भेट अशेरीभाईंची …


ट्रेकिंगचा किडा अंगात वळवळायला लागल्यापासून अधूनमधून जस जमेल तसे थोडेफार ट्रेक करत राहिलो.बाहेरच्या ट्रेक्ससाठी वेळेची,सुट्टीची सगळी गणित जुळवून मला कसा ‘डबल ट्रेक’ करावा लागतो ते मी माझ्या किल्ले असाव्याच्या पोस्टमध्ये तुम्हाला सांगितले आहेच.म्हणूनच  मला आमच्या बोईसर -पालघर विभागातले गड जास्तच जवळचे वाटतात ह्याबद्दल काही शंका नाही.महत्वाच म्हणजे इथले गिरीदुर्ग अजून तितकेसे ‘पिकनिक’ पाँईंट झालेले नसल्याने नाही ती गर्दी इथे दिसत नाही.त्यामुळे  अर्नाळा , केळवे ,दातिवरे ,दांडा ,तारापूर,डहाणू,शिरगाव,माहीम इथल्या अरबी समुद्रावर लक्ष ठेऊन असणार्या जमीनीवरील किल्ल्यांच्या  गँगबरोबरच कोहोजदादा ,तांदुळवाडी ताई,महालक्ष्मीमाई  ,असावाराव ,कामणसाहेब ,काळदुर्गभाऊ  ह्या सगळ्या मला जवळ असणाऱ्या मंडळींना भेट देऊन झाली होती. पण ह्या सगळ्यांचा मोठा भाऊ असलेला  अशेरी’भाई’ मात्र आमच्यावर रुसला होता.कारण आधी एकदा त्याला येतो म्हणून सांगितलं आणि ‘प्लान’ रद्द झाल्याने  घरीच बसून राहिलो, तर गेल्या वर्षी पावसाळ्यात अगदी घरातून निघेपर्यंत त्याला येतो सांगून शेवटच्या क्षणी असावादादांकडे  वळलो होतो.

तर ह्या ‘भाईं’ ना लवकरच पटवायच होत पण मुहूर्त निघत नव्हता.तसा आमच्या गँगने अशेरीगड करून आमच्या इथल्या पेशल बिर्याणी खायचा ठराव वर्षभरापूर्वीच मंजूर केला होता.त्याबाबत प्रामुख्याने दीपक ,सुहास ,ज्योती खुपच आशावादी होते. पण ते हे विसरले कि हा ठरावाची जबाबदारी ज्याच्यावर दिली आहे तो  एक सरकारी कर्मचारी आहे ,आणि सरकारी ठराव मंजूर झाल्यावर त्याच्या  अंमलबजावणीसाठी वेळ तर लागणार ना. 🙂 तर आठवड्याभरापूर्वी  ९ फेब ला अशेरीगड करायचा म्हणून आमच्या ट्रेकगुरू धनावडेंचा ईमेल आला.९ तारखेला सेकंडशिफ्ट होती.गेल्या वर्षात अमरनाथ (११दिवस),काश्मीर (६ दिवस),गिरीसंचार-२३ (९ दिवस ) ह्याबरोबर अनेक छोट्यामोठ्या सुट्ट्या पकडून सुमारे दोन महिन्याच्या वर माझ्या सुट्ट्या झाल्या आणि त्यामुळे  साहेबांनी ह्यावर्षी सुट्ट्या कमी करण्याबाबत  बजावल्यावरही वर्षाच्या पहिल्याच महिन्यात २३ कामाच्या दिवसापैकी १० दिवस सुट्टी घेऊन माझी ह्यावर्षाचीही चांगलीच  सुरुवात झाली होती .  🙂 पण हा  किल्ला  जवळच असल्याने  सेकंडशिफ्ट करता येईल आणि अशेरी भाईंचा रुसवा ही काढता येईल म्हणून मी तिथे  जायचं ठरवलं.

अशेरीगड

अशेरीगड

अशेरी म्हणजे शिलाहारवंशीय भोजराजाने बांधलेला म्हणजे सुमारे  ८०० वर्षे जुना समुद्रसपाटीपासून  १६८० फूट उंचीवर असलेला एक गिरीदुर्ग.आपल्या  समुद्रावरील किनारपट्टीवर बर्याच काळ राज्य करणाऱ्या पोर्तुगीजांनी ह्या गडाचे महत्व लक्षात घेऊन इ. स. १५५६ ते इ. स. १६८३ अशी १३० वर्षे हा गड स्वत:च्या ताब्यात ठेवला.पुढे संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत मराठ्यांनी हा गड आपल्या ताब्यात घेतला.पण ४ वर्षातच म्हणजे   इ. स. १६८७ ला पोर्तुगीजांनी हा गड परत आपल्या ताब्यात घेतला.त्यानंतर बरोबर ५० वर्षांनी चिमाजी अप्पांच्या वसई मोहिमेच्या वेळी मराठ्यांनी इथे भगवा फडकावला.पुढे ८१ वर्ष मराठ्यांनी हा गड आपल्याकडे राखण्यात यश मिळवले पण ब्रिटिशांनी भारत गिळंकृत  करताना १८१८ ला हा गड आपल्या ताब्यात घेतला.

माझ्या कंटाळ्यावर माझा अजिबात विश्वास नाही कारण तो कधीपण अचानक येऊन मला त्याच्या मगरमिठीत गुरफटून टाकतो.पण ह्यावेळी साहेबांनी माझ्यापासून दूर होत मला  साथ दिली  आणि सकाळी वेळेवर उठून ठरल्याप्रमाणे सकाळी साडेसात वाजता ठरलेल्या ठिकाणी म्हणजे आमच्या कॉलनीच्या गेटजवळ  पोहोचलो.नुकताच केलेल्या भीमाशंकर येथील सात दिवसाच्या ट्रेकमध्ये ओळख झालेला सचिन वेळेवर कळवूनही त्याच्या शशांक नावाच्या मित्रासह आम्हाला जॉइन झाला होता.फायनली ट्रेकला धनावडे,मुळे ,निलेश,वैभव ,सचिन,शशांक,हेमंत आणि मी अशी आठ टाळकी निश्चित झाली होती.ह्यापैकी धनावडे,वैभव हेमंत ,मुळे व मी अश्या आम्ही पाच जणांनी चार वर्षापूर्वी सात दिवसाचा चांदोलीच्या जंगलातील ट्रेक एकत्र  केला होता पण त्यानंतर पहिल्यांदाच आम्ही सगळे एकत्र ट्रेक करत होतो.तर निलेशचा हा पहिलाच ट्रेक होता पण त्याचा उत्साह दांडगा होता.  हेमंत रात्रपाळी करून आल्यामुळे त्याला थोडा उशीर होणार होता मग आम्ही  जवळच असलेल्या चित्रालयमधील हॉटेल शिवानंद मध्ये नाश्ता करायचं ठरवलं.समोसा,इडली,चहा ह्यांनी पोटातल्या कावळ्यांच तोंड बंद करून आम्ही साठेआठ  वाजता बाईकची इंजिन सुरु केली व मुंबई -अहमदाबादशी महामार्गाशी आम्हाला जोडणारा  चिल्हार फाटा गाठला. तिथून महामार्गावार अहमदाबादच्या दिशेने तीन -चार  किमी अंतरावर एक मोठ नागमोडी वळण आहे ते वळण संपल्यावर डाव्या बाजूला बस थांबा किंवा छोट्याश्या  टपरी सारख एक सिमेंटच बांधकाम आहे  व त्याला लागूनच डाव्या बाजूला आत जाणारा एक कच्चा रस्ता दिसतो.(पालघरहून महामार्ग गाठल्यास तिथल्या मस्तान नाक्यापासून इथे यायला तुम्हाला सुमारे  १० किमी अंतर कापाव लागेल )  हा रस्ता आपल्याला पुढे एका सिमेंटच्या पुलावरून  खोडकोना गावात घेऊन जातो.

गाड्या दावणीला बांधताना ..

गाड्या दावणीला बांधताना .. 🙂

खोडकोना...

खोडकोना…

अगदी आरामात गाडी हाकुनही साडे नऊच्या सुमारास आम्ही खोडकोना गावात दाखल झालो .खोडकोना म्हणजे अशेरी गडाच्या पायथ्याशी असलेल पाच-पंचवीस घर असलेल छोटस पण लोभस गाव.वारली लोकांची ‘टिपिकल’ घर,पाठीशी उभा असलेला अशेरीगड ,आजूबाजूला शेताची छोटी छोटी खाचर आणि मध्ये घर असलेल्या भागात विस्तीर्ण पसरलेल्या वृक्षराईची गर्द सावली.इथे दिवसातील कोणत्याही वेळी उन्हाचा त्रास अजिबात जाणवणार नाही ह्याची पूर्ण खात्री . धनावडेच्या ओळखीच्या व्यक्तीचा संदर्भ देऊन गावातील व्यक्तींशी बोलून आम्ही तिथल्या एका विस्तीर्ण वृक्षाखाली आमच्या गाडया पार्क केल्या.तिथून गडाकडे प्रयाण करतांना दोन छोटे गाईड रोहित आणि गणेश विचारणा करताच आपणहून आम्हाला जॉईन झाले.त्यांना सांगितलं घरी कळवून तर या तर ते म्हणाले आम्हाला बघून ते घरी सांगूनच निघाले आहेत. धनावडेंनी पाच सहा वर्षापूर्वी हा गड केला होता तर इतर आम्ही सगळे इथे पहिल्यांदाच येत होतो त्यामुळे हे छोटे गाईड लाभल्याने आम्हालाही बर वाटलं.

20

अशेरीवरील शेर

3.5

निलेश आणि जुन्नु …

मुळे आणि धनावडे ...

मुळे आणि धनावडे …

त्या छोट्या गाईड्सबरोबर आम्ही गाव मागे सोडत आधी बैलगाडीच्या रस्त्यावरून चालत जंगलाच्या दिशेन आत शिरलो.इथे आणि पुढील वाटेतही दोन तीन ठिकाणी गडाकडे जायचा मार्ग दाखवणारे बाण वाटेवरील दगडांवर काढलेले दिसतात. तिथून सुमारे १०-१५ मिनटे सपाट पठारावर चालल्यावर आम्ही एक खिंड चढायला सुरुवात केली.उजव्या बाजूला सूर्यकिरणांनी नटलेला अशेरीभाई सुहास्य वदनाने आमच्याकडे पाहत आमचा उत्साह वाढवत होता.सुमारे तासाभरात आम्ही त्या खिंड चढून वरच्या सपाट पृष्टभागावर पोहोचलो अशेरीगडाच्या अर्ध्याहून अधिक उंची आम्ही गाठली होती.बर्यापैकी चढ चढल्याने थकलेली इंजिन बंद करत आम्ही क्षणभर विश्रांतीसाठी तिथे विसावलो.तिथे आजूबाजूला गावातली काही पुरुष व स्त्रिया दैनंदिन वापरासाठी लागणारी लाकड गोळा करत होती.ती जागा अतिशय छान वाटत होती तिथून निघावास वाटत नसल तरी मोह टाळून मी,हेमंत व शशांकनी उजव्या बाजूला वर चढत गडाच्या दिशेन कुच केल.तिथून १०-१५ मिनटाच्या चढाईनंतर आम्ही अशेरीभाईंची गळा भेट घेत प्रत्यक्ष गडाला ‘कनेक्ट’ झालो.तिथेच थोडस वर गेल्यावर उजव्या बाजूला १० पाउलांवर लाकडामध्ये कोरलेली  वाघोबाची उघड्यावरील मूर्ती आपल्याला पाहावयास मिळते.हा वाघोबा म्हणजे इथल्या पंचक्रोशीतल्या आदिवासी लोकांचे आद्य दैवत .पण त्या लाकडावर इतके हार चढवलेले होते कि मध्यभागी कोरलेली वाघोबाची मूर्ती पूर्ण झाकली गेली होती .ते हार थोडे बाजूला करत  वाघोबाचा आशीर्वाद घेऊन आम्ही पुढची चढाई सुरु केली .

वाघोबा ...

वाघोबा …

सचिनने एक्सप्लोर केलेला मार्ग.....

सचिनने एक्सप्लोर केलेला मार्ग…..सोबत छोटा गाईड गणेश …

गणेशपट्टी....

गणेशपट्टी….

वाघोबाच्या मंदिरापासून पुढे वर चढतांना कातळात खोदलेल्या पायऱ्यांच्या मदतीने वर चढत आपण सपाट भागावर येऊन पोहोचतो.इथे आत डाव्या बाजूला जाणारा  एक छोटासा  गुहावजा मार्ग  दिसतो . सचिनने अशेरीभाईंना साष्टांग नमस्कार घालत काळजीपूर्वक  त्या निमुळत्या मार्गात शिरून डाव्या बाजूला पुढे मार्ग बंद होत असल्याची माहिती आम्हाला दिली.त्या सपाट भागावरून समोरच्या  मोठ्या कातळाला वळसा घेऊन उजव्या  बाजूला  गेल्यावर समोर एकदम अरुंद अशी खिंड दिसते.इथे जवळपासच गडाच प्रवेशद्वार असाव अशी साक्ष देणारी गणेशपट्टी ह्या खिंडीच्या पायथ्याशी उघड्यावर पाहावयास मिळते.ही अरुंद खिंड चढतांना मात्र दोन्ही हातापायांबरोबर तुमच वजन वर ढकलत  पूर्ण शरीराची कसरत करावी लागते.पाउसाळ्यात तर ही खिंड खुपच धोकादायक होत असावी .ही खिंड चढल्यावर आमच्या छोट्या गाईडनी आम्हाला ‘राजाची टोपी ‘ दाखवली.ही ‘राजाची टोपी’ म्हणजे दगडात  कोरलेले  पोर्तुगीज राजसत्तेचे चिन्ह.इथे दोन कलाकारांनी त्या राजचिन्हाला  सोनेरी रंग देऊन पोर्तुगीज साम्राज्य काबीज केल्याच्या आवेशात त्याच रंगाने  त्यावर तारखेसह  आपली नावे ही लिहलेली दिसतात .त्या राजचिन्हाच्या जवळ एक पाण्याचे टाक आहे आणि भास्करराव फुल्ल फार्मात असल्याने आमच्याकडील बाटलीतल्या पाण्याच्या साठ्याने खालची पातळी गाठली होती पण आमच्या छोट्या गाईड्सनी हे पाणी प्यायचं नसल्याच स्पष्ट केल.

हीच ती खिंड ....

हीच ती खिंड ….

पोर्तुगीजांच राजचिन्ह....

पोर्तुगीजांच राजचिन्ह….

पोर्तुगीजांनीचा झेंडा

पोर्तुगीजांचा झेंडा

भग्न प्रवेशद्वार ....

भग्न प्रवेशद्वार ….

प्रवेशद्वारावरील नक्षीकाम ...

प्रवेशद्वारावरील नक्षीकाम …

त्या पोर्तुगीज राजचिन्हापासून रुंद आणि भक्कम पायऱ्यांवरून चढत आपण भग्नावस्थेत असलेल्या एका दरवाजाजवळ पोहोचतो.इथून उजव्या  बाजूला नजर टाकल्यास गडाची तटबंदी आपल्याला दिसते पण ती आपल्या बनावटीची वाटत नाही .बहुतेक पोर्तुगीजांनी ह्या तटबंदीची डागडुजी केली असावी .तिथूनच उजव्या बाजूला खाली  नजर फेकल्यास  उन्हात चमकणारा मुंबई-अहमदाबाद महामार्ग आणि त्यावरून पळणाऱ्या गाड्यांची लगबग आपल्याला स्पष्ट पाहावयास मिळते.इथून पुढे वर जाताना डाव्या बाजूला पाण्याची चार-पाच टाक लागली .आम्ही आमच्या छोट्या गाईड्सकडे पाहिल पण त्यांनी मानेनेच हे सुद्धा पिण्याचे पाणी नाही अस परत बजावलं.पण तिथून थोड पुढे गेल्यावर डाव्या बाजूला खाली तीन पाण्याची टाक दिसली.ह्यावेळी आमच्या गाईड्सच्या चेहऱ्यावर हवी ती प्रतिक्रिया मिळाली होती.त्या टाकांजवळ डहाणुमधील कासा गावातील फिरायला आलेली मुल चुलीवर मस्त जेवण बनवत होती . ह्या पाण्यांच्या टाक्यांपर्यंत जायची वाट मात्र अतिशय निसरडी आहे आणि खाली खोल दरी ,त्यामुळे इथे जातांना काळजी घेणे आवश्यक आहे. त्या तीन टाकांपैकीही सर्वात दक्षिणेकडच्या  म्हणजे मुंबईच्या बाजूच्या  टाक्यातल पाणी हे पिण्यायोग्य आहे व ते बारमाही उपलब्ध असते.

पिण्याच गार पाणी ...

पिण्याच गार पाणी …

पिण्याच्या पाण्याच्या बाजूची बाजूची दोन टाक ...

पिण्याच्या पाण्याच्या टाकाच्या बाजूची दोन टाक …

हीच ती गुहा ...

हीच ती गुहा …

गुहेसमोरील तोफ....

गुहेसमोरील तोफ….

ते गार पाणी पिऊन थोड पुढे चालल्यावर आम्ही गड्माथ्यावरील पठारावर पोहोचलो तिथे समोरच भूतकाळात तिथे असलेल्या वास्तूची साक्ष देणारे पडक्या वाड्याचे अवशेष आपल्याला दिसतात .तिथून उजव्या बाजूला थोड्या अंतर चालल्यावर आपण दगडात खोदलेल्या  गुहेजवळ  पोहोचतो.ह्या गुहेबाहेर जमीनीवर एक तोफ पडलेली आपल्याला दिसते.ह्या गुहेत वर्षभरापूर्वीपर्यंत एक बाबा राहत होता पण काही ट्रेकर्सच्या पुढाकारानेच बाबाला इथून हलायला लागल होत.त्या बाबाकडे चोरीच्या वस्तू सापडल्याची माहिती आमच्या गाईडसनी आम्हाला दिली. गुहा बर्यापैकी मोठी असून गुहेचा आतील भाग  आणि बाहेरील कट्टा पकडून   १०-१२ माणसे इथे  आरामात राहू शकतात.बाहेरील उन,पाउस,वारा ह्यांचा त्रास गुहेत होणार नाही ही दक्षता घेत गुहेची संरचना अतिशय विचारपूर्वक केलेली आहे.दुपारचे बारा वाजल्यामुळे सूर्यदेव बरोबर डोक्यावर येऊन आग ओकत असतांनाही त्या गुहेत एकदम वातानुकुलीत कक्षासारख अतिशय गार वातावरण होत. गुहेच्या आत देवीचा तांदळा (मुखवटा )आहे.गुहेच्या आत व बाहेर हौशी कलाकारांनी बराच रंगकाम केलेल आहे.गुहेच्या वरच्या बाजूला एक बांधीव तळे आहे.गुहेसामोरच लाल जास्वंदीची दोन झाडे आपल्याला दिसतात.आम्हाला खाली गावापासून गुहेत पोहोचायला आम्हाला सव्वा दोन ते अडीच तास लागले होते.सकाळी ज्यांची  शांती केली होती ते कावळे एव्हाना परत ओरडायला लागले होते.मग गुहेच्या बाहेर मुळे ,वैभव ह्यांनी आणलेले डब्बे (म्हणजे डब्ब्यातील  पदार्थ बर ) ,मंडळाचे ब्रेड -जाम-सॉस ह्यांची मस्त  पंगत झोडली.

जय माता दी...!!!

जय माता दी…!!!

अशेरीवरील हेमान्त्ब बाबा

अशेरीवरील हेमंतबाबा

शशांक...

शशांक…

अस्मादिक...

अस्मादिक…

तृप्त पोटाने मग लगेचच आम्ही गुहेच्या मागच्या भागात कुच केल. जवळच  एक सुकलेल तळ नजरेस पडल आणि त्याच्या  थोडस पुढे गेल्यावर तोंडातून ‘वाह’ ,’ऑस्सम’ असे शब्द आपसूकच बाहेर पडावेत असे कमलपुष्पांनी आच्छादित  एक सुंदर तळ आपल्याला पाहावयास मिळते.काही वेळ त्या तळयाभोवती  घुटमळल्यावर मला सेकंड शिफ्टला जायचे असल्याने तसे इतर मंडळींना सांगून तिथून १ वाजता  मी परतीच्या प्रवासाला लागलो .अर्ध्या  अंतरापर्यंत हेमंत व निलेश माझ्या सोबत होते पण  पुढे वेळच गणित ‘कट टू कट ‘ होत असल्याने मी वेग वाढवत पावणेदोनच्या आसपास गावात पोहोचलो.तिथून  माझ ‘युनीकोर्न’ नामक घोड दामटत हवेवर स्वार होऊन मी घरी पोहोचलो व तयार होत अडीचची ऑफिसची बस पकडली.काही वेळापूर्वी मी किती वेगळ्या ‘फ्रेम’ मध्ये होतो.आणि आता बसची घरघर,आजूबाजूला लोकांची  बडबड ,खिडकीबाहेर रखरखत  सिमेंटच जंगल आणि त्या खिडकीजवळ बसलेलो मी.मी म्हणजे माझ फक्त शरीर कारण मन  तर अजूनही  आधीच्याच ‘फ्रेम’ मध्ये कुठेतरी घुटमळत होत.

सचिन तळ्याची पाहणी करतांना...

सचिन तळ्याची पाहणी करतांना…

नयनरम्य तळ ...

नयनरम्य तळ …

मी फुल तळ्यातील इवले....

मी फुल तळ्यातील इवले….

 

Advertisements

11 thoughts on “भेट अशेरीभाईंची …

  1. मस्त वर्णन आणि फोटो. पालघर म्हटलं की सगळं जवळचं वाटतं. शालेय जीवनातली पाच सहा वर्ष मी पालघरला होते.

    • मोहना, दवबिंदुवर आपल स्वागत आणि आवर्जून दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आभार ….!!!
      तुमची वेबसाईट पाहिली, तुमच्यासारख बहुरंगी व्यक्तिमत्वाची आमच्या गावाशी लिंक आहे ह्याचा अभिमान वाटला ….

  2. नुसती जळजळ…. एक तर आम्हाला टांग देऊन गेलास त्याची, दुसरी ती बिर्याणी हुकली त्याची आणि तिसरी आणि शेवटची माझ्या हापिसात बसून मला ह्या अश्या ट्रेकिंगच्या पोस्ट वाचण्याची वेळ यावी याची. तुलाच गाईड म्हणून परत यावे लागणार आमच्यासोबत.. आणि हो ही धमकीच आहे 😉

    • मीच ह्या ट्रेकला जाईन किंवा गेलो तर ट्रेक पूर्ण करेन ह्याची खात्री नव्हती ….बंदा विथ बिर्याणी आपके खिदमतमे हाजीर है…. 🙂

टिप्पण्या बंद आहेत.