किल्ले रोहीडा उर्फ विचित्रगड उर्फ बिनीचा किल्ला …


पाउसाची सुरुवात थोडी फार का होईना पण झालेली होती. अवघा निसर्ग हिरवा शालू पांघरून नटायला सज्ज झालेला होता.मग आम्हा भटक्यांना ट्रेकचे वेध नाही लागले तर नवलच.पाय थिरकू लागले होते.त्यातच २३-२४ हरिश्चंद्रगड मोहिमेबद्दल दीपक आणि सुझेचा मेल इनबॉक्समध्ये येऊन थडकला. मग काय लागलीच ‘कन्फर्मेशन’ देऊन टाकल.गेल्या वर्षी मान्सून ट्रेकची सुरुवात महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई गाठत केली होती  पण पुढे वैयक्तिक कारणांमुळे हवे तसे ट्रेक करता आले नाही.बाकी माझी भटकंती तशी दर काही दिवसांनी कुठे ना कुठे चालू होतीच.पण नेहमीच्या गैंग बरोबर ट्रेक करून बरेच दिवस लोटले होते. त्यामुळे मी खूप आनंदित होतो कारण आपल्या गैंग बरोबर ट्रेकची मजा काही औरच असते.

उंदेरी-खांदेरी वेळी थोड्याश्या झोपेमुळे गाडी चुकली आणि  त्यामुळे त्या  मोहिमेस मुकाव लागल होत,  म्हणून ह्यावेळी एक आधीची गाडी पकडून दादर गाठल.तिथे पोहोचल्यावर अर्चनाकडून कळल कि हरिश्चंद्रगडला वेळ पुरणार नसल्याने पुण्याहून ५० किमी अंतरावरील  रोहीडा सर करायच ठरलं आहे.तिथून मग आम्ही पनवेलला दिपकच्या घरी गेलो.तिथे मस्त घावण आणि चिकन अशी  खाशी सोय दिपकच्या कुटुंबियांनी केली होती.खरच जेवण इतक छान होत कि आका ,सुझे आणि मी  तर अक्षरशः त्यावर तुटून पडलो. किती खाल ते जेवून उठल्यावर कळल आणि आम्हाला चांगलीच ‘लक्षपावली’ करण भाग पडल.अश्या प्रकारे तिथे पोटोबांना तुडुंब तृप्त करून आम्ही आमच्या लक्ष्याकडे कुच केल.

सकाळी सुमारे ४ च्या सुमारास आम्ही पुणे बस स्थानकाजवळ आमची गाडी थांबवली.रात्रीच सगळ जेवण गप्पागोष्टींमध्ये जिरून गेल होत आणि आता त्यावर उताराही हवा होता मग तिथे मस्त गरमागरम  चहा आणि क्रीमरोलचा स्वाद घेऊन भोरच्या दिशेने निघालो.भोरहून दक्षिणेला सुमारे १० किमी अंतरावर आम्हाला बाजारवाडी गाव लागल.दरम्यान आकाला एलियन,भूत वैगेरे दाखवून झाल होत.  🙂  अजून उजाडायच असल्याने आणि आम्हाला इथवर गाडीत सुखरूप आणणाऱ्या महेशचा विचार करून तिथे थोड्यावेळ थांबायचं ठरल.मग तिथेच बाजूला असलेल्या शाळेच्या ओटीवर सगळे आपले देह भूदेवीला समांतर करून गुपचूप  निद्रादेवीला शरण गेले.

सुझे ,धुंडी आणि मी मात्र तिथे झोपलो नाही.तिथेच आजूबाजूला फिरत प्रात:कालचा  निसर्ग  डोळे भरून पाहत होतो आणि क्लीकाक्लीकी करत होतो.काही वेळाने रात्रीची काळी चादर अंगावरून बाजूला सारून सर्व दिशा हळूहळू प्रकाशमय होऊ लागल्या.मग आम्ही आमच्या सोबत्यांची झोप मोडण्याच सत्कार्य केल आणि पाऊणे सातच्या सुमारास  गडावर चढाई सुरु केली.रोहीडयाच  नाव ऐकलेल असल तरी त्याचा  इतिहास आठवत नव्हता.मग सुझेनी थोडक्यात रोहीडयाची ओळख करून दिली.गडावर चढायला अगदी  स्वच्छ मार्ग आहे.जंगलाचा अभाव असल्याने  सुरुवातीपासूनच गडमाथा आपल्या नजरेसमोर राहतो, त्यामुळे चढाव असला तरी गडमाथा समोर दिसत असल्याने मानसिक थकवा येत नाही .

थोडीशी चढाई झाल्यावर एक ध्यानस्थ सर्पमहाराज  आमच्या दृष्टीस पडले.आम्ही सगळे त्याच्या भोवती गोळा होऊन गलबला करू लागलो तरी त्यांच लक्ष थोडही विचलित झाल नाही.मग ३-४ मिनिटांनंतर  ते सर्पराज मृत असल्याच घोषित करून आम्ही  बिनधास्त त्यांच निरीक्षण करतांना अचानक त्यांची तंद्री भंग पावली व एका क्षणासाठी सर्वांना जोरदार झटका देत  ते सळसळत बाजूला निघून गेले.अशीच मजल दरमजल करत अधूनमधून क्लीकाक्लीकी करत आम्ही वर पोहोचलो.पहिल्या दरवाज्याच्या चौकटीवर गणेशपट्टी पाहावयास मिळते.येथून काही पायऱ्या चढल्यावर दुसरा दरवाजा लागतो त्यातून आत शिरल्यावर उजव्या बाजूला पाण्याचे भुयारी टाके आहे.ह्यात बाराही महिने पाणी असल्याच सांगितलं जाते.हे पाणी पिण्यायोग्य आहे अशी माहिती आंतरजालावर सगळीकडे उपलब्ध असली तरी आम्हास ते पिण्यासाठी तितकस योग्य वाटलं नाही.

मग तिथून थोडस चढल्यावर आम्ही तिसर्या दरवाज्याजवळ पोहोचलो.हा पहिल्या दोन दरवाजांच्या मानाने भक्कम आहे तसाच ह्यावर बरचस कोरीव काम केल्याचाही आढळून येते.येथे दोनही बाजूंस गजमुख  कोरण्यात आले आहे. तसेच ह्यावर एक शिलालेखही पाहावयास मिळतो.ह्या दरवाज्यातून आत शिरल्यावर आपण  गडावर  प्रवेश करतो.तिथे डाव्या बाजूला रोहिडेश्वराचे मंदिर आहे.गडावर एकूण सहा बुरुज आहेत तसेच उत्तरेकडील वाघजईच्या बुरुजासमोर एकाच ठिकाणी पाण्याची पाच सहा टाक पाहावयास मिळतात.जवळ जवळ सगळेच बुरुज भक्कम अवस्थेत असून ताठ मानेने उभे आहेत.रमत गमत चढूनही सुमारे सव्वा आठलाच आम्ही गडमाथ्यावर पोहोचलो होतो.त्यामुळे थोडीशी खादाडी उरकून आम्ही गडावर मनसोक्त भटकलो.

This slideshow requires JavaScript.

फत्ते बुरुजावरून दूर अंतरावर आम्हाला एक मंदीर दिसले व तेच रायरेश्वराचे मंदिर समजून आम्ही तिथे जायचा रस्ता शोधू लागलो.शेवटी पहिल्या दरवाज्याच्या बाहेर डाव्या बाजूला एक वाट त्या मंदिराकडे जात असल्याच दिसली. मग आम्ही त्या वाटेचा मागोवा घेत रोहीड्याचा निरोप घेतला.दरम्यान मीमराठीवाला  राज जैन आणि मंडळीची भेट झाली.रोहीडा चढतांना जरी सरळ चढाव असला तरी ह्या मंदिराकडे जातांना मात्र अतिशय निमुळती वाट होती व दुसऱ्या बाजूला दरी,अनेक ठिकाणी तर आम्हाला साखळीतंत्र वापरून पुढे कुच कराव लागल.पण मंदिराच्या ओढीने आम्ही खुपच कमी वेळात तिथे पोहोचलो .तिथे गेल्यावर ते एका देवीच मंदीर असल्याच आमच्या लक्षात आल.खरतर ह्या मंदिराकडील प्रवासाने आजच्या ट्रेकमध्ये जान ओतली होती कारण रोहीडा आम्ही उन पडायच्या आताच सर केला होता त्यामुळे थकवा असा अजिबात नव्हता.ह्या प्रवासाने आजच्या ट्रेकमध्ये बरच ‘मोमेंटम’ आणल होत.

शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना सुरुवातीला जे मोजके गड जिंकले होते त्यापैकीच हा एक रोहीडा.शिवाजी महाराजांनी बांदलांकडून हा जिंकून घेतला. बांदल पडल्यावर त्यांचे मुख्य कारभारी म्हणजे बाजीप्रभू देशपांडे हिंमतीने महाराजांना सामोरे गेले. महाराजांनी मग त्यांना विश्वासात घेऊन स्वराज्यात सामील करून घेतले. अश्या प्रकारे वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी महाराजांनी पदस्पर्श करून पावन केलेल्या आणि स्वराज्याला एक  अनमोल हिरा गवसलेल्या ठिकाणी भेट  दिल्याच्या आनंदात आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो…

अवांतर : काल दवबिंदुला तीन वर्ष पूर्ण झाली म्हणून कंटाळ्याशी चिक्कार मारामारी करून ही पोस्ट लिहिलेली आहे.

Advertisements

16 thoughts on “किल्ले रोहीडा उर्फ विचित्रगड उर्फ बिनीचा किल्ला …

  1. लई भारी… मला तो सापाचा प्रसंग आठवला की भीती आणि हसू एकदम येतं. रच्याकने तो साप विषारी असतो म्हणे 😉

  2. पोस्ट खूप आवडली. “दवबिंदु”ला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन. पुढील भटकंतीसाठी शुभेच्छ्या!!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s