‘कास-व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’- महाराष्ट्रातला एक स्वर्ग….


गेल्या रविवारी मुंबईहून ६-७ तास अंतरावर असलेल्या पश्चिम घाटातील सातारयानजीकच्या   ‘कास’ ह्या पठारावर जाण्याचा भाग्य लाभल. हो भाग्यच….कास बद्दल थोड फार ऐकून होतोच पण प्रत्यक्ष तिथे पोहोचल्यावर जे अनुभवलं ते अवर्णनीयच..काश्मीरमधील ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ चे अनेक फोटो पाहिले होते पण महाराष्ट्रात अशी जागा असेल अस वाटलं नव्हत .जिकडे तिकडे हिरवागार परिसर ,त्यावर दूरदूरवर पसरलेले  पिवळ्या,निळ्या, पांढरया, जांभळ्या अश्या अनेक रंगाच्या फुलांचे  गालीचे,त्यांच्या सोबतीला निळ्याशार आभाळात पांढर्या ढगांची नक्षीदार उधळण .. अहाहा…

वाऱ्यांच्या मंद झुळकेबरोबर त्यां फुलांच ते डुलण जणू काही वारा त्यांना काही संगीत एकवत होता अन ते त्याच्या तालावर डोलत होते.अवघी रात्र जागरण करूनही तिथे आम्ही सगळे ताजेतवाने होऊन गेलो होतो.निसर्गाचा एक सुंदर आविष्कारच पाहायला मिळाला.खरच कासने माझ्या डोळ्यांना खासच ‘ट्रीट’ दिली.त्या स्वर्गीय पठारावरील दृश्य बघून मी मनातल्या मनात  ब्रम्हदेवाला एक कडकडीत सलाम ठोकुन दिला.तिथे आलेले सर्व लोकही आपोआप त्या फुलांसारखेच फुलले होते.त्या वातावरणात कोणाच्या चेहऱ्यावर दु:खाची छटा दिसण म्हणजे नवलच होत,सर्व काही विसरायला लावणार अस होत ते सगळ… मला तर लिओनार्डोच्या ‘दि बीच’ मधील ‘त्या’ बेटाची आठवण आल्याशिवाय राहिली नाही .

आमच्या  ह्या सुंदर फूलसहलीचे राजीव फलटणकर काकांनी अगदी  सुंदर रीतीने व्यवस्थापन केले होते.गेल्या वर्षी ह्याच दिवशी तिकोना येथे पहिल्यांदाच भेट घडलेल्या श्री ताई आणि अनघा ताई ह्यांना बरोबर एका वर्षांनी भेटण्याचा योग ह्या कास भेटीच्या निमित्ताने जुळून आला.तसा आपला खादाडी सेनापती रोहन चौधरी आणि आका  सहकुटुंब येणार होते पण वेळेवर काही अडचणींमुळे त्यांना यायला जमल नाही.  बाकी गौरी, गणेश,पूजा,अर्चना, भक्ती, ज्योती,दीपक,स्वाती  ह्यांच्या समावेशाने मंदिरमय झालेल्या स्नेहपूर्ण वातावरणात चांगलेच चैतन्य निर्माण झाले होते.अश्या आपल्याच धुंदीत असलेल्या, सागरासारख्या उधाणलेल्या मुंबईकरांच्या टोळीचे कासने  सुहास्य वदनाने स्वागत केले.संपूर्ण प्रवासात आम्ही खूप खूप  धमाल केली. रात्रभर डोळ्याला डोळा न लागू देता  गाणी गाऊनही पोट न भरल्याने कासला मिळालेल्या उर्जेने संबध  परतीच्याही वाटेवरही गाण्याची मैफल तशीच चालू होती. एकूणच  अविस्मरणीय दिवस होता तो …

आत अनेक ज्वालामुखी आणि तत्सम गोष्टी खदखदत असताना अवघ्या पृथ्वीतलाचा भार हसत हसत सोसणाऱ्या भूमातेला अश्या काही ठिकाणी थोडा नट्टापट्टा करायची संधी सृष्टीकर्त्याने दिली आहे.त्यातली बरीचशी ठिकाण मानवाने आपल्या स्वार्थासाठी  आधीच नष्ट केली आहेत.कासच्या पठारावर साधारणत: सप्टेंबर महिन्यातील तीन आठवडे भूमाता अशीच सजून राहते.पण अति पर्यटनामुळे हे सुद्धा तिच्या नशिबात फार  काळ राहील अस वाटत नाही .

महाबळेश्वर येथील पठारावरील अनेक दुर्मिळ जाती अतिपर्यटनामुळे अश्याच नाहीश्या झालेल्या आहेत.गेल्या काही वर्षात इथे पर्यटकांची संख्या खूप वाढत असून जाणते-अजाणतेपणातून येथील वनस्पतींचे नुकसान होत आहे.पर्यटन हे काससाठी दुधारी अस्त्र बनल आहे.एखाद फूल तोडून जर काही विशेष होत नाही अस एखाद्या व्यक्तीला वाटत असेल तर  त्यांनी लक्षात घ्यावे जर प्रत्येकाने अस एक फूल तोडलं तर… ह्या रविवारीच तिथे पंधरा हजाराहून अधिक पर्यटकांनी भेट दिल्याची नोंद आहे…अनेक व्यावसायिक,नेत्यांनी इथल्या बहुतांशी जमिनी कासच्या ‘प्रॉमिसिंग’ नावाखाली बळकावल्या आहेत त्यांनीही इथल्या पर्यावरणाच्या संवर्धनाबाबत विचार करायला हवा नाहीतर ज्या ‘कास’ला डोळ्यासमोर ठेऊन तुम्ही ‘इन्वेस्टमेंट’ केली आहे तेच तिथे उरणार नाही. तसेच आपल्यासारख्या पर्यटकांनीही इथल्या एकूणच पर्यावरणाची योग्य ती काळजी जबाबदारीने घ्यायला हवी.सरकारनेही कासच्या संवर्धनासाठी तेथील बाजारीकरण थांबवून पर्यटनाच्या दृष्टीने (तिकडच पर्यटन थांबवणे हा काही उपाय नाहीये अस मला तरी वाटते) आणि वनसंरक्षणाच्या दृष्टीने योग्य ती पाउले वेळीच उचलावीत …नाहीतर….

This slideshow requires JavaScript.ह्यातील बहुतांशी फुलांची नाव ह्या संकेतस्थळावर समजली आणि ती शोधतांना इतर अनेक फुलांची विविध माहिती तिथे मिळाली.आवर्जून भेट द्यावी असे संकेतस्थळ आहे.धन्यवाद 🙂

Advertisements

29 thoughts on “‘कास-व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’- महाराष्ट्रातला एक स्वर्ग….

  1. सुंदर फुलं आहेत रे आणि तू फोटो देखील छान टिपले आहेस.
    आणि आपल्या नेत्यांबद्दल काय बोलावे? हि लोकं मेंटल हॉस्पिटलची आरक्षित जागा पण सोडत नाहीत तर कासचे काय होणार हे वेगळे सांगायलाच नको.

  2. बोले तो एक्दम झ्यग्यास्स्स्स्स मुन्ना !!
    सुंदर लिहिलं आहेस ! स्पेशली तो मधला पॅरा !! 🙂

  3. देवेंद्र किती दिवसांनी भेटतोय. आजची पोस्त वाचलीय कि नाही माहित नाही. पण तुला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ….
    कासला मलाही जायचं होतं. पण धो धो पावसानं ठरवलेला बेत मोडीत काढला. आता पुन्हा नंतर कधी तरी.

टिप्पण्या बंद आहेत.