पानिपत…

पानिपत….जे नाव नुसत ऐकल कित्येक मराठ्यांच्या काळजात कुठे ना कुठे एक ठोका चुकतोच…सव्वा लाख बांगडी फुटली अस वर्णन ज्याच केल जाते…मराठय़ांसाठी एक आख्यायिका बनलेल्या अश्या ह्या मराठय़ांच्या आणि एकूणच सबंध भारताच्या इतिहासावर सखोल परिणाम करणाऱ्या पानिपतच्या महासंग्रामाला येत्या १४ जानेवारी रोजी अडीचशे वर्षे पूर्ण होत आहेत.त्यानिमित्ताने गेल्या रविवारी विले पार्ले येथील जनसेवा समितीने साठ्ये महाविद्यालयात सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ‘पानिपतचा रणसंग्राम’ हा अभ्यासवर्ग आयोजित केला होता.विश्वास पाटील यांच पानिपत वाचल्यापासून पानिपत हा विषय माझ्यासाठी अधिकच जिव्हाळ्याचा झालेला असल्याने जेव्हा ह्या कार्यक्रमाबद्दल रोहनच्या बझावर कळले तेव्हा मी तिथे जायचच अस ठरवून टाकल होत.

खरच विश्वास पाटील ह्यांच पानिपत वाचतांना ज्याच्या अंगावर काटा येत नाही तो खरा मराठा नव्हेच,इतक सुंदर शैलीत त्यांनी हे पुस्तक लिहल आहे.पुस्तक वाचतांना कित्येक वेळा आपल रक्त अस सळसळते कि आता आपण उठून लढायला जाव अस वाटते. “बचेंगे तो और भी लढेंगे” म्हणत मृत्युला सामोरे जाणारया दत्ताजींचा व इब्राहीमखानाचा शेवट तसेच लढाई हरल्यावर झालेले मराठ्यांचे हाल हे प्रसंग त्यांनी असे उभे केले आहेत कि ते वाचतांना अगदी भरून येत,आत कुठे तरी आपण रडतो पण त्याबरोबरच संतापाची, त्वेषाची भावनाही उफाळून येते.ज्या भाऊचे कौतुक तत्कालीन उत्तरेतील लोकांनी केले व ते आजही करत आले आहेत,त्या भाऊला त्याच्याच मातीत वेडा ठरवले गेले.त्या भाऊंची बाजूही अगदी योग्यरीत्या ह्या कांदबरीत मांडली आहे. ‘पानिपत’ जरी कांदबरी स्वरुपात असल तरी ते नुसत्या ऐकीव कथांवर आधारित नाहीये. विश्वास पाटलांनी त्यासाठी खूप संशोधन केल आहे आणि त्यांची मेहनत पुस्तक वाचतांना आपल्याला नक्कीच जाणवते. ह्यावर्षी त्यांना पानिपताची ३० वी आवृत्ती काढावी लागत आहे ती नुसती नाही.


सुहास
त्याच्याबरोबर आलेले त्याचे मित्रवर्ग अर्चना ,धानद,प्रसन्न आणि मी असे आम्ही पाच जण कार्यक्रमाला गेलो होतो.अर्थातच कार्यक्रम परतेपर्यंत ते माझेही मित्र झाले होते. 🙂 रविवार सुट्टीचा,मजेचा दिवस असूनही सभागृह पूर्ण भरल होत.त्यातही तरुणांची संख्या जास्त होती,रविवारचा एक सबंध दिवस इतक्या लोकांनी ह्या पानिपत अभ्यासवर्गाला वाहिला हे पाहून खरेच बरे वाटले.कोण म्हणते मुंबईत मराठी माणूस राहिला नाही म्हणून…अस त्यावेळी उगाच वाटून गेल.ह्या कार्यक्रमाची मिडीयाने देखील दखल घेतली होती.बरयाच वृत्तपत्राचे प्रतिनिधी तसेच स्टार माझाचे प्रसन्न जोशी स्वत: कार्यक्रमाला उपस्थित होते.

कार्यक्रम बरोबर १० वाजता सुरु झाला होता. प्रस्तावना आणि पाहुण्यांच्या स्वागात संभारंभ आटोपल्यावर ज्येष्ठ इतिहास अभ्यासक श्री.निनादराव बेडेकर हयांनी पानिपतच्या रणसंग्रामामागील पार्श्वभूमीवर व्याख्यान दिले. त्यांची वक्तृत्व शैली खरच खूप सुंदर आणि जबरदस्त आहे,त्यात त्यांनी इतिहास अगदी घोळून पिला आहे त्यामुळे तारखां पासून ते छोटे छोटे संदर्भ अन व्यक्ती सगळच त्यांना तोंडपाठ आहे.त्यांच्या बोलण्यात दीड तास कसा भुर्रकन उडाला कळलेच नाही.त्यानंतर मिळालेल्या १० मिनटाच्या विश्रांतीच्या काळात आम्ही ट्रेकिंगसाठी वळवळणारे पाय मोकळे करण्यासाठी सभागृहाबाहेर आलो. 🙂 तेव्हा तिथे तीन वर्षापूर्वी सुहास आणि त्यांची भेट झालेल्या पार्श्वभूमीवर निनाद बेडेकर स्वत:हून आमच्याकडे आले आणि आम्हा सर्वांशी हस्तालोंदन केले.आमच्या सुदैवाने आम्हाला काही क्षणासाठी कां होईना त्यांच्याशी इतक्या जवळून प्रत्यक्ष बोलायला मिळाल.


त्यानंतर युद्धाचा बराच अनुभव असलेले,लष्करातील निवृत्त अधिकारी मेजर जनरल शशिकांत पित्रे ह्यांचे व्याख्यान झाले.त्यांनी त्यांच्या लष्करी नजरेतून पानिपत संग्रामाचे युद्धशास्त्रीय पैलू ,दोन्ही बाजूंच्या व्यूहरचना आदी विविध स्लाईडसच्या सहाय्याने चांगल्याच उलगडून दाखवल्या.पानिपत युद्धाच्या विश्लेषणांबरोबरच कोणत्याही युद्धावर परिणाम करणार्या काही ठळक महत्वाच्या बाबींची माहिती दिली.त्यानंतर पेटपुजा उरकल्यावर निनादरावानी त्यांच्या ऐतिहासिक पत्रांच्या अभ्यासातून त्यांना कळलेल्या अनेक लहान-मोठ्या किस्स्यांची जोड देत, त्यांच्या खास शैलीत पानिपतचा रणसंग्राम आमच्या डोळ्यापुढे उभा केला.त्यानंतर इतिहासाचे गाढे अभ्यासक पांडुरंग बलकवडे ह्यांनी युद्धानंतर निर्माण झालेली परिस्थिती आणि मराठा साम्राज्यावर युद्धाचा झालेला परिणाम या विषयांचा उहापोह आपल्या व्याख्यानातून केला.बोलतांना त्यांच्या त्वेष वाखाखण्याजोगा होता.आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची आठवण न ठेवणार्या आजच्या पिढीला त्यानी चांगलेच शाब्दिक फटके दिले.शेवटी प्रश्नोत्तरांचे सत्र चांगलेच रंगले व त्यानंतर यथावकाश कार्यक्रमाची सांगता झाली.तिथून निघाल्यावर आम्ही एक छोटेखानी खादाडी कार्यक्रम केला हे ही इथे नमूद करावेसे वाटते मला. 🙂

पानिपत रणसंग्रामाला १४ जानेवारी २०११ रोजी अडीचशे वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने पानिपतच्या योद्धयांना मानवंदना देण्यासाठी पानिपत रणसंग्राम स्मृती समिती व विवेक व्यासपीठ ह्यांच्या संयुक्त विध्यमाने ‘पानिपत वीरभूमी अभिवादन यात्रा’ आयोजिण्यात आली आहे. पानिपत अभिवादन यात्रेमध्ये पानिपतची युद्धभूमी, कुरूक्षेत्र, दिल्ली, आग्रा, वृंदावन आणि मथुरा येथील ऐतिहासिक स्थळांना ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञांबरोबर भेट देण्याचा कार्यक्रम आखण्यात आला आहे.महाराष्ट्रातील अधिकाधिक तरुण, नागरिकांनी यात्रेमध्ये सहभागी होऊन रणसंग्रामातील योद्धयांना मानवंदना देण्याचे आवाहान समितीकडून करण्यात आले आहे.ह्यासंदर्भात अधिक माहितीसाठी सा. विवेक कार्यालय मुंबई (०२२) २४२२ ०९४५१,१४४०,५३६९ आणि सा. विवेक कार्यालय पुणे (०२०) २४४८ १३९२ इथे संपर्क साधावा.

तर अश्या ह्या पानिपताला खूप जुना इतिहास आहे. महाभारतात पांडवांनी ज्या पाच शहरांची निर्मीती केली. त्यापैकि एक शहर पांडुप्रस्थ म्हणजेच आजचे पानिपत होय.पानिपत हे ठिकाण दिल्लीपासून ८५ कि.मी. अंतरावर हरयाणा राज्यात आहे.या पानिपतात तीन युद्धे लढली गेली पानिपतचे पहिले युद्ध १५२६ मध्ये दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोधी आणि बाबर मध्ये लढले गेले.पानिपतचे दुसरे युद्ध १५५६ मध्ये हेमू आणि मुघलांच्यात लढले गेले.ह्या दोन्ही युद्धात मुघलांची सरशी झाली.तिसरी लढाई झाली ती आपली…पानिपतचे हे तिसरे युद्ध झाले नसते तर कदाचित अहमदशाह अब्दाली हा भारताचा शासक झाला असता व भारत आज एक इस्लामिक राज्य असत.तसही ह्या तीनही युद्धापैकी एकाही युद्धाचा निकाल वेगळा असता तर भारताचा इतिहास वेगळा असता,हे वेगळ सांगण्याची गरज नाही.

पानिपतावरील ह्या युद्धाचा महाराष्ट्रातील जनमानसावर निश्चितच खोल परिणाम झाला होता.त्यामूळे ह्या युद्धा संदर्भातील अनेक बाबी पुढे म्हणी व वाक्यप्रचार म्हणून मराठीत रुढ झाल्या आहेत.पानिपत होणे (अगदी वाईट पराभव होणे ह्या अर्थी ),संक्रांत कोसळणे (संक्रातीच्या दिवशी हे युद्ध झाल्यामुळे मोठे संकट येणे ह्या अर्थाने ही म्हण वापरतात) ,पाचावर धारण बसणे (युद्धापूर्वी भाऊंच्या सैन्यात जी महागाई होउन जी भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली होती त्या संदर्भात),´विश्चास गेला पानिपतात` हे वाक्य तर अगदी सर्रास वापरले जाते,’१७६० काम काय करत बसला आहेस’ ह्यातील १७६० चा संदर्भही १७६० साली मराठ्यांनी संबध भारतात ज्या विविध मोहिमा आयोजल्या होत्या, त्याबाबत आहे.खरतर पानिपत हा तेव्हापासून मराठी संस्कृतीचा कसा कां होईना एक अविभाज्य घटकच बनलेला आहे.

मी जे काही वाचल आहे त्यावरून माझ्या मते पानिपत संग्रामातील पराभवाची कारणे खालील प्रमाणे आहेत.

१. सर्वात पहिलं आणि सर्वात महत्वाच कारण म्हणजे भाऊंना नको असतांनाही केलेला यात्रेकरुंचा आणि बुणग्यांचा भरणा.ह्यांची संख्या सैन्यापेक्षा अधिक होती,मराठ्यांच्या मंद हालचालीस,उपासमारीस एकूणच पानिपतच्या पराभवात ह्यांचा मोठा वाटा होता.ह्यांच्या रक्षणासाठी बरेच सैन्य उगाच खर्ची पडल.
२. सपाट भूमी असल्याने इब्राहिमखान गारद्याने सांगितलेल्या गोलाईच्या पद्धतीने लढाई खेळायचे ठरवलेले असतांना विठ्ठल विंचूरकर आणि दमाजी गायकवाड गोल तोडून बाहेर पडणे हा एक मोठा टर्निंग पोईंट होता युद्धाचा,कारण त्या मुळे अफगाण सैन्याला भारी पडत असलेल्या इब्राहीमखानाच्या तोफा बंद कराव्या लागल्या.
३. ह्या पराभवाचा ठपका मल्हारराव होळकरांवरही ठेवता येईल लढाई संपायच्या आत त्यांनी मैदान तर सोडलेच पण मुख्य म्हणजे हे युद्ध ज्या नजीबाने घडवून आणले त्याला आधीच मल्हाररावांनी हातात असतांना जीवन दान दिल होत.
४. वारंवार पत्र लिहूनही वेळेवर कुमक न पाठवलेल्या नानासाहेबांचाही ह्या पराभवात मोठा वाटा आहेच.
५. उत्तरेकडील एकाही सत्तेकडून मदत मिळवण्यास आलेले अपयश.
६. कुंजपुरायात पकडलेल्या अफागाण्यांवर इतक्या कमी कालावधीत विश्वास दाखवून त्यांना सैन्यात घेण,कारण त्यांनी युद्ध भरात असतांना मागे लुटालूट सुरु केली व अफगाणी सैन्यानेच मागून हल्ला केल्याचे वाटून
मराठा सैन्यात उगाच गोंधळ निर्माण होऊन सैन्य विस्कटल
७. अब्दालीने ज्याप्रमाणे राखीव सैन्याची एक तुकडी मागे ठरवली होती, जी अब्दालीच्या विजयाची शिल्पकार ठरली.तशी एखादी राखीव तुकडी मराठ्यांनी ही ठेवायला हवी होती.
८. भावनात्मक होऊन हत्तीवरून खाली उतरून भाउंनी केलेली चूकही आपल्याला चांगलीच महागात पडली.कारण ते तिथे न दिसल्याने ते पडले असे वाटून सैन्यातला गोंधळ अजून वाढण्यास मदत झाली.
९ . मराठा सैन्यात परस्पर विरोधी असलेले गट.
१० . मोठी रसद घेऊन येत असलेल्या गोविंद पंताच पकडल जाण,दुपारनंतर सूर्याची डोळ्यावर आलेली किरण,अब्दालीच्या उंटावरील लवचिक तोफांचा अभाव अश्या अनेक गोष्टी ह्या पराभवास कारणीभूत होत्या.

पानिपत म्हटले, की आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो तो फक्त पराभवाचा इतिहास….नामुष्की,हळहळ ,दु:ख…पण लक्षात ठेवा, पानिपतचा लढा महाराष्ट्रासाठी नव्हता तो होता संपुर्ण हिदुंस्थानासाठी,अवघ्या हिदुंस्थानासाठी मराठ्यांच्या एका संबध पिढीने दिलेलं बलिदान होत ते..ह्या गोष्टीचा सार्थ अभिमान बाळगायला नको कां ?… किंबहुना मला तर वाटते आपण ते युद्ध हरूनही जिंकलो होतो,कारण….

१) सर्वात प्रथम म्हणजे त्याकाळच्या जगातल्या एका मोठ्या शक्तीशाली आणि अनुभवी बादशहाशी मायभूमीच्या रक्षणासाठी आपण एकट्याने न भिता टक्कर घेतली होती.
२)युद्ध झाल्यावर अब्दालीने दिल्लीच्या बंदोबस्तासाठी मराठ्यांनाच परत कायम केले,ह्यातच सगळ आल.
३)ह्या युद्धानंतर अब्दाली किंवा इतर कोणांही अफगाणी सेनापतीला ह्या मार्गाने भारतावर परत आक्रमण करायची हिंमत झाली नाही.
४)पराभवानंतर काही काळातच माधवराव पेशवेमहादजी शिंदे ह्यांनी मराठ्यांचे उत्तरेतील गतवैभव पुन: प्रस्थापित केले व सुमारे पंचवीस वर्षे भगवा झेंडा अखंड दिल्लीच्या किल्ल्यावर फडकत ठेवून ‘दिल्लीचे तख्त राखिले’.

अनेक लोकांच अस म्हणण आहे कि पुराणातली वांगी पुराणात ठेवा आजच काय ते बोला, पण मी म्हणतो मराठी शूरांनी त्या वेळी गाजविलेल्या मर्दुमकीचा ,त्यांच्या शौर्याचा जाज्वल्य इतिहास,त्यांचे बलिदान नव्या पिढीला कसे कळणार.त्यांचे हे कार्य विसरून कसे चालेल,ह्याचा अभिमान बाळगायला हवा,त्यांचा दुर्दम्य आत्मविश्वास, पराभवानंतरही खचून न जाता घेतलेली गरुडझेप ह्यापासून आपण काहीतरी स्फुर्ती,प्रेरणा घ्यायला हवी.वयाच्या अवघ्या अठ्ठाविसाव्या वर्षी अनंत अडचणींना तोंड देत,हिदुंस्थानासाठी मायभूमीपासून इतक्या दूर जाऊन अगदी धीरोदात्तपणे झुंझार लढा देवून वीरगती पत्करलेल्या तरीही त्याच्या मायभूमीने वेडा ठरवलेल्या,दुर्दैवाने एका मोठ्या शोकांतिकेचा धनी बनलेल्या, पानिपतच्या रणभूमीवर आजही एखाद्या कोपरयावर विचारमग्न होउन बसलेल्या भाऊच्या मनावरील भार आपल्याला थोडा कां होईना कमी करायचा आहे….

सदाशिवराव भाऊ

 

Advertisements

आचार्य…

” उध्या जर माझी समाधी बांधायची झाली तर त्यावर एकच वाक्य लिहा- हा माणूस मुर्ख असेल,हयाच्या हातुन अनेक चुका झाल्या असतील ; पण हा कॄत्घन मात्र कधीही न्वहता.”

गेल्या आठवड्य़ातच वि.र.काळे हयांच  ’आचार्य अत्रे : महाराष्ट्रातील बलदंड व्यक्तीमत्व’ हे आचार्य अत्रेंवरील पुस्तक वाचल.पुस्तकाच्या पहिल्याच  पानावर अत्रेंनी त्यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाच्या वेळी काढलेले वरील उदगार दिलेले  आहेत.ते किती समर्पक आहेत ते पुस्तक वाचल्यावर आपल्या लक्षात येते.खरतर ही पोस्ट १ मे ला सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्रदिनाच्या दिवशी टाकायची होती, पण नेहमीचाच कं मध्ये आला आणि ही पोस्ट प्रकाशीत होण्य़ासाठी तब्बल ८ मे उजाडाव लागल.

खर सांगतो हे पुस्तक वाचायच्या आधी आपले साहित्यातील अत्रे आणि राजकारणातील अत्रे मला दोन वेगवेगळ्या व्यक्ती वाटायच्या.असो पण अत्र्यांच्या व्यक्तीमत्वाचा आवाकाच इतका मोठा आहे की ही असली चुक आम्हा पामरांकडुन होउ शकते, त्यात काही वावग नाही.अत्र्यांचे विविध क्षेत्रातील कर्तुत्व एकुन ”एक माणूस एवढा सगळा असू शकतो? ” असे उद्गार स्वत: पंडीत नेहरुंनीही काढले होते.ते बरच काही सांगुन जातात.ज्याप्रमाणे आपल्या सचिन तेंडुलकरला देवाने प्रतिभाशाली फ़लंदाजीची देणगी दिली आहे त्याचप्रकारे अत्र्यांवर तर परमेशवराने विविध गुणांची उधळणच केली होती.त्यांनीसुदधा हया दैवी देणगीचा विविध क्षेत्रात योग्य वापर करुन तिला योग्य न्याय दिला.तर हे पुस्तक वाचुन माझ्या मनात जी काही आदर्श व्यक्तीमत्व आहेत त्यात एक नाव वाढल…

ते शिक्षणतज्ज्ञ, एक उत्कॄष्ट मराठी लेखक, एक श्रेष्ठ कवी,प्रभावी वक्ते,एक उत्तम क्रिकेटपटू, वृत्तपत्राचे संस्थापक व संपादक, राजकीय नेते,विंडबनकार,नाटककार, चित्रपट निर्माते-दिग्दर्शक-पटकथा लेखक होते.अष्टपैलु हे विशेषणही कमी पडाव अस त्यांच एकुण व्यक्तीमत्व होत.

अत्र्यांचे पुर्ण नाव प्रल्हाद केशव अत्रे.आचार्य  ही उपाधी त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कामगीरीबद्दल दिली.वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी त्यांनी  ’महाराष्ट्र मोहरा’ ही कांदबरी लिहली. कुठेही काही चांगल आढळल की त्याला उत्स्फ़ुर्त दाद दिल्याशिवाय त्यांना राहवत नसे.तसेच ते हजरजवाबीही होते.एखाद्याची कोणती गोष्ट रुचली नाही कि ते अगदी सडॆतोड आणि आक्रमक भाषेत उत्तर देत.हयामुळेच अत्र्यांची बरयाच लोकांबरोबर भांडणही झाली.अशी भांडण असली तरी ज्याच्याबरोबर भांडायचे त्याला शिवराळ भाषेत ठणकावतांना त्याच्या चांगल्या गुणाची स्तुती करायला ते मागेपुढे पाहायचे नाही.संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अत्र्यांनी नेहरुंचा उलैख औरंगजेब म्हणुन केला तेव्हा एका नेहरु समर्थकाने त्यांना नेहरुंचा चांगुलपणा तुम्हाला दिसत नाही का असे विचारले असता अत्रे म्हणाले  ’वाघ जोपर्यंत  आम्हाला खातो आहे तोपर्यंत त्याच्या अंगावरच्या शोभीवंत पट्ट्यांचे कौतुक कोण करणार..? ’

अत्रे कोणत्याही क्षेत्रात शिरताना अगदी बेधडक घुसायचे. पण ज्या क्षेत्रात त्यांनी पाऊल टाकलं, ते क्षेत्र त्यांनी हादरवून सोडलं.नुसत नावादाखल एखाद क्षेत्र त्यांनी निवडल अस नाही तर ज्या  क्षेत्रात घुसले तिथे त्यांनी विशिष्ट उंची गाठलीच.आचार्य अत्रे यांनी प्रथम मकरंद व नंतर केशवकुमार या टोपणनावांनी काव्यलेखन केले. झेंडूची फुले  हा त्यांचा विनोदी व विडंबन कवितांचा संग्रह खूप गाजला.त्यांचा प्रेमाचा गुलकंद तर आठवत असेलच तुम्हाला.पाठ्यपुस्तकातील धडे सोप्या भाषेत असावेत असा त्यांचा आग्रह होता.चौथीच्या पुस्तकातील  दिनुचे बिल हया त्यांच्या धड्याने महाराष्ट्रातील किती पिढ्या हलवल्या ,घडवल्या. नाटकाच्या क्षेत्रात साष्टांग नमस्कार ने पदार्पण करत पुढे एकापाठोपाठ भ्रमाचा भोपळा, लग्नाची बेडी , घराबाहेर, उद्याचा संसार , तो मी नव्हेच अश्या अनेक लोकप्रिय नाटके लिहण्याचा सपाटाच लावला.पुढे चित्रपट क्षेत्रात उडी घेतल्यावर तिथेसुदधा  शामची आई  या त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटास राष्ट्रपती सुवर्ण पदक व महात्मा फुले या चित्रपटास रौप्यपदक प्राप्त झाले.

मराठा व नवयुग हया वॄत्तपत्रांतुन ते जनसामान्यांना मार्गदर्शन करायचे.वॄत्तपत्रांकडे धंदा म्हणुन त्यांनी कधीही पाहिल नाही.मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची नेतॄत्व आचार्य अत्र्यांनी अगदि समर्थपणे आपल्या खांद्यावर  पेलले . त्यांच्यामुळेच आज संयुक्त महाराष्ट्र होऊ शकला असे म्हंटल्यास ते वावगे ठरणार नाही.त्यांच्यासारखा निस्वार्थी नेता आज आपल्याला लाभायला हवा.अत्रे  भाषणातुन हशा व टाळ्यांसह आपले परखड विचार जनसामान्यांसमोर योग्य भाषेत मांडायचे.विनोदाचा प्रभावी वापर ते त्यांच्या भाषणात करायचे.अत्र्यांचे काही विनोदी किस्से वाचण्यासाठी इथे भेट दया. त्यांच्या वाणीने उभ्या महाराष्ट्रातील जनतेला आपलेसे केले होते.बाळासहेब किंवा राज ठाकरे हयांच्या वक्तॄत्वावरही आचार्यांच्या वक्तॄत्वशैलीचा  प्रभाव असल्याचे सांगीतले जाते.तशीही प्रबोधन ठाकरे आणि अत्रेंची तब्बल ३५ वर्षाची मैत्री होती.स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात कॉंग्रेसपक्ष अत्र्यांनीच फ़ुलविला.त्यांनी कॉंग्रेसची अगदि मनापासुन सेवा केली पण तेच जेव्हा कॉंग्रेसची मते त्यांना पटेनाशी झाली तेव्हा त्याच तिव्रतेने ’ अब हमारी दुश्मनी देख लो’ च्या तोर्यात त्यांनी कॉंग्रेसला चांगलच  फ़ैलावरही घेतले.

एकुणच अत्र्यांच्या भव्य व्यक्तीमत्वाची ओळख योग्य शब्दात केली आहे हया पुस्तकात. सुरुवातीला अत्रेंच्या कन्या शिरीष पै हयांनी लिहलेली प्रस्तावनाही वाचण्यासारखी आहे.पुस्तक घटनांनुसार न लिहता अत्र्यांच्या  व्यक्तीमत्वाचा एकेक पैलु उलगडत लिहले आहे त्यामुळे ते जास्त प्रभावी ठरले आहे.असे असले तरीही बर्याच घटनांचे संदर्भ पुस्तकात  परत परत आलेले आहेत.त्यामुळे मध्ये मध्ये थोड रिपीटेशन वाटत पण एकुणच पुस्तक वाचनीय आहे.शक्य असल्यास जरुर वाचा.  मी हे पुस्तक वाचल्यावर काही मित्र ज्यांना साहित्यात थोडाफ़ार रस आहे त्यांच्याशी अत्रेंबाबत चर्चा केली पण पुल,वपु,जीए यांबाबत चांगली माहिती असलेल्या बहुतेकांना अत्रेंबद्दल विशेष माहिती न्वहती.मला वाटते आजच्या पिढीला तरी अत्रेंबाबत जास्त माहिती नाहिये.कदाचीत हे चुकही असु शकेल कारण खुपच कमी लोकांच्या आधारावर हे विधान करतो आहे पण तरीही  जी लोकप्रियता पुलना व्यक्तीगतरीत्या आजही मिळते आहे तेवढी अत्रेंना मिळत नाहिये हे मात्र नक्की.

एकेकाळी आपल्या जादुई व्यक्तीमत्वामुळे अवघ्या महाराष्ट्राला भारावुन टाकणारया खरया अर्थाने आचार्य असलेल्या हया   अवलियाला  माझे लाख लाख सलाम…..