आई महालक्ष्मीच्या नावान चांगभल …


ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात ‘असावा’ ट्रेक आटोपल्यावर पुढील बरेचसे रविवार सुट्टी नसल्याच माझ्या लक्षात आल होत.गणपतीला तब्बल पाच दिवस सुट्टी आधीच टाकून ठेवली असल्याने रविवारी सुट्टी मारायची शक्यताही कमी होती. तेव्हा बराच कालावधी ट्रेकला मुकणार हे निश्चित होत. मग दुधाची तहान ताकावर भागवण्यासाठी मी कंपनीतल्या मित्रांसमोर (‘ऑड डे’ ला अजून कोण भेट णार 🙂  ) ट्रेकचा प्रस्ताव मांडला.ट्रेक सर्वांनाच झेपेल अस मला वाटत नव्हत. तसही एखाद्या गडावर जाऊन तिथे आपल्याला पहायला मिळणारे इतिहासाची साक्ष देणारे पडके बुरुज,पाण्याची टाक वैगेरे सगळ्यांनाच भावेल अस नाही.वर जाऊन देवीच दर्शन घेतल्याच समाधानही मिळेल आणि चढतांना देवीच्या नावाने मानसिक बळही मिळेल हे गृहीत धरून मी त्या लोकांना महालक्ष्मी गडावर ‘पिकनिक’ला जाण्याचा पर्याय सुचवला.त्याबरोबरच मुंबई -अहमदाबाद हायवेला लागून असलेले महालक्ष्मी मंदीर आणि सूर्या नदीकिनारी असलेल्या सप्तशृंगी मंदिराला भेट देण्याचा ‘प्लान’ ठरवला.सुरुवातीला आम्ही दोन गाड्या करायचे ठरवले होते पण इच्छुक लोक वाढल्याने आम्हाला तिसरी गाडीही करावी लागली.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून दिसणारा महालक्ष्मी गड

ह्या पिकनिकला आमच्या ‘बी’ क्रू च्या दृष्टीने खूप महत्व होत कारण कित्येक वर्ष आमची ‘पिकनिक ‘ मोठा गाजावाजा करत कागदावरच राहिली होती.अश्यातच तो दिवस उजाडला, तो श्रावणातील एक मंगळवार होता .रिमझिम पाऊस चालू होता आणि आभाळ काळ्या ढगांनी व्यापलेले होते.बर्याच विकेट जाणार अस वाटलं होत पण अनपेक्षितपणे फक्त एकच विकेट गेली.सकाळी साडेसहाच्या सुमारास आम्ही आमचा प्रवास सुरु केला.आमच्या इथून महालक्ष्मीला जाण्यासाठी एकूण चार रस्ते आहेत पण त्यातील तीन रस्ते अतिशय खराब असल्याने आम्ही सर्वात लांबचा पण चांगला ‘व्हाया तारापूर ‘ रस्ता निवडला होता.ढगाळ वातावरणामुळे असल्याने आजूबाजूचा सगळा परिसर आणि  अवघा निसर्गच सुस्तीत होता. पण आम्ही आमच्याच मस्तीत पुढे जात होतो.वाणगाव जवळील रेल्वे फाटक गाठल्यावर तिथला प्रसिद्ध वडापाव ‘पार्सल’  न घेता पुढ जाण आम्हाला कोणालाही पटण्यासारख नव्हतच मुळी… 🙂

वाणगावहून चारोटीला जातांना रस्त्यात लागणाऱ्या ‘साखरे’ धरणाच विहंगम दृश्य पाहण्यासाठी आम्ही थोडा वेळ तिथे थांबलो आणि परत मार्गाला लागलो.चारोटी नाका यायच्या ४-५  किमी आधी डाव्या बाजूला ‘महालक्ष्मी गडाकडे जाण्याचा रस्ता ‘ अस लिहिलेली पाटी  दिसते.तिथे वळून थोड आत गेल्यावर आपण महालक्ष्मी गडाच्या पायथ्याशी पोहोचतो.तिथे पार्किंगसाठी मुबलक जागा उपलब्ध आहे.तिथे गाड्या ठेऊन आम्ही ११ नंबरची गाडी पकडून वर चढायला सुरुवात केली.सुरुवातीची दहा-पंधरा मिनटे चांगलाच थकवणारा उभा चढाव लागतो. तो चढाव पार केल्यावर पुढे  पायऱ्या लागतात.वर जाण्यासाठी एकूण नउशे पायऱ्या आपल्याला चढायला लागतात. (ह्या काही मी मोजत गेलो नाही पण लहानपणापासून ऐकून आहे 🙂 )  रस्त्यात हिरवीगार गर्द झाडी मन प्रसन्न करून टाकते.दोन ठिकाणी छोटीशी दगडांच्या मूर्ती असलेली दोन मंदिर लागतात.दुसरया मंदिराच्या थोड पुढेच आपण एकदम मोकळ्या जागेत येतो . आणि आपल्या लक्षात येत एक डोंगराच्या माथ्यावर आहोत आणि महालक्ष्मीच मंदीर समोरच्या दुसर्या डोंगरावर आहे.महालक्ष्मीचा हा डोंगर ‘मुसळ्या’ डोंगर म्हणूनही ओळखला जातो.इथून  समोरच्या  महालक्ष्मी गडाच दर्शन खरच लोभनीय आहे.. त्या डोंगरापासून महालक्ष्मीच्या डोंगरावर जाण्यासाठी चांगला  कॉँक्रीटचा रस्ता आहे.तिथे परत पायऱ्या चढून  आपण महालक्ष्मीच्या गुंफेजवळ पोहोचतो.

कोल्हापूरची महालक्ष्मी गुजरातमधील सुपीकता, धार्मिकता पाहण्यासाठी गुजरातकडे जात असताना तिला हा परिसर खूपच आवडला.ती इथल्या डोंगर- दरया पार करत असतांना तिथले पशु-पक्षी खुपच आनंदित झाले व नाचू -गाऊ लागले. त्यामुळे तेथील राक्षसांची झोप उडाली. ते  जागे झाल़े महालक्ष्मीला आपल्या परिसरात पाहून  संतापले. नंतर देवीशी त्यांचे युद्ध झाले. त्यात देवीने राक्षसांचा वध केला. नंतर ती विश्रांतीसाठी गडावर विसावली.अशी या महालक्ष्मीची आख्यायिका आहे. पांडवानीही अज्ञातवासात असताना त्यांनीही हया ठिकाणी मुक्काम केला होता असे सांगीतले जाते. बखरकार फेरिस्ता यांनी हे दैवत एकेकाळी अतिशय श्रीमंत होतं असं म्हटलं आहे.सुलतान महम्मदाने व कालांतराने गझनीच्या महम्मदाने हे देऊळ लुटून तिथे मशीद बांधली. मुस्लीम राज्य खालसा झाल्यानंतर , इथे पुन्हा मंदिर बांधलं गेलं. त्या वेळी अकबर बादशहानेही ह्या  देवीचं दर्शन घेतलं होतं अस सांगितलं जात .

पायथ्यापासून वरच्या गुहेतील मंदीरापर्यंत साधारणत: पाउण तासात आरामात पोहोचता येते ,पण आम्ही रमत गमत ,रिमझिम पडणाऱ्या पाऊसाची आणि श्रावणातील हिरवाईने नटलेल्या निसर्गाची मजा घेत वर पोहोचायला तासाभराहून बराच वेळ अधिक लावला होता.वरील गुहा खूप मोठी आहे पण देवीच्या दर्शनासाठी तुम्हाला खरया अर्थाने ‘नतमस्तक’ व्हावं लागत, कारण देवीच्या दर्शनासाठी त्या गुहेतील अजून एका छोट्या गुहेत जाव लागत आणि त्या गुहेचा रस्ता इतका लहान आहे कि  भूमातेला समांतर होऊन ‘मिलिटरी’ स्टाईलने मध्ये जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये.त्या गुहेच्या आतही अतिशय कमी जागा आहे.एका वेळी दोन ते तीन जणच आत दर्शन घेऊ शकतात.


गुहेच्या आत वातावरण जरा वेगळाच वाटत होत आणि मन भक्तीभावाने प्रसन्न झाल होत.देवीच्या चरणी माथा टेकवून आम्ही तिचा आशीर्वाद घेतला.त्या गुहेच्या डाव्या बाजूला आत जायला अजून एक अतिशय अरुंद रस्ता आहे ,तिकडच्या भटजींना विचारलं असता ते म्हणाले इथून आत गेल्यावर पुढे एक तलाव लागतो पण तिथे कोणी जात नाही .त्यांना विचारल्यावर त्यांनी थोड पुढे जाऊन तो तलाव बघण्याची परवानगी दिली.मी त्या अतिशय अरुंद बोगद्यात सरपटतच शिरलो पण पुढे काळोखाच काळोख होता आणि पाऊसामुळे सगळा भाग ओलाही झाला होता थोड पुढे जाऊनही काही दिसलं नाही मग जास्त ‘रिस्क’ नको म्हणून  मी माघारी आलो.दुसर कोणी एक जरी माझाबरोबर असत तर मी त्या जागेच दर्शन जरूर घेतलं असत.मग आम्ही देवीचा निरोप घेऊन त्या छोट्या गुहेतून बाहेर पडलो.बाहेरील गुहेत अनेक देवदेवतांच्या मुर्त्या स्थापन केलेल्या आहेत.आम्ही गुहेतून बाहेर नजर टाकली तर बाहेर अतिशय मुसळधार पाउस चालू झाला होता मग आम्ही पाउसाचा जोर थोडा कमी होईपर्यंत तिथेच बसायचे ठरवले.


पाउसाचा जोर थोडासा ओसरल्यावर आम्ही गुहेबाहेर पडलो ,पाउस कमी झाला असला तरी वारा अगदी जोरात वाहत होता आणि नैसर्गिक वातानुकूलित यंत्रही ‘कुलेस्ट’ मोड वर गेल होत.अतिशय आल्हाददायक वातावरणामुळे तिथून हलावस वाटत नव्हत.पण आमच्या बरोबरचे लोक पुढे निघाले होते आणि पुढचा कार्यक्रमही पार पाडायचा असल्याने ‘क्लीकाक्लीकी’ करत  मागे राहिलेल्या मी आणि शशिकांत नावाच्या मित्राने शेवटी तिथून निघायचे ठरवले.पण तितक्यात तिथे असलेल्या एका दुकानातून गरमागरम वड्यांचा वास आमच्या नाकातून सरळ मेंदूत शिरला आणि तश्या वातावरणात गरमागरम वडे सोडून पुढे निघायचा प्रश्नच नव्हता.मग आम्ही खाली थोड झटपट खाली उतरून पूर्ण ‘टीम’ ला गाठल आणि पुढे एका ठिकाणी वाणगावहून आणलेल्या स्पेशल वडापाववर यथेच्छ ताव मारला.तिथून पुढे क्लीकाक्लीकी करत आम्ही पायथ्याशी पोहोचलो आणि तिथून सुमारे १० किमी आणि हायवेवर चारोटी नाक्यापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या विवळवेढे येथील महालक्ष्मीच मंदिर गाठल.गडावरची ती ‘रानशेतची महालक्ष्मी’ आणि ही ‘डहाणूची महालक्ष्मी’ म्हणून ओळखली जाते.

डहाणूची महालक्ष्मी ...

डहाणूची महालक्ष्मी जागृत देवस्थान म्हणून भाविकांमध्ये खूप प्रसिद्ध आह़े .ह्या मंदिरात लहानपणापासून दरवर्षी न चुकता कमीत कमी एकदा तरी मी येतोच.  एका गरोदर आदिवासी स्त्रीभक्तासाठी देवी पायथ्याशी आली आणि ह्या मंदिराची स्थापना झाली असे सांगीतले जाते.येथे आजूबाजूला असलेल्या सर्वच गावातील असंख्य आदिवासी बांधवांचं ह्या महालक्ष्मीवर अपार श्रद्धा आहे.त्याचं सांस्कृतिक जीवनावरही ह्या श्रद्धेचा मोठा प्रभाव दिसून येतो.हे मंदिर गुजराती लोकांमध्ये खूप प्रसिद्ध असून महालक्ष्मीच्या  देशातल्या ५१ शक्तीपीठांपैकी हे एक आहे. इथे नेहमीच गर्दी असते.इथे दरवर्षी हनुमान जयंतीच्या दिवशी सुरु होऊन पुढे पंधरा दिवस चालणारी मोठी जत्रा भरते.

या यात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे येथे मिळणारे चिकन आणि मटण भुजिंग होय.बरेच लोक देवी दर्शन आटोपून भूजिंगवर ताव मारतात तर काही जण एकदा भुजिंगसाठी आणि एकदा देवीच्या दर्शनासाठी अशी दोनदा इथे भेट देतात .फक्त भुजिंगसाठी इथे येणार्या लोकांचीही संख्याही लक्षणीय असते.चिकनचे भुजिंग बनवण्याकरता कोंबडीच्या मटणाचे छोटे-छोटे तुकडे करून एक विशिष्ट प्रकारचा मसाला लावून शिगेत घालून ते कोळशावर भाजले जाते.त्याचप्रमाणे मटणाचा खिमा करून त्याच्या मुठिया बनवल्या जातात .आदिवासींनी वर्षभर जंगलातून गोळा केलेली कंदमुळे, रानभाज्या, औषधी वनस्पती,सुकी मच्छी ,विविध प्रकारचे मसाले,लसूण, कांदे अश्या अनेक वस्तूंचा मोठा बाजार ह्या जत्रेत भरतो.

इथेही योगायोगाने बरोबर आम्ही मंदिराच्या आत असतांना जोरदार पाउस सुरु झाला होता.तिथे देवीच यथावकाश दर्शन घेऊन काही वेळ आम्ही मंदिरात बसलो आणि मग देवीचा निरोप घेतला.मग आम्ही चारोटीवरून बोईसर-डहाणूला जाणार्या रस्त्यावर अंदाजे चार पाच किमी अंतरावर डाव्या बाजूला सप्तशृंगी मंदिराकडे गाडी वळवली.मंदिराजवळ पोहोचल्यावर एक गाडी अजून यायची बाकी असल्याने त्यांची वात पाहत आम्ही मंदिरासमोर असलेल्या छोट्याश्या दुकानात गेलो आणि तिथे चिक्की आणि बालपणाची आठवण करून देणारे आणि आपल्या इथल्या दुकानात बहुतांशी न दिसणारे  दोन तीन पदार्थ ( 🙂 ) घेतले आणि तोंड आणि जिभेला थोडस काम दिल.इथल सप्तशृंगीच मंदिर आणि परिसर अतिशय सुंदर आहे ,पण का कोणास ठाऊक हे तितकस प्रसिद्ध नाहीये.तिसरी गाडी आल्यावर आम्ही सप्तशृंगीमातेच यथावकाश दर्शन घेतलं आणि मंदिराच्या मागील बाजूचा रस्ता पकडून सूर्या नदीच्या किनारी पोहोचलो.

सप्तशृंगी देवीच मंदिर


ह्या सूर्या नदीबद्दलही महालक्ष्मीशी निगडीत एक आख्यायिका आहे.पांडव अज्ञातवासात असताना जेव्हा  हया ठिकाणी वास्तव्यास होते त्या वेळी भिमाने एके दिवशी देवीला पाहिलं आणि तिच्या प्रेमात पडला आणि तिच्याशीच लग्न करण्याचा निश्चय केला होता.तेव्हा देवीने भीमाला सांगीतले जर तू एका रात्रीत सूर्या नदीवर बांध बांधून तीच पाणी मी राहत असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी आणलस तर मी तुझ्याशी लग्न करेन.तेव्हा भिमाने ते आव्हान स्वीकारून कामाला सुरुवातही केली.रात्रभर मोठेमोठे दगड घेऊन त्याने नदीवर बांध बांधला शेवटी थोडीशी जागा बाकी राहिल्यावर दगड न मिळाल्यामुळे तो स्वत: तिथे पाठ टेकवून बसला.मग नदीच पाणी वाढू लागल आणि महालक्ष्मीच्या डोंगराकडे वळू लागल.तेव्हा महालक्ष्मीने परिस्थिती जाणून कोंबड्याचं रूप घेऊन पहाटेपूवीर्च बांग दिली.तेव्हा भीम निराश होऊन त्या जागेवरून उठला आणि वाढलेलं पाणी प्रचंड जोराने पुढे वाहून गेल आणि बरोबर भीमाच्या सगळ्या आशाही …

तर त्यानंतर तब्बल चार तास आम्ही त्या सूर्या नदीवरच ठाण मांडून बसलो होतो.सूर्या नदीच्या पाण्यांत मनसोक्त विहार करून आम्ही तिथेच बोईसरहून नेलेल्या स्पेशल वेज बिर्याणी (श्रावण चालू होता न राव..)  वर ताव मारला. आणि परत नदीच्या पाण्यात जाऊन विसावलो.एक वेगळीच ओढ लागली होती त्या पाण्याची आणि बाहेर पडूच नये अस वाटत होत पण बाहेर तर निघाव लागणार होत ना.बाहेर आल्यावरही आम्ही आमचा दंगा चालूच ठेवला होता. मोबाईलवर गाणी लावून मस्त डान्स केला अनेक अतरंगी फोटो काढले.आणि अशी धमाल करताच आम्ही घराच्या दिशेने निघालो.सबंध दिवस आम्ही खूप खूप खूप यंज्वाय केला होता.


एकंदरीत माझा हा ‘ताक’  भलताच चविष्ट निघाला होता आणि त्यानंतर अजूनही  बाहेर कुठे फिरण न झाल्याने त्याचीच चव अजून मनाच्या जिभेवर रेंगाळत आहे म्हणून हा लेखप्रपंच…..

Advertisements

16 thoughts on “आई महालक्ष्मीच्या नावान चांगभल …

  1. “”या यात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे येथे मिळणारे चिकन आणि मटण भुजिंग होय.”

    बोल रे कधी घेऊन चलतो यात्रेला?!

  2. खरच मस्त लिहिलस..प्लस माझ्या मामाकडची “सूर्या नदी”चा उल्लेख असल्यामुळे पण आणखी रस आला..
    ही महालक्ष्मी यात्रा पण माझी राहिली आहे…पुढच्यावेळी तुलाच विचारेन नेतोस का म्हणून….::)

  3. वर्णन एकदम छान प्रत्यक्ष डोळ्यापुढे चित्र उभे राहते.सुरेख लेखन.

  4. अरे एक सांगायचे विसरलोच, बर्‍याच दिवसांनी भेट देतोय, नवा लूक आवडलाय ब्लॉगचा ! ही कसली तयारी म्हणायला हवी ?? 😉

  5. जबरदस्त रे..तुम्ही ज्या सप्तश्रूंगी मातेच्या आणि सुर्या नदीच्या परीसरात भटकंती केलीत..त्याच रस्त्याला पुढे ३ किमी.वर “उर्से” नावाचे माझे जन्मगाव आहे.महालक्ष्मी आणि सप्तश्रूंगी मातेवर तर या भागातील लोकांची अपार श्रद्धा आहे.सुर्या नदी तर आमची दुसरी माय च आहे.लहानपणी तर घरी कमी आणि नदीवर जास्त अशी परीस्थिती असायची.

टिप्पण्या बंद आहेत.