खेळ मांडला …

लगोरी ,विटी दांडू,क्रिकेट , गोट्या,खांब-खांब,पकडापकडी (टॅम्प्लीज  🙂 ) ,साखळी, लपाछपी(रेडीका 🙂 ), चोर-पोलीस, विषामृत, टीपीटीपी टीप टॉप,लंगडी,संत्रे-लिंबू,बुद्धीबळ, सापशिडी, नवा व्यापार, लुडो, पत्ते(रमी, मेंढीकोट, तीनपत्ते ,चॅलेंज,डॉंकी-मंकी,सात-आठ, पाच-तीन-दोन, गुलामचोर, किलबिल,बदाम सात …) ,पत्त्यांचे बंगले,कागदाची विमान-होड्या,नागाफफू,डोंगर का पाणी (‘डोंगराला आग लागली पळा..पळा..पळा…’ :))खोखो,मामाच पत्र ,भोवरा ,कांदा-फोडी……हुश्श….

काय ही सगळी नाव वाचून तुमच मन  एकदम कृष्णधवल काळात नाही पण इस्टमनकलरयुगात नक्कीच गेल असेल, हो ना …ह्या सगळ्या खेळांना उधाण यायचं ते मे महिन्यात …आणि आता मे महिना सुरु झालाय…काय परत हरवलात ना जुन्या आठवणीत …खरच अगदी नॉस्टॅल्जिक करून टाकतात ह्या बालपणीच्या खेळांच्या आठवणी.

हे आणि ह्यांसारखे अनेक खेळ मी प्रत्यक्ष खेळलो आहे ह्याचा मला  सार्थ अभिमान आहे, कारण ह्यातले बरेचसे खेळ आता फक्त अश्या आठवणी काढण्यासाठीच बाकी राहिले आहेत.हे खेळ शालेय अभ्यासाबरोबरच  मुलांची शारीरिक, सामाजिक, मानसिक वाढ  तसेच बौद्धिक जडण-घडण होण्यात महत्वाची भूमिका बजावतात. मैदानी  खेळांमुळे  शरिरास व्यायाम मिळतो.काहीं खेळांमुळे संघभावना वाढीस लागते,नेतृत्व गुणाची वाढ होते,कल्पकता वाढते ,निर्णयक्षमता वाढते. खेळ आपल्याला नियम पाळायला शिकवतात तसेच पराभव पचवायला शिकवतात.ज्याची पुढील आयुष्यात आपल्याला नितांत गरज असते. हे खेळ आपल्या मनावरील ताण नाहीसा करून आपल्याला ताजतवान  करतात.

पण काळानुसार वरील अनेक खेळ हळूहळू हरवायला लागले.क्रिकेटने अनेक खेळांना नामशेष होण्यात महत्वाचा वाटा उचलला.प्रत्येक जण फक्त क्रिकेटचाच विचार करत हातात बॅट हातात घेऊन स्वत:ला ‘सचिन’  समजू लागला.  पुढे व्यसन लावणारे टीवी व्हिडिओ गेम आले. मैदानातला खेळ घरच्या टीवी मध्ये शिरला.सुपरमारियो,पॅकमन,कॉनट्रा,डक हंट असे खेळ फेर धरू लागले. मग सुरुवातीला सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असलेले संगणक घरोघरी येऊ लागले.मग त्यावरील विविध खेळ जोर धरू लागले.बर्याच ऑनलाईन खेळांची गर्दी झाली.पुढे प्ले-स्टेशन,एक्स बॉक्स अशी ‘पेशल’ खेळाची उपकरण आली.’नथिंग इज परमनंट’ ह्या उक्तीप्रमाणे  खेळांमध्ये हळूहळू झालेले हे बदल ,संक्रमण आपल्या पिढीने अनुभवलं.आणि आता राज्य आल आहे ते अँड्रॉइड आणि आयफोन वरील गुरुत्वाकर्षण ,गती,दिशा अशी सेंसर्स असणाऱ्या टच सेन्सिटिव  खेळांच …

तर काही महिन्यापूर्वीच मी अँड्रॉइडन झालो आणि त्यावरील विविध ‘अॅप्स’ बरोबरच विविध खेळांनी मनाला भुरळ घातली.खेळांपासून बराच काळ दूर राहिलेलो मी गेले काही महिने मनसोक्त खेळ खेळ खेळलोय.तर मी खेळलेल्या खेळांतील मला आवडलेल्या काही खेळांची मी इथे तुम्हाला ओळख करून देतोय.

वैधानिक सूचना :खाली नमूद केलेले सर्व खेळ हे अँड्रॉइडमार्केटवर खरोखरच तेही चकटफू उपलब्ध असून इथे लिहलेल्या सर्व माहितीशी त्यांचा वास्तव संबध आहे .हे सर्व खेळ साधे असले तरी  अतिशय व्यसनी असून त्यामुळे तुमच्या वेळेबरोबरच तुमच्या डोळ्यांचीही पुरती वाट लागू शकते.सदर नुकसानाला दवबिंदु जबाबदार राहणार नाही ह्याची नोंद घ्यावी.  🙂

टेम्पल रन:

मला सगळ्यात जास्त व्यसन लावलेला किंवा मी सर्वात जास्त खेळलोय असा हा खेळ. तुम्ही म्हणजेच खेळातल पात्र एका पुरातन मंदिरातून एक महत्वाची जुनी मूर्ती चोरून मंदिराबाहेर पडता आणि भयंकर माकडरुपी राक्षस तुमच्या मागे लागतात आणि सुरु होतो ‘टेम्पल रन’….

t

कधीही न संपणारा असा हा खेळ आहे.वाटेत येणाऱ्या अडथळ्यांपासून वाचून तुम्हाला सतत धावत रहायचं आहे.कुठे जरा अडकलात कि मागचे राक्षस तुम्हाला पकडून  तुमचा लागलीच फडशा पाडतात.ह्यात खेळ संपल्यावर ज्या कारणाने खेळ संपतो त्या कारणाला अनुसुरून मनोरंजक वाक्य लिहून येतात जी वाचायला खरोखर मजा येते.ह्यात  उजव्या आणि डाव्या बाजूला वळण्यासाठी त्या दिशेला बोट स्क्रिन वर फिरवा.तसच उडी मारण्यासाठी पुढच्या बाजूला तर खाली झोपून जाण्यासाठी खालच्या बाजूला बोट फिरवाव लागत.आजूबाजूला जाण्यासाठी फोन त्या दिशेला (टील्ट करा) फिरवा. आणि अस धावत असतांना वेगवेगळी छोटी छोटी ध्येय आपल्याला पूर्ण करायची असतात तसेच  रस्त्यात मिळणारी पिवळ्या रंगाची  नाणीही आपण गोळा करायची कारण त्यांच्याद्वारे आपल्याला पुढे वेगवेगळ्या शक्ती प्राप्त करून घेता येतात.पुढे ह्या  नाण्यांचा रंग त्यांच्या किमतीप्रमाणे वाढून लाल ,निळा असा होतो. ह्या नाण्यांबरोबरच रस्त्यात तुम्हाला इतरही शक्ती मिळतात.ह्यात अदृश्य होण्याची शक्ती ,नाण्यांच चुंबक ,अतिजलद धाव ,नाण्यांची संख्या व किंमत वाढवायची शक्ती   अश्या शक्ती आहेत.आपण मिळवलेल्या नाण्यांद्वारे आपण ह्या शक्ती जास्त काळासाठी आपल्याकडे ठेऊ शकतो. तसेच नाण्यांनी आपण खेळात इतर पात्र सक्रिय करू शकतो तसेच पडण्यापासून जीवदान देणारे पंख सक्रिय करू शकतो.म्हणजेच एकूण अडथळ्यांपासून वाचत धावत जातांना नाणी गोळा करणही तितकच महत्वाच आहे. आणि जस जस तुम्ही पुढे पुढे जाता अडथळ्यांच प्रमाण आणि तीव्रता तसेच तुमचा वेग वाढत जातो. तर बघा तुम्हाला किती धावता येते ते…..

हा खेळ गुगल प्ले वरून इथून डाउनलोड करा. फेसबुकवर ‘टेम्पल रन’ला  सुमारे ७५ लाखाहून अधिक जणांनी पसंती दर्शवलेली आहे. तर ‘टेम्पल रन -२’  ह्या त्यांच्या नंतर  आलेल्या नव्या खेळाने पहिल्या १३ दिवसात ५०० लाखाहून अधिक वेळा डाऊनलोड होऊन मोबाईल गेमिंगमध्ये एक वेगळाच उच्चांक गाठला आहे. टेम्पल रन-२ च ग्राफिक्स अतिशय सुंदर आहे.

टेम्पल रनच्या यशामुळे  त्याच्याशी साधर्म्य असणारे अनेक खेळ आपल्याला प्लेस्टोर वर आढळतात.त्यापैकी खेळायचाच  असेल तर सबवे सर्फर आणि एजंट डॅश  हे खेळ तुम्ही ट्राय करु शकता.

व्हेअर इज माय वॉटर:

टेम्पल रनच व्यसन लागण्याआधी माझा सर्वात आवडता खेळ होता तो  व्हेअर इज माय वॉटर. डिस्नेने तयार केलेला हा खेळही  चांगलाच व्यसन लावणारा आहे.पण ह्यातल्या सगळ्या पातळ्या पूर्ण झाल्या  कि खेळ संपतो आणि बरोबर व्यसनही संपते.ह्या खेळात तीन भाग आहेत पहिला स्वँपी दुसरा मिस्ट्री डक्स आणि तिसरा क्रँन्की स्टोरी.

w

स्वँपी हा ह्यातील सगळ्यात मोठा भाग.ह्यात खेळातील ‘लॉजिक’नुसार १० प्रकरण आहेत प्रत्येक प्रकरणात  २० अश्या एकूण २०० पातळ्या ह्या भागात  आहेत.पण सुरुवातीला फक्त ह्यातील पहिल प्रकरण ‘मिट स्वँपी’  हे  खेळण्यासाठी मुक्त असते .जशी जशी तुम्ही रबराची बदक मिळवाल त्याप्रमाणे त्यांच्या संख्येनुसार पुढील प्रकरण खेळण्यासाठी  मुक्त होत जातात. ह्यात आपल्याला स्वँपी नावाच्या शहराच्या खाली राहणाऱ्या एका मगरीला विविध अडथळे दूर करत आंघोळीसाठी पाणी पोहोचवायच आहे.त्याबरोबरच रबरी बदक व स्वँपीसाठी इतर वस्तूही मिळवायच्या आहेत. सुरुवातीला सोपा असलेला हा खेळ नंतर नंतर आपल्याला डोक खाजवायला भाग पाडतो.हा खेळ खेळण्यासाठी विज्ञानाच प्राथमिक ज्ञान असण आवश्यक आहे.मिस्ट्री डक हा दुसरा भागही स्वँपी सारखाच आहे फक्त ह्यात पाणी स्वँपीपर्यंत पोहोचवण्याबरोबरच रबरी  बदक मिळवण हे ती पातळी पूर्ण होण्यासाठी आवश्यक असत. ह्यात पाच प्रकरण आहेत व प्रत्येकात २० पातळ्या आहेत .तिसरा भाग म्हणजे क्रँन्की स्टोरी ह्यात सगळी समीकरण उलटी होतात कारण ह्यात आपल्याला क्रँन्कीच्या जेवणावरील अल्गी बाजूला करण्यासाठी पाण्याएवजी अॅसिड   क्रँन्कीपर्यंत पोहोचवायच असत. ह्यात प्रत्यकी २० पातळ्यांची चार प्रकरण आहेत.ह्या तीन भागाबरोबरच ह्या खेळात ‘दि लॉस्ट लेवल्स’ हा अजून एक बोनस भाग दिलेला आहे ह्यात १०-१० पातळ्यांची दोन प्रकरण आहेत.

लहान मुलांच्या  डोक्याला चालना देत त्यांच मनोरंजन करण्याची कामगिरी हा खेळ अगदी चोख बजावतो.तर तुम्हीही खेळा तुमच्या सोनू-मोनुला ही खेळायला द्या.

हा खेळ गुगल प्ले वरून इथून डाउनलोड करा.

 

अँग्री बर्डस :

अँग्री बर्डस …काय म्हणाव ह्या खेळाबद्दल ,सगळ्यात लोकप्रिय असा हा खेळ.खेळ जगतात मोठी क्रांती घडवून आणणारा हा खेळ.गुगल प्लेवर आतापर्यंत सगळ्यात जास्त डाऊनलोड झालेला हा खेळ… आता जवळजवळ सगळ्याच फोन्समध्ये  खेळ विभागात गेलात तर हा खेळ दिसतो इतका ‘कॉमन’ झाला आहे हा अँग्री बर्डस.तर काय आहे ह्या खेळात … खेळात आहेत काही पक्षी..त्यांची अंडी काही डुकरांनी चोरली आहेत ,आणि म्हणून हे पक्षी अँग्री झाले आहेत.त्यांना आता तुमच्या मदतीने त्या डुकरांना धडा शिकवायचा आहे.ह्यात प्रत्येक पक्षाच वेगळी ताकद असते ती समजून बेचकीच्या माध्यमातून  कितीचा कोन वापरायचा, किती जोर लावायचा हे ठरवून  दिलेलं ‘टास्क’ पूर्ण करायचं असते.पण एकदा का आपण  ह्या पक्षांच्या राज्यात शिरला कि तिथे आपण  चांगलेच गुंग होतो,आणि हळूहळू ह्या खेळाला अँडिक्ट होतो.

a

अँग्री बर्डसचे अँग्री बर्डस,अँग्री बर्डस रियो ,अँग्री बर्ड सिजन्स,अँग्री बर्ड स्पेस आणि अँग्री बर्डस स्टारवॉर्स अशी  अनेक वर्जन्स हळूहळू येत गेली. गुगल प्ले , आय.ओ.एस. तसेच संगणक ह्या  सगळ्या प्लॅटफॉर्मवर सगळ्या  वर्जन्सच्या  एक बिलीयन्सपेक्षा जास्त डाऊनलोड मिळवण्याचा चमत्कार ह्या खेळाने केला आहे.ह्यातला अँग्री बर्ड स्पेस हा खेळ तर तयार करण्यात आलाय तो चक्क ‘नासा’च्या मदतीने.बच्चेकंपनीत तर हा खेळ इतका लोकप्रिय आहे कि अँग्री बर्डसचे चित्र असलेले  लाखो  टी शर्ट,वॉटर बॅग,स्कूल बॅग,कंपासपेटी तसेच अँग्री बर्डसच्या  बाहुल्या व त्यावर आधारित अनेक खेळ मार्केटमध्ये सहज खपून गेले.कधीतरी असाच कंटाळा आल्यावर ह्या पक्षांच्या राज्यात शिरा त्यांच्या रागाच्या माध्यमातून तुमचा स्ट्रेस कसा निघून जातो आणि तुम्ही कसे ताजेतवाने होता हे अनुभवा ……जर अजून हा खेळ तुमच्या मोबाईलमध्ये नसेल तर चला  पटकन इथून उतरवून घ्या..

अँग्री बर्डसचेच निर्माते  रोवियो यांनी बनवलेला  बॅड पिगीज हा मजेदार खेळही तुम्ही खेळून बघा.ह्यात समीकरण थोडी उलटी आहेत  उडणाऱ्या,रोल होणाऱ्या,स्पीन होणाऱ्या, क्रॅश होणाऱ्या उपकरणांतून तुम्हाला डुकरांना पक्षांच्या अंड्यापर्यंत पोहचवायच आहे.हा खेळ इथे उपलब्ध आहे.

डूडल जंप :

d

मी अँड्रॉइड जगतात शिरायच्या आधीपासून माझ्या नोकीयावर खेळत असलेला आणि अँड्रॉइडन व्हायच्या आधीचा माझा सर्वात आवडता असा हा खेळ. तसेच मी विकत घेतलेलाही  हा पहिला खेळ.अँग्री बर्डस यायच्या आधीपर्यंत  डाउनलोड्सचे अनेक विक्रम स्वत:च्या नावावर असणारा असा हा खेळ.ह्यात एक  चार पायाचा डूड्लर आहे.आपल्याला मोबाईल टील्ट करून त्याला आडव्या-उभ्या हलणार्यां ,तुटणाऱ्या पायऱ्यांवर उड्या मारत वर वर न्यायच आहे.ह्यात अधूनमधून  कमी वेळात जास्त अंतर कापण्यासाठी स्प्रिंग , जेटपॅक व रॉकेट अश्या सोयीही उपलब्ध होतात.पडण्यापासून सांभाळताना रस्त्यात असणाऱ्या राक्षसांपासून तसेच यूएफओ,काळ्या विवरांपासून ही आपल्याला वाचायचं असते.राक्षसांना आपण स्क्रिन वर टॅप करून गोळ्या मारून संपवू शकतो.टेम्पल रन प्रमाणे हा खेळही कधीही न संपणारा असा आहे. ह्यात आपण वेगवेगळ्या थीम वापरून डूड्लरचा लुक व खेळाच बॅकग्राउंड बदलु शकतो.काही दिवसापूर्वीपर्यंत ५३.० रु ला असलेला खेळ आता गुगल प्लेवर चकटफू उपलब्ध आहे. मग कसला विचार करता ,चला उड्या मारत ह्या  डूड्लच्या जगात …

हा खेळ गुगल प्लेवरून इथून डाउनलोड करा.

कट दि रोप :

c

कट द रोप हा सुद्धा एक सुंदर व डोक्याला चालना देणारा खेळ आहे . ह्या खेळात ओम नोम ह्या छोट्या हावरट राक्षसाला कँडी पुरवत राहाणं हा या खेळाचा उद्देश आहे. कँडी लावलेल्या दोऱ्यांवरुन बोटं फिरवून त्या दोऱ्या तोडायच्या आहेत आणि कँडी ओम नोमपर्यंत पोहोचवायच्या आहेत. धागे तोडताना मध्ये असणारे  स्टार्स  घ्यायला विसरायचं नाही.तसेच मधल्या काट्यांपासून कँडी लांब ठेवायची.कँडीचा  काट्यांना स्पर्श  झाला तर लेव्हल परत पहिल्यापासून सुरु होते . हवेचे बुडबुडे आहेत, ते कँडीला वरवर घेऊन जातात. या बुडबुड्यांबरोबर कँडीला दूर उडवण्यासाठी हवेच्या पिशव्याही आहेत.तसेच आपली कँडी कोळ्यांपासून वाचवायला हवी. कारण हे कोळी कँडी खातात आणि पहिल्यापासून सुरु होते . मध्येमध्ये विजेचे स्पार्क्सही असतात. त्याला स्पर्शजरी झाला तरी लेव्हल पहिल्यापासून सुरु होते सुरुवातीला सोपा वाटत असला तरी हा खेळ  पुढे डोक खाजवायला भाग पाडतो.तेव्हा ह्या सगळया अडथळ्यांपासून वाचत ओम नोम ला  कँडी खायला द्यायची आहे .तो वाट बघतोय ,तुम्ही त्याला कँडी द्याल ना ?  🙂

हा खेळ गुगल प्लेवरून इथे उपलब्ध आहे.

वरील खेळांप्रमाणेच ड्रॉप , फ्रूट निन्जाहॅपी फॉलस्पीड मोटो ,कँडी रेसरबॉटल शुटर  हे सुद्धा काही साधे आणि सुंदर खेळ तुम्ही ट्राय करू शकता .तेच खेळ खेळून कंटाळा येत असेल तर  छोटेमोठे  १३४ खेळ एकाच खेळात असलेला हा खेळ डाउनलोड करून ठेवा. 

हे खेळ आता काही नुसते खेळ राहिले नाहीयेत तो एक नवा करिअरचा पर्याय म्हणूनही समोर येतोय.खेळ आता कोट्यवधींची उलाढाल असलेली एक इंडस्ट्री आहे.जपान आणि युरोपातील काही देशात सिनेमापेक्षाही ही गेम्स इंडस्ट्री जास्त कमाई करून देणारी ठरली आहे. लाखो लोकांना ह्यातून रोजगार मिळतोय.ह्या  खेळांच सगळ्यांना खुलं आमंत्रण असतं. तुम्हाला हव्या त्या तऱ्हेचा खेळ इथे उपलब्ध असतो . रेसिंग आहे,  अँक्शन आहे,अॅडवेंचर आहे. डोक्याला खाद्य देणारे स्ट्रॅटेजी गेम्स आहेत,पझल्स आहेत.इथे काळ-वेळ पाळायच बंधन नाही म्हणजे रात्र झाली तर फुटबॉल-क्रिकेट कस खेळणार.किंवा क्रिकेट खेळायला मैदान/जागाच नाही अस इथे नाही. शिवाय खेळ  कुठे कधी कसा खेळायचा ते तुमच्यावर आहे. घरी बसून कंटाळलात आरामात पीसी किंवा लॅपटॉपवर खेळा.प्रवास बोअर करतोय  मोबाईलवर खेळा.खेळ म्हणजे फक्त लहानांसाठी ही संकल्पनाच आता उरलेली नाही.ह्या  खेळांना वयाची काही अट नाही. तरुण, वयस्कर,बायका-पोर,लहान-थोर  सगळ्यांनाच याचं वेड लागू  लागलंय….कालाय तस्मै नमः

startanimW

….लंगडी घालाया लागली.

पोस्टच नाव वाचुन ही पोस्ट ’कोंबडी पळाली’ हया गाण्यासंदर्भात आहे असा गैरसमज अजिबात करुन घेउ नका.तर ही पोस्ट परवा पुण्यात झालेल्या ब्लॉगर्सच्या सहल कम मीट बद्दल आहे. ती थोडी आत्मकेंद्रीत वैगेरे वाटत असेल तर पचवुन घ्या कारण गेले दोन दिवस माझी जी ’घोडदौड ’ झाली आहे  तिनेच मला ही पोस्ट लिहायला प्रवॄत्त केल आहे.ही पोस्ट थोडी लांबलचक होणार हयाची जाणीव आहे मला पण झालेल तुमच्यासमोर नको मांडु तर कोणासमोर मांडु… 🙂 (ब्लॉगर्सभेटीबद्दल डिटेलात तुम्हाला पेठेकाका,सुहास,विभी इथेही वाचायला मिळेल…)तर पुढे पोस्टला शिर्षक काय देउ हा विचार मनात येताच आमच्या श्री.बिनडोक्याना ’ कोंबडी पळाली ’ हे गाण आठवल. साधारणत: विकांतात माझ्यासाठी एका तरी कोंबडीला  प्राणार्पण कराव लागत.(कुठ फ़ेडणार हे पाप भाउ… 🙂  ) अस असतांना आणि कोंबडी खायच बेत झालेला असतांनासुदधा कोंबडीविनाच मला कशी लंगडी घालावी लागली त्याबद्दल ही पोस्ट असल्याने हया शिर्षकावर शिक्कामोर्तब केल. तर  १० तारखेला सुहासचा संदेश आला कि अनुजाताई इथे आली आहे तिला फ़ोन कर .मग अनुजाताईला फ़ोन केल्यावर तिने हया २० तारखेच्या सहलीबद्दल सांगीतल आणि मी तिला नाही म्हणु शकलो नाही.मग मी लागलीच पेठेकाकांच्या ब्लॉगवर ’मी येत आहे’ म्हणुन प्रतिक्रियाही दिली.ही झाली माझ्या लंगडीची पार्श्वभुमी….

आम्ही ब्लॉगर्स...

१९ जुलैला सकाळी १०:३० च्या आसपास सुहासचा फ़ोन आला कि अडीचच्या बसची टिकिटस बुक केली आहेत.मग मी आमच्या इथली ११:५५ ची गाडी पकडायची ठरवली.तयार होवुन ११:३० च्या आसपास बाइकची चावी घेउन खाली उतरलो.पाहतो तर काय गाडीच नाही.धावत वरती गेलो तर कळल वडील गाडी घेउन बाहेर गेले आहेत.( हा पहिला धक्का…सुरुवात होती माझ्या लंगडीची ..पुढे वाचा काय काय होते ते.. : )  )  लगेच मित्रांना फ़ोन लावायला सुरुवात केली.पहिलाच फ़ोन मित्राने उचलला पण तो बाहेर होता.मग दुसरा-तिसरा दोघांनीही उचलला नाही.चौथ्या मित्राने  फ़ोन उचलला.त्याला सांगीतल असेल त्या स्थितीत ये आणि मला स्टेशनला सोड .मग त्याने पटकन येउन मला स्टेशनवर सोडले. बाइकवरुन उतरल्या उतरल्या पाहतो ते काय गाडी स्टेशनवरुन निघायला लागलेली.हया नंतर गाडी होती ती थेट १४ :१५ ला.मग काय तिकिट वैगेरे काढायच सोडुन धावत पळत गाडीच्या आत कसा शिरलो मलापण कळलच नाही.टिकिट नसल्याने उगाचच मला चोरी केल्यासारखे वाटत होते,गाडीत चढुन आत येणारी प्रत्येक व्यक्ती टी.सी सारखीच वाटायची आणि वेगळीच हुरहुर मनाला लागत होती.दंड भरा वर इतक्या लोंकासमोर पकडल जाण …बाप रे…दरम्यान दुसर्या आणि तिसरया क्रमांकाच्या मित्रांचे फ़ोन आले, काय झाल रे..फ़ोन केलेलास मघाशी…कसाबसा विरारला पोहोचलो आणि तिथे टीसींची नजर चुकवत टिकिटखिडकी गाठुन बोरिवलीचे टिकिट काढले.( आता इथे माझे जास्त काही पैसे वाचले असा विचार करु नका.टिकिटात फ़क्त ६ रुपयाचा फ़रक होता 🙂 ) आता माझ्या जीवात जीव आला होता, किती मोकळ वाटत होत सगळ.मग ताठ मानेने बोरिवली गाडी पकडुन १४:०० च्या आसपास बोरिवली गाठली.

मस्त कॉफ़ीचा आस्वाद घेउन आम्ही ( बर्थडे बॉय सुहास आणि मी ) ०२:३० ला बोरिवली सोडली.आदल्या दिवशी खुप पाउस पडला होता पण आज सकाळपासुन छोटीसी सरही आली नव्हती.त्यामुळे भयंकर उकाडा होता पण आमची बस ए.सी. असल्याने तो तितकासा जाणवला नाही.(  🙂 )वाटल चला लागलो एकदाचे मार्गाला..पण कसल काय बस  ट्रॅफ़िक आणि पिकअपच्या चक्रव्युहात अशी अडकली कि वाशीला तासभर आधीपासुन गाडीची वाट पाहणारया आनंदला (आनंद काळे-हयापुढे हयाचा उलैख आका असा होइल हयाची वाचकांनी नोंद घ्यावी.) तिने ’ इंतहा हो गयी इंतज़ार की ’ हे गाण बोलायला भाग  पाडल.वाशीला आका धावत पळतच बसमध्ये आला कारण बस वेगळ्याच थांब्यावर थांबली होती.आकाने सुहासला वाढदिवसाची भेट म्हणुन दिलेल क्रिमच्या बिस्कीटाच पॅकेट मी लगेचच फ़ोडल.क्षणापुर्वी भरलेला तो पुडा पटकन कसा खाली झाला कळल नाही.बसमध्ये ’ लगे रहो मुन्नाभाई’ हा हलकाफ़ुलका सिनेमा  लागला होता तो पाहत एकमेकांशी गप्पा मारत त्याच सिनेमातील ’पल पल पल हर पल कैसे कटेगा पल..’ हे गाण गुणगुणत (खरच खुप कंटाळा आला होता हो प्रवासाचा) सव्वाआठच्या च्या सुमारास पुणे गाठल आणि सागरच्या म्हणण्यानुसार वाकड फ़ाटयाला उतरलो.

नभ उतरु आल..

दवबिंदु

तुम्हाला काय वाटल झाल सगळ व्यवस्थीत…नाही आज नियतीचा डाव काही वेगळाच होता.त्या बसवाल्याने वाकड फ़ाट्याच्या नावाखाली आम्हाला आदिच्याच एका फ़ाटयावर उतरवले होते.मग काय सागरला संपर्क  करुन सरळ चालत त्या वाकडया फ़ाटय़ावर गेलो.तिथे सागर आमची वाट पाहत होता.थोड्याच वेळात सपापण (सचिन पाटील) आला.मग आम्हाला कळल इतर मंडळी (आनंद पत्रे(आप),विद्याधर भिसे(विभी),भारत मुंबईकर(भामु))  पुण्यातच असली तरी वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली होती.आमची सर्वात मोठी घोडचुक ही झाली होती कि आम्ही पुणे हे एकच ठिकाण गृहीत धरल होत आणि सगळे जवळजवळ असतील अशी अपेक्षा होती. ( पुढे मागे मी कधी चेतन भगतच्या थ्री मिस्टेक्ससारख माझ्या जीवनातील ’वॅरीअस (हो खुप आहेत हो) मिस्टेक्स ऑफ़ माय लाईफ़ ’ लिहल तर हया दोन दिवसातील बर्याच चुका त्यात सामील होतील.. 🙂 ) पण इथे कोणी कर्वेनगर,कोणी हिंजवाडी,कोणी पिंपळ-गुरव तर कोणी स्वारगेटवर स्वारी केली होती .पुढे काय.. हयावर चर्चामसलत करुन मी आणि सुहासने कर्वेनगरला जाउन तिथे वाट पाहत असलेल्या पेठेकाका,अनुजा ताई,गौरी हयांना भेटायचे ठरले तर आका आणि सपा हयांनी जेवणाची सोय करावी. (मस्त चिकन तंदुरीचा वैगेरे बेत आखला होता)मग रात्री सर्वांनी सचिनच्या घरी जेवण करुन तिथेच झोपायच असा एकंदरीत कार्यक्रम ठरला होता.सुहास आणि मी दोघेही नविन असल्याने आम्हाला कर्वेनगरला पोहोचवायची जबाबदारी सागरने उचलली होती.

पण पिक्चर अजुन बाकी होता मंडळी…आम्ही बाजीरावाच्या थाटात हायवेला ट्रिपलसीट निघालो होतो. त्यात सागरने एक बॉंब टाकला.’माझ्या जवळ लायसन्स नाहिये ’..आम्ही तो हसण्यावारीच घेतला.आजुबाजुला रात्रीच्या पुण्याच दर्शन घेत मजल-दरमजल करत आम्ही जात होतो.सागर आधी पेठेकाकांकडे आला होता पण तरीही पुर्ण रस्ता त्याला नीटसा आठवत नव्हता.मग कोणाकोणाला विचारत आम्ही ९९.९९ % अंतर व्यवस्थीत कापल पण हाय रे दैवा ’ तो बघ सुर्य तो बघ जयद्रथ’ अशी परिस्थीती असतांना मामांचा एक ताफ़ाच गाडीसमोर आडवा आला.सागरने थोड्यावेळापुर्वी आमची मस्करी केली नव्हती ते आम्हाला तेव्हा कळले. ’लायसन्स नाय वर ट्रिपल’  मामांना भारीच मुद्दा मिळाला होता. १२०० च्या खाली यायलाच तयार नव्हते .मग मुबंईचे पाहुणे वैगेरे घासघीस करत २५० वर त्याला ’ सेटल ’ केल. त्याची उद्याच्या रविवारच्या  दोन्ही वेळच्या कोंबडीची सोय झाली होती.मग तिथे पेठेकाका,अनुजा ताई,गौरी हयांना भेटलो.तिथे त्यांच्याशी मस्त गप्पा मारल्या, अजुन कोण कोण येणार,कुठे किती वाजता भेटायच हयावर चर्चा झाली. पेठेकाका आणि अनुजा ताई हया दोघांचा मीटबद्दलचा उत्साह खरच खुप दांडगा होता.गौरी काही खाजगी कारणामुळे  उद्या येउ शकणार नव्हती.पण तिच्या हसरया चेहरयावर त्याबद्दलची खंत स्पष्ट दिसत होती.हया तिघांच्या भेटीने थोड-फ़ार का होइना रिलॅक्स वाटत होत.आम्हाला परत पोहोचायला खुप उशीरहोणार असल्याने आकाला फ़ोन करुन  तंदुरी-बिर्याणी परस्परच चेपायला सांगीतली.मग आम्ही सहाजणांनी तिथेच पावभाजीवर ताव मारला.

मग अनुजाताईचा तिथेच राहायचा आग्रह मोडुन आम्ही कर्वेनगर सोडल.अनुजाताई आम्हाला एका ठिकाणापर्यंत सोडायला आली.मध्ये आम्हाला दोनदा पोलिस लागले पण ताय होती ना बरोबर.त्यातल्या एका ठिकाणी तर ताईने थांबुन पोलिसालाच पुढचा रस्ता विचारला होता…. 🙂 मग त्या एका ठिकाणी अनुजा ताईला अलविदा करुन आम्ही परत एकदा ट्रिपलसीट झालो.माझ्याकडे लायसन्स नाही पण त्याची एक छापील प्रत होती.त्यामुळे गाडी हाकण्याच काम आता माझ्या कडे सोपवल गेल होत. आमच दुर्दैव हे कि विकांत असल्याने कि कसल्या कारणाने ठाउक नाही पण जिकडे- तिकडे भयंकर चेकिंग चालु होती.मग लांबुनच मामा दिसले होते कि सुहासची ट्रेकिंग सुरु व्हायची.( मागे बसलेला असल्याने )”सो गया हे जहा (पोलिस सोडुन 🙂 ), सो गया आसमा ” हे गाण अनुभवत आमच्या नजरा दुरवर पोलिसांनाच शोधत होत्या हळू हळु आम्हाला जरा कुठे पांढरा रंग दिसला कि पोलिस असल्याचाच भास होत होता.तरीही एका ठिकाणी आम्ही त्यांच्या तावडीत सापडलोच मग काय अजुन १०० रुपये ढिले करावे लागले.हयांची भाषा भारी एकदम.. काही नाही उद्या पोलिसस्टेशनला येउन गाडी घेउन जा.जास्त दंड होणार नाही वैगेरे वैगेरे.खरतर आम्हाला भुकही लागली होती पण रस्त्यात अगदि आधीपासुन कुठेच काही खायच दिसल नाही.मग पुढे असाच पुण्यातल्या गल्लीबोळात फ़िरतांना एका ठिकाणी औंधला जायचा रस्ता सापडला आणि सागरची ट्युब पेटली.मग आम्ही व्हाया औंध पिंपळे-गुरव इथे सचिनच्या घरी रात्री दोनच्या सुमारास पोहोचलो.सागर ची २३ ला परिक्षा असल्याने तो उद्या येणार नव्हता.आमच्यामुळे त्याला खुप त्रास झाला होता.सागरला निरोप देउन  मग गच्चीवर मी, भामु,सपा आणि सुहासनी थोडावेळ गप्पा मारल्या आणि मग आम्ही निद्रादेवीला शरण गेलो.

शनिवारवाडा

दुसर्या दिवशी नउ-सव्वानउला आम्ही बसने पुणेदर्शन करत (इतक्या ठिकाणी बस फ़िरली कि काय सांगु)  शनिवारवाडा गाठला.सुहास खुपच कमी झोपला होता पण त्याच्या सुहास्य वदनामुळे त्याचा थकवा दिसत नव्हता.सुहास त्याचा कालचा वाढदिवस आता कधीही विसरणार नव्हता.आज आपल्या मोगराफ़ुललावाल्या कांचनतायचा वाढदिवस असल्याने तिला शुभेच्छांचा समस पाठवला.मला वाटते वाढदिवस नसता तर तीसुदधा आली असती.असो तिथे मग आम्ही कांदापोहे (हे पेशल सपामुळे,सध्या कांदेपोहे खात फ़िरतो आहे ना तो सगळीकडे म्हणुन इथेही त्यानी तिच ऑर्डर दिली)  ,इडली,उपमा हयावर मस्त ताव मारला आणि बसस्टॉपजवळ गेलो तिथे काका आणि अनुजा ताई आमची वाट बघत होतेच.तिथे भामु (हा सचिनच्या घरुन सकाळीच कोणाला तरी भेटायला गेला होता… 🙂  ) आणि सध्या हटकुन ज्याच्या पोस्टसची वाट बघत असतो तो बाबाची भिंत वाला विभी हे दोघेही भेटले.गाडीला सुमारे ४० मिनटे होती (किती लवकर आलो होतो ना आम्ही..हा हा हा… आधीची बस आम्ही सगळ्यांनी चुकवली होती..  🙂 ) मग आम्ही सर्वांनी शनिवार वाड्याचे दर्शन घेतले.गेल्या वर्षीच पेशवाईवरच्या बरयाच पुस्तकांच पारायण झालेल असल्याने बर्याच आठवणींसह शनिवार वाडा जवळचाच वाटला.मग १०:५० च्या आसपास बस आली आणि आम्ही सिंहगडाच्या दिशेला निघालो.सचिन आमच्या बरोबर येणार नव्हता कारण त्याला मित्राबरोबर कांदेपोहे (  🙂 ) खायला जायचे होते पण आमच्या साठी त्याने कांद्यापोहयांची आहुती दिली. बसमध्ये आमच्या गप्पा एकदम जबरी  रंगल्या कारण एव्हाना सगळे जाम रंगात आले होते.गप्पांच्या ओघातच आम्ही सिंहगडाचा पायथा गाठला.बराच उशिर झाला असल्याने तिथेच असलेल्या घाटगे फ़ार्महाउसात जायचे ठरले.

गौरी आणि इशान...

थोड्याच वेळात नाशिकहुन दरमजल करीत आलेली तन्वीताई सहजच आमच्यासमोर अवतरली, ती अगदि बोनस पॅकेजसह (इशान,गौरी आणि अमीतसह).तीच बोलण-वागण खरच सहजच होत.तीला पहिल्यांदाच भेटतोय अस जाणवलच नाही.इशान भलताच खुश होता.तो लगेचच मामालोकात (हे आम्ही..ते कालचे मामा नाही बर का ..  🙂 ) मिसळुन गेला.गौराबाईचा मुड मात्र  उखडलेला होता.तिला पाहताच आपला लगेच त्या वॉशींगमशीन आणि केळ्याच्या सालीची आठवण झाली.अमीत खुपच शांत अन सहनशील वाटत होता.गौरा बाई त्याला अशी पिडत होती कि मला ते बघुन  ’दमलेल्या बाबाची कहाणी ’ आठवली.पेठेकाका फ़ार्महाउसच्या काउंटरवर टिकिटे काढत असतांनाच अचानक एवढा वेळ फ़ोनवर बोलत असलेल्या आकाने सिंहगर्जना केली..”असल आर्टिफ़िशीअल काही बघायला मला अजिबात आवडत नाही वैगेरे…” विजा कडाडत होत्या ,ढगांचा गडगडाट सुरु झाला अन आम्ही सगळे निमुटपणे (ताया तर शांतच झाल्या होत्या आकाचा आवेश बघुन) पायपीट करत मागे फ़िरलो आणि सिंहगडाकडे वर जाणारया रस्त्याजवळ आलो.दरम्यान पुण्याचा अभिजीत वैद्य आमच्यात सामील झाला.तिथे ते जीपवाले शेंहगड-शेंहगड ओरडत होते.गाडीत जनावरांसारख माणसांना कोंबत होते.आम्हीही सिंहगड्भेटीच्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे त्या कळपात शिरलो.तन्वी ताईने आणलेली गाडी पुढे गेली ते बर झाल कारण पार्किंगच्या कारणामुळे खाजगी गाड्या वर सोडण आता बंद केल होत.विभीपण अभिजीतबरोबर बाईकवर पुढे गेला होता.कशीतरी आमची गाडी एकदाची सुरु झाली.

खादाडी...

वरती खुपच ट्रॅफ़िक जाम असल्याने आम्ही थोड आधीच उतरुन पायपीट करत पार्किंगजवळ पोहोचलो.तायांना शोधत असतांना पाहतो तर काय  (रिलायंस सोडुन सगळी नेटवर्क गुल झाली होती..त्यामुळे संपर्क करता येत नव्हता) एका छोट्याश्या हॉटेलात ताया भजीवर हल्लाबोल करत असलेल्या दिसल्या.आम्हीही त्या लढाईत सामील होवुन हर हर महादेव म्हणत भजीचा आणि सोबत ताक-दहीचा चांगलाच समाचार घेतला.अनुजा ताईचा बहुतेक लग्नाचा वाढदिवस होता आणि त्यानिमीत्ताने ती केक घेउन आली होती.मग सगळ्यांनी त्यावर यथेच्छ ताव मारत त्याच नाव-निशाण नाहिस केल.आमच्या भजी आणि ताक खादाडीच बिल किती झाल माहित आहे…बरोबर ४२० .. 🙂 मग हळुहळु आम्ही सिंहगड सर करायला सुरुवात गेली सोबत फ़ोटोग्राफ़र होतेच आका आणि छोटुकला इशान.तिथे एकदम मस्त आल्हाददायक वातावरण होत वर आम्हा सगळ्यांचा आपापसातला जिव्हाळ्याचा ओलावाही  होताच  त्यामुळे आतापर्यंतचा थकवा कुठच्या कुठे निघुन गेला होता.चहुबाजुला पसरलेले धुक्यांचे ढग, आपल्याच मस्तीत वाहत असलेला थंडगार वारा हयांच्या सोबतीत तो गड आता गड राहिला नव्हता तर एखाध मस्त ’ हिलस्टेशन ’ बनुन गेला होता.ज्याच्यामुळे आम्ही वर आलो त्या आकावर आता कौतुकाचा वर्षाव होत होता.इथे पेठेकाका आणि अनुजा ताईचा उत्साह वाखाखण्याजोगा होता.दोघ मध्ये मध्ये बसुन वि्श्रांती घेत होते पण शेवटपर्यंत आमच्याबरोबर फ़िरले.तास-दिड तास तिथे छानपैकी भटकंती करत आम्ही परतायला निघालो तेव्हा आका म्हणाला तुम्ही चला मी येतो दहा मिनटातच.मग आम्ही पार्किंगजवळ जाउन आकाची वाट पाहु लागलो.दरम्यान ज्यांना घरी जायची घाई होते ते ” अरे देवेंद्रला कुठे जायच आहे माहित आहे बोइसरला ” तर ज्यांना घाई नव्हती ते “अरे कसली घाई करतोस  देवेंद्रला कुठे जायच आहे माहित आहे बोइसरला,तो काही बोलतो का बघ” अस बोलत माझ्याच नावाची ढाल वापरत होते.मी दोन्ही पक्षांना मंद स्मीत करुन दाखवत होतो, कारण मला घाईही होती आणि त्या सर्वांना लवकर सोडावसदेखील वाटत नव्हत.

धुक्यात हरवलेला सिंहगड...

बाबाची स्टाईल तर बघा...

आकाची वाट पाहत असतांनाच अनुजा ताईने चहा घेउया असे सुचवले.अहाहा… त्या वातावरणात चहा  एकदम अमृतासारखाच भासला. (तसा साधाच होता) मग तन्वीताईने मघाशी काही वेळापुर्वी घेतलेल्या गरम-गरम शेंगदाण्याच्या बाफ़लेल्या शेंगा मी नको नको म्हणत चांगल्याच चेपल्या.परत तिथे गप्पांचा फ़ड रंगला.सुमारे ४० मिनटे झाली पण आकाचा पत्ता नव्हता. मग मी ’गड झाला पण आका गेला’ अशी कोटी केली.त्याला सगळ्यांनीच मुक्तहास्याने दाद दिली.थोड्याच वेळात धुक्यात हरवलेला (आम्हाला तरी हेच कारण सांगीतले खर-खोट त्या परमेश्वराला ठाउक…  : )  )  आका परत आला.मग आकाने घेतलेल्या कैरी्च्या आंबड-गोड स्वादाची लज्जत चाखत आम्ही दोनच्या सुमारास परतीच्या प्रवासाला लागलो.पण आजचा दिवस काही वेगळाच होता उतरतांना रस्त्यांच्या दुतर्फ़ा लावलेल्या गाड्यांमुळे ट्रॅफ़िक इतकी झाली होती कि गाडी मुंगीच्या पाउलांनी पुढे सरकत होती.मग अनुजा ताई,तन्वीताई,आका,भामु,इशान आणि मी चालतच गाडीपुढे निघालो.काही वेळाने ट्रॅफ़िक थोडी सावरल्याने आम्ही परत गाडीत विराजमान झालो.पण पुढे परत तीच कहाणी.अस करत करत तब्बल तीन तास लागले आम्हाला खाली उतरायला.  😦  मग तिथुन स्वारगेटसाठी रिक्षा केली पण त्या रिक्षाचा काहितरी प्रॉब्लेम असल्याने त्याने रिक्षा पुणे शहरात घुसवली नाही व तुम्हाला दुसर्या गाडीत बसवुन देतो म्हणत तो इथे तिथे भटकत होता.

कैरीचा लज्जत चाखतांना...

शेवटी आम्ही कंटाळुन त्याला अर्धे पैसे दिले आणि तिथुन मीटरवाली रिक्षा करुन स्वार गेट गाठल.तिथे आका ठाण्याच्या गाडीत गेला तर सुहास,विभी आणि मी ७ वाजताची बोरिवलीगाडी पकडली.त्यातही थोडीशी पुण्याई कुठेतरी बाकी असल्याने गर्दीतही आम्हाला सीट मिळाल्या.मुंबईच्या वाटेवर खोपोलीला आम्ही उतरुन मस्त वडापाव,वेफ़र्स,चकली (विकत आणि विद्याधरच्या घरच्यापण) अशी खादाडी केली.त्या गाडीने ११:३५ ला आम्हाला बोरिवलीला पोहोचवल.विभी मालाडलाच उतरला होता.११:३५ ही माझ्या शेवटच्या गाडीची वेळ होती.खाली उतरल्यावर पाहतो तो काय बसवाल्याने बस डेपोत न नेता दुसरीकडेच उतरवल होत.मग काय सुहासने लगबगीने रिक्षा केली आणि ११:४० ला स्टेशन गाठल.सुहास रिक्षाचे पैसे भरत असतांनाच माझी गाडी प्लॅटफ़ॉर्म सोडत होती…वर अनांउसमेंट होत होती..अहमदाबाद जानेवाली.. मला काही सुचत नव्हते मग विचार न करता एकदम धावत धावत गाडी पकडली आणि गाडीत बसलो.एक लांब सुस्कारा टाकला.जब वी मेट मधे एकलेला  ’ बाबाजी, अब इस रातमे और कोइ एक्साईटमेंट मत देना,बोरिंग बना दोजी इस रात को ‘ असा काहिसा धावा देवाकडे करत होतो.

पण तेवढ्यातच… ढॅण टॅ णॅण….बाजुच्या प्रवाश्याकडुन कळल ही एक्सप्रेस आहे माझी गाडी हयाच्या मागे येणार होती आणि ही गाडी थेट थांबणार होती बलसाडला…म्हणजे रात्रभर प्रवास करुन परत सकाळी बलसाड वरुन परतायच वर टीसीच टेन्शन… माझा आवाजच बंद झाला होता..पण लगेचच स्वत:ला सावरल आणि ट्रेनच्या दरवाज्याजवळ उभा राहिलो.आणि गाडी कुठे स्लो होते का हयाची वाट पाहु लागलो.दहिसर स्टेशनच्या थोड आधी गाडी थोडी स्लो झाली पण हाय रे दैवा ..स्टेशन जवळ येताच असला वेग धरला गाडीने काय सांगु…परत एकदा गाडी स्लो व्हायची वाट बघत देवाच नाव घेत ताटकळत  उभा राहिलो.गाडी भन्नाट वेगात पळत होती भाइंदर,वसई,नालासोपारा..इतक्यात विरार स्टेशनच्या दिड ते दोन किमी आधी गाडी एकदम मंद झाली..देवाने माझ एकल होत मग लगेच उतरुन ट्रॅकच्या बाजुने चालायला लागलो.मी उतरल्यावर ती गाडी परत सुसाट निघुन गेली…मला थोडीफ़ार का होइना देवाच्या अस्तीत्वाची जाणीव झाली..पण आता परत माझ्या गाडीची विरारची वेळ जवळ येत होती मग धावत पळतच टिकिट-खिडकी गाठली आणि टिकिट काढले.तोच माझी गाडी (विरमगाम पॅसेंजर) प्लॅटफ़ॉर्मवर हजर.मग गाडीत मस्त जाउन बसलो.

तेव्हा सुहासचा आणि मग विभीचा फ़ोन आला त्यांना सांगीतल पोहोचेन लवकरच अस.पण इथेही माझ दुर्दैव माझा पिच्छा सोडायला तयार नव्हत.केळवा हया स्थानकावर तब्बल २० मिनटे गाडी सायडिंगला काढली..(एकस्प्रेसना वाट करुन देण्यासाठी) ..रडत पळत (मध्ये मध्ये तर अस वाटल गाडीतुन उतरुन सरळ धावत निघाव…  🙂  )०२:१५ (तब्बल पाउण तास उशिरा) ला बोइसर गाठल.मला आता तिथे काहीच रिस्क घ्यायची नसल्याने वडिलांनाच स्टेशनवर बोलावल होत.मग एकदाच घर गाठल आणि फ़्रेश होवुन चिकनवर मस्त ताव मारला.गेले दोन दिवस हया कोंबडीने मला हुलकावणी दिली होती…  🙂  तसही दोन दिवस बरीच खादाडी झाली असली तरी जेवण असे झालेच नव्हते माझे आणि सुहासचे…असो खरच सगळ्यांना भेटुन खुप आनंद झाला होता आणि का नाही होणार दोन दोन आनंद आमच्या बरोबर होते…  🙂  हया पुणेरी मिशनचे  कॅप्टन पेठेकाका आणि वाईस-कॅप्टन अनुजाताई आणि हयांचे खुप खुप आभार ही भेट घडवुन दिल्याबद्दल…

….कोण कुठले ब्लॉगर्स…भेटायची काय गरज… पण तरीही आपण एकत्र आलो, का..तर ते एकमेकांशी हळुवार जोडलेल्या ऋणानुबंधामुळे्च… नशिबाच आणि माझ हे दोन दिवस एकदम वाकड असतांना एवढ्या संकटांना तोंड देत मी ही लंगडी सहन केली ती केवळ तुम्हा सर्वांना भेटायच्या ओढीनेच….

” वो कहते है ना किसि चिज को अगर दिलसे चाहो तो पुरी कायानात तुम्हे उसे मिलानेमे जुड जाती है..”   🙂