मॅड


लहानपणापासून माझा सर्वात आवडता छंद आहे तो पुस्तक वाचण्याचा.हलकफुलक्या कथां असलेली पुस्तक ,ऐतिहासिक कादंबऱ्या,धीरगंभीर वास्तववादी पुस्तक,माहितीपर पुस्तक अश्या अनेक प्रकारच्या पुस्तकांचा मी आजवर खूप आस्वाद घेतला आहे.लहानपणी माझे मित्र मला नेहमी म्हणायचे, आम्हाला ही शाळेची पुस्तकच वाचायलाच जीवावर येते आणि तू इतकी जाडजाड पुस्तक कशी वाचत बसतो.मॅडच होत ते त्यांना काय माहीत कि खरतर पुस्तक वाचायला कुठे लागतात ती मनापासून उघडली कि  स्वत:हूनच ती आपल्याला सगळ सांगत राहतात.आपल्यासमोर सगळी दृश्य जिवंतपणे उभी करतात. तर अश्या ह्या माझ्या पुस्तकवेड्याच्या मनात एक कोपरा खास वपुंच्या पुस्तकांसाठी निरंतर राखून ठेवलेला आहे आणि तसाच एक वेगळा कोपरा ‘शाळा’ व ‘दुनियादारी’ ह्या पुस्तकांसाठी राखून ठेवलेला होता.गेली कितातरी वर्ष ही दोन पुस्तक त्या कोपरयात गुण्यागोविंदाने राज्य करीत होती.

पण काही दिवसापूर्वीच त्यांना त्यांच राज्य ‘लंप्या’ बरोबर वाटून घ्याव लागल. कोण लंप्या ? तुमच्यापैकी अनेक जण कदाचित ओळखत असाल ह्या लंप्याला पण महिन्याभरापूर्वी पर्यंत मी तरी ह्याला ओळखत नव्हतो.एकाच दिवशी मनाली (स्वच्छंदी) आणि रश्मी (मनस्वी) ह्या दोघींच्या ब्लॉगवर सर्वप्रथम ह्या मॅड लंप्याची मॅड ओळख झाली.मग काही दिवसातच मी हळुवारच लंपनच्या मॅड भावविश्वात प्रवेश केला आणि मग काय मला तो एकदम   ‘बेष्ट’च वाटला.आणि शेवटी ते काय म्हणतात ना त्यातली गत लंप्याने थोड्याश्या  मॅड असलेल्या मला पूर्ण  मॅड केल,’कम्प्लेट’ मॅड… अश्या त्या मॅड लंप्याची मी तुम्हाला इथे ओळख करून देणार आहे. साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण….

तर  ‘लंप्या’ म्हणजेच ‘लंपन’ हा प्रकाश नारायण संत ह्यांच्या कथासंग्रहामधील नायक – कर्नाटकातील कारवार नजीकच्या एका छोट्याश्या गावात आपल्या आजी-आजोबांबरोबर राहणारा अगदी कोवळ्या वयाचा एक शाळकरी मुलगा.त्याच स्वत:च एक वेगळच जग आहे. आजूबाजूचे सगळे सजीव-निर्जीव घटक त्याला  ह्या ना त्या कारणाने  मॅड वाटतात. अनेक छोट्या छोट्या गोष्टीचं निरीक्षण करायची त्याची मॅड सवय आहे.एकदा का  हात डोक्यामागं घेऊन तो एखाद्या गोष्टीकडे पाहू लागला कि मग त्याला वेळ-काळाचे काही भान राहत नाही. त्याच्या डोक्यातील चक्र नेहमी चालूच.प्रत्येक गोष्टीचा तो एकोणविसशे  वेळा विचार करतो. त्या निरीक्षणावरून तो अनेक भन्नाट  ‘लॉजिक’  लावतो.छान छान गाणी गायची त्याला भारी हौस.वाचनाची तर त्याला  प्रचंड आवड, अगदी पुस्तकवेडा . त्याला नेहमी दहा बारा तासांऐवजी खरं तर एकोणीस-तास झोपावस वाटत. कधीतरी आईपासून दूर राहत असल्याने तो थोडासा हळवाही होतो.त्याला त्याची शाळा  खूप आवडत असते कारण ह्याच शाळेत त्याच्या आईने शिक्षण घेतलेलं असत.त्याची एक मैत्रीणही आहे सुमी नावाची ,का कोण जाणे पण हिची नुसती आठवण आली तरी त्याला पोटात काहीतरी गडबड झाल्यासारख वाटते.तर असा आहे हा आमचा लंप्या.

हा निरागस,अल्लड,आपली अचाट कल्पनाशक्ती वापरणारा आणि थोडासा संवेदनशील लंपू आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातो. त्याची आजी-आजोबा, आ‌ई-बाबा,सुमी, बाबूराव, मनी आणि लहान बाळ बिट्ट्या, कणबर्गी गंग्या, टुकण्या ,संप्या, परळ्या, यमज्या, हणब्या, एशी, केबी,वंटमुरीकर देसाईंचा बोका, ‘लक्ष्मी’ झाड, तिथलं तळं, ‘हंपायर’ जंब्या कटकोळ,लंप्याचा गामा पैलवान खेकडा,ड्रिलचे मास्तर हत्तंगडी,आचरेकरबाई,म्हापसेकर सर ,सायकलचं  दुकान चालवणारा टी. जी.  कासारगोड ,नकादुतले खंडागळे मामा,सोन्याबापू,तेलसंगी,हिंडलगेकर अण्णा,साउथ इंडियन तुंगभद्रा,सांबप्रसादच घर,दुंडाप्पा हत्तरगीच्या टांगा ,लंपूला त्याच्यासारखाच एकटा वाटणारा गुंडीमठ रोड अश्या कितीतरी जणांची तो त्याच्या भावविश्वातून ओळख करून देतो.आणि ही सगळी सजीव-निर्जीव पात्र आपल्यासमोर जिवंत उभी राहतात.आपण एकवीसशे त्रेचाळीस वेळा सगळ परत परत वाचत राहतो.लंपूही आपला हात धरून आपल्याला सगळीकडे हिंडवत राहतो.हळूहळू काळ-वेळेचे, जागेचे, वयाचे सगळे बंध निखळून पडतात. त्याच्याबरोबर मॅडसारख भटकत असताना तो  आपला खास कि काय तसा मित्र होऊन जातो.अनेक धागे जुळत जातात. आणि मग अचानक कधीतरी आपणच लंप्या होऊन जातो.

लंप्याला आपल्याशी अशा प्रकारे जोडण्याचे सगळे श्रेय प्रकाश नारायण संतांच्या अप्रतिम लेखनशैलीला जाते.त्यांचे वडिल उत्तम ललितलेखक होते तर त्यांच्या आई इंदिरा संत ह्यांच्याबद्दल काही वेगळ सांगायला नको.वयाच्या सतराव्या वर्षीच ललित लेखनास सुरुवात करणाऱ्या प्रकाश नारायण संतांनी ह्या घराण्याला अजून एका उंचीवर नेऊन ठेवले.त्यांनी अडनिड वयातील मुलांच्या भावविश्वाचे अगदी  सूक्ष्म निरीक्षण केले असल्याचा साक्षात्कार ही पुस्तक वाचतांना आपल्याला वारंवार होतो.कथेची उत्तम बांधणी ,अगदी जिवंत वाटणारी वर्णन ,साधी सरळ भाषा, कानडी वळणाच्या मराठी बोलभाषेचा जागोजागी  छान वापर, ह्या त्यांच्या ह्या लेखनातील अगदी जमेच्या बाजू .ते उत्तम चित्रकारही होते. त्यांच्या पहिल्या तीन पुस्तकांसाठी त्यांनी स्वतःच रेखाटने केली होती. ‘मॅड‘ हे मॅड विशेषण कशासाठीही वापरणं,आपल्याला अगदी त्या वयात घेऊन जाणारया शब्दरचना ,वेगवेगळ्या संख्यांचा वाक्यातला उपयोग, आडवयातील मुलाच्या नजरेतून विविध गोष्टी मांडण्याच प्रचंड कौशल्य,लंपनच वेगवेगळया लोकांबरोबर जुळवलेले हळुवार ऋणानुबंध सगळ सगळ आपल्यावर एक वेगळीच जादू करते.मी ह्याचवर्षी कारवार भागाला भेट दिलेली असल्याने ह्या पुस्तकातील अनेक वर्णनांना चांगलाच ‘रिलेट’ करू शकलो.

गोट्या खेळतांनाचा प्रकाश नारायण संतांनी सांगितलेला भन्नाट मंत्र इथे टाकावासा वाटतोय ….

पंचापांडू – सह्यादांडू – सप्तपोपडे – अष्ट जिंकिले – नऊनऊ किल्ले – दश्शा पेडा – अकलकराठा बाळू मराठा – तिरंगी सोटा – चौदा लंगोटा – पंधराशी परिवळ – सोळी घरिवल – सतरम सीते – अठरम गरुडे – एकोणीस च्यकच्यक – वीसा पकपक – एकवीस कात्री – बावीस रात्री – तेवीस त्रिकाम फुल – चोवीस चोर – पंचवीस मोर

वनवास, शारदा संगीत, पंखा, झुंबर ह्या चार पुस्तकातून लंपनच भावविश्व  तरलपणे उलगडून दाखवतांना ते आपल्याला मनमुराद आनंद देतात.ही चार पुस्तक म्हणजे एक आगळावेगळा खजिनाच आहे.ह्या चार पुस्तकांचं वैशिष्ट्य म्हणजे ह्यातल कोणतेही एक पुस्तक वाचल तरी ते अपूर्ण वाटत नाही.पण एकदा का तुम्ही ह्या लंपनच्या भावविश्वात शिरलात कि चारही पुस्तक कशीही मिळवून तुम्ही ती मॅडसारखी वाचून काढेपर्यंत किंवा त्यानंतरही तुम्ही लंपनला सोडत नाहीत आणि तो ही तुम्हाला सोडत नाही. ही सगळी पुस्तक वाचतांना आपल्याला निखळ आनंद  देतात पण त्याच बरोबर अनेक कथांच्या शेवटी घडलेल्या घटना मनाला चटका लावून जातात.’झुंबर’ मधील ‘स्पर्श’ ह्या कथेत आपल्या वडिलांच्या मृत्युची जाणीव झालेला लंपन  तर अंगावर काटा आणतो.खूप हुरहूर लावून जाते ती कथा. लंपनच्या आयुष्यातील तरूणपणाच्या दिवसांवर संतांना एक कादंबरी लिहायाची होती पण ‘झुंबर’ हा कथासंग्रह प्रकाशित होण्यापूर्वीच त्यांच निधन झाल, आणि मराठी रसिक एका अतिशय चांगल्या कादंबरीला मुकला अस मला वाटते.खरच संतांचा तरुणपणाचा लंपन कसा असता… ह्याच उत्तर कधीच मिळणार नाही ह्याची खात्री असूनही  ह्याबद्दल  कधीकधी खूप विचार करतो मी …

लहानपणापासून सत्याण्णव हजार चारशे त्रेचाळीस  पुस्तक वाचलेली असतांना  इतका चांगला कथासंग्रह  वाचनात  कसा आला नाही ह्याच मला खूप आश्चर्य वाटलं.आणि मला लंप्याची ती ओळ आठवली, “माझ्यासारखा मॅड शोधुनही सापडणार नाही. असला मॅड म्हणजे दहा गुणिले दहा भागिले शंभर! मी. एकच!”.  मग माझ्यासारखे अजूनही काही पुस्तकवेडे महाभाग असतील ज्यांची लंप्याशी ओळख झालेली नसेल  अस वाटलं आणि  त्यांच्यासाठी हा लेखप्रपंच.खरच कधीतरी अगदी मॅड सारखे काहीतरी वाचत सुटाव अस वाटल  तर लंपनच्या मॅड  भावविश्वात जरूर प्रवेश करा … एक वेगळाच मंतरलेला मॅड अनुभव तुम्हाला मिळेल…

“लंप्याच्या भाषेत सांगायच म्हणजे, ‘एकदा नाही, दोनदा नाही तर अठ्ठावीसशे तीस वेळा जरी ह्या कथा ‘ मॅड सारख्या वाचल्या’ तरी त्या ताज्याच वाटतील. एक निराळ्याच शैलीचा आणि वाचकाशी चट्कन संवाद साधून त्यालाही लंप्याच्या वयाचा करून टाकणारा कथासंग्रह मराठीत येतो आहे ह्या आनंदात मी आहे…..”- इति पुल.

 

Advertisements

41 thoughts on “मॅड

 1. foxampoor of mango lady u me bread… athavla ata.
  beshtch ahe ekdum.. dhanyavad! lampyakade amachahi ek kopara gahan ahe ani shala ni duniyadarikade pan.. ani ashcharya mhanaje ajun 999 kopare shillakach ahet.. kadhi bhartil shree shankaralach mahit!

  • शतानंदजी, दवबिंदुवर स्वागत आणि आवर्जून दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आभार …
   हो अगदी अगदी बेष्ट अस आहे ते सगळच … 🙂
   भरतील कोपरे हळूहळू… शुभेच्छा… 🙂

 2. शाळा आणि दुनियादारी सगळ्यांच्याच टॉपलिस्ट वर आहेत वाटतं…
  मी विकत घेतलेली ही पहिली दोन पुस्तके!
  एका वेळी चार पुस्तकांना जागा नाही मिळायची कपाटात त्यापेक्षा एक-एक घेऊन येईन…
  म्हणजे आवडायला लागले कि बाकीचे तीन आपोआप येतील मागे-मागे 🙂

 3. देवा बरं झालं ही ओळख करून दिलीस ते… तू लिहीले आहेस उत्तम अगदी… पुस्तकं मिळवायला हवीत… आई-बाबा येताहेत पुढच्या महिन्यात इथे, त्यांना लिस्ट द्यावी पुस्तकांची म्हणतेय 🙂 … अजून काही असतील रेकमंडेड तर सुचव बघू पटापट!!!

  • वाचन कमी झालाय ग आता …चालू असत अस अधूनमधून … प्रकाश नारायण संतांनी वेगळ्याच विश्वात नेऊन ठेवलं म्हणून हा लेखप्रपंच ग … मेल करीन तुला पुस्तकांची नाव आठवून … 🙂

 4. पुस्तकांच्या किंमतीच्या दुप्पट-तिप्पट शिपिंग पडत असल्याने मागवली नाहीयेत ही अजून :(( लवकरात लवकर वाचायची आहेत. ओळख तर तू जामच भारी करून दिली आहेस !! बघू कधी योग येतो ते 🙂

  • येऊ दे योग लवकर…. वेगळीच आणि अतिशय सुंदर शैली आहे संतांची… अरे लंप्याची ओळख झाल्यावर त्याला मी खूप कधीपासून ओळखतो आहे अस जाणवलं…त्यामुळे इथे त्याची ओळख करून देण जास्त सोप गेल … 🙂

 5. देवेन मस्त लिहिलयस रे…काहीच माहित नव्हत मला लंपनबद्दल पण आता जाम वाचावसं वाटतय…हेरंबचा आणि माझा प्रोब्लेमो सेम हाय…तेव्हा आता माहित नाही केव्हा मिळेल पण वाचणार नक्की..
  हाबार्स रे….:)

 6. 🙂 🙂 हा लंप्या पठ्ठ्या सगळ्यांच्या मनात अगदी घर करून बसलाय… मिलिंद बोकीलांचं ‘शाळा’ आणि सुहास शिरवळकरांचं ‘दुनियादारी’ या पुस्तकांनंतर मनापासून भावलेलं हे आणखी एक पुस्तक… इतकं की त्याच्यावर कितीही लिहिलं तरी ते अपुरंच पडणारेय हे माहित असूनही त्यावर लिहिण्याचा मोह काही आवरला नाही.
  असं वाटतंय की हेच पुस्तक पुन्हा नव्याने वाचलं तर अजून काहीतरी वेगळं सापडेल… बघूया प्रयत्न करून…!

  • हो ग तो पठ्ठ्या आहेच तसा…. नाव सापडल्यावर जरूर कळव… आणि आभार्स तुझ्या आणि मनालीच्या ब्लॉगमुळेच ह्या पठ्ठ्याशी गाठ पडली त्याबद्दल… 🙂

 7. देवेन ! 🙂
  ….. लहानपणापासून सत्याण्णव हजार चारशे त्रेचाळीस पुस्तक वाचलेली असतांना इतका चांगला कथासंग्रह वाचनात कसा आला नाही ह्याच मला खूप आश्चर्य वाटलं.आणि मला लंप्याची ती ओळ आठवली, “माझ्यासारखा मॅड शोधुनही सापडणार नाही. असला मॅड म्हणजे दहा गुणिले दहा भागिले शंभर! मी. एकच!”. ++++ १
  – हे १०० % मलाही लागू होते… मस्त लिहीले आहेस … वनवास , शारदासंगीत आणि पंखा वाचलीत मी …. फक्त झूंबर बाकी आहे….. मिळवतो आता…. !
  आणखी एक….. मनालीच्या लेखामूळेच मलाही लंपन सापडला… 😀

 8. किती छान लिहिले आहेस देवेन… 🙂

  माझ्या बाबांनी मला जेव्हा ह्या पुस्तकांबद्दल पहिल्यांदा सांगितले आणि सर्व पुस्तके मला भेट म्हणून दिली तेव्हा आनंद होत होता पण जेव्हा ती सर्व वाचली आणि नुसतीच वाचली नाहीत तर त्यातली ३ वाचून दाखवली माझ्या लेकीला तेव्हा त्या पुस्तकातली खरी धमाल कळली….सर्व वयातल्या वाचकांना आपलेसे करून घेतले आहे ह्या पुस्तकांनी.श्री संत ह्यांचे लेखन जितके हसवते तितके डोळ्यात पाणी पण आणते. लंपनची इतकी छान दोस्ती होते कि तू म्हणल्या प्रमाणे पुस्तक वाचून झाले तरी लंप्या पाठ सोडत नाही.परत परत वाचावी अशी हि सर्व पुस्तके खरच संग्रही ठेवण्या योग्य आहेत…ह्या पुस्तकांबद्दल सर्वांना माहित व्हावे म्हणून तुझा लिहिलेला हा लेख खरच आवडला.
  सर्वांच्या बालपणात भेटलेला एक खेळगडी असा हा लंप्या ह्याची परत एकदा ओळख व्हावी म्हणून आणि आपण सर्वांनी परत एकदा लहान होऊन जावे म्हणून सर्व मराठी भाषिक वाचकांनी नक्कीच हि पुस्तके वाचावीत.

  मी तर fan आहे ह्या पुस्तकांची ….. 🙂

  • धन्स ग … 🙂

   आता मोठ झाल्यावर तर जास्तच आपलीशी वाटतात जुन्या आठवणींमुळे … संताच्या शैलीला खरच तोड नाही… खरच सर्व मराठी भाषिक वाचकांनी नक्कीच हि पुस्तके वाचावीत…पण आपल दुर्दैव अस कि आपल्याला संतांच्या मनातला तरुणपणाचा लंपन कळू शकला नाहीये… 😦
   असो मला ह्या लंपनने मॅड केल आणि त्या मॅडनेस मध्येच हे सर्व लिहून झाल… 🙂

 9. मॅड मॅड मॅड !!!! आयला मी अजून ह्या मॅड दोस्ताला भेटलोच नाही ! 😦 आता एकोणवीसशेवीस वेळा चारही वाचून काढतो !!! एकदम मॅड लेख झालाय आणि आता लम्प्याला भेटायला मी पण मॅड झालोय..

 10. हो रे …. ह्या लंपन ने नुसतं “म्याड म्याड ” करून ठेवलंय …… मी पण एकोणवीसशेवीस वेळा फ्यान आहे त्याची…!! 🙂

 11. लंपन माझाही खूप फेव्हरीट आहे. प्र. नां. नी त्याच्या वागण्या-बोलाण्याचे, आजूबाजूच्या टिपिकल कन्नड लोकांचे, वातावरणाचे इतके छान वर्णन केले आहे की आपण मॅडसारखं लंपनचा हात धरून त्याच्या मागे जाऊ लागतो. ‘शारदासंगीत ’ माझं अत्यंssssत आवडतं पुस्तक आहे.

 12. शाळा, दुनियादारी आणि ‘लम्पन’.. एकदम मनासारखं वर्गीकरण केलंस.
  मी पण एक पुस्तक वाचलं, बहुदा ‘झुंबर’ आणि उरलेली तिन्ही ‘मॅड’ सारखी वाचून काढली.
  मॅड आणि ‘सणसणीत’ सुद्धा, बरोबर ना ?

टिप्पण्या बंद आहेत.