खेळ मांडला …

लगोरी ,विटी दांडू,क्रिकेट , गोट्या,खांब-खांब,पकडापकडी (टॅम्प्लीज  🙂 ) ,साखळी, लपाछपी(रेडीका 🙂 ), चोर-पोलीस, विषामृत, टीपीटीपी टीप टॉप,लंगडी,संत्रे-लिंबू,बुद्धीबळ, सापशिडी, नवा व्यापार, लुडो, पत्ते(रमी, मेंढीकोट, तीनपत्ते ,चॅलेंज,डॉंकी-मंकी,सात-आठ, पाच-तीन-दोन, गुलामचोर, किलबिल,बदाम सात …) ,पत्त्यांचे बंगले,कागदाची विमान-होड्या,नागाफफू,डोंगर का पाणी (‘डोंगराला आग लागली पळा..पळा..पळा…’ :))खोखो,मामाच पत्र ,भोवरा ,कांदा-फोडी……हुश्श….

काय ही सगळी नाव वाचून तुमच मन  एकदम कृष्णधवल काळात नाही पण इस्टमनकलरयुगात नक्कीच गेल असेल, हो ना …ह्या सगळ्या खेळांना उधाण यायचं ते मे महिन्यात …आणि आता मे महिना सुरु झालाय…काय परत हरवलात ना जुन्या आठवणीत …खरच अगदी नॉस्टॅल्जिक करून टाकतात ह्या बालपणीच्या खेळांच्या आठवणी.

हे आणि ह्यांसारखे अनेक खेळ मी प्रत्यक्ष खेळलो आहे ह्याचा मला  सार्थ अभिमान आहे, कारण ह्यातले बरेचसे खेळ आता फक्त अश्या आठवणी काढण्यासाठीच बाकी राहिले आहेत.हे खेळ शालेय अभ्यासाबरोबरच  मुलांची शारीरिक, सामाजिक, मानसिक वाढ  तसेच बौद्धिक जडण-घडण होण्यात महत्वाची भूमिका बजावतात. मैदानी  खेळांमुळे  शरिरास व्यायाम मिळतो.काहीं खेळांमुळे संघभावना वाढीस लागते,नेतृत्व गुणाची वाढ होते,कल्पकता वाढते ,निर्णयक्षमता वाढते. खेळ आपल्याला नियम पाळायला शिकवतात तसेच पराभव पचवायला शिकवतात.ज्याची पुढील आयुष्यात आपल्याला नितांत गरज असते. हे खेळ आपल्या मनावरील ताण नाहीसा करून आपल्याला ताजतवान  करतात.

पण काळानुसार वरील अनेक खेळ हळूहळू हरवायला लागले.क्रिकेटने अनेक खेळांना नामशेष होण्यात महत्वाचा वाटा उचलला.प्रत्येक जण फक्त क्रिकेटचाच विचार करत हातात बॅट हातात घेऊन स्वत:ला ‘सचिन’  समजू लागला.  पुढे व्यसन लावणारे टीवी व्हिडिओ गेम आले. मैदानातला खेळ घरच्या टीवी मध्ये शिरला.सुपरमारियो,पॅकमन,कॉनट्रा,डक हंट असे खेळ फेर धरू लागले. मग सुरुवातीला सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असलेले संगणक घरोघरी येऊ लागले.मग त्यावरील विविध खेळ जोर धरू लागले.बर्याच ऑनलाईन खेळांची गर्दी झाली.पुढे प्ले-स्टेशन,एक्स बॉक्स अशी ‘पेशल’ खेळाची उपकरण आली.’नथिंग इज परमनंट’ ह्या उक्तीप्रमाणे  खेळांमध्ये हळूहळू झालेले हे बदल ,संक्रमण आपल्या पिढीने अनुभवलं.आणि आता राज्य आल आहे ते अँड्रॉइड आणि आयफोन वरील गुरुत्वाकर्षण ,गती,दिशा अशी सेंसर्स असणाऱ्या टच सेन्सिटिव  खेळांच …

तर काही महिन्यापूर्वीच मी अँड्रॉइडन झालो आणि त्यावरील विविध ‘अॅप्स’ बरोबरच विविध खेळांनी मनाला भुरळ घातली.खेळांपासून बराच काळ दूर राहिलेलो मी गेले काही महिने मनसोक्त खेळ खेळ खेळलोय.तर मी खेळलेल्या खेळांतील मला आवडलेल्या काही खेळांची मी इथे तुम्हाला ओळख करून देतोय.

वैधानिक सूचना :खाली नमूद केलेले सर्व खेळ हे अँड्रॉइडमार्केटवर खरोखरच तेही चकटफू उपलब्ध असून इथे लिहलेल्या सर्व माहितीशी त्यांचा वास्तव संबध आहे .हे सर्व खेळ साधे असले तरी  अतिशय व्यसनी असून त्यामुळे तुमच्या वेळेबरोबरच तुमच्या डोळ्यांचीही पुरती वाट लागू शकते.सदर नुकसानाला दवबिंदु जबाबदार राहणार नाही ह्याची नोंद घ्यावी.  🙂

टेम्पल रन:

मला सगळ्यात जास्त व्यसन लावलेला किंवा मी सर्वात जास्त खेळलोय असा हा खेळ. तुम्ही म्हणजेच खेळातल पात्र एका पुरातन मंदिरातून एक महत्वाची जुनी मूर्ती चोरून मंदिराबाहेर पडता आणि भयंकर माकडरुपी राक्षस तुमच्या मागे लागतात आणि सुरु होतो ‘टेम्पल रन’….

t

कधीही न संपणारा असा हा खेळ आहे.वाटेत येणाऱ्या अडथळ्यांपासून वाचून तुम्हाला सतत धावत रहायचं आहे.कुठे जरा अडकलात कि मागचे राक्षस तुम्हाला पकडून  तुमचा लागलीच फडशा पाडतात.ह्यात खेळ संपल्यावर ज्या कारणाने खेळ संपतो त्या कारणाला अनुसुरून मनोरंजक वाक्य लिहून येतात जी वाचायला खरोखर मजा येते.ह्यात  उजव्या आणि डाव्या बाजूला वळण्यासाठी त्या दिशेला बोट स्क्रिन वर फिरवा.तसच उडी मारण्यासाठी पुढच्या बाजूला तर खाली झोपून जाण्यासाठी खालच्या बाजूला बोट फिरवाव लागत.आजूबाजूला जाण्यासाठी फोन त्या दिशेला (टील्ट करा) फिरवा. आणि अस धावत असतांना वेगवेगळी छोटी छोटी ध्येय आपल्याला पूर्ण करायची असतात तसेच  रस्त्यात मिळणारी पिवळ्या रंगाची  नाणीही आपण गोळा करायची कारण त्यांच्याद्वारे आपल्याला पुढे वेगवेगळ्या शक्ती प्राप्त करून घेता येतात.पुढे ह्या  नाण्यांचा रंग त्यांच्या किमतीप्रमाणे वाढून लाल ,निळा असा होतो. ह्या नाण्यांबरोबरच रस्त्यात तुम्हाला इतरही शक्ती मिळतात.ह्यात अदृश्य होण्याची शक्ती ,नाण्यांच चुंबक ,अतिजलद धाव ,नाण्यांची संख्या व किंमत वाढवायची शक्ती   अश्या शक्ती आहेत.आपण मिळवलेल्या नाण्यांद्वारे आपण ह्या शक्ती जास्त काळासाठी आपल्याकडे ठेऊ शकतो. तसेच नाण्यांनी आपण खेळात इतर पात्र सक्रिय करू शकतो तसेच पडण्यापासून जीवदान देणारे पंख सक्रिय करू शकतो.म्हणजेच एकूण अडथळ्यांपासून वाचत धावत जातांना नाणी गोळा करणही तितकच महत्वाच आहे. आणि जस जस तुम्ही पुढे पुढे जाता अडथळ्यांच प्रमाण आणि तीव्रता तसेच तुमचा वेग वाढत जातो. तर बघा तुम्हाला किती धावता येते ते…..

हा खेळ गुगल प्ले वरून इथून डाउनलोड करा. फेसबुकवर ‘टेम्पल रन’ला  सुमारे ७५ लाखाहून अधिक जणांनी पसंती दर्शवलेली आहे. तर ‘टेम्पल रन -२’  ह्या त्यांच्या नंतर  आलेल्या नव्या खेळाने पहिल्या १३ दिवसात ५०० लाखाहून अधिक वेळा डाऊनलोड होऊन मोबाईल गेमिंगमध्ये एक वेगळाच उच्चांक गाठला आहे. टेम्पल रन-२ च ग्राफिक्स अतिशय सुंदर आहे.

टेम्पल रनच्या यशामुळे  त्याच्याशी साधर्म्य असणारे अनेक खेळ आपल्याला प्लेस्टोर वर आढळतात.त्यापैकी खेळायचाच  असेल तर सबवे सर्फर आणि एजंट डॅश  हे खेळ तुम्ही ट्राय करु शकता.

व्हेअर इज माय वॉटर:

टेम्पल रनच व्यसन लागण्याआधी माझा सर्वात आवडता खेळ होता तो  व्हेअर इज माय वॉटर. डिस्नेने तयार केलेला हा खेळही  चांगलाच व्यसन लावणारा आहे.पण ह्यातल्या सगळ्या पातळ्या पूर्ण झाल्या  कि खेळ संपतो आणि बरोबर व्यसनही संपते.ह्या खेळात तीन भाग आहेत पहिला स्वँपी दुसरा मिस्ट्री डक्स आणि तिसरा क्रँन्की स्टोरी.

w

स्वँपी हा ह्यातील सगळ्यात मोठा भाग.ह्यात खेळातील ‘लॉजिक’नुसार १० प्रकरण आहेत प्रत्येक प्रकरणात  २० अश्या एकूण २०० पातळ्या ह्या भागात  आहेत.पण सुरुवातीला फक्त ह्यातील पहिल प्रकरण ‘मिट स्वँपी’  हे  खेळण्यासाठी मुक्त असते .जशी जशी तुम्ही रबराची बदक मिळवाल त्याप्रमाणे त्यांच्या संख्येनुसार पुढील प्रकरण खेळण्यासाठी  मुक्त होत जातात. ह्यात आपल्याला स्वँपी नावाच्या शहराच्या खाली राहणाऱ्या एका मगरीला विविध अडथळे दूर करत आंघोळीसाठी पाणी पोहोचवायच आहे.त्याबरोबरच रबरी बदक व स्वँपीसाठी इतर वस्तूही मिळवायच्या आहेत. सुरुवातीला सोपा असलेला हा खेळ नंतर नंतर आपल्याला डोक खाजवायला भाग पाडतो.हा खेळ खेळण्यासाठी विज्ञानाच प्राथमिक ज्ञान असण आवश्यक आहे.मिस्ट्री डक हा दुसरा भागही स्वँपी सारखाच आहे फक्त ह्यात पाणी स्वँपीपर्यंत पोहोचवण्याबरोबरच रबरी  बदक मिळवण हे ती पातळी पूर्ण होण्यासाठी आवश्यक असत. ह्यात पाच प्रकरण आहेत व प्रत्येकात २० पातळ्या आहेत .तिसरा भाग म्हणजे क्रँन्की स्टोरी ह्यात सगळी समीकरण उलटी होतात कारण ह्यात आपल्याला क्रँन्कीच्या जेवणावरील अल्गी बाजूला करण्यासाठी पाण्याएवजी अॅसिड   क्रँन्कीपर्यंत पोहोचवायच असत. ह्यात प्रत्यकी २० पातळ्यांची चार प्रकरण आहेत.ह्या तीन भागाबरोबरच ह्या खेळात ‘दि लॉस्ट लेवल्स’ हा अजून एक बोनस भाग दिलेला आहे ह्यात १०-१० पातळ्यांची दोन प्रकरण आहेत.

लहान मुलांच्या  डोक्याला चालना देत त्यांच मनोरंजन करण्याची कामगिरी हा खेळ अगदी चोख बजावतो.तर तुम्हीही खेळा तुमच्या सोनू-मोनुला ही खेळायला द्या.

हा खेळ गुगल प्ले वरून इथून डाउनलोड करा.

 

अँग्री बर्डस :

अँग्री बर्डस …काय म्हणाव ह्या खेळाबद्दल ,सगळ्यात लोकप्रिय असा हा खेळ.खेळ जगतात मोठी क्रांती घडवून आणणारा हा खेळ.गुगल प्लेवर आतापर्यंत सगळ्यात जास्त डाऊनलोड झालेला हा खेळ… आता जवळजवळ सगळ्याच फोन्समध्ये  खेळ विभागात गेलात तर हा खेळ दिसतो इतका ‘कॉमन’ झाला आहे हा अँग्री बर्डस.तर काय आहे ह्या खेळात … खेळात आहेत काही पक्षी..त्यांची अंडी काही डुकरांनी चोरली आहेत ,आणि म्हणून हे पक्षी अँग्री झाले आहेत.त्यांना आता तुमच्या मदतीने त्या डुकरांना धडा शिकवायचा आहे.ह्यात प्रत्येक पक्षाच वेगळी ताकद असते ती समजून बेचकीच्या माध्यमातून  कितीचा कोन वापरायचा, किती जोर लावायचा हे ठरवून  दिलेलं ‘टास्क’ पूर्ण करायचं असते.पण एकदा का आपण  ह्या पक्षांच्या राज्यात शिरला कि तिथे आपण  चांगलेच गुंग होतो,आणि हळूहळू ह्या खेळाला अँडिक्ट होतो.

a

अँग्री बर्डसचे अँग्री बर्डस,अँग्री बर्डस रियो ,अँग्री बर्ड सिजन्स,अँग्री बर्ड स्पेस आणि अँग्री बर्डस स्टारवॉर्स अशी  अनेक वर्जन्स हळूहळू येत गेली. गुगल प्ले , आय.ओ.एस. तसेच संगणक ह्या  सगळ्या प्लॅटफॉर्मवर सगळ्या  वर्जन्सच्या  एक बिलीयन्सपेक्षा जास्त डाऊनलोड मिळवण्याचा चमत्कार ह्या खेळाने केला आहे.ह्यातला अँग्री बर्ड स्पेस हा खेळ तर तयार करण्यात आलाय तो चक्क ‘नासा’च्या मदतीने.बच्चेकंपनीत तर हा खेळ इतका लोकप्रिय आहे कि अँग्री बर्डसचे चित्र असलेले  लाखो  टी शर्ट,वॉटर बॅग,स्कूल बॅग,कंपासपेटी तसेच अँग्री बर्डसच्या  बाहुल्या व त्यावर आधारित अनेक खेळ मार्केटमध्ये सहज खपून गेले.कधीतरी असाच कंटाळा आल्यावर ह्या पक्षांच्या राज्यात शिरा त्यांच्या रागाच्या माध्यमातून तुमचा स्ट्रेस कसा निघून जातो आणि तुम्ही कसे ताजेतवाने होता हे अनुभवा ……जर अजून हा खेळ तुमच्या मोबाईलमध्ये नसेल तर चला  पटकन इथून उतरवून घ्या..

अँग्री बर्डसचेच निर्माते  रोवियो यांनी बनवलेला  बॅड पिगीज हा मजेदार खेळही तुम्ही खेळून बघा.ह्यात समीकरण थोडी उलटी आहेत  उडणाऱ्या,रोल होणाऱ्या,स्पीन होणाऱ्या, क्रॅश होणाऱ्या उपकरणांतून तुम्हाला डुकरांना पक्षांच्या अंड्यापर्यंत पोहचवायच आहे.हा खेळ इथे उपलब्ध आहे.

डूडल जंप :

d

मी अँड्रॉइड जगतात शिरायच्या आधीपासून माझ्या नोकीयावर खेळत असलेला आणि अँड्रॉइडन व्हायच्या आधीचा माझा सर्वात आवडता असा हा खेळ. तसेच मी विकत घेतलेलाही  हा पहिला खेळ.अँग्री बर्डस यायच्या आधीपर्यंत  डाउनलोड्सचे अनेक विक्रम स्वत:च्या नावावर असणारा असा हा खेळ.ह्यात एक  चार पायाचा डूड्लर आहे.आपल्याला मोबाईल टील्ट करून त्याला आडव्या-उभ्या हलणार्यां ,तुटणाऱ्या पायऱ्यांवर उड्या मारत वर वर न्यायच आहे.ह्यात अधूनमधून  कमी वेळात जास्त अंतर कापण्यासाठी स्प्रिंग , जेटपॅक व रॉकेट अश्या सोयीही उपलब्ध होतात.पडण्यापासून सांभाळताना रस्त्यात असणाऱ्या राक्षसांपासून तसेच यूएफओ,काळ्या विवरांपासून ही आपल्याला वाचायचं असते.राक्षसांना आपण स्क्रिन वर टॅप करून गोळ्या मारून संपवू शकतो.टेम्पल रन प्रमाणे हा खेळही कधीही न संपणारा असा आहे. ह्यात आपण वेगवेगळ्या थीम वापरून डूड्लरचा लुक व खेळाच बॅकग्राउंड बदलु शकतो.काही दिवसापूर्वीपर्यंत ५३.० रु ला असलेला खेळ आता गुगल प्लेवर चकटफू उपलब्ध आहे. मग कसला विचार करता ,चला उड्या मारत ह्या  डूड्लच्या जगात …

हा खेळ गुगल प्लेवरून इथून डाउनलोड करा.

कट दि रोप :

c

कट द रोप हा सुद्धा एक सुंदर व डोक्याला चालना देणारा खेळ आहे . ह्या खेळात ओम नोम ह्या छोट्या हावरट राक्षसाला कँडी पुरवत राहाणं हा या खेळाचा उद्देश आहे. कँडी लावलेल्या दोऱ्यांवरुन बोटं फिरवून त्या दोऱ्या तोडायच्या आहेत आणि कँडी ओम नोमपर्यंत पोहोचवायच्या आहेत. धागे तोडताना मध्ये असणारे  स्टार्स  घ्यायला विसरायचं नाही.तसेच मधल्या काट्यांपासून कँडी लांब ठेवायची.कँडीचा  काट्यांना स्पर्श  झाला तर लेव्हल परत पहिल्यापासून सुरु होते . हवेचे बुडबुडे आहेत, ते कँडीला वरवर घेऊन जातात. या बुडबुड्यांबरोबर कँडीला दूर उडवण्यासाठी हवेच्या पिशव्याही आहेत.तसेच आपली कँडी कोळ्यांपासून वाचवायला हवी. कारण हे कोळी कँडी खातात आणि पहिल्यापासून सुरु होते . मध्येमध्ये विजेचे स्पार्क्सही असतात. त्याला स्पर्शजरी झाला तरी लेव्हल पहिल्यापासून सुरु होते सुरुवातीला सोपा वाटत असला तरी हा खेळ  पुढे डोक खाजवायला भाग पाडतो.तेव्हा ह्या सगळया अडथळ्यांपासून वाचत ओम नोम ला  कँडी खायला द्यायची आहे .तो वाट बघतोय ,तुम्ही त्याला कँडी द्याल ना ?  🙂

हा खेळ गुगल प्लेवरून इथे उपलब्ध आहे.

वरील खेळांप्रमाणेच ड्रॉप , फ्रूट निन्जाहॅपी फॉलस्पीड मोटो ,कँडी रेसरबॉटल शुटर  हे सुद्धा काही साधे आणि सुंदर खेळ तुम्ही ट्राय करू शकता .तेच खेळ खेळून कंटाळा येत असेल तर  छोटेमोठे  १३४ खेळ एकाच खेळात असलेला हा खेळ डाउनलोड करून ठेवा. 

हे खेळ आता काही नुसते खेळ राहिले नाहीयेत तो एक नवा करिअरचा पर्याय म्हणूनही समोर येतोय.खेळ आता कोट्यवधींची उलाढाल असलेली एक इंडस्ट्री आहे.जपान आणि युरोपातील काही देशात सिनेमापेक्षाही ही गेम्स इंडस्ट्री जास्त कमाई करून देणारी ठरली आहे. लाखो लोकांना ह्यातून रोजगार मिळतोय.ह्या  खेळांच सगळ्यांना खुलं आमंत्रण असतं. तुम्हाला हव्या त्या तऱ्हेचा खेळ इथे उपलब्ध असतो . रेसिंग आहे,  अँक्शन आहे,अॅडवेंचर आहे. डोक्याला खाद्य देणारे स्ट्रॅटेजी गेम्स आहेत,पझल्स आहेत.इथे काळ-वेळ पाळायच बंधन नाही म्हणजे रात्र झाली तर फुटबॉल-क्रिकेट कस खेळणार.किंवा क्रिकेट खेळायला मैदान/जागाच नाही अस इथे नाही. शिवाय खेळ  कुठे कधी कसा खेळायचा ते तुमच्यावर आहे. घरी बसून कंटाळलात आरामात पीसी किंवा लॅपटॉपवर खेळा.प्रवास बोअर करतोय  मोबाईलवर खेळा.खेळ म्हणजे फक्त लहानांसाठी ही संकल्पनाच आता उरलेली नाही.ह्या  खेळांना वयाची काही अट नाही. तरुण, वयस्कर,बायका-पोर,लहान-थोर  सगळ्यांनाच याचं वेड लागू  लागलंय….कालाय तस्मै नमः

startanimW

घराच घरपण …

‘ही काय कटकट आहे, ‘ अस मनातल्या मनात चरफडतच  मी मोबाईलमधून वाजणारा अलार्म कोणततरी बटण  दाबून बंद केला.एव्हाना डोळ्यावर सूर्याची कोवळी किरणही ‘ठकठक ‘ करायला लागली होती.मी डोळ्याचा पडदा थोडासा ‘मायक्रोमीटर’ उघडून इथे तिथे पाहिल.मी आमच्या गावातल्या घरात होतो आणि ते जाणवल्यावर मी जरा जास्तच ‘रिलॅक्स’ झालो. वर तो थोडासा जुना झालेला पंखा एक विशिष्ट आवाज काढत आपल्याच लयीत फिरत होता.भिंतीवर सूर्यकिरणांनी मस्त नक्षीदार रांगोळी काढली होती.देवघरातील अगरबत्ती,बाहेर पेटत असलेल्या चुलीतील धूर ,त्यावर तयार होत असलेली भाकरी ,कोणततरी फुललेल फुल आणि दुसरेपण कसलेतरी पण  छानच वाटणारे वेगवेगळे  वास ‘हर हर महादेव’ करत वेगवेगळी आवर्तन घेत  माझ्या  नाकाच्या गुहेत शिरकाव करत होते. कसल्याश्या पक्षांचा हलकासा किलबिलाट चालू होता.जणू ते माझ्यासाठी ‘उठी उठी गोपाळा ‘ चे रागच आळवत होते.सगळ कस मस्तच वाटत होत,पण तितक्यात मोबाईल परत बोंबलायला लागला.ह्यावेळी मी डोळे थोडेसे जास्त ‘मायक्रोमीटरने’ उघडले.वर नजर गेली तर तो आमच्या कॉलनीतल्या घरातला मॅड पंखाच स्वत:भोवती गिरक्या घेत घेत माझ्याकडे बघून हसत होता.मी लागलीच मोबाईल हातात घेतला तेव्हा लक्षात आल केव्हापासून  ‘स्नुझ’  करत करत आता ऑफिसची  बस यायला केवळ १५ मिनटे राहिली होती.क्षणार्धात अवघ जगच पालटलं होत. मी मनाच्या इच्छेविरूद्ध त्याच्याशी जोरदार लढा देत कसाबसा अंथरुणावरून उठलो आणि झटपट पुढच्या तयारीला लागलो. 🙂

मित्रांनो तुमच्याबरोबर अस कधी झाल आहे का कि कोणत्यातरी क्षणी तुम्हाला राहत्या घरात असतांना गावातल्या घरात वैगेरे असल्याच जाणवत.बघा आठवून कारण  माझ्याबरोबर अस एकदा नाही तर चांगल तीन-चार वेळा झालेलं आहे .नाही माझा ऋषी कपूरच्या ‘कर्ज ‘ सिनेमासारखा काही ‘सीन’ नाहीये,कारण हे घर माझ्यासमोरच बांधल गेल आहे त्यामुळे पूर्वजन्मात वैगेरे तिथे राहिल्याचा प्रश्न येत नाही.तस आम्ही लहान असतांना हे घर बांधल गेल आहे.लहानपणी मे महिन्याची सुट्टी पडली रे पडली कि आम्ही ‘डायरेक्ट’ गावी न जाता आधी  मुंबईला (जोगेश्वरी) राहणार्या आत्याकडे जायचो  आणि तिथे चांगली आठ-दहा दिवस धमाल करून मग आत्याच्या मुलांसह गावी परतायचो.पण ज्या वर्षी हे घर बांधल गेल होत त्या वर्षी फक्त दोनच दिवसात मी रडून गावी परतलो होतो,आणि परतायच कारण काय होत सांगू ?- ‘गावातल्या नवीन घराची आठवण’ !  🙂  आताही आम्ही सगळे एकत्र आलो आणि कधी ही माझ्या घराच्या आठवणीची आठवण निघाली कि चांगलीच खसखस पिकते.तर तेव्हा नक्की माझ भावविश्व काय होत ते अचूकपणे  सांगता येत नाही पण असा मी अगदी लहानपणापासून  घराशी वेगळ्याच धाग्याने जोडला गेलो आहे.

कसही का असेना पण आपल्या घरात आपल्याला जेवढी सुरक्षितता वाटते तेवढी कुठेच वाटत नाही.मी कुठेही बाहेर गेल्यावर परततांना कितीही उशीर झाला ,रात्रीच्या प्रवासाची रिस्क घ्यावी लागली ,झोप कमी घ्यावी लागली तरी बहुतांशी  कसपण घरी येऊनच अंग टाकतो.सकाळी डोळे उघडल्यावर आपल्या घरात असल्याचा ‘फील’ वेगळाच असतो.कोणाला पापी पोटासाठी नोकरी करतांना दर काही वर्षांनी घर बदलाव लागते.एका घराशी नात जोडायच आणि काही वर्षातच त्याचा निरोप घ्यायचा.  अश्या लोकांबद्दल मला खरच सहानुभूती वाटते.सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस साधारणत: अवघ्या आयुष्याची पुंजी ह्या घरासाठीच रिकामी करत असतो.तस पाहायला गेल तर आपल्या सगळ्यांचाच घराशी एक वेगळच नात निर्माण झालेलं असत.ते घर आपल्या सु:ख दुखाच ,अनेक छोट्यामोठ्या घटनांच मूक साक्षीदार असते.कोणी ह्याच घरात मरणाच्या दारातून परत आलेल असते,कोणाला नोकरीचा कौल ह्याच घरात आलेला असतो,कोणाच लग्न ह्याच घरात ठरलेलं असत,त्याच्याबरोबर/तिच्याबरोबर गप्पा मारत कधी अख्खी रात्र जागवलेली असते ती ह्याच घरात,चिंटूचा जन्म झाला तो ह्याच घरात,कोणाच्या पुर्वजांच्या अनेक आठवणी विखुरलेल्या असतात त्या ह्याच घरात…अश्या वेगवेगळया बंधानी लोक ह्या घराशी जुडलेले असतात .

नेटवरून साभार ....

असाच एकदा मी आमच्या घरी गेलो.तिथे पोहोचल्यावर मी फाटकरावांना  हळूच धक्का दिला कारण बऱ्याचदा त्यांना  प्रेमाची भाषा कळत नाही.पण असा थोडासा हिसका दाखवला कि रावांच डोक थोड ठिकाणावर येत.ते रागाने गुरगुरत कुरकुर करत उघडले गेले ,पण उघडता उघडता ओळख पटल्याने एक डोळा मिचकावून त्याने माझे लगेच स्वागतही केले .मी बाजूला नजर टाकली कुंपणही माझ्याकडे बघून एक मंद स्मिहास्य देत होत, मी त्या स्मितहास्याचा स्वीकार करून पुढे गेलो.अंगणात चालता चालता एका ठिकाणी थोड ओल होत तिथे माझा पाय सरकत होता पण मी थोडक्यात सावरलं आणि म्हटलं बराच ‘स्लीपरी’ झालाय हा भाग.त्यावर अंगण लगेचच ओरडल जरा डोळे उघडे ठेऊन नीट चालता येत नाही तूला   आणि मला बोलतोय ,हे पाणी पण सकाळी तूच इथे टाकलास ना ? वा रे ! तुम्हाला नाचता येत नाही आणि आम्ही वाकडे . सहीये!” मी कानावर हात ठेवतच  झटपट  पायऱ्या ओलांडून दरवाजेबुवांकडे कुच केल.दरवाजेबुवा हाताची घडी घालून मस्त उभे होते.ते रामसेंच्या चित्रपटात ह्यांचे कोण ते चुलत भाऊ आहेत ना ते खूप मोठ्या आवजात कुरकुरत असतात पण आमचे हे बुवा मात्र अगदी शांत कधी उघडले कधी बंद झाले कळतही नाही.पण ते रामसेवाले त्याचे चुलत भाऊ आपोआप उघडतात, ह्यांना मात्र आमचा हाताचा प्रेमळ स्पर्श हवा असतो.दरवाजेबुवांना गोंजारत मी घरात प्रवेश केला.आत दोन खुर्च्या मी त्यांच्या मांडीवर बसाव म्हणून आपापसात भांडत होत्या मी त्यांना ठेंगा दाखवत मऊ गादीवाल्या सोफाभाऊच्या कुशीत हळूच विसावलो.

तिथे बसतो न बसतो तोच चांगलाच गलबलाट ऐकू यायला लागला.सगळ्या भिंती ताई आपापसात गप्पा मारत होत्या.माझ्या आगमनामुळे कदाचित त्यांच्या गप्पात खंड पडला होता पण आता त्यांच्या गप्पा पूर्ववत झाल्या होत्या.एक भिंत म्हणत होती, “खूप बोअर झालय,अग ए खिडके केव्हापासून बाहेर काय  बघत बसलीयेस आम्हाला पण सांग ना काय  बघतेस ते.” खिडकीने काहीच उत्तर दिल नाही ती आपल्याच तंद्रीत होती.अस तासंतास  बाहेर बघायचं हाच तिचा छंद होता.ती कधीतरीच ह्यांच्या संभाषणात सहभागी व्हायची. मग मधली भिंत म्हणाली,  “अग बाहेर ना एक फुल मस्त फुलल आह. केव्हापासून एक भुंगा येऊन त्या फुलाच्या कानात गाणी म्हणतोय आणि त्यावर ते फुल खुश होऊन हसतेय आणि त्या भुंग्याला काहीतरी भेट देतेय.मग भुंगेबुवा त्याचा निरोप घेतात पण न राहावल्याने त्या फुलाकडे परत परत येत आहेत.मध्येच एखाद रंगीबेरंगी फुलपाखरुही त्या फुलाबरोबर खेळायला येतेय.सुंदरच चालू आहे ग सगळ आणि ही बया त्यांच्याच विश्वात रमली आहे ती कसलं तुला उत्तर देतेय.” ह्यावर ती बाहेरची भिंत बोलली ” बघ ना मी माझ्या हृदयात हिला जागा दिली आहे आणि ही अशी मला काही बाहेरील गमती सांगतच नाही .तुझ बर आहे ग तुला बाहेरच सगळ  दिसतेही आणि तुझ्या पाठीला मला सहन करावा लागणारे  उन्हाचे चटके ,वाऱ्याचा -पाउसाचा मारही बसत नाही.माझ मेलीच नशीबच फुटक.”

ह्यावर वरचे छप्परभाऊ  म्हणाले तुला तर काही वेळ ते उन्हाचे चटके वैगेरे सहन करावे लागतात मला तर संबध दिवस ते सगळ सहन कराव लागत.आणि तुम्ही स्वत:च्या पायावर उभ्या आहात मला हे अस तुमच्या कुबड्या घेऊन…..” छप्परभाऊंच बोलण पूर्ण व्हायच्या आधीच समोरचे भिंत कडाडली, “एs , जा ग … तुला माझ्याकडे पाठ करून ठेवलेला टीवी बघतांना कसली मजा येते ग.तेव्हा खिदळताय काय ते खोट दु:ख पाहून रडताय काय….ह्या माणसांना वाटत असेल तुझ्या चेहऱ्यावर अजून जो ओलावा आहे तो  पाऊसाच्या वैगेरे पाण्यामुळे असेल पण मला माहितेय काल ती सासुसुनेची कोणती मालिका चालू होती, ती बघून मुसमुसून रडत असतांना तो ओलावा आलाय ते.” तेवढ्यात समोरची दुसरी भिंत किंचाळली “जा ग तुम्ही सगळ्या माझे काय हाल होतात तुम्हाला काय सांगू , ह्या घरात कोणाचा वाढदिवस असो किंवा गणपती बाप्पांसारखा उत्सव असो;  हे लोक माझ्या अंगावर त्या चिकट गमने किंवा सेलोटेपने काय काय चिकटवत असतात.वर ती कसली लायटिंग सोडतात तिचा पण शॉक लागतो माहितीये मला कितीतरी वेळा ,अजून काही लावायला हे लोक खिळे काय ठोकतात माझ्या अंगावर ,मी तेव्हा  आतून खूप हादरते ,पण करणार काय. वर ते सगळ डेकोरेशन काढतांना कसलं ओरबाडून काढतात.हे माझ्या उजव्या हाताची तर चामडे सोलली होती ह्यावर्षीच गणपतीच डेकोरेशन  काढतांना.हे बघा, खरचडल्याच निशाण कस दिसते आहे ते.तुम्ही आपल तेव्हा बोलता ”  कसली नटलीये बघा” ,पण माझ मलाच माहिती ग बाई! ”

एवढ्यात आतल्या बेडरूमची भिंत मधून म्हणाली , ” काय रडत बसल्यात तुम्ही नुसत्या…त्या तिथ शहरात बघा आपल्या सारख्या भिंतीना  ही माणस दहीहंडीला कशी एकावर एक थर करून उभी असतात,तस एकमेकींच्या खांद्यावर  एकमेकांच ओझ घेऊन उभ राहायला लागत …बिल्डिंग का काय अस म्हणतात त्याला … ” बाहेरची एक भिंत म्हणाली ” अग बाई !खरच का..आणि तुला कोणी ग सांगितलं हे ?.” आतून परत आवाज आला ” अग तिकडे माझी  मामेबहिण आहे ना पंधराव्या थरावर ,तीनेच मला वारयाभाऊकडून त्यादिवशी ‘मेसेज’ पाठवला होता. बर ते जाऊ दे मी आता तुम्हाला कि नाई एक गंमत सांगते. आता लवकरच दिवाळी येत आहे आणि मी कालच त्या माणसांच बोलण ऐकल ते कि नाई आपल्या सगळ्यांना नव्या रंगाचे कपडे घालणार आहेत.आणि त्या छपर भाऊला सांगा त्याला ना ते काहीतरी ‘पीओपीचा’ ड्रेस आणणार आहेत म्हणून ..”

मग काय सगळ्या भिंतींचा एकच गलबलाट सुरु झाला.त्याक्षणी मला वाटलं कोण म्हणत भिंतीना कान असतात ? भिंतीना फक्त एकच अवयव असतो- तोंड! असो त्यांचा किलबिलाट काही लवकर बंद होणार नव्हता, तेव्हा मी घराच्या मागे गेलो.त्यांच्या किलबिलाटात एका भिंतीच बोलण मात्र मला आवडलं ती म्हणत होती, ” आपल्या सर्वांमुळे हे घर उभ असल तरी  खऱ्या अर्थानं ते जिवंत असते त्या ह्या घरात राहणाऱ्या माणसांच्याच अस्तित्वानं,आणि आता दिवाळीला तर हे सगळे  इथे एकत्र येणार… सगळ कस भरभरून जाणार..एकदम धमाल.. दिवस कसे सरतील ते कळणारही नाही …ही दिवाळी वर्षातून दोनदा का ग येत नाही ? ”

घराच्या  मागे गेल्या गेल्या तिथली पायरी बोलली ” ये बैस माझ्या मांडीवर ,मी तुझी लहानपणापासूनची मैत्रीण आहे.आजवर कितीतरी कातरवेळा तू माझ्यासोबत घालवल्या आहेस.तुला जरा दु:ख झाल ,जरा काही तुझ्या मनाला लागल कि तू इथे यायचास.हुंदके देत माझ्याशी ते ‘शेअर’ करायचास.तू दु:खी झाल्यावरच माझ्याकडे येत असल्याने तुझी नेहमीच आठवण येत असूनही तुला माझ्याकडे यायला लागू नये असच मी देवाला म्हणायचे.बर तुला आठवते तू सर्वात पहिला माझ्याजवळ कधी आला होतास ते ..” मला बरेचसे क्षण आठवून गहिवरल्यासारख  झाल होत.त्या पायरीची पहिली भेटही आठवली, मी तिला त्याबद्दल सांगणार इतक्यात ….. मोबाईलचा अलार्म जोरजोरात वाजायला लागला.

[हा लेख याआधी ‘मोगरा फुलला ई-दिवाळी अंक-२०११’ इथे प्रकाशित झालेला आहे.]