ब्लॉगर्स टू ट्रेकर्स …


ह्या दवबिंदूची निर्मिती कशी झाली त्याबद्दल मी ह्याआधी इथे आपल्याला सांगितलच आहे.तर तीन वर्षापूर्वी ब्लॉगजगतात प्रवेश केला, इथले विविध ब्लॉग्स वाचू लागलो.पुस्तक वाचण्यापेक्षा हे ब्लॉग्स वाचायची आवड वाढू लागली.ब्लॉगर्सच्या लिखाणाला ठराविक अस काही बंधन नसल्याने आपण त्यातील मुद्दयांना किवां माहितीला इतर लेखनापेक्षा  जास्त ‘रिलेट’ करू शकतो. तर एकाहून एक सरस असे ब्लॉग्स वाचत,मनाला  वाटेल ते लिहित ब्लॉगविश्वात चांगलाच रमलो ,एक ब्लॉगर झालो.

अशातच एके दिवशी रोहन चौधरी (आमच्या ट्रेकिंग गैंगचा सेनापती)  ह्याच्या माझी सह्यभ्रमंती ह्या ब्लॉगशी गाठ पडली.रोहन म्हणजे बारा वर्षे  भटकंती करत सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळलेला एक पक्का भटकया आणि तितकाच इतिहासाचा गाढा अभ्यासक.त्याच्या ब्लॉगवरील ट्रेकिंगबद्दलच्या विविध पोस्टस वाचून एकदम हरखून गेलो.मग तशीच एकदा पंक्याच्या ‘भटकंती अनलिमिटेड’ ची गाठ पडली.त्याच्या ट्रेकबद्दलच्या पोस्ट्सना सुंदर छायाचित्र आणि चांगल्या लेखनशैलीची सुरेख जोड लाभली आहे.पंक्याची ‘मी भटकंती का करतो’  ही पोस्ट वाचून त्यावर ‘पोस्ट आवडली ,आम्हा आळश्यांसाठी प्रेरणादायी लेख आहे ‘ अशी प्रतिक्रिया दिल्यावर पंकजने उत्तरादाखल ‘उठा ,चालते व्हा’ अस आव्हानच दिल.ह्या दोघांमुळे माझ्यात ट्रेकिंगचा किडा वळवळू लागला.मग काय जानेवारी २०१० मध्ये  आमच्या इथे डी.ए.ई. स्पोर्टस ऍंड कल्चरल काउंसील आणि इंडीयन माउण्टेनीअरिंग फ़ाउंडेशनच्या साहाय्याने सुरु असलेल्या ‘गिरीसंचार’ह्या उपक्रमातून चांदोली अभयारण्यातील  सात दिवसाचा ट्रेक करून ट्रेकिंगला अधिकृतरीत्या सुरुवात केली. तशी भटकंतीची खाज आधीपासून होतीच पण आधी केलेल्या भटकंतीला हा  असा ‘टच’ , असा दृष्टीकोन  नव्हता.

१७ जुलै २०१० म्हणजे आजपासून बरोबर दोन वर्ष आधी रोहनने विसापूर इथे एक ब्लॉगर्स ट्रेक ठरवून यशस्वी करून दाखवला.काही कारणाने मी त्यात सहभागी होऊ शकलो नव्हतो.पण सेनापतींनी ठिणगी पेटवली होती .कारण ट्रेकिंगची खाज एकदा लागली कि सुटायचं नाव घेत नाही.फक्त निसर्गाशी बरोबर लिंक जुळली पाहिजे.तिथल्या गडकोट ,बुरुज.पानेफुले,भन्नाट वारा,धो धो पाऊस ह्यांची भाषा एकदा कळली कि बस्स,ते आपसूकच आपल्याला तिथे बोलवून घेतात. मग काय हळूहळू सुहास-दीपक (व्यवस्थापक मंडळ 🙂 ) ,अनुजा,ज्योती ,स्नेहल ,आनंद ,सचिन,योगेश ,सागर(नेरकर +बाहेगव्हाणकर) ,अर्चना,धुंडीराज,भारत अशी आमची भली मोठी ट्रेकिंग  गैंग तयार झाली. इतके सगळे जण कधी एकत्र नसतो हे ही वेगळ सांगायला नको.कधी कोणी असत कोणी नसत, आणि हे कोणत्याही ट्रेक ग्रुपला लागू होते. पण हळूहळू आमचे ट्रेक होऊ लागले आणि आज ट्रेकर्स ब्लॉगचा दुसर्या वाढदिवसापर्यंत ते चालूच आहेत.बोईसरमध्ये राहत असल्यामुळे वेळेची गणित न जमल्याने अनेक ट्रेक्सना मुकलो पण शक्य तितकी भटकंती चालूच ठेवली. तर अश्या प्रकारे आमच्या नेहमीच्या गैंगबरोबर केलेले अनेक ट्रेक्स,अनुजाच्या ओळखीवरून  वसई एडवेंचर क्लब सोबत केलेले कामण-कोहोज-रतनगड ,ऑफबीट सह्याद्री सोबत केलेला कळसूबाई,गिरीसंचारमधून चांदोली (महाराष्ट्र),याना (कर्नाटक),डांग(गुजरात ) इथे प्रत्येकी सात दिवसाचे मेगा ट्रेक्स अस करत करत मी एक ट्रेकर झालो.

मागे एकदा सुहास जोशी ह्यांचा लोकसत्तामधील  ‘ट्रेकर्स टू ब्लॉगर्स’ हा लेख वाचला होता.पण त्या लेखाच्या अनुषंगाने माझा प्रवास थोडा उलटा म्हणजे ‘ब्लॉगर्स टू ट्रेकर्स’ होता म्हणून हा लेखप्रपंच.पण हे आता लिहण्यामागच  कारण वेगळ आहे.एखादे आईवडिल आपल्या  मुलाने काही यश मिळवल्यावर त्याबद्दल कस कौतुकाने भरभरून बोलतात,त्याचा इथवरचा प्रवास सांगतात ,त्या दृष्टीकोनातून हे आजच लिखाण.कारण दवबिंदूवरील भटकंती ह्या सदराने आज दवबिंदूला  पहिलावहिला अधिकृत सन्मान मिळवून दिला आहे.तर तुम्हाला सांगतांना अतिशय आनंद होतोय कि ह्यावर्षीच्या ११ व्या  गिरीमित्र संमेलनात नव्याने सुरु झालेल्या ‘ट्रेकर्स ब्लॉग’ ह्या स्पर्धेत दवबिंदूला  द्वितीय पारितोषिक मिळाल आहे.राज्यभरातील अनेक गिर्यारोहक संस्थामधील सह्याद्रीच्या कडेकपारीत, दरीखोर्यात, सुळक्यांवर भटकणारी लहान-थोर  शेकडो टाळकी हमखास एकत्र यायचं एक व्यासपीठ म्हणजे हे गिरीमित्र संमेलन.त्याबद्दलच्या अधिक माहितीसाठी इथे भेट द्या.

लोकप्रभाचे संपादक विनायक परब यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना…

स्वत:च बोलतेय ना … 🙂

तुम्हाला विश्वास बसणार नाही पण मी लिहतो हे घरात कोणालाही माहिती नव्हत.ऑफीसमध्येही मोजक्या दोन चार जणांना हे माहिती होत.पण आता  ह्या सन्मानामुळे बर्याच लोकांना हे कळल आहे .गेले दोन दिवस कित्येक  जणांच अभिनंदन स्विकारून खरच खूप भारावून गेलो आहे.माझी एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.घरच्यांसाठी पण हा एक सुखद धक्का होता.ह्याबद्दल खरच गिरिमित्र संमेलनाच्या आयोजकांचे मी अगदी मनापासून आभार मानतो.माझ्या दिवसभर संगणकासमोर बसण्याबद्दल आक्षेप असला तरी मी ट्रेकिंगला जाण्याबाबत घरच्यांचा कधीच विरोध नव्हता. उलट कधी रात्री अपरात्री पकडाव्या लागणारया गाडीवर सोडण्यासाठी  तर कधी मला रात्री अपरात्री स्टेशनवर घ्यायला येण्यासाठी माझा ट्रेक म्हणजे वडीलांची किंवा भावाची हमखास झोपमोड.ह्या सगळ्या सहकार्यामुळेच आजवर ट्रेक करत आलोय.गेल्या वर्षीच्या शेवटी डाव्या पायाच्या पोटरीजवळील मसल्स स्ट्रेच्ड झाल्यामुळे अतोनात त्रास झाला.आणि ही ट्रेकचीच देणगी असूनही आजवर ट्रेकची ओढ कधी कमी झाली नही. अनेक वेळा रेल्वे व इतर प्रवासाच्या विचाराने घरातून निघतांना खूप कंटाळा येतो पण मग  गडमाथ्यांच्या ओढीने पाय घराबाहेर पडतात.आणि इतका सगळा त्रास सहन करून गडमाथ्यावर पोहोचल कि जे ‘फिलिंग’ येत ते पुढच्या ट्रेकसाठी उर्जा पुरवण्यासाठी पुरेस असत.

स्पर्धेचा एकूण निकाल :

प्रथम क्रमांक – पंकज झरेकर – भटकंती अनलिमिटेड

द्वितीय क्रमांक – देवेंद्र अशोक चुरी – दवबिंदू

तृतीय क्रमांक – नचिकेत जोशी – आनंदयात्रा

उत्तेजनार्थ – हेमंत पोखरणकर – बॉर्न पीएचडी

(काल बर्याच लोकांनी मला मटामध्ये माझ्यासंदर्भात  उलैख असलेल्या द च्या गंमतीबाबत विचारले ,तर ती गंमत अशी “देवेनने देवाच्या देवळात दोन दिवस दिवा दाखवून ,दुर्वा देऊन देवाला दानपेटीत दान दिले , देवाने देवेंद्राला  ’दवबिंदु’  देवुन दानासाठी दाद दिली” 🙂  )

किल्ल्यांच वेड लावणारे छत्रपती शिवाजी महाराज,माझ्या घरचे , ट्रेकिंग मधील सहकारी  ,इतक्या सुट्ट्या देणारी माझी कंपनी   आकाशाला गवसणी घालत नेहमी मला साद देत आलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगा ,मनाला भुरळ घालणारे सुळके-बुरुज-तटबंदी ,तिथे जातांना हसत स्वागत करणारा हिरवा निसर्ग ,मन प्रसन्न करणारी फुल , गडमाथ्यावरील भन्नाट वारा-पाउस ,वर्षोनुवर्षे इतिहासाची साक्ष देणाऱ्या तिथल्या वास्तू,जेव्हा जेव्हा दवबिंदूची गाडी बंद पडली तेव्हा त्याला धक्का मारून चालू करणारी मंडळी  🙂 ,  आणि विशेष म्हणजे  दवबिंदूचे समस्त वाचकगण ह्या सर्वांचाच ह्या यशात बहुमोल वाटा आहे….ह्या  सर्वांचा  माझ्यावर असाच लोभ असू द्यावा हिच ईश्वरचरणी प्रार्थना  …अजून शेकडो गड-किल्ल्यांना भेटायचं आहे त्यांच्याशी बोलायचं  आहे …त्यांच्या सोबतीला तुम्हाला इथे भेटत राहीनच…आपला दवबिंदू-देवेन

ट्रेकर्स-ब्लॉग बद्दल मटातील बातमी …आणि आपल्या दवबिंदूचा फोटूपण… 🙂

Advertisements

26 thoughts on “ब्लॉगर्स टू ट्रेकर्स …

  1. अभिनंदन !!!

    अशीच भुक राहूदे लिखाणाची ,भटकंतीची (आणी खादाडीची पण )

टिप्पण्या बंद आहेत.