खेळ मांडला …

लगोरी ,विटी दांडू,क्रिकेट , गोट्या,खांब-खांब,पकडापकडी (टॅम्प्लीज  🙂 ) ,साखळी, लपाछपी(रेडीका 🙂 ), चोर-पोलीस, विषामृत, टीपीटीपी टीप टॉप,लंगडी,संत्रे-लिंबू,बुद्धीबळ, सापशिडी, नवा व्यापार, लुडो, पत्ते(रमी, मेंढीकोट, तीनपत्ते ,चॅलेंज,डॉंकी-मंकी,सात-आठ, पाच-तीन-दोन, गुलामचोर, किलबिल,बदाम सात …) ,पत्त्यांचे बंगले,कागदाची विमान-होड्या,नागाफफू,डोंगर का पाणी (‘डोंगराला आग लागली पळा..पळा..पळा…’ :))खोखो,मामाच पत्र ,भोवरा ,कांदा-फोडी……हुश्श….

काय ही सगळी नाव वाचून तुमच मन  एकदम कृष्णधवल काळात नाही पण इस्टमनकलरयुगात नक्कीच गेल असेल, हो ना …ह्या सगळ्या खेळांना उधाण यायचं ते मे महिन्यात …आणि आता मे महिना सुरु झालाय…काय परत हरवलात ना जुन्या आठवणीत …खरच अगदी नॉस्टॅल्जिक करून टाकतात ह्या बालपणीच्या खेळांच्या आठवणी.

हे आणि ह्यांसारखे अनेक खेळ मी प्रत्यक्ष खेळलो आहे ह्याचा मला  सार्थ अभिमान आहे, कारण ह्यातले बरेचसे खेळ आता फक्त अश्या आठवणी काढण्यासाठीच बाकी राहिले आहेत.हे खेळ शालेय अभ्यासाबरोबरच  मुलांची शारीरिक, सामाजिक, मानसिक वाढ  तसेच बौद्धिक जडण-घडण होण्यात महत्वाची भूमिका बजावतात. मैदानी  खेळांमुळे  शरिरास व्यायाम मिळतो.काहीं खेळांमुळे संघभावना वाढीस लागते,नेतृत्व गुणाची वाढ होते,कल्पकता वाढते ,निर्णयक्षमता वाढते. खेळ आपल्याला नियम पाळायला शिकवतात तसेच पराभव पचवायला शिकवतात.ज्याची पुढील आयुष्यात आपल्याला नितांत गरज असते. हे खेळ आपल्या मनावरील ताण नाहीसा करून आपल्याला ताजतवान  करतात.

पण काळानुसार वरील अनेक खेळ हळूहळू हरवायला लागले.क्रिकेटने अनेक खेळांना नामशेष होण्यात महत्वाचा वाटा उचलला.प्रत्येक जण फक्त क्रिकेटचाच विचार करत हातात बॅट हातात घेऊन स्वत:ला ‘सचिन’  समजू लागला.  पुढे व्यसन लावणारे टीवी व्हिडिओ गेम आले. मैदानातला खेळ घरच्या टीवी मध्ये शिरला.सुपरमारियो,पॅकमन,कॉनट्रा,डक हंट असे खेळ फेर धरू लागले. मग सुरुवातीला सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असलेले संगणक घरोघरी येऊ लागले.मग त्यावरील विविध खेळ जोर धरू लागले.बर्याच ऑनलाईन खेळांची गर्दी झाली.पुढे प्ले-स्टेशन,एक्स बॉक्स अशी ‘पेशल’ खेळाची उपकरण आली.’नथिंग इज परमनंट’ ह्या उक्तीप्रमाणे  खेळांमध्ये हळूहळू झालेले हे बदल ,संक्रमण आपल्या पिढीने अनुभवलं.आणि आता राज्य आल आहे ते अँड्रॉइड आणि आयफोन वरील गुरुत्वाकर्षण ,गती,दिशा अशी सेंसर्स असणाऱ्या टच सेन्सिटिव  खेळांच …

तर काही महिन्यापूर्वीच मी अँड्रॉइडन झालो आणि त्यावरील विविध ‘अॅप्स’ बरोबरच विविध खेळांनी मनाला भुरळ घातली.खेळांपासून बराच काळ दूर राहिलेलो मी गेले काही महिने मनसोक्त खेळ खेळ खेळलोय.तर मी खेळलेल्या खेळांतील मला आवडलेल्या काही खेळांची मी इथे तुम्हाला ओळख करून देतोय.

वैधानिक सूचना :खाली नमूद केलेले सर्व खेळ हे अँड्रॉइडमार्केटवर खरोखरच तेही चकटफू उपलब्ध असून इथे लिहलेल्या सर्व माहितीशी त्यांचा वास्तव संबध आहे .हे सर्व खेळ साधे असले तरी  अतिशय व्यसनी असून त्यामुळे तुमच्या वेळेबरोबरच तुमच्या डोळ्यांचीही पुरती वाट लागू शकते.सदर नुकसानाला दवबिंदु जबाबदार राहणार नाही ह्याची नोंद घ्यावी.  🙂

टेम्पल रन:

मला सगळ्यात जास्त व्यसन लावलेला किंवा मी सर्वात जास्त खेळलोय असा हा खेळ. तुम्ही म्हणजेच खेळातल पात्र एका पुरातन मंदिरातून एक महत्वाची जुनी मूर्ती चोरून मंदिराबाहेर पडता आणि भयंकर माकडरुपी राक्षस तुमच्या मागे लागतात आणि सुरु होतो ‘टेम्पल रन’….

t

कधीही न संपणारा असा हा खेळ आहे.वाटेत येणाऱ्या अडथळ्यांपासून वाचून तुम्हाला सतत धावत रहायचं आहे.कुठे जरा अडकलात कि मागचे राक्षस तुम्हाला पकडून  तुमचा लागलीच फडशा पाडतात.ह्यात खेळ संपल्यावर ज्या कारणाने खेळ संपतो त्या कारणाला अनुसुरून मनोरंजक वाक्य लिहून येतात जी वाचायला खरोखर मजा येते.ह्यात  उजव्या आणि डाव्या बाजूला वळण्यासाठी त्या दिशेला बोट स्क्रिन वर फिरवा.तसच उडी मारण्यासाठी पुढच्या बाजूला तर खाली झोपून जाण्यासाठी खालच्या बाजूला बोट फिरवाव लागत.आजूबाजूला जाण्यासाठी फोन त्या दिशेला (टील्ट करा) फिरवा. आणि अस धावत असतांना वेगवेगळी छोटी छोटी ध्येय आपल्याला पूर्ण करायची असतात तसेच  रस्त्यात मिळणारी पिवळ्या रंगाची  नाणीही आपण गोळा करायची कारण त्यांच्याद्वारे आपल्याला पुढे वेगवेगळ्या शक्ती प्राप्त करून घेता येतात.पुढे ह्या  नाण्यांचा रंग त्यांच्या किमतीप्रमाणे वाढून लाल ,निळा असा होतो. ह्या नाण्यांबरोबरच रस्त्यात तुम्हाला इतरही शक्ती मिळतात.ह्यात अदृश्य होण्याची शक्ती ,नाण्यांच चुंबक ,अतिजलद धाव ,नाण्यांची संख्या व किंमत वाढवायची शक्ती   अश्या शक्ती आहेत.आपण मिळवलेल्या नाण्यांद्वारे आपण ह्या शक्ती जास्त काळासाठी आपल्याकडे ठेऊ शकतो. तसेच नाण्यांनी आपण खेळात इतर पात्र सक्रिय करू शकतो तसेच पडण्यापासून जीवदान देणारे पंख सक्रिय करू शकतो.म्हणजेच एकूण अडथळ्यांपासून वाचत धावत जातांना नाणी गोळा करणही तितकच महत्वाच आहे. आणि जस जस तुम्ही पुढे पुढे जाता अडथळ्यांच प्रमाण आणि तीव्रता तसेच तुमचा वेग वाढत जातो. तर बघा तुम्हाला किती धावता येते ते…..

हा खेळ गुगल प्ले वरून इथून डाउनलोड करा. फेसबुकवर ‘टेम्पल रन’ला  सुमारे ७५ लाखाहून अधिक जणांनी पसंती दर्शवलेली आहे. तर ‘टेम्पल रन -२’  ह्या त्यांच्या नंतर  आलेल्या नव्या खेळाने पहिल्या १३ दिवसात ५०० लाखाहून अधिक वेळा डाऊनलोड होऊन मोबाईल गेमिंगमध्ये एक वेगळाच उच्चांक गाठला आहे. टेम्पल रन-२ च ग्राफिक्स अतिशय सुंदर आहे.

टेम्पल रनच्या यशामुळे  त्याच्याशी साधर्म्य असणारे अनेक खेळ आपल्याला प्लेस्टोर वर आढळतात.त्यापैकी खेळायचाच  असेल तर सबवे सर्फर आणि एजंट डॅश  हे खेळ तुम्ही ट्राय करु शकता.

व्हेअर इज माय वॉटर:

टेम्पल रनच व्यसन लागण्याआधी माझा सर्वात आवडता खेळ होता तो  व्हेअर इज माय वॉटर. डिस्नेने तयार केलेला हा खेळही  चांगलाच व्यसन लावणारा आहे.पण ह्यातल्या सगळ्या पातळ्या पूर्ण झाल्या  कि खेळ संपतो आणि बरोबर व्यसनही संपते.ह्या खेळात तीन भाग आहेत पहिला स्वँपी दुसरा मिस्ट्री डक्स आणि तिसरा क्रँन्की स्टोरी.

w

स्वँपी हा ह्यातील सगळ्यात मोठा भाग.ह्यात खेळातील ‘लॉजिक’नुसार १० प्रकरण आहेत प्रत्येक प्रकरणात  २० अश्या एकूण २०० पातळ्या ह्या भागात  आहेत.पण सुरुवातीला फक्त ह्यातील पहिल प्रकरण ‘मिट स्वँपी’  हे  खेळण्यासाठी मुक्त असते .जशी जशी तुम्ही रबराची बदक मिळवाल त्याप्रमाणे त्यांच्या संख्येनुसार पुढील प्रकरण खेळण्यासाठी  मुक्त होत जातात. ह्यात आपल्याला स्वँपी नावाच्या शहराच्या खाली राहणाऱ्या एका मगरीला विविध अडथळे दूर करत आंघोळीसाठी पाणी पोहोचवायच आहे.त्याबरोबरच रबरी बदक व स्वँपीसाठी इतर वस्तूही मिळवायच्या आहेत. सुरुवातीला सोपा असलेला हा खेळ नंतर नंतर आपल्याला डोक खाजवायला भाग पाडतो.हा खेळ खेळण्यासाठी विज्ञानाच प्राथमिक ज्ञान असण आवश्यक आहे.मिस्ट्री डक हा दुसरा भागही स्वँपी सारखाच आहे फक्त ह्यात पाणी स्वँपीपर्यंत पोहोचवण्याबरोबरच रबरी  बदक मिळवण हे ती पातळी पूर्ण होण्यासाठी आवश्यक असत. ह्यात पाच प्रकरण आहेत व प्रत्येकात २० पातळ्या आहेत .तिसरा भाग म्हणजे क्रँन्की स्टोरी ह्यात सगळी समीकरण उलटी होतात कारण ह्यात आपल्याला क्रँन्कीच्या जेवणावरील अल्गी बाजूला करण्यासाठी पाण्याएवजी अॅसिड   क्रँन्कीपर्यंत पोहोचवायच असत. ह्यात प्रत्यकी २० पातळ्यांची चार प्रकरण आहेत.ह्या तीन भागाबरोबरच ह्या खेळात ‘दि लॉस्ट लेवल्स’ हा अजून एक बोनस भाग दिलेला आहे ह्यात १०-१० पातळ्यांची दोन प्रकरण आहेत.

लहान मुलांच्या  डोक्याला चालना देत त्यांच मनोरंजन करण्याची कामगिरी हा खेळ अगदी चोख बजावतो.तर तुम्हीही खेळा तुमच्या सोनू-मोनुला ही खेळायला द्या.

हा खेळ गुगल प्ले वरून इथून डाउनलोड करा.

 

अँग्री बर्डस :

अँग्री बर्डस …काय म्हणाव ह्या खेळाबद्दल ,सगळ्यात लोकप्रिय असा हा खेळ.खेळ जगतात मोठी क्रांती घडवून आणणारा हा खेळ.गुगल प्लेवर आतापर्यंत सगळ्यात जास्त डाऊनलोड झालेला हा खेळ… आता जवळजवळ सगळ्याच फोन्समध्ये  खेळ विभागात गेलात तर हा खेळ दिसतो इतका ‘कॉमन’ झाला आहे हा अँग्री बर्डस.तर काय आहे ह्या खेळात … खेळात आहेत काही पक्षी..त्यांची अंडी काही डुकरांनी चोरली आहेत ,आणि म्हणून हे पक्षी अँग्री झाले आहेत.त्यांना आता तुमच्या मदतीने त्या डुकरांना धडा शिकवायचा आहे.ह्यात प्रत्येक पक्षाच वेगळी ताकद असते ती समजून बेचकीच्या माध्यमातून  कितीचा कोन वापरायचा, किती जोर लावायचा हे ठरवून  दिलेलं ‘टास्क’ पूर्ण करायचं असते.पण एकदा का आपण  ह्या पक्षांच्या राज्यात शिरला कि तिथे आपण  चांगलेच गुंग होतो,आणि हळूहळू ह्या खेळाला अँडिक्ट होतो.

a

अँग्री बर्डसचे अँग्री बर्डस,अँग्री बर्डस रियो ,अँग्री बर्ड सिजन्स,अँग्री बर्ड स्पेस आणि अँग्री बर्डस स्टारवॉर्स अशी  अनेक वर्जन्स हळूहळू येत गेली. गुगल प्ले , आय.ओ.एस. तसेच संगणक ह्या  सगळ्या प्लॅटफॉर्मवर सगळ्या  वर्जन्सच्या  एक बिलीयन्सपेक्षा जास्त डाऊनलोड मिळवण्याचा चमत्कार ह्या खेळाने केला आहे.ह्यातला अँग्री बर्ड स्पेस हा खेळ तर तयार करण्यात आलाय तो चक्क ‘नासा’च्या मदतीने.बच्चेकंपनीत तर हा खेळ इतका लोकप्रिय आहे कि अँग्री बर्डसचे चित्र असलेले  लाखो  टी शर्ट,वॉटर बॅग,स्कूल बॅग,कंपासपेटी तसेच अँग्री बर्डसच्या  बाहुल्या व त्यावर आधारित अनेक खेळ मार्केटमध्ये सहज खपून गेले.कधीतरी असाच कंटाळा आल्यावर ह्या पक्षांच्या राज्यात शिरा त्यांच्या रागाच्या माध्यमातून तुमचा स्ट्रेस कसा निघून जातो आणि तुम्ही कसे ताजेतवाने होता हे अनुभवा ……जर अजून हा खेळ तुमच्या मोबाईलमध्ये नसेल तर चला  पटकन इथून उतरवून घ्या..

अँग्री बर्डसचेच निर्माते  रोवियो यांनी बनवलेला  बॅड पिगीज हा मजेदार खेळही तुम्ही खेळून बघा.ह्यात समीकरण थोडी उलटी आहेत  उडणाऱ्या,रोल होणाऱ्या,स्पीन होणाऱ्या, क्रॅश होणाऱ्या उपकरणांतून तुम्हाला डुकरांना पक्षांच्या अंड्यापर्यंत पोहचवायच आहे.हा खेळ इथे उपलब्ध आहे.

डूडल जंप :

d

मी अँड्रॉइड जगतात शिरायच्या आधीपासून माझ्या नोकीयावर खेळत असलेला आणि अँड्रॉइडन व्हायच्या आधीचा माझा सर्वात आवडता असा हा खेळ. तसेच मी विकत घेतलेलाही  हा पहिला खेळ.अँग्री बर्डस यायच्या आधीपर्यंत  डाउनलोड्सचे अनेक विक्रम स्वत:च्या नावावर असणारा असा हा खेळ.ह्यात एक  चार पायाचा डूड्लर आहे.आपल्याला मोबाईल टील्ट करून त्याला आडव्या-उभ्या हलणार्यां ,तुटणाऱ्या पायऱ्यांवर उड्या मारत वर वर न्यायच आहे.ह्यात अधूनमधून  कमी वेळात जास्त अंतर कापण्यासाठी स्प्रिंग , जेटपॅक व रॉकेट अश्या सोयीही उपलब्ध होतात.पडण्यापासून सांभाळताना रस्त्यात असणाऱ्या राक्षसांपासून तसेच यूएफओ,काळ्या विवरांपासून ही आपल्याला वाचायचं असते.राक्षसांना आपण स्क्रिन वर टॅप करून गोळ्या मारून संपवू शकतो.टेम्पल रन प्रमाणे हा खेळही कधीही न संपणारा असा आहे. ह्यात आपण वेगवेगळ्या थीम वापरून डूड्लरचा लुक व खेळाच बॅकग्राउंड बदलु शकतो.काही दिवसापूर्वीपर्यंत ५३.० रु ला असलेला खेळ आता गुगल प्लेवर चकटफू उपलब्ध आहे. मग कसला विचार करता ,चला उड्या मारत ह्या  डूड्लच्या जगात …

हा खेळ गुगल प्लेवरून इथून डाउनलोड करा.

कट दि रोप :

c

कट द रोप हा सुद्धा एक सुंदर व डोक्याला चालना देणारा खेळ आहे . ह्या खेळात ओम नोम ह्या छोट्या हावरट राक्षसाला कँडी पुरवत राहाणं हा या खेळाचा उद्देश आहे. कँडी लावलेल्या दोऱ्यांवरुन बोटं फिरवून त्या दोऱ्या तोडायच्या आहेत आणि कँडी ओम नोमपर्यंत पोहोचवायच्या आहेत. धागे तोडताना मध्ये असणारे  स्टार्स  घ्यायला विसरायचं नाही.तसेच मधल्या काट्यांपासून कँडी लांब ठेवायची.कँडीचा  काट्यांना स्पर्श  झाला तर लेव्हल परत पहिल्यापासून सुरु होते . हवेचे बुडबुडे आहेत, ते कँडीला वरवर घेऊन जातात. या बुडबुड्यांबरोबर कँडीला दूर उडवण्यासाठी हवेच्या पिशव्याही आहेत.तसेच आपली कँडी कोळ्यांपासून वाचवायला हवी. कारण हे कोळी कँडी खातात आणि पहिल्यापासून सुरु होते . मध्येमध्ये विजेचे स्पार्क्सही असतात. त्याला स्पर्शजरी झाला तरी लेव्हल पहिल्यापासून सुरु होते सुरुवातीला सोपा वाटत असला तरी हा खेळ  पुढे डोक खाजवायला भाग पाडतो.तेव्हा ह्या सगळया अडथळ्यांपासून वाचत ओम नोम ला  कँडी खायला द्यायची आहे .तो वाट बघतोय ,तुम्ही त्याला कँडी द्याल ना ?  🙂

हा खेळ गुगल प्लेवरून इथे उपलब्ध आहे.

वरील खेळांप्रमाणेच ड्रॉप , फ्रूट निन्जाहॅपी फॉलस्पीड मोटो ,कँडी रेसरबॉटल शुटर  हे सुद्धा काही साधे आणि सुंदर खेळ तुम्ही ट्राय करू शकता .तेच खेळ खेळून कंटाळा येत असेल तर  छोटेमोठे  १३४ खेळ एकाच खेळात असलेला हा खेळ डाउनलोड करून ठेवा. 

हे खेळ आता काही नुसते खेळ राहिले नाहीयेत तो एक नवा करिअरचा पर्याय म्हणूनही समोर येतोय.खेळ आता कोट्यवधींची उलाढाल असलेली एक इंडस्ट्री आहे.जपान आणि युरोपातील काही देशात सिनेमापेक्षाही ही गेम्स इंडस्ट्री जास्त कमाई करून देणारी ठरली आहे. लाखो लोकांना ह्यातून रोजगार मिळतोय.ह्या  खेळांच सगळ्यांना खुलं आमंत्रण असतं. तुम्हाला हव्या त्या तऱ्हेचा खेळ इथे उपलब्ध असतो . रेसिंग आहे,  अँक्शन आहे,अॅडवेंचर आहे. डोक्याला खाद्य देणारे स्ट्रॅटेजी गेम्स आहेत,पझल्स आहेत.इथे काळ-वेळ पाळायच बंधन नाही म्हणजे रात्र झाली तर फुटबॉल-क्रिकेट कस खेळणार.किंवा क्रिकेट खेळायला मैदान/जागाच नाही अस इथे नाही. शिवाय खेळ  कुठे कधी कसा खेळायचा ते तुमच्यावर आहे. घरी बसून कंटाळलात आरामात पीसी किंवा लॅपटॉपवर खेळा.प्रवास बोअर करतोय  मोबाईलवर खेळा.खेळ म्हणजे फक्त लहानांसाठी ही संकल्पनाच आता उरलेली नाही.ह्या  खेळांना वयाची काही अट नाही. तरुण, वयस्कर,बायका-पोर,लहान-थोर  सगळ्यांनाच याचं वेड लागू  लागलंय….कालाय तस्मै नमः

startanimW

मॅड

लहानपणापासून माझा सर्वात आवडता छंद आहे तो पुस्तक वाचण्याचा.हलकफुलक्या कथां असलेली पुस्तक ,ऐतिहासिक कादंबऱ्या,धीरगंभीर वास्तववादी पुस्तक,माहितीपर पुस्तक अश्या अनेक प्रकारच्या पुस्तकांचा मी आजवर खूप आस्वाद घेतला आहे.लहानपणी माझे मित्र मला नेहमी म्हणायचे, आम्हाला ही शाळेची पुस्तकच वाचायलाच जीवावर येते आणि तू इतकी जाडजाड पुस्तक कशी वाचत बसतो.मॅडच होत ते त्यांना काय माहीत कि खरतर पुस्तक वाचायला कुठे लागतात ती मनापासून उघडली कि  स्वत:हूनच ती आपल्याला सगळ सांगत राहतात.आपल्यासमोर सगळी दृश्य जिवंतपणे उभी करतात. तर अश्या ह्या माझ्या पुस्तकवेड्याच्या मनात एक कोपरा खास वपुंच्या पुस्तकांसाठी निरंतर राखून ठेवलेला आहे आणि तसाच एक वेगळा कोपरा ‘शाळा’ व ‘दुनियादारी’ ह्या पुस्तकांसाठी राखून ठेवलेला होता.गेली कितातरी वर्ष ही दोन पुस्तक त्या कोपरयात गुण्यागोविंदाने राज्य करीत होती.

पण काही दिवसापूर्वीच त्यांना त्यांच राज्य ‘लंप्या’ बरोबर वाटून घ्याव लागल. कोण लंप्या ? तुमच्यापैकी अनेक जण कदाचित ओळखत असाल ह्या लंप्याला पण महिन्याभरापूर्वी पर्यंत मी तरी ह्याला ओळखत नव्हतो.एकाच दिवशी मनाली (स्वच्छंदी) आणि रश्मी (मनस्वी) ह्या दोघींच्या ब्लॉगवर सर्वप्रथम ह्या मॅड लंप्याची मॅड ओळख झाली.मग काही दिवसातच मी हळुवारच लंपनच्या मॅड भावविश्वात प्रवेश केला आणि मग काय मला तो एकदम   ‘बेष्ट’च वाटला.आणि शेवटी ते काय म्हणतात ना त्यातली गत लंप्याने थोड्याश्या  मॅड असलेल्या मला पूर्ण  मॅड केल,’कम्प्लेट’ मॅड… अश्या त्या मॅड लंप्याची मी तुम्हाला इथे ओळख करून देणार आहे. साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण….

तर  ‘लंप्या’ म्हणजेच ‘लंपन’ हा प्रकाश नारायण संत ह्यांच्या कथासंग्रहामधील नायक – कर्नाटकातील कारवार नजीकच्या एका छोट्याश्या गावात आपल्या आजी-आजोबांबरोबर राहणारा अगदी कोवळ्या वयाचा एक शाळकरी मुलगा.त्याच स्वत:च एक वेगळच जग आहे. आजूबाजूचे सगळे सजीव-निर्जीव घटक त्याला  ह्या ना त्या कारणाने  मॅड वाटतात. अनेक छोट्या छोट्या गोष्टीचं निरीक्षण करायची त्याची मॅड सवय आहे.एकदा का  हात डोक्यामागं घेऊन तो एखाद्या गोष्टीकडे पाहू लागला कि मग त्याला वेळ-काळाचे काही भान राहत नाही. त्याच्या डोक्यातील चक्र नेहमी चालूच.प्रत्येक गोष्टीचा तो एकोणविसशे  वेळा विचार करतो. त्या निरीक्षणावरून तो अनेक भन्नाट  ‘लॉजिक’  लावतो.छान छान गाणी गायची त्याला भारी हौस.वाचनाची तर त्याला  प्रचंड आवड, अगदी पुस्तकवेडा . त्याला नेहमी दहा बारा तासांऐवजी खरं तर एकोणीस-तास झोपावस वाटत. कधीतरी आईपासून दूर राहत असल्याने तो थोडासा हळवाही होतो.त्याला त्याची शाळा  खूप आवडत असते कारण ह्याच शाळेत त्याच्या आईने शिक्षण घेतलेलं असत.त्याची एक मैत्रीणही आहे सुमी नावाची ,का कोण जाणे पण हिची नुसती आठवण आली तरी त्याला पोटात काहीतरी गडबड झाल्यासारख वाटते.तर असा आहे हा आमचा लंप्या.

हा निरागस,अल्लड,आपली अचाट कल्पनाशक्ती वापरणारा आणि थोडासा संवेदनशील लंपू आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातो. त्याची आजी-आजोबा, आ‌ई-बाबा,सुमी, बाबूराव, मनी आणि लहान बाळ बिट्ट्या, कणबर्गी गंग्या, टुकण्या ,संप्या, परळ्या, यमज्या, हणब्या, एशी, केबी,वंटमुरीकर देसाईंचा बोका, ‘लक्ष्मी’ झाड, तिथलं तळं, ‘हंपायर’ जंब्या कटकोळ,लंप्याचा गामा पैलवान खेकडा,ड्रिलचे मास्तर हत्तंगडी,आचरेकरबाई,म्हापसेकर सर ,सायकलचं  दुकान चालवणारा टी. जी.  कासारगोड ,नकादुतले खंडागळे मामा,सोन्याबापू,तेलसंगी,हिंडलगेकर अण्णा,साउथ इंडियन तुंगभद्रा,सांबप्रसादच घर,दुंडाप्पा हत्तरगीच्या टांगा ,लंपूला त्याच्यासारखाच एकटा वाटणारा गुंडीमठ रोड अश्या कितीतरी जणांची तो त्याच्या भावविश्वातून ओळख करून देतो.आणि ही सगळी सजीव-निर्जीव पात्र आपल्यासमोर जिवंत उभी राहतात.आपण एकवीसशे त्रेचाळीस वेळा सगळ परत परत वाचत राहतो.लंपूही आपला हात धरून आपल्याला सगळीकडे हिंडवत राहतो.हळूहळू काळ-वेळेचे, जागेचे, वयाचे सगळे बंध निखळून पडतात. त्याच्याबरोबर मॅडसारख भटकत असताना तो  आपला खास कि काय तसा मित्र होऊन जातो.अनेक धागे जुळत जातात. आणि मग अचानक कधीतरी आपणच लंप्या होऊन जातो.

लंप्याला आपल्याशी अशा प्रकारे जोडण्याचे सगळे श्रेय प्रकाश नारायण संतांच्या अप्रतिम लेखनशैलीला जाते.त्यांचे वडिल उत्तम ललितलेखक होते तर त्यांच्या आई इंदिरा संत ह्यांच्याबद्दल काही वेगळ सांगायला नको.वयाच्या सतराव्या वर्षीच ललित लेखनास सुरुवात करणाऱ्या प्रकाश नारायण संतांनी ह्या घराण्याला अजून एका उंचीवर नेऊन ठेवले.त्यांनी अडनिड वयातील मुलांच्या भावविश्वाचे अगदी  सूक्ष्म निरीक्षण केले असल्याचा साक्षात्कार ही पुस्तक वाचतांना आपल्याला वारंवार होतो.कथेची उत्तम बांधणी ,अगदी जिवंत वाटणारी वर्णन ,साधी सरळ भाषा, कानडी वळणाच्या मराठी बोलभाषेचा जागोजागी  छान वापर, ह्या त्यांच्या ह्या लेखनातील अगदी जमेच्या बाजू .ते उत्तम चित्रकारही होते. त्यांच्या पहिल्या तीन पुस्तकांसाठी त्यांनी स्वतःच रेखाटने केली होती. ‘मॅड‘ हे मॅड विशेषण कशासाठीही वापरणं,आपल्याला अगदी त्या वयात घेऊन जाणारया शब्दरचना ,वेगवेगळ्या संख्यांचा वाक्यातला उपयोग, आडवयातील मुलाच्या नजरेतून विविध गोष्टी मांडण्याच प्रचंड कौशल्य,लंपनच वेगवेगळया लोकांबरोबर जुळवलेले हळुवार ऋणानुबंध सगळ सगळ आपल्यावर एक वेगळीच जादू करते.मी ह्याचवर्षी कारवार भागाला भेट दिलेली असल्याने ह्या पुस्तकातील अनेक वर्णनांना चांगलाच ‘रिलेट’ करू शकलो.

गोट्या खेळतांनाचा प्रकाश नारायण संतांनी सांगितलेला भन्नाट मंत्र इथे टाकावासा वाटतोय ….

पंचापांडू – सह्यादांडू – सप्तपोपडे – अष्ट जिंकिले – नऊनऊ किल्ले – दश्शा पेडा – अकलकराठा बाळू मराठा – तिरंगी सोटा – चौदा लंगोटा – पंधराशी परिवळ – सोळी घरिवल – सतरम सीते – अठरम गरुडे – एकोणीस च्यकच्यक – वीसा पकपक – एकवीस कात्री – बावीस रात्री – तेवीस त्रिकाम फुल – चोवीस चोर – पंचवीस मोर

वनवास, शारदा संगीत, पंखा, झुंबर ह्या चार पुस्तकातून लंपनच भावविश्व  तरलपणे उलगडून दाखवतांना ते आपल्याला मनमुराद आनंद देतात.ही चार पुस्तक म्हणजे एक आगळावेगळा खजिनाच आहे.ह्या चार पुस्तकांचं वैशिष्ट्य म्हणजे ह्यातल कोणतेही एक पुस्तक वाचल तरी ते अपूर्ण वाटत नाही.पण एकदा का तुम्ही ह्या लंपनच्या भावविश्वात शिरलात कि चारही पुस्तक कशीही मिळवून तुम्ही ती मॅडसारखी वाचून काढेपर्यंत किंवा त्यानंतरही तुम्ही लंपनला सोडत नाहीत आणि तो ही तुम्हाला सोडत नाही. ही सगळी पुस्तक वाचतांना आपल्याला निखळ आनंद  देतात पण त्याच बरोबर अनेक कथांच्या शेवटी घडलेल्या घटना मनाला चटका लावून जातात.’झुंबर’ मधील ‘स्पर्श’ ह्या कथेत आपल्या वडिलांच्या मृत्युची जाणीव झालेला लंपन  तर अंगावर काटा आणतो.खूप हुरहूर लावून जाते ती कथा. लंपनच्या आयुष्यातील तरूणपणाच्या दिवसांवर संतांना एक कादंबरी लिहायाची होती पण ‘झुंबर’ हा कथासंग्रह प्रकाशित होण्यापूर्वीच त्यांच निधन झाल, आणि मराठी रसिक एका अतिशय चांगल्या कादंबरीला मुकला अस मला वाटते.खरच संतांचा तरुणपणाचा लंपन कसा असता… ह्याच उत्तर कधीच मिळणार नाही ह्याची खात्री असूनही  ह्याबद्दल  कधीकधी खूप विचार करतो मी …

लहानपणापासून सत्याण्णव हजार चारशे त्रेचाळीस  पुस्तक वाचलेली असतांना  इतका चांगला कथासंग्रह  वाचनात  कसा आला नाही ह्याच मला खूप आश्चर्य वाटलं.आणि मला लंप्याची ती ओळ आठवली, “माझ्यासारखा मॅड शोधुनही सापडणार नाही. असला मॅड म्हणजे दहा गुणिले दहा भागिले शंभर! मी. एकच!”.  मग माझ्यासारखे अजूनही काही पुस्तकवेडे महाभाग असतील ज्यांची लंप्याशी ओळख झालेली नसेल  अस वाटलं आणि  त्यांच्यासाठी हा लेखप्रपंच.खरच कधीतरी अगदी मॅड सारखे काहीतरी वाचत सुटाव अस वाटल  तर लंपनच्या मॅड  भावविश्वात जरूर प्रवेश करा … एक वेगळाच मंतरलेला मॅड अनुभव तुम्हाला मिळेल…

“लंप्याच्या भाषेत सांगायच म्हणजे, ‘एकदा नाही, दोनदा नाही तर अठ्ठावीसशे तीस वेळा जरी ह्या कथा ‘ मॅड सारख्या वाचल्या’ तरी त्या ताज्याच वाटतील. एक निराळ्याच शैलीचा आणि वाचकाशी चट्कन संवाद साधून त्यालाही लंप्याच्या वयाचा करून टाकणारा कथासंग्रह मराठीत येतो आहे ह्या आनंदात मी आहे…..”- इति पुल.