आपण हे करायचे का ??

“आपण करायचं का हे? काय वाटतं सगळ्यांना?” अशी या सगळ्याची सुरुवात झाली.

लहान लहान मुलं. स्कूलबसच्या हॉर्नच्या आवाजावर सोसायटीच्या पेव्हमेंटवर आपली नाजूक पावलं दुडदुडत टाकत आपल्या कार्टूनच्या सॅक्स सांभाळत त्या दिशेने धावणारी मुलं आणि पाठीमागे त्यांचे उरलेलं सामान घेऊन धावणार्‍या मम्मीज. किती सुरेख चित्र आहे नं. पण सगळ्याच गोंडस मुलांच्या नशिबी असं चित्र असतेच असं नाही. कित्येक मुलांना शाळा म्हणजे काय आणि तिथे का जायचं असतं हेच माहित नसतं. आम्ही नाही का न शिकता जगलो, तसंच आमची मुलं जगतील अशाच समजुतीत त्यांचे पालक. पण हेच चित्र बदलण्यासाठी काही मंडळी मनापासून झटतायेत, नव्हे आपलं सगळं आयुष्य त्यांनी तिथे समर्पित केलंय. असेच एक कुटुंब म्हणजे आमटे परिवार. आता याबद्दल आम्ही काही सांगायला नकोच. बाबा आमटे, साधनाताई आमटे यांच्यापासून सुरु केलेले व्रत प्रकाशकाका, मंदाताई यांच्यासह तुमच्या आमच्या पिढीचे अनिकेतदादा पुढे चालवत आहेत. हर्क्युलसला पृथ्वी तोलताना कमी कष्ट झाले असतील, एवढ्या अडचणी या मंडळी आदिवासी जनतेच्या पुनुरुत्थानासाठी सोसत आहेत. त्यांची ध्येयासक्ती अमर्यादित आहे. त्याच प्रेरणेतून साकार झालेला लोकबिरादरी प्रकल्प. आदिवासी जनतेसाठी दवाखाना, शाळा, वन्य प्राणी अनाथालय असे अनेक लोकोपयोगी उपक्रम या परिवाराच्या पुढाकाराने सुरु केले आहेत.

त्यातलाच एक म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शाळा. प्रकाशकाका आणि मंदाकाकींची मुलंही याच शाळेत आदिवासी मुलांसोबतच शिकली. या शाळेला दरवर्षी होणारा (रिकरिंग) खर्च म्हणजे शाळेचे युनिफॉर्म्स. प्रत्यक्ष अनिकेत आमटेंचा त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून पाठवलेला आलेला हा इमेलच त्यांची गरज सांगून देतो.

नमस्कार
इमेल बद्दल आभारी आहे .
रंग महत्वाचे नाहीत. उत्तम दर्जाचे व टिकावू नवीन कपडे हवेत.
२ ते २० वयोगटातील प्रत्येकी २० ड्रेस हवेत.

आता आपण वेगवेगळे पाठवणे म्हणजे वेगवेगळे रंग आणि मापं, शिवाय थोडे महागही पडणार. म्हणूनच आमच्या ब्लॉगर्स मित्रांनी मिळून एकत्र काही तरी करायचे ठरवले आहे. प्रत्येक वयोगटासाठी २०-२५ जोड याप्रमाणे इयत्ता १ली ते १०वी पर्यंतच्या मुलांसाठी कपडे पाठवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी येणार्‍या खर्चाचा तक्ता खालीलप्रमाणे आहे.

Screen area1-001

Screen area2-001

आपल्याला काय करता येईल?

आमच्या प्रामाणिक हेतूबद्दल खात्री असेल तर आपला खारीचा वाटा उचलता येईलच. अर्थातच हिशोबात पूर्णपणे पारदर्शकता असणारच आहे.  आपली एकत्रित मदत हेमलकसाला पोचली की सगळा हिशोब ईमेलवर मिळेल. आपली मदतीची इच्छा असेल तर कृपया या लिंकवर जाऊन आपले डिटेल्स भरा.

https://docs.google.com/forms/d/1uk0BrxZC2TqWIF9kJUrs2H3UcTNMoIQj2zPW4cQg_cc/viewform

आपणांस हवी असेल तर आपण डायरेक्टली त्यांनाही आपली मदत पाठवू शकता. परंतु थेंबाथेंबाने पोचणार्‍या मदतीपेक्षा तेच थेंब एकत्र करुन किमान घोटभर का होईना आपण मदत पोचवू शकू ना? म्हणूनच हा प्रपंच !

टीप: आपण वस्तुरुपाने मदत पाठवत असल्याने आयकरात सवलत मिळेल अशी पावती मिळणे शक्य आहे असे मला वाटत नाही. तसा टॅक्स बेनेफिट हवा असेल तर थेट लोकबिरादरीच्या साईटवर डिटेल्स आहेत तिथे मदत पाठवावी. त्याचाही लोकबिरादरीला फायदाच होईल.

http://lokbiradariprakalp.org/getting-involved/donate/

– देवेंद्र चुरी

साभार  – पंकज झरेकर

Advertisements

क्यामेरा साथभी गवाँरा नही…..

गेली दोन-तीन वर्ष मी अगदी मनसोक्त भटकंती करतोय, अगदी वेड्यासारखा फिर फिर फिरतोय. गेल्या दोन वर्षातील माझ्या सुट्ट्यांचे उच्चांक ह्याचे जिवंत साक्षीदार आहेत.मागे वळून पाहायाची सवय तर नाहीच आपल्याला पण कधी आयुष्याचा हिशोब लावायला गेल आणि त्यात जर ह्या सुट्ट्यांच्या/वेळेच्या बदली काय कमावल असा प्रश्न आला तर त्याच उत्तर असेल स्वीज बँकेतही सामावणार नाहीत असे अनेक अनमोल क्षण…आणि असे हे अनेक अनमोल क्षण परत जिवंत करण्याच ,ते फील परत एकदा देण्याच काम करतात ती मी काढलेली छायाचित्र.मेंदूच्या हार्डडिस्कमधून पुसून गेलेल्या अनेक आठवणी रिस्टोर करायचं कामही हि छायाचित्र करत असतात . म्हणूनच तर भटकंती म्हटलं कि त्यातला एक अविभाज्य घटक म्हणजे कॅमेरा .

१० वर्षापूर्वी नोकरीला लागलो आणि ट्रेनिंगसाठी दोन वर्ष राजस्थानला जाण्यासाठी निघालो तेव्हा माझ्या इच्छेखातर वडिलांनी माझ्यासाठी दोन महागड्या वस्तू विकत घेऊन दिलेल्या ..सोनीचा वॉकमन आणि कोडॅकचा कॅमेरा (रीळवाला)…तेव्हा रीळाचे आकडे पाहत जपून काढलेले फोटो ,आणि काढलेले फोटो धुवून येईपर्यंत असलेली उत्सुकता…काय दिवस होते यार … खरच त्या फीलची मजा आजच्या डीजीटल युगात नाही.तर जयपूर,अजमेर,पुष्कर,चित्तोड,दिल्ली ,आग्रा अश्या अनेक ठिकाणच्या तेव्हाच्या आठवणी आज माझ्याकडे तीन वेगवेगळ्या अल्बम्समध्ये जिवंत आहेत.पुढे बरीच वर्ष मोठ्या भावाने घेतलेला निकॉनचा डिजीटल कॅमेरा एल -१८ कर्नाटक,गुजरात,मध्यप्रदेश,सिक्कीम,गंगटोक,दिल्ली,आग्रा,मथुरा,वृंदावन,हरिद्वार,ऋषिकेश, मसुरी अश्या  कितीतरी ठिकाणी नाचवत  त्याच्यापेक्षा जास्त मीच वापरला.पण नंतर ट्रेकिंगचा किडा जास्तच वळवळायला लागल्यावर ‘ये दिल मांगे मोअर’ हे उमजून कोडॅकचा २६ एक्स झूम असलेला झेड-९८१ हा कॅमेरा विकत घेतला.खरतर तेव्हा डीएसएलआर घ्यायचा होता पण बर्याच फोरम्सवर वाचल्यावर जाणवलं कि सरळ तिथे वळणे योग्य नाही.

तेव्हापासून कळसूबाईच्या शिखरापासून अमरनाथच्या गुहेपर्यंत,काश्मीर ह्या जमीनीवरील  नंदनवनापासून कासच्या निसर्गसौंदर्याने नटलेल्या पठारापर्यंत,गुजरातमधील डांग व कर्नाटकातील याना ह्या गर्द जंगलात ,पंढरपूर -अक्कलकोट-तुळजाभवानी -ज्योतिबा -महालक्ष्मी-मांढरदेवी   ह्यांच दर्शन घेत राजस्थानातील सर्वात उंच शिखरावरील दत्तांच्या व जम्मूतील वैष्णोदेवीच्या चरणी नतमस्तक होतांना ,सह्याद्रीच्या कड्याकपा-यातून तहानभूक विसरून भटकतांना,सोसाट्याचा वारा,उन- पाउस अंगावर झेलत कितीतरी  गडमाथ्यांवर पोहोचल्याचा आनंद उपभोगताना माझ्या सावलीप्रमाणे मला साथ दिली ती ह्या कोडॅक झेड-९८१ ने ….

मी फिरताना तर काही लिहित नाही ,फोटोच्या साह्याने जस जस क्रमाक्रमाने आठवत तस ब्लॉगवर लिहतो.म्हणजेच दवबिंदु वर ज्या भटकंतीच्या पोस्ट लिहल्या त्या ह्या काढलेल्या छायाचित्रावरूनच…तसेच भटकंतीच्या पोस्टमध्ये नुसत लेखनात गुंतवून ठेवण्याइतक शब्दसामर्थ्य माझ्याकडे  नसल्याने भटकंतीच्या पोस्ट आकर्षक बनवायचं आणि माझी  भटकंती अधिक चांगल्या रितीने व्यक्त  करण्याच  काम ह्या छायाचित्रांनी केल.तेव्हा  बघायला गेल तर दवबिंदुवर ह्या कोडॅक झेड-९८१चे खूप उपकार आहेत. आणि अस असतांना मी आज त्याची साथ सोडली आहे. 😦 तो माझा जीवाभावाचा सोबती आज माझ्याबरोबर नाहीये. आणि म्हणूनच त्याच्यासाठी ही पोस्ट लिहायला घेतली .आज तो प्रत्यक्ष माझ्याबरोबर नसला तरी त्याने टिपलेल्या असंख्य छायाचित्रातून  तो नेहमीच माझ्या सोबत असणार आहे.त्यातली बरीचशी छायाचित्र तुम्ही दवबिंदुवरील भटकंतीच्या पोस्टमध्ये पाहिली असतीलच पण  दवबिंदुवरील ड्राफ्टसच्या दुष्टचक्रात अडकल्यामुळे इथे प्रकट न झालेली काही छायाचित्र इथे जोडतो आहे.

This slideshow requires JavaScript.

कोडॅक झेड-९८१ ची सोबत सोडतांना मी कॅनॉन ११०० डी ह्या नव्या मित्राशी गट्टी जमवली आहे….डीएसएलआरच्या जगात शिरायची ही वेळ योग्य आहे कि माहीत नाही पण केव्हातरी शिरायचं होतच तर आता का नको…तेव्हा आता नव्या मित्राच्या  सोबतीने परत इथे प्रगट होईनच…तब तक के लिये…..तरी जाताजाता म्हणावास वाटतेय…

कॅमेरा साथ है तो ,मुझे क्या कमी है …..