जय श्री कृष्ण…

देवकीच तान्ह बाळ तू
कंस-शिशुपालाचा काळ तू

यशोदेला लागलेला लळा तू
श्यामवर्णी मेघ सावळा तू

गोपिकांची फोडलेली घागर तू
त्यांच्या प्रेमाचा सागर तू

गोवर्धनाचा करंगळीवरील भार तू
तूच सांगीतलेल्या गीतेच सार तू

गायीगुरानांही मोहवणारा गोपाल तू
कालियामर्दन करणारा नंदलाल तू

रासलीलेतील मग्न गवळण तू
प्रेमाची दिलेली नवी शिकवण तू

सुदाम्याचा पाठीराखा तू
उद्धवाचा परम सखा तू

द्रौपदीचा निस्सीम विश्वास तू
राधेचा हर एक श्वास तू

मीरेची वेडी भक्ती तू
पांडवांची खरी शक्ती तू

महाभारताचा खरा सूत्रधार तू
कुलांताच्या शापातही निर्विकार तू

पांचालीच अखंड वस्त्र तू
भीष्मप्रतिज्ञेसाठी हाती घेतलेलं शस्त्र तू

दुर्जनांचा विध्वसंक सुदर्शन चक्रधर तू
युगातीत असा युगंधर तू

मुरलीचा मधुर नाद तू
हृदयाला दिलेली साद तू

माझ तन-मन, जीवन तू
कान्हा मजहूनि  का आहेस भिन्न तू

-देवेंद्र चुरी

गेल्या डिसेंबर महिन्यात मथुरेच्या पावन भूमीला भेट दिली होती तेव्हाचा हा फोटो...इथेच मध्ये ते वसुदेव-देवकीला ठेवण्यात आलेल कारागृह तसेच कृष्णाच सुंदर मंदिर आहे...

पाऊस आणि मी

तुझ्या  स्वागतासाठी
हिरवाईने नटते अवघी सृष्टी
आम्ही आलो काय, गेलो काय
दिसतात तेच चेहरे दु:खी कष्टी
.
तू आपल्या मर्जीचा मालक
पाहिजे तेव्हा पाहिजे तसा येतो
आम्ही मात्र अजाण बालक
आयुष्याचा गाडा कसातरी पुढे नेतो
.
तू कसाही कोसळलास तरी
कोणीतरी पाहतच असते  तुझी  वाट
कोणासाठी कितीही केलं तरी
आमची नेहमी लागत असते वाट
.
पण तू सोबतीला असलास की मला
उगाच हसायचे सोंग घ्यावे लागत नाही
तुझी  साथ मग हवीशी वाटते, कारण
तेव्हा मला माझे अश्रू लपवावे लागत नाही
.
मग कधी माझं दु:ख जाणवल्यावर
तू वेड्यासारखा  कुठेही पडत असतोस
आणि माझे अश्रू सुकले तरी
तू मात्र नेहमीच रडत असतोस…..
.
-देवेंद्र चुरी
(हि कविता आधी जालरंग प्रकाशनाच्या  ऋतू हिरवा -२०११  ह्या  वर्षा विशेषांकात प्रकाशित झाली आहे. )