सदाशिवगड …


सकाळचे साडे नऊ वाजले होते.सूर्यदेव बर्यापैकी वर आले होते. माझा दक्षिणायनातला तो पहिला दिवस होता. आम्ही मंगलोर एक्स्प्रेसमधून कारवार रेल्वेस्टेशनवर उतरलो. आजवर उत्तरेत अनेक दौरे गाजवलेले (ह्या दक्षिण दौर्याआधी अगदी महिन्यापूर्वीच दिल्ली ,आग्रा,मथुरा ,हृषीकेश,हरिद्वार,मसुरी वैगेरे अशी मोठी सहल करून आलो होतो. 🙂 )   असलेले तरी दक्षिणेकडे येण अस झालच नव्हत.तर दक्षिणेतील कर्नाटकातील त्या भूमीवर माझ ते पाहिलं पाउल होत.आमच्या ट्रेकिंगच्या बॅच मधले अजून दहा-बारा जणांशी तिथे भेट झाली.त्या दिवशी संध्याकाळपर्यंत आम्हाला कारवारहून ४० किमी अंतरावर असलेल्या  मल्लापूर इथे बेस कॅम्पला पोहोचायचे होते.म्हणजे आजचा दिवस आमच्याकडे फिरण्यासाठी  होता.पण पुढचे सात दिवस जंगलातच ट्रेकिंग करत काढायचे असल्याने आज मल्लापुरला जाऊन आराम करू असे अनेक जणांचे मत होते त्याप्रमाणे त्यांनी त्यांचा कार्यक्रमही ठरवला.पण आम्ही (आम्ही म्हणजे श्याम,हेमंत आणि मी ) मात्र असे तिथे जाऊन आराम करणाऱ्यांतले नक्कीच नव्हतो.

आम्ही लागलीच तिथे फिरायच्या ठिकाणांची चौकशी केली.गोकर्ण महाबळेश्वर, मिर्जन चा किल्ला,जोगचा धबधबा असे चांगले पर्याय आम्हाला मिळाले.पण सगळे सुमारे ५० किमी च्या आसपास होते.पब्लिक ट्रान्सपोर्ट वर अवलंबून उपयोग नव्हता कारण संध्याकाळी मल्लापुरला जाणाऱ्या गाड्या खुपच कमी होत्या आणि तिघांसाठी वेगळी गाडी करण तितकस परवडणार नव्हत. संध्याकाळी बेस कॅम्पला पोहोचायच महत्वाच असल्यामुळे आम्ही परतीच्या वेळी गोकर्ण महाबळेश्वर आणि जोगचा धबधबा
पाहायचं ठरवल.मग तिथून एक गाडी करून स्टेशनपासून ६ किमी अंतरावर असलेल्या  कारवार शहरात पोहोचलो.काळी नदी ,अरबी समुद्र आणि पश्चिम घाट ह्यांची  साथ लाभलेल, कर्नाटक आणि गोव्याच्या सीमारेषेजवळ वसलेल  सुंदर शहर   म्हणजे  कारवार. इब्न-ए-बत्तुता ने पण कारवारला भेट दिल्याची नोंद आहे.तसेच आम्ही महाराष्ट्रातले ‘इब्न-ए-बत्तुता’ तिथे पोहोचलो होतो.तिथे उतरल्याबरोबर सर्वप्रथम एक हॉटेल गाठून पेटपुजा आटोपली आणि कारवार नगरीत हिंडू लागलो. रविवार असल्याने बर्यापैकी मोठा आठवड्याचा बाजार तिथे भरला होता.थोडस भटकल्यावर आम्ही जवळच असलेल्या कारवार बीचकडे आमचा मोर्चा वळवला.

कारवार समुद्रकिनारयाच्या प्रवेशस्थानी ...

कर्नाटकातून नोबेल विजेत्या रविंद्रनाथ टागोरांना  मोहवून टाकणारा तो बीच खरच खूप सुंदर आहे.टागोर ह्यांना  कारवारच्या बीचबद्दल काय वाटले ते वरील छायाचित्रात पहा. रविवार असल्याने बर्यापैकी उन असूनही बीचवर बरीच वर्दळ होती.बीचवर भटकत भटकत आम्ही थोडस दूर गेलो तिथे नुकताच काही लोक समुद्रात सोडलेल जाळ घेऊन दर्याच सोन घेऊन आले होते.त्या जाळ्यात इतर मास्यांबरोबरच  ‘क्रॉकडाइल हंटर’ स्टीवच्या निधनास कारणीभूत ठरलेला जिवंत ‘स्टिंगरे’ आम्हाला पाहायला मिळाला.तिथे यथेच्छ भटकल्यावर आम्ही तिथे जवळपास अजून काही बघण्यासारख आहे का अशी चौकशी केली असता सकाळचीच नाव पुढ आली.पण तिथेच असलेल्या सायकलस्वारांच्या टोळीतील एका मुलाने आमच्याकडे पाहून निरखत आम्हाला सदाशिवगडाची माहिती दिली.सकाळपासून सदाशिवगडाबद्दल आम्हाला कोणीच काही बोलल नाही ह्याच आम्हाला थोडस आश्चर्य वाटलं.सदाशिवगडला जायचा ठराव बिनविरोध पास झाल्याने आम्ही त्याप्रमाणे मोर्चेबांधणी सुरु केली .तो मुलगा आमच्याबरोबर  मुख्य रस्त्यापर्यंत आला आणि आम्हाला योग्य बसमध्ये बसवून मगच त्याने आमचा निरोप घेतला.

stingrey

हेमंत ..खाऊ कि गिळू 🙂

बसमध्ये आम्ही कंडक्टरला आम्हाला सदाशिवगडला उतरव अस बजावून ठेवलं होत त्याप्रमाणे त्याने आम्हाला उतरवल. बसमधून खाली उतरल्यावर मात्र बाजूला एक गाव सोडून काही दिसेना. मग तिथे चौकशी केल्यावर कळाल की हे सदाशिवगड गाव आहे आणि जो किल्ला आहे तो मागे काळी नदीवरील पूल ओलांडल्यावर उजव्या बाजूला आहे.मग काय आयुष्यात कधी मागे वळून न पाहणाऱ्या आम्हाला पूर्ण मोर्चाच मागे वळवावा लागला. 🙂 आपल्या हळुवार अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीतील बराच काळ गाजवलेल्या ‘ऐरणीच्या देवा तुला’ वाल्या मराठीतील ज्येष्ठ नायिका जयश्री गडकर ह्यांच कणसगिरी हे गाव ह्या सदाशिवगड गावाला लागूनच आहे.कडक उन्हामुळे जास्त वाटलं कि माहीत नाही पण सुमारे दोन-तीन किमी तरी अंतर आम्हाला उलट्या दिशेला कापाव लागल आणि आम्ही सदाशिवगडाजवळ पोहोचलो.तिथे पोहोचल्यावर नीट पाहिल्यावर कळल काळी नदीवरील पूल संपल्यावर रस्त्याच्या उजव्या बाजूबरोबरच डाव्या बाजूलाही छोटा डोंगर आहे.आम्हाला नंतर कळल कारवार गोव्याला जोडण्यासाठी, कारवारच्या विकासासाठी  सदाशिवगडाची आहुती दिली गेली आहे.आम्हाला दिसलेला डाव्या बाजूचा डोंगरही सदाशिवगडाचाच भाग आहे.सदाशिवगड कापून तो रस्ता तयार केला गेला  आहे .  😦

गडावर जायचा आमचा मार्ग ... 🙂

आम्ही सदाशिवगडाजवळ तर पोहोचलो पण वर जायचा रस्ता काही आम्हाला सापडत नव्हता.तशी एक पायवाट तिथे होती पण ती गडाला समांतर अशी दुरवर कुठे तरी जात होती.आमच तिथे चर्चासत्र सुरु झाल.चर्चेअंती ज्याप्रमाणे सकाळपासून कोणी आपल्याला ह्या किल्ल्याबद्दल काही सांगितलं नाही त्यावरून हा किल्ल्यावर कोणी जात नसाव, पण आपण माघार घ्यायची नाही,काहीही करून वर पोहोचायचच अस ठरलं.मग काय काट्याकुट्यातून मार्ग  काढत ‘हर हर महादेव’ म्हणत आम्ही वर चढायला सुरुवात केली.अनेक ठिकाणी अडखळत एकमेकांना हात देत आम्ही पुढे पुढे जात होतो.दोन तीन वेळा तर अस वाटलं कि नाही इथून तर पुढे जाता येणार नाही. परत मागे फिरायचा विचारही आमच्या मनाला स्पर्शून गेला. पण ते होणे नाही ,वेळप्रसंगी आम्ही भूमातेला साष्टांग दंडवत घातला,पण मागे हटलो नाही.शिवरायांच्या महाराष्ट्राच्या भूमीतील लेकर होतो आम्ही.. हातावर वैगेरे थोडस खरचडल होत पण आम्हाला त्याची पर्वा नव्हती  कोणीही जात नसलेल्या एका पडीक किल्ल्याला भेटीला  आम्ही चाललो होतो.एक वेगळीच विरश्री अंगात संचारली होती. 🙂

गडावर जायचा खरा मार्ग आणि प्रवेशद्वार ...

तटबंदी

गडावरील तोफ

कसेबसे वर पोहोचल्यावर आम्हाला गडाची तटबंदी दिसली आमच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.जणू काही आम्ही तो गड लढाई करून जिंकून घेतला होता .पण ..पण तेवढ्यात तिथे आम्हाला चारपाच माणस दिसली .त्यांच्याकडून कळल कि खाली जी पायवाट आहे तिनेच गडाला वळसा घालून दुसर्या बाजूने वर अगदी गाडी येईल असा रस्ता आहे. 🙂 आमचे चेहरे तेव्हा नक्कीच पाहण्यासारखे झाले होते पण क्षणार्धातच आम्ही एकमेकांकडे बघून इतके हसलो कि विचारू नका.वरती फिरत असतानाच गडावर बरोबर मध्यभागी छानशी इमारत दिसली.आम्हाला वाटलं ते म्युझिअम वैगेरे असेल.आत शिरल्यावर कळल ते एक हॉटेल होत.पण तिथे काही खायची इच्छा झाली नाही कारण त्या हॉटेलने गडाच्या नैसर्गिक ‘लुक’ ची पूर्ण वाट लावून टाकली होती.आम्ही लगेचच तिथून बाहेर पडलो आणि गडाचा परिसर न्याहाळू लागलो.किल्ल्यांच प्रवेशद्वार , तटबंदी ,तोफा   असे गडाचे काही अवशेष तसे  गडावर अजून बाकी आहेत.गडावर अनेक झाडांवर कोणीतरी चांगलच कोरीव काम केलेल आहे. गडावरून काळी नदीवरील पुलाच दृश्य अगदी ‘क्लास ‘ वाटत होत. तसेच हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत वसलेलं कारवार शहर , काळी नदी आणि अरबी समुद्राचा संगमही गडावरून पाहायला  मिळतो. हे सगळ पाहतांना गडाच भौगोलिक महत्व आपल्या लगेच लक्षात येते.

हेच ते गडावरील हॉटेल ....

काळी नदी आणि अरबी समुद्र संगम ....

हाच तो काळी नदीवरील पूल...

बराच वेळ गडावर भटकंती केल्यावर आम्ही उतरण्यासाठी आम्ही आमची  नैसर्गिक वाट सोडून  ती कृत्रिम वाट पकडली.थोडस खाली उतरल्यावर उजव्या बाजूला दुर्गादेवीच जून मंदिर लागल.आम्हाला इतका वेळ पूर्ण गड फिरूनही  त्याबद्दल काही माहिती मिळाली नव्हती पण ह्या मंदिरात गेल्यावर आम्हाला तेथील पुजारयांकडून बरीच माहिती मिळाली.सकाळपासून आम्हाला जितकी लोक भेटली ती सगळीच कोकणी बोलणारी होती त्यामुळे थोडीशी अडचण असली तरी संभाषण होत होत.पण मंदिरातल्या पुजाऱ्यांना मात्र आपण बोलतो तशीच मराठी भाषा अवगत होती.त्यांचा स्वभाव ही खूप चांगला होता.त्यांनी विविध माहिती सांगताना ब्रिटिशांनी तिथे लावलेल त्यांच राजचिन्हही दाखवल. सकाळी ह्या गडाच नाव ऐकल्यापासून मला ह्या गडाचे नाव सदाशिवरावभाऊंच्या नावावरून पडले असावे असे वाटत होते पण हे नाव  सौंधेकर राजा बसवलिंग ह्याने आपल्या वडिलांच्या नावावरून ठेवल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले.त्यानंतर त्यांनी आम्हाला एक अशी माहिती सांगितली कि ज्यामुळे आमची छाती अभिमानाने फुलल्याशिवाय राहिली नाही.त्यांनी आम्हाला सांगितलं कि  छत्रपती शिवाजी महाराजांनी काळी नदी ओलांडून दोन वेळा इथे भेट दिली आहे.त्यांनी तशी नोंद केलेला फलकही आम्हाला दाखवला.खरच स्वराज्यासाठी महाराज कुठे कुठे जात होते किती कष्ट घेत होते. हे कळल्यावर सकाळसारखी वीरश्री परत एकदा  अंगात संचारली.खरच काय जादू आहे ना ह्या नावात… त्याच आवेशात दुर्गादेवीच दर्शन घेऊन आम्ही सदाशिवगडाचा निरोप घेतला.

दुर्गादेवीच मंदिर ...

आम्हाला बरीच माहिती पुरवणारे पुजारी (मधले)

ब्रिटीशांच राजचिन्ह

मंदिरातील फलक ...

सौंधेकर,पोर्तुगीज,मराठा,ब्रिटीश आणि टिपू सुलतान अशी अनेक सत्तांतर अनुभवलेल्या भौगोलिक स्थानामुळे  एके काळी अतिशय महत्वाच्या मानल्या गेलेल्या ह्या सदाशिवगडाने काळाबरोबर पुढे जाऊन  कारवारच्या विकासासाठी जे बलिदान दिल आहे त्याला तोड नाही….. पण  इतक करून त्याच्या नशिबी काय तर  ते वर असलेल हॉटेल….

[ माझ हे दक्षिणायन ह्यावर्षीच जानेवारीत झाल होत पण नेहमीच्याच  कंटाळ्यामुळे त्यावर लिहण राहून गेल होत.पण आता प्रकाश नारायण संत ह्यांनी रेखाटलेल्या लंपनच्या विश्वात रमलेलो असतांना,  त्यातीलच ‘झुंबर ‘ ह्या पुस्तकात ‘ज्यामीन ‘ ह्या प्रकरणात सदाशिवगड गावाचा उल्लेख आला आणि मग  ह्या आठवणी जाग्या झाल्या …]

दवबिंदुच्या समस्त वाचकांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा …!!!

16 thoughts on “सदाशिवगड …

 1. very beautiful photos. Thanks for sharing I LOVE THIS POST!!! I feel like I know a lot about you after seeing these pictures!

  India is a land of many festivals, known global for its traditions, rituals, fairs and festivals. A few snaps dont belong to India, there’s much more to India than this…!!!.
  visit here for India

 2. बरीच नवी माहिती मिळाली. आता न कंटाळता दक्षिणायानाचे पुढचे अनुभवही लिहा 🙂 विजयादशमीचा संकल्प करा तसा!!

 3. भाऽऽऽऽरी च्या भारीऽऽऽऽ झालाय हो तुमचा ब्लॉग देवेन!!! मस्तच! खूप आवडला! ही पोस्टही सुपर्ब! मी गेल्या मे मधे सिरसी, गोकर्ण महाबळेश्वर, मुर्डेश्वर असा दौरा केला होता! त्या दौरय़ाच्या आठवणी ताज्या झाल्या! आभार!

 4. लेख मस्तच…
  अन “पण इतक करून त्याच्या नशिबी काय तर ते वर असलेल हॉटेल…” हे सत्य खूपच बोचणारं…सगळीकडेच पाहायला मिळणारं…
  कधी जागे होणार आपण… आहे ती संपदा आता आहे त्या स्थितीत जरी टिकवली तरी खूप असे वाटते… पण सगळ्याच स्तरावर अनास्था.. 😦

  भक्ती

 5. वाह देव….. एकदम मस्त माहिती दिलीस…. तुझ्या लिखाणाची जी शैली आहे ना ती खूप ओघवती आहे….
  त्यामुळे कुठेही थांबायला होत नाही… आणि फोटो तर चार चंद्र लावतात… भटकंती अशीच सुरू राहूदे..
  आमच्या शुभेच्छा आहेतच…! 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s