशी खिळखिळी होत असतात ते सिनेमात पहाच.पुढे नंदिनी बद्दल खरी माहिती वर्माना कळते तेव्हाच वर्मा कुटुंबीय तिथे येते व ‘तुम्ही आमच्याबरोबर राहत नाही पण हिला मात्र स्वत:जवळ ठेवलं आहे’ अस सांगत आपला हक्क मागतात .तेव्हा त्यांच्यात अजून दुरावा नको म्हणून नंदिनी वर्मांच घर सोडून निघून जाते.पण ती परत कधीच यायला नको म्हणून वर्मा कुटुंबीय समद खानला तिची सुपारी देतात.हे कळल्यावर प्रीतम समद खानशी लढा देतो व वर्माना लागेल अस खूप बोलतो.त्यानंतर वर्मा सर्वाना एकत्र बोलवून एक मोठ रहस्य उलगडतात.ते आणि त्यानंतर प्रीतमच्या प्रेमाच काय होत ते सिनेमातच पाहिलेलं उत्तम.

ह्या चित्रपटातील अमरीश पुरीची अदाकारी खरच पाहण्यासारखी असून रेवतीच्या अप्रतिम अभिनयाची सुरेख जोड त्याला लाभली आहे.चित्रपटातील अनेक प्रसंग आपल्याला हळव करतात.चित्रपट हलकाफुलका चेहऱ्यावर मंद स्मितहास्य आणणारा असला तरी त्याला विसंगत अशी थोडीशी हिंसा चित्रपटात आहे.चित्रपटात जय मेहता,अन्नू कपूर ,जगदीप ह्यांनीही आपापल्या भूमिका आपापल्या परीने साकारून चांगलाच रंग भरला आहे.गाणी एकदम लक्षात राहण्यासारखी नसली तरी ‘मेलोडीयस’ आहेत.वर्मांमध्ये परिवर्तन होत असतांना   ‘ललल लालला लल लाल लालला’ अशी एक थीम आहे ती खूप श्रवणीय आहे ,म्हणजे मला खूप आवडली.तस ह्या चित्रपटाला त्यावर्षीच्या फिल्मफेअरमध्ये ‘बेस्ट सिनेमाटोग्राफी ‘ चा पुरस्कारही  मिळाला.पण सिनेमा  एकंदरीत दुर्लक्षितच राहिला.म्हणजे एकदम सुपरहिट व्हायला हवा होता अस नाही पण इतका दुर्लक्षितही व्हायला नको हवा होता.असो…

तुम्हाला हा चित्रपट बघाच असे सांगत नाही पण तुमच्या आठवणीत हरवलेला एखादा चित्रपट तुम्हालाही सापडतो का ते जरूर  बघा…

22 thoughts on “एक हरवलेला चित्रपट….

 1. खूप छान, हेल्दी विनोद असलेला सिनेमा आहे हा. रेवतीने काय काम केलंय! गेल्याच आठवड्यात प्लॅनेट एम मधे याची सी.डी. मिळाली. पटकन घेऊन टाकली. कारण पुन्हा गेल्यावर मिळण्याची शक्यता कमी. “गुनगुन करता आया भँवरा” हे गाणं मात्र विसरता न येण्यासारखं. फारशी प्रसिद्धी न मिळालेल्या आणि विस्मरणात गेलेल्या पण अतिशय चांगल्या अशा सिनेमांपैकी हा एक. इथे याच्यावर लिहिल्याबद्दल धन्यवाद.

  • “गुनगुन करता आया भँवरा” मला पण खूप आवडत…रेवती मला तेव्हापण आवडायची तिची ‘लव’ मधली मॅगी तर सुपरलाईक…रामूच्या ‘रात’ मध्ये पण कसलं भन्नाट काम केल आहे तिने …ती पण अजून पुढे यायला हवी होती..असो तुझ्या प्रतिक्रियेबद्दल धन्स ग ….

 2. सुंदर चित्रपट आहे हा.. खूप आधी बघितलाय.. आता बराचसा आठवतही नाहीये.

  धन्स एवढ्या चांगल्या चित्रपटाची आठवण करून दिल्याबद्दल !

 3. Same here!!!
  ही movie मलाही आवडली होती पण मला नाव लक्षात राहत नाही.

  अमरीश पुरी आणि रेवती यांचे movie मधलं नातं फुलताना पाहणं खरंच छान होतं पण अमरीश पुरी गौप्यस्फोट करतात तेव्हा एका कठोर आणि ‘आकडू’ दाखवलेल्या माणसाचे माणूस म्हणून मोठेपण अधोरेखित होते.
  I really Wonder रेवती इतकी चांगली अभिनेत्री असूनही जास्त नजरेत का नाही आली.

  या movieची आठवण करून दिल्याबद्द्ल Thanks!!!

  —सोनल.

  • विशालदा,खरच सुंदर सिनेमा आहे , चित्रपटातलं वातावरण/लोकेशन पण मस्त आहे …
   >>जय मेहता एवढा सुसह्य पुन्हा कधीच वाटला नाही…अगदी खर आहे.त्याला काही फरक नाही पडत गुजरात सिद्धी सिमेंटचा मालक आहे तो …

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदल )

Connecting to %s