मॅड

लहानपणापासून माझा सर्वात आवडता छंद आहे तो पुस्तक वाचण्याचा.हलकफुलक्या कथां असलेली पुस्तक ,ऐतिहासिक कादंबऱ्या,धीरगंभीर वास्तववादी पुस्तक,माहितीपर पुस्तक अश्या अनेक प्रकारच्या पुस्तकांचा मी आजवर खूप आस्वाद घेतला आहे.लहानपणी माझे मित्र मला नेहमी म्हणायचे, आम्हाला ही शाळेची पुस्तकच वाचायलाच जीवावर येते आणि तू इतकी जाडजाड पुस्तक कशी वाचत बसतो.मॅडच होत ते त्यांना काय माहीत कि खरतर पुस्तक वाचायला कुठे लागतात ती मनापासून उघडली कि  स्वत:हूनच ती आपल्याला सगळ सांगत राहतात.आपल्यासमोर सगळी दृश्य जिवंतपणे उभी करतात. तर अश्या ह्या माझ्या पुस्तकवेड्याच्या मनात एक कोपरा खास वपुंच्या पुस्तकांसाठी निरंतर राखून ठेवलेला आहे आणि तसाच एक वेगळा कोपरा ‘शाळा’ व ‘दुनियादारी’ ह्या पुस्तकांसाठी राखून ठेवलेला होता.गेली कितातरी वर्ष ही दोन पुस्तक त्या कोपरयात गुण्यागोविंदाने राज्य करीत होती.

पण काही दिवसापूर्वीच त्यांना त्यांच राज्य ‘लंप्या’ बरोबर वाटून घ्याव लागल. कोण लंप्या ? तुमच्यापैकी अनेक जण कदाचित ओळखत असाल ह्या लंप्याला पण महिन्याभरापूर्वी पर्यंत मी तरी ह्याला ओळखत नव्हतो.एकाच दिवशी मनाली (स्वच्छंदी) आणि रश्मी (मनस्वी) ह्या दोघींच्या ब्लॉगवर सर्वप्रथम ह्या मॅड लंप्याची मॅड ओळख झाली.मग काही दिवसातच मी हळुवारच लंपनच्या मॅड भावविश्वात प्रवेश केला आणि मग काय मला तो एकदम   ‘बेष्ट’च वाटला.आणि शेवटी ते काय म्हणतात ना त्यातली गत लंप्याने थोड्याश्या  मॅड असलेल्या मला पूर्ण  मॅड केल,’कम्प्लेट’ मॅड… अश्या त्या मॅड लंप्याची मी तुम्हाला इथे ओळख करून देणार आहे. साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण….

तर  ‘लंप्या’ म्हणजेच ‘लंपन’ हा प्रकाश नारायण संत ह्यांच्या कथासंग्रहामधील नायक – कर्नाटकातील कारवार नजीकच्या एका छोट्याश्या गावात आपल्या आजी-आजोबांबरोबर राहणारा अगदी कोवळ्या वयाचा एक शाळकरी मुलगा.त्याच स्वत:च एक वेगळच जग आहे. आजूबाजूचे सगळे सजीव-निर्जीव घटक त्याला  ह्या ना त्या कारणाने  मॅड वाटतात. अनेक छोट्या छोट्या गोष्टीचं निरीक्षण करायची त्याची मॅड सवय आहे.एकदा का  हात डोक्यामागं घेऊन तो एखाद्या गोष्टीकडे पाहू लागला कि मग त्याला वेळ-काळाचे काही भान राहत नाही. त्याच्या डोक्यातील चक्र नेहमी चालूच.प्रत्येक गोष्टीचा तो एकोणविसशे  वेळा विचार करतो. त्या निरीक्षणावरून तो अनेक भन्नाट  ‘लॉजिक’  लावतो.छान छान गाणी गायची त्याला भारी हौस.वाचनाची तर त्याला  प्रचंड आवड, अगदी पुस्तकवेडा . त्याला नेहमी दहा बारा तासांऐवजी खरं तर एकोणीस-तास झोपावस वाटत. कधीतरी आईपासून दूर राहत असल्याने तो थोडासा हळवाही होतो.त्याला त्याची शाळा  खूप आवडत असते कारण ह्याच शाळेत त्याच्या आईने शिक्षण घेतलेलं असत.त्याची एक मैत्रीणही आहे सुमी नावाची ,का कोण जाणे पण हिची नुसती आठवण आली तरी त्याला पोटात काहीतरी गडबड झाल्यासारख वाटते.तर असा आहे हा आमचा लंप्या.

हा निरागस,अल्लड,आपली अचाट कल्पनाशक्ती वापरणारा आणि थोडासा संवेदनशील लंपू आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातो. त्याची आजी-आजोबा, आ‌ई-बाबा,सुमी, बाबूराव, मनी आणि लहान बाळ बिट्ट्या, कणबर्गी गंग्या, टुकण्या ,संप्या, परळ्या, यमज्या, हणब्या, एशी, केबी,वंटमुरीकर देसाईंचा बोका, ‘लक्ष्मी’ झाड, तिथलं तळं, ‘हंपायर’ जंब्या कटकोळ,लंप्याचा गामा पैलवान खेकडा,ड्रिलचे मास्तर हत्तंगडी,आचरेकरबाई,म्हापसेकर सर ,सायकलचं  दुकान चालवणारा टी. जी.  कासारगोड ,नकादुतले खंडागळे मामा,सोन्याबापू,तेलसंगी,हिंडलगेकर अण्णा,साउथ इंडियन तुंगभद्रा,सांबप्रसादच घर,दुंडाप्पा हत्तरगीच्या टांगा ,लंपूला त्याच्यासारखाच एकटा वाटणारा गुंडीमठ रोड अश्या कितीतरी जणांची तो त्याच्या भावविश्वातून ओळख करून देतो.आणि ही सगळी सजीव-निर्जीव पात्र आपल्यासमोर जिवंत उभी राहतात.आपण एकवीसशे त्रेचाळीस वेळा सगळ परत परत वाचत राहतो.लंपूही आपला हात धरून आपल्याला सगळीकडे हिंडवत राहतो.हळूहळू काळ-वेळेचे, जागेचे, वयाचे सगळे बंध निखळून पडतात. त्याच्याबरोबर मॅडसारख भटकत असताना तो  आपला खास कि काय तसा मित्र होऊन जातो.अनेक धागे जुळत जातात. आणि मग अचानक कधीतरी आपणच लंप्या होऊन जातो.

लंप्याला आपल्याशी अशा प्रकारे जोडण्याचे सगळे श्रेय प्रकाश नारायण संतांच्या अप्रतिम लेखनशैलीला जाते.त्यांचे वडिल उत्तम ललितलेखक होते तर त्यांच्या आई इंदिरा संत ह्यांच्याबद्दल काही वेगळ सांगायला नको.वयाच्या सतराव्या वर्षीच ललित लेखनास सुरुवात करणाऱ्या प्रकाश नारायण संतांनी ह्या घराण्याला अजून एका उंचीवर नेऊन ठेवले.त्यांनी अडनिड वयातील मुलांच्या भावविश्वाचे अगदी  सूक्ष्म निरीक्षण केले असल्याचा साक्षात्कार ही पुस्तक वाचतांना आपल्याला वारंवार होतो.कथेची उत्तम बांधणी ,अगदी जिवंत वाटणारी वर्णन ,साधी सरळ भाषा, कानडी वळणाच्या मराठी बोलभाषेचा जागोजागी  छान वापर, ह्या त्यांच्या ह्या लेखनातील अगदी जमेच्या बाजू .ते उत्तम चित्रकारही होते. त्यांच्या पहिल्या तीन पुस्तकांसाठी त्यांनी स्वतःच रेखाटने केली होती. ‘मॅड‘ हे मॅड विशेषण कशासाठीही वापरणं,आपल्याला अगदी त्या वयात घेऊन जाणारया शब्दरचना ,वेगवेगळ्या संख्यांचा वाक्यातला उपयोग, आडवयातील मुलाच्या नजरेतून विविध गोष्टी मांडण्याच प्रचंड कौशल्य,लंपनच वेगवेगळया लोकांबरोबर जुळवलेले हळुवार ऋणानुबंध सगळ सगळ आपल्यावर एक वेगळीच जादू करते.मी ह्याचवर्षी कारवार भागाला भेट दिलेली असल्याने ह्या पुस्तकातील अनेक वर्णनांना चांगलाच ‘रिलेट’ करू शकलो.

गोट्या खेळतांनाचा प्रकाश नारायण संतांनी सांगितलेला भन्नाट मंत्र इथे टाकावासा वाटतोय ….

पंचापांडू – सह्यादांडू – सप्तपोपडे – अष्ट जिंकिले – नऊनऊ किल्ले – दश्शा पेडा – अकलकराठा बाळू मराठा – तिरंगी सोटा – चौदा लंगोटा – पंधराशी परिवळ – सोळी घरिवल – सतरम सीते – अठरम गरुडे – एकोणीस च्यकच्यक – वीसा पकपक – एकवीस कात्री – बावीस रात्री – तेवीस त्रिकाम फुल – चोवीस चोर – पंचवीस मोर

वनवास, शारदा संगीत, पंखा, झुंबर ह्या चार पुस्तकातून लंपनच भावविश्व  तरलपणे उलगडून दाखवतांना ते आपल्याला मनमुराद आनंद देतात.ही चार पुस्तक म्हणजे एक आगळावेगळा खजिनाच आहे.ह्या चार पुस्तकांचं वैशिष्ट्य म्हणजे ह्यातल कोणतेही एक पुस्तक वाचल तरी ते अपूर्ण वाटत नाही.पण एकदा का तुम्ही ह्या लंपनच्या भावविश्वात शिरलात कि चारही पुस्तक कशीही मिळवून तुम्ही ती मॅडसारखी वाचून काढेपर्यंत किंवा त्यानंतरही तुम्ही लंपनला सोडत नाहीत आणि तो ही तुम्हाला सोडत नाही. ही सगळी पुस्तक वाचतांना आपल्याला निखळ आनंद  देतात पण त्याच बरोबर अनेक कथांच्या शेवटी घडलेल्या घटना मनाला चटका लावून जातात.’झुंबर’ मधील ‘स्पर्श’ ह्या कथेत आपल्या वडिलांच्या मृत्युची जाणीव झालेला लंपन  तर अंगावर काटा आणतो.खूप हुरहूर लावून जाते ती कथा. लंपनच्या आयुष्यातील तरूणपणाच्या दिवसांवर संतांना एक कादंबरी लिहायाची होती पण ‘झुंबर’ हा कथासंग्रह प्रकाशित होण्यापूर्वीच त्यांच निधन झाल, आणि मराठी रसिक एका अतिशय चांगल्या कादंबरीला मुकला अस मला वाटते.खरच संतांचा तरुणपणाचा लंपन कसा असता… ह्याच उत्तर कधीच मिळणार नाही ह्याची खात्री असूनही  ह्याबद्दल  कधीकधी खूप विचार करतो मी …

लहानपणापासून सत्याण्णव हजार चारशे त्रेचाळीस  पुस्तक वाचलेली असतांना  इतका चांगला कथासंग्रह  वाचनात  कसा आला नाही ह्याच मला खूप आश्चर्य वाटलं.आणि मला लंप्याची ती ओळ आठवली, “माझ्यासारखा मॅड शोधुनही सापडणार नाही. असला मॅड म्हणजे दहा गुणिले दहा भागिले शंभर! मी. एकच!”.  मग माझ्यासारखे अजूनही काही पुस्तकवेडे महाभाग असतील ज्यांची लंप्याशी ओळख झालेली नसेल  अस वाटलं आणि  त्यांच्यासाठी हा लेखप्रपंच.खरच कधीतरी अगदी मॅड सारखे काहीतरी वाचत सुटाव अस वाटल  तर लंपनच्या मॅड  भावविश्वात जरूर प्रवेश करा … एक वेगळाच मंतरलेला मॅड अनुभव तुम्हाला मिळेल…

“लंप्याच्या भाषेत सांगायच म्हणजे, ‘एकदा नाही, दोनदा नाही तर अठ्ठावीसशे तीस वेळा जरी ह्या कथा ‘ मॅड सारख्या वाचल्या’ तरी त्या ताज्याच वाटतील. एक निराळ्याच शैलीचा आणि वाचकाशी चट्कन संवाद साधून त्यालाही लंप्याच्या वयाचा करून टाकणारा कथासंग्रह मराठीत येतो आहे ह्या आनंदात मी आहे…..”- इति पुल.

 

आचार्य…

” उध्या जर माझी समाधी बांधायची झाली तर त्यावर एकच वाक्य लिहा- हा माणूस मुर्ख असेल,हयाच्या हातुन अनेक चुका झाल्या असतील ; पण हा कॄत्घन मात्र कधीही न्वहता.”

गेल्या आठवड्य़ातच वि.र.काळे हयांच  ’आचार्य अत्रे : महाराष्ट्रातील बलदंड व्यक्तीमत्व’ हे आचार्य अत्रेंवरील पुस्तक वाचल.पुस्तकाच्या पहिल्याच  पानावर अत्रेंनी त्यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाच्या वेळी काढलेले वरील उदगार दिलेले  आहेत.ते किती समर्पक आहेत ते पुस्तक वाचल्यावर आपल्या लक्षात येते.खरतर ही पोस्ट १ मे ला सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्रदिनाच्या दिवशी टाकायची होती, पण नेहमीचाच कं मध्ये आला आणि ही पोस्ट प्रकाशीत होण्य़ासाठी तब्बल ८ मे उजाडाव लागल.

खर सांगतो हे पुस्तक वाचायच्या आधी आपले साहित्यातील अत्रे आणि राजकारणातील अत्रे मला दोन वेगवेगळ्या व्यक्ती वाटायच्या.असो पण अत्र्यांच्या व्यक्तीमत्वाचा आवाकाच इतका मोठा आहे की ही असली चुक आम्हा पामरांकडुन होउ शकते, त्यात काही वावग नाही.अत्र्यांचे विविध क्षेत्रातील कर्तुत्व एकुन ”एक माणूस एवढा सगळा असू शकतो? ” असे उद्गार स्वत: पंडीत नेहरुंनीही काढले होते.ते बरच काही सांगुन जातात.ज्याप्रमाणे आपल्या सचिन तेंडुलकरला देवाने प्रतिभाशाली फ़लंदाजीची देणगी दिली आहे त्याचप्रकारे अत्र्यांवर तर परमेशवराने विविध गुणांची उधळणच केली होती.त्यांनीसुदधा हया दैवी देणगीचा विविध क्षेत्रात योग्य वापर करुन तिला योग्य न्याय दिला.तर हे पुस्तक वाचुन माझ्या मनात जी काही आदर्श व्यक्तीमत्व आहेत त्यात एक नाव वाढल…

ते शिक्षणतज्ज्ञ, एक उत्कॄष्ट मराठी लेखक, एक श्रेष्ठ कवी,प्रभावी वक्ते,एक उत्तम क्रिकेटपटू, वृत्तपत्राचे संस्थापक व संपादक, राजकीय नेते,विंडबनकार,नाटककार, चित्रपट निर्माते-दिग्दर्शक-पटकथा लेखक होते.अष्टपैलु हे विशेषणही कमी पडाव अस त्यांच एकुण व्यक्तीमत्व होत.

अत्र्यांचे पुर्ण नाव प्रल्हाद केशव अत्रे.आचार्य  ही उपाधी त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कामगीरीबद्दल दिली.वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी त्यांनी  ’महाराष्ट्र मोहरा’ ही कांदबरी लिहली. कुठेही काही चांगल आढळल की त्याला उत्स्फ़ुर्त दाद दिल्याशिवाय त्यांना राहवत नसे.तसेच ते हजरजवाबीही होते.एखाद्याची कोणती गोष्ट रुचली नाही कि ते अगदी सडॆतोड आणि आक्रमक भाषेत उत्तर देत.हयामुळेच अत्र्यांची बरयाच लोकांबरोबर भांडणही झाली.अशी भांडण असली तरी ज्याच्याबरोबर भांडायचे त्याला शिवराळ भाषेत ठणकावतांना त्याच्या चांगल्या गुणाची स्तुती करायला ते मागेपुढे पाहायचे नाही.संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अत्र्यांनी नेहरुंचा उलैख औरंगजेब म्हणुन केला तेव्हा एका नेहरु समर्थकाने त्यांना नेहरुंचा चांगुलपणा तुम्हाला दिसत नाही का असे विचारले असता अत्रे म्हणाले  ’वाघ जोपर्यंत  आम्हाला खातो आहे तोपर्यंत त्याच्या अंगावरच्या शोभीवंत पट्ट्यांचे कौतुक कोण करणार..? ’

अत्रे कोणत्याही क्षेत्रात शिरताना अगदी बेधडक घुसायचे. पण ज्या क्षेत्रात त्यांनी पाऊल टाकलं, ते क्षेत्र त्यांनी हादरवून सोडलं.नुसत नावादाखल एखाद क्षेत्र त्यांनी निवडल अस नाही तर ज्या  क्षेत्रात घुसले तिथे त्यांनी विशिष्ट उंची गाठलीच.आचार्य अत्रे यांनी प्रथम मकरंद व नंतर केशवकुमार या टोपणनावांनी काव्यलेखन केले. झेंडूची फुले  हा त्यांचा विनोदी व विडंबन कवितांचा संग्रह खूप गाजला.त्यांचा प्रेमाचा गुलकंद तर आठवत असेलच तुम्हाला.पाठ्यपुस्तकातील धडे सोप्या भाषेत असावेत असा त्यांचा आग्रह होता.चौथीच्या पुस्तकातील  दिनुचे बिल हया त्यांच्या धड्याने महाराष्ट्रातील किती पिढ्या हलवल्या ,घडवल्या. नाटकाच्या क्षेत्रात साष्टांग नमस्कार ने पदार्पण करत पुढे एकापाठोपाठ भ्रमाचा भोपळा, लग्नाची बेडी , घराबाहेर, उद्याचा संसार , तो मी नव्हेच अश्या अनेक लोकप्रिय नाटके लिहण्याचा सपाटाच लावला.पुढे चित्रपट क्षेत्रात उडी घेतल्यावर तिथेसुदधा  शामची आई  या त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटास राष्ट्रपती सुवर्ण पदक व महात्मा फुले या चित्रपटास रौप्यपदक प्राप्त झाले.

मराठा व नवयुग हया वॄत्तपत्रांतुन ते जनसामान्यांना मार्गदर्शन करायचे.वॄत्तपत्रांकडे धंदा म्हणुन त्यांनी कधीही पाहिल नाही.मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची नेतॄत्व आचार्य अत्र्यांनी अगदि समर्थपणे आपल्या खांद्यावर  पेलले . त्यांच्यामुळेच आज संयुक्त महाराष्ट्र होऊ शकला असे म्हंटल्यास ते वावगे ठरणार नाही.त्यांच्यासारखा निस्वार्थी नेता आज आपल्याला लाभायला हवा.अत्रे  भाषणातुन हशा व टाळ्यांसह आपले परखड विचार जनसामान्यांसमोर योग्य भाषेत मांडायचे.विनोदाचा प्रभावी वापर ते त्यांच्या भाषणात करायचे.अत्र्यांचे काही विनोदी किस्से वाचण्यासाठी इथे भेट दया. त्यांच्या वाणीने उभ्या महाराष्ट्रातील जनतेला आपलेसे केले होते.बाळासहेब किंवा राज ठाकरे हयांच्या वक्तॄत्वावरही आचार्यांच्या वक्तॄत्वशैलीचा  प्रभाव असल्याचे सांगीतले जाते.तशीही प्रबोधन ठाकरे आणि अत्रेंची तब्बल ३५ वर्षाची मैत्री होती.स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात कॉंग्रेसपक्ष अत्र्यांनीच फ़ुलविला.त्यांनी कॉंग्रेसची अगदि मनापासुन सेवा केली पण तेच जेव्हा कॉंग्रेसची मते त्यांना पटेनाशी झाली तेव्हा त्याच तिव्रतेने ’ अब हमारी दुश्मनी देख लो’ च्या तोर्यात त्यांनी कॉंग्रेसला चांगलच  फ़ैलावरही घेतले.

एकुणच अत्र्यांच्या भव्य व्यक्तीमत्वाची ओळख योग्य शब्दात केली आहे हया पुस्तकात. सुरुवातीला अत्रेंच्या कन्या शिरीष पै हयांनी लिहलेली प्रस्तावनाही वाचण्यासारखी आहे.पुस्तक घटनांनुसार न लिहता अत्र्यांच्या  व्यक्तीमत्वाचा एकेक पैलु उलगडत लिहले आहे त्यामुळे ते जास्त प्रभावी ठरले आहे.असे असले तरीही बर्याच घटनांचे संदर्भ पुस्तकात  परत परत आलेले आहेत.त्यामुळे मध्ये मध्ये थोड रिपीटेशन वाटत पण एकुणच पुस्तक वाचनीय आहे.शक्य असल्यास जरुर वाचा.  मी हे पुस्तक वाचल्यावर काही मित्र ज्यांना साहित्यात थोडाफ़ार रस आहे त्यांच्याशी अत्रेंबाबत चर्चा केली पण पुल,वपु,जीए यांबाबत चांगली माहिती असलेल्या बहुतेकांना अत्रेंबद्दल विशेष माहिती न्वहती.मला वाटते आजच्या पिढीला तरी अत्रेंबाबत जास्त माहिती नाहिये.कदाचीत हे चुकही असु शकेल कारण खुपच कमी लोकांच्या आधारावर हे विधान करतो आहे पण तरीही  जी लोकप्रियता पुलना व्यक्तीगतरीत्या आजही मिळते आहे तेवढी अत्रेंना मिळत नाहिये हे मात्र नक्की.

एकेकाळी आपल्या जादुई व्यक्तीमत्वामुळे अवघ्या महाराष्ट्राला भारावुन टाकणारया खरया अर्थाने आचार्य असलेल्या हया   अवलियाला  माझे लाख लाख सलाम…..