‘असावा’ सुंदर जवळचा किल्ला ….


ह्या शीर्षकाच मोल तुम्हाला कितपत कळेल माहित नाही.पण ‘इट मीन्स अ लॉट टू मी ‘… 🙂   का म्हणता..तर त्याच अस आहे कि आमचे नेहमी जे ट्रेक कार्यक्रम होत असतात तेव्हा मला ट्रेकच्या आदल्या दिवशीच घर सोडाव लागत.कारण मी जर आमच्या इकडची पहिली गाडी पकडली तरी मुंबईला पोहोचायला कमीत कमी ८ वाजतात . ट्रेकसाठी मुंबईहून इतक्या उशिरा निघणे सोयीच नसल्याने साधारण पहाटेच मुंबई सोडली जाते. तर सांगायचा मुद्दा असा कि बहुतांशी ट्रेक्स हे मला अगदी अल्पश्या झोपेवर करावे लागतात.वर घरी परततांना ओल्या,थकलेल्या अश्या स्थितीत कंटाळवाणा प्रवास करत नेहमीच रात्रीचे बारा वाजून जातात.कळसूबाईच्या वेळी तर रात्रीची शेवटची गाडी चुकल्यामुळे घरी पोहोचायला  सकाळचे पाच वाजले होते. पण ह्यावेळी आमचा ट्रेक झाला तो  आमच्या घरापासून अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेल्या ‘किल्ले असावा/आसावा/असावागड ‘ इथे…आता कळल मी शीर्षकाबद्दल ह्या ओळी का खरडल्या ते  🙂

तर त्या दिवशी खरतर अशेरीगड करायचा ‘प्लान’ होता आणि त्यासंदर्भात आनंद आणि आमच्या कंपनीतले श्याम दोघांचा मेल आला होता.हे श्याम म्हणजे ज्यांच्याबरोबर मी याआधी ‘चांदोली‘ येथिल सात दिवसाचा तसेच ह्यावर्षी कर्नाटकातील ‘याना‘ परिसरातील सात दिवसाचा ट्रेक केला होता.२५ वर्षाहून अधिक काळ ट्रेकिंगचा अनुभव असल्याने त्यांच्याकडून मला ट्रेक मधल्या अनेक लहान-मोठ्या गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत .तर आधी माझा ह्या ट्रेकला जायचा बेत नव्हता कारण रविवारी सुट्टी नव्हती.पण शनिवारी संध्याकाळी उगाच मन बैचेन झाल हे लोक इथे ट्रेकला येणार आणि मी कामावर जाणार ..मग दुसर्या दिवशी आजारी पडायचं ठरवून श्याम आणि आका दोघांना फोन करून ‘कन्फर्मेशन’ दिल.  🙂

तशी सकाळी ६.४५ लाच जाग आली पण सगळे ८ वाजता भेटणार असल्याने आणि बाहेर चांगला धो धो पाउस आणि विजा चालू असल्याने गाणी एकत मस्त पडून राहिलो.७.३० ळा ज्यो चा  फोन आला कि त्यांना एक्सप्रेस गाडी मिळाली आहे आणि ती ,दीपक,सुझे बोईसरला पोहोचलेत.मग पटपट तयारी करून श्यामना फोन केला ते म्हणाले अशेरीला  एक दगडी कातळ आहे ती पाऊसाळ्यात खुपच निसरडी होते तेव्हा कदाचित दोर वापरावा लागेल तेव्हा माझ्याकडे आपण एकत्र निघू.मग त्यांना दोरासकट पिक अप करून थेट  बोईसर  स्टेशन गाठल.तिथे पोहोचताच आका त्याचे दोन मित्र आणि बाळा (गावडे -हे पण आमच्या कंपनीतलेच एक हार्डकोअर ट्रेकर ) ह्यांची भेट झाली.स्टेशननजीकच्या ‘बोईसर रिफ्रेशमेंट’ मध्ये नाश्ता करायचं ठरवलं.तिथेच वारघडे आणि प्रफुल पाटील हे आमच्याइथलेच दोन ट्रेकर आम्हाला येऊन मिळाले आणि आमचा अकरा जणांचा संघ पूर्ण झाला.आम्हाला जरा उशिराच कळल पण ह्या दरम्यान  दीपक,सुझे आणि ज्यो ह्यांनी ‘बृजवासी’ मध्ये चांगल्या पाच-सहा पदार्थांचा फडशा पाडला होता.आणि ह्याचा परिणाम दिल्लीकरांना पण भोगायला लागणार होता …कसा ? हम्म ..जानने के लिये आगे पढते रहिये… 🙂

सगळ्यांचे पोटोबा तृप्त झाल्यावर आम्ही बोईसर बस डेपोत गाठल.गेल्या दोन दिवसापासून मुसळधार  पाउस अखंड चालू होता.डेपोत आम्हाला चांगले साडेनऊ वाजले होते आणि पाउस जोरदार आव्हान देत होता.तेव्हा बोईसरला बिर्याणीचा प्लान करू किंवा चिंचणी बीचवर जाउया असे पर्याय दिपकने मांडले.पण ट्रेकसाठी सुट्टी टाकली असल्याने ट्रेकच करावा म्हणून मी श्यामना ‘आसावा’ ला जाउया असे सुचवले.कारण अशेरीला थेट गाडी नव्हती तिथे पोहोचून पण आम्हाला ‘टमटम’ ची वाट बघावी लागणार होती आणि एकूणच परतायला  खूप उशीर होणार होता.सगळ्यांनी मग ‘आसावा’ वर शिक्कामोर्तब केल.आसावासाठी बोईसरहून ठाणे,पुणे ,कल्याण,वाडा अशी कोणतीही बस पकडून पंधरा-वीस मिनटात   ‘वरंगडा’ येथे उतराव लागत.जर मुंबई -अहमदाबाद  हायवेने (NH-8) आलात तर चिल्हार फाटयातून आत १०-१२ किमी अंतर तुम्हाला कापाव लागेल.

किल्ले असावा ...

रान -हळदीच फुल ...

स्वागत मित्रा...

"गपचूप हो पुढे ,काहीही करून वर जाययच नाहीतर सरळ वर जायच ... " 🙂

वरंगडाला  उतरल्यावर रस्त्याच्या उजव्या बाजूला  विराज कंपनी लागते.त्या कंपनीच्या समोर उभ राहिल्यास तिच्या उजव्या बाजूला तिला वळसा घालून ‘आसावा’ ट्रेकची सुरुवात करावी लागते.तिथून पुढे एक ओढा ओलांडावा लागतो.पण तो पाऊसाच्या संततधारेमुळे प्रचंड ‘फोर्सने’ भरून वाहत होता.त्यामुळे आम्हाला डावीकडील चिखलाचा आमची वीस-पंचवीस मिनटे अधिक घेणारा लांबचा मार्ग निवडायला लागला.त्यानंतर पाटाच्या पाण्याला समांतर चालत आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलो.भजी,वडे, समोसे असा छोटेखानी खादाडी कार्यक्रम उरकून चढाईला सुरुवात केली.

टशन दे ,टशन दे ... 🙂

दीप,ज्यो,सुझे...

वर जाण्यासाठी सुरुवातीला  दोन छोट्यामोठ्या टेकड्या चढाव्या लागतात व तिथून आपल्या मुख्य चढाईस सुरुवात होते.ट्रेक तसा इतका कठीण नसल्याने आम्ही मस्त  रमतगमत  चाललो होतो.अधूनमधून श्याम त्यांनी लावलेली वडाची रोपटे दाखवीत होते.पुढे बाळा ह्यांनी मस्त काबुली चणे खायला काढले तेव्हा ते खात असतांनाच श्यामनी ते का खायचे ह्याच ‘लॉजिक’ सांगितलं.’चणे खाल्याने गॅस होतो ,आणि त्या गॅसमुळे आपण आपोआप वर जातो. 🙂 दरम्यान ही वरिष्ठ ट्रेकर मंडळी आम्हाला अनेक माहितीही पुरवत होती.जसे नागपंचमीला असावावर मोठी जत्रा भरते,हजारोच्या संख्येने लोक इथे येतात.अश्या अनेक गप्पा हाणत जवळ जवळ दुप्पट वेळ घेऊन आम्ही एकदाचे वर पोहोचलो.तिथे समोरच गडाची तटबंदी तो गड असल्याचा पुरावा देत आमच स्वागत करत होती.

तटबंदी

पाण्याची टाक

गडावर पाण्याची बर्यापैकी मोठी  दोन टाक आहेत ,समोरच एक मोठा जलाशय बांधलेला आहे .तिथे उतरायला पायऱ्याही आहेत.गडावर पूर्ण  धुक्याच साम्राज्य पसरलेलं होत.त्या आल्हाददायक वातावरणाछा आस्वाद घेत आम्ही तिथे विसावलो. गडावर ‘ई -वाडवळ ग्रुप’ ची ४०-५० लोकांची टीम आमच्या आधीच हजार होती.त्यांच्या लीडर कल्पेश म्हात्रेकडून कळल कि ह्यांच्यातील बहुतेक मंडळी ही नवीन आहेत.पिकनिक पोईंटस,रिसोर्टस,फिल्म्स ह्या गोष्टी सोडून त्यांना ही लोक इथे निसर्गाच्या कुशीत ट्रेकिंगला घेऊन आल्याबद्दल त्यांचे कौतुक वाटले.थोड्या वेळ विश्रांतीनंतर आम्ही खालच्या गुहेकडे कुच केले.श्याम,दीपक ,सुझे ह्यांना वरची हिरवळ आवडल्यामुळे कि कोणास ठाऊक पण तिथेच थांबायचे ठरवले.  🙂

गडमाथ्यापासून गुहेपर्यंतचा मार्ग मात्र बराच निसरडा आणि थोडासा आव्हानात्मक होता.ते आव्हान पेलाल्यावर पुढे तश्याच निसरड्या दगडी कातळाला आलिंगन देत पुढे कुच कराव लागत आणि शेवटी आपण त्या गुहेत पोहोचतो.सुरुवातीपासून अगदी रमतगमत वर आलो असलो तरी ह्या माथ्य[पासून ते गुहेपर्यंतच्या ह्या वाटेने आम्हाला ट्रेकिंगला आलो असल्याची जाणीव करून दिली.सुरुवातीला जी मोठी गुहा आहे तिच्या प्रवेशद्वाराजवळ वरतून येणारा एक छोटासा झरा तुमचा अभिषेक करून स्वागत करतो.आत गुहेत एक पिरॅमिड सारखा दगड आहे.याचीच पूजा करण्यासाठी नागपंचमीला हजारो लोक इथे येतात.गुहेत एक तळ आहे.तो पूर्ण राखाडी रंगाच्या कसल्याश्या पदार्थाच्या तवंगाने झाकोळला होता .पण तो तवंग थोडासा बाजूला सारताच आत खालचा पृष्ठभाग अगदी स्पष्ट दिसण्याइतक नितळ पाणी आपल्याला दिसते.प्रफुल पाटील ह्यांनी आम्हाला त्याबद्दल सांगितले आणि आनंदने त्याच प्रात्यक्षीक करून दाखवल.ह्या तळ्यात १२ महिने पाणी असते ही माहितीही पाटील ह्यांनी पुरवली.शिवाय ह्या गुहा नैसर्गिक आहेत हे ही विशेष ..

गुहेच प्रवेशद्वार

हीच ती गुहा ...

गुहेतून ..

त्या मोठ्या गुहेला लागूनच बाजूला एक छोटीशी लहान गुहा आहे.तिथे आम्ही आमच सामान आदळल आणि खादाडी सुरु केली.बाळांनी मस्त बुर्जी आणि उकडलेली अंडी आणली होती पण श्रावण चालू असल्याने स्वत:वर नियंत्रण ठेवत शाकाहारी खादाडीवर  हल्लाबोल केला पण  ती खादाडी भरपूर असल्याने आम्हाला दाद देत नव्हती तेव्हा आम्हाला  दीपक आणि सुझेची आठवण आल्यावाचून राहिली नाही.मग खादाडीनंतर गुहेत फिरून झाल्यावर इथूनच दुसर्या वाटेने खाली जायचं ठरल्याने वरच्या मंडळीना खाली यायचं बोलवण पाठवलं.पण काही वेळातच ते वाट चुकल्याची बातमी आम्हाला मिळाली आणि मग आम्ही आमचा मोर्चा परत  गडमाथ्याकडे वळवला.

आमची गँग

सभोवतालचा परिसर

खाली दिसणारी विराज कंपनी आणि परिसर ...

त्या दगडी कातळाची परत एकदा गळाभेट घेऊन वर जात असताना सुझे आणि मंडळी रस्त्यात भेटली.मग गड माथ्यावर अल्पशी विश्रांती घेऊन आम्ही उतरायला सुरुवात केली.धुक आणि सततच्या पाऊसामुळे गुहेतले काही क्षण वगळता ‘क्लीकाक्लीकी’ला वेळच मिळाला नव्हता पण उतरताना वातावरण बर्यापैकी निवळलेले असल्यामुळे मी सर्वात शेवटी राहून ती कसर भरून काढत होतो.उतरताना अनेक फुल आमच हसून स्वागत करीत होती.एक फुल तर मस्त लाजलही.. 🙂   उतरतानाही काही विशेष त्रास झाला नाही तासाभरातच आम्ही खाली पोहोचलो.तिथे गरमागरम चहाचा आस्वाद घेत आम्ही बोईसर गाठल. आनंद आणि त्याचे मित्रांनी ठाण्याला जाण्यासाठी  बसचा पर्याय निवडला तर सुझे , दीपक, ज्यो आणि बाळा हया चौघांनी डहाणू-विरार शटल पकडली.

इश्श्य ..

अभिनंदन राजे ... 🙂

बाय बाय असावा ...

सुझे, दीपक आणि ज्यो एकत्र ह्या शटलने गेले असल्याने मला रेल्वे ट्रॅकची थोडी चिंता वाटत होतीच पण इतक काही होईल अस वाटलं नव्हत …  🙂  त्यामुळेच वातावरण निवळायची वाट पाहत आज ही पोस्ट टाकली नाहीतर दिल्लीपर्यंतची त्रस्त लोक  ह्या तिघांचा पत्ता विचारत माझ्याकडे आली असती … 🙂

तस बघायला गेल तर मी  सुरुवातीला ट्रेकसाठी  होणार्या त्रासाबद्दल जे लिहल आहे,तो त्रास करून घ्यायची तशी  काही गरज नसते…. पण ट्रेकिंगची खाज एकदा लागली ना कि .. 🙂

…आणि ह्या त्रासानंतर वर गडमाथ्यावर पोहोचल्यावर जे ‘फिलिंग’ येते ते… बस्स …अवर्णनीय … !!!

Advertisements

35 thoughts on “‘असावा’ सुंदर जवळचा किल्ला ….

 1. त्रासानंतर वर गडमाथ्यावर पोहोचल्यावर जे ‘फिलिंग’ येते ते… बस्स …अवर्णनीय …. ++++10000000000

  एक बदल नाश्ता फ़क्त दीपक आणि सूझे ने केला होता …. 😦 😦
  बाकी पोस्ट छान झालिये …. 🙂 🙂

 2. हाहाहा
  मस्त झालाय लेख…
  अन हो.. त्याच दिवशी नव्हे तर दुसऱ्या ही दिवशी अहमदाबादसाठीची शताब्दी अडकवली होती…अन त्यात मी पण २ तास अडकले होते !! 🙂

  • हो ग भक्ती ..काल म्हणजे गुरुवारी पूर्ण सुरळीत झाली सेवा….तू अडकलेलीस तर शिव्या घालू शकतेस, मी गुन्हेगारांची नाव दिली आहेत वर…. 🙂

 3. सही लिहिलंयस एकदम !!

  तुमच्या ग्रुपला एक नाव सुचलंय
  ‘देल्ही बेली ट्रेकिंग ग्रुप’ :PPPPP

 4. असावा ट्रेकचे चांगले वर्णन केले आहे.१२ वर्षांपूर्वी मी धो धो पावसात तांदूळवाडीला गेल्याची आठवण झाली.आता गुडघेदुखीमुळे असा आनंद घेता येत नाही.तुमचे वर्णन आणि छायाचित्रे यामुळे ट्रेकचा आनंद मिळतो.’अभिनंदन राजे’ हे शीर्षक असलेल्या फुलाचे नाव काय हे कळेल काय?पावसानंतर ही फुले सर्वत्र दिसतात.

  • माझ्या वर्णनामुळे आपल्याला आनंद मिळतो हे वाचून मलाही आनंद झाला ….त्या फुलाच नक्की नाव ठाऊक नाही ,कळल कि कळवेन तुम्हाला ….

 5. तुमच्या केलेल्या वर्णनावरुन आम्हाला तेथे आम्ही प्रत्यक्ष असल्याचा aaभास झाला..
  thanks ….

 6. वा देवेन्द्र मस्त झालं ट्रेकिग मग . आम्हाला ही असावा गडा बद्दल माहिती मिळाली .

 7. मस्त जमलंय ट्रेक वर्णन…!!!

  आम्हांला पण घेऊन चला यार कधीतरी ट्रेकला….

 8. पिंगबॅक आई महालक्ष्मीच्या नावान चांगभल … | दवबिंदु

 9. मस्त जमलंय ट्रेक वर्णन…!!!

  आम्हांला पण घेऊन चला यार कधीतरी ट्रेकला
  .पण पावसाळ्यात नको.

टिप्पण्या बंद आहेत.