बाबुजी…


काही माणसांचा जन्म होतो तोच मुळी  काही तरी असामान्य कार्य करण्यासाठी…आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत अश्या व्यक्तींचा विचार करतांना जी काही नाव येतात त्यातलं एक नाव ‘बाबुजीं’च…तस पाहिलं तर  प्रतिभा तर खूप लोक घेऊन येतात ह्या जगात  पण ती जोपासण्यासाठी परिश्रम घेण्याच सगळयांनाच जमत नाही. बाबुजींनी  मिळालेल्या प्रतिभेला कठोर मेहनतीची जोड देवून यशाची उत्तुंग शिखरे कशी गाठायची ह्याचे खूप मोठे उदाहरण आपल्यासमोर ठेवले आहे. मराठी चित्रपटसंगीताच्या क्षेत्रात तब्बल पाच दशकाहून अधिक काळ राज्य करणार्या ह्या अवलियाचा आज स्मृतीदिन आहे.त्यांना मानवंदना देण्यासाठी  हा छोटासा लेखप्रपंच.

आपण त्यांना सुधीर फडके किंवा ‘बाबुजी’ म्हणून ओळखत असलो तरी त्यांचे खरे नाव ‘रामचंद्र विनायक फडके’ आहे. हो ‘आहेच ‘ लिहायचं मला. कारण त्यांच्या असंख्य गीतातून ते नेहमीच आपल्याबरोबर राहिले आहेत. तर बाबुजींचा जन्म २५ जुलै १९१९ ला कोल्हापुरात झाला.सुधीर फडके यांचे वडील विनायक फडके कोल्हापूरचे नामांकित वकील होत व त्यांच्या देशभक्तीमुळे ते ‘कोल्हापूरचे टिळक’ म्हणून ओळखले जात. त्यांना संगीताची आवड असल्याने त्यांनी बर्याच रेकॉर्डसघरी आणायचे.बाबुजीना संगीताची आवड लागली ती ह्यामुळेच.ते गाणी ऐकायचे व हुबेहूब त्याची नक्कल करायचे.त्यांचे मामा डॉ. भालचंद्र पटवर्धन ह्यांनी भाच्यातील उपजत गुण ओळखून त्याला श्री. विनायकबुवा पाध्ये यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे प्राथमिक शिक्षण घेण्यास दाखल केले.अल्पावधीतच त्यांनी प्रतिभेला मेहनतीची जोड देत शास्त्रीय संगीतावर चांगलाच प्रभुत्व मिळवलं.पाध्ये ह्यांचा आपल्या ह्या शिष्यावर खूप विश्वास होता म्हणूनच त्यांनी आपल्या विद्यालयात भरलेल्या अ.भा. संगीत परिषदेत देशभरातील गवय्यांना “तुम्ही जो राग सादर कराल तो राग माझा हा शिष्य हुबेहूब सादर करील” अस जाहीर केल.आणि त्यावेळी त्यांच्या शिष्याने त्यांच ते म्हणण चूकीच होऊन दिल नाही.

१९२८ मध्ये बाबुजींची आईच आजारपणात निधन झाल.ह्या गोष्टीचा बाबुजींच्या वडिलांनी खुपच धसका घेतला व वकिली करण सोडून दिल.पुढे आर्थिक परिस्थिती खुपच बिकट झाल्यामुळे ते आपल्या मामांकडे राहायला गेले व तिथून त्यांच्या विकासासाठी त्याना मुंबईला पाठवण्यात आले.मुंबईत शालेय शिक्षणाबरोबरच महाराष्ट्र संगीत विद्यालयातून संगीताचे शिक्षणही चालूच ठेवले.तिथे सरस्वती संगीत विद्यालयात दरवर्षी होणाऱ्या शास्त्रीय संगीताच्या स्पर्धेत तर त्यांनी आपल्या विद्यालयातर्फे भाग घेऊन परीक्षक असलेल्या उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब ह्यांच्याकडून मुक्तकंठाने प्रशंसा मिळवली व बरोबरच प्रथम पुरस्कारही पटकावला.पुढे १९३३ मध्ये बाबुजी कोल्हापुरात परतले व श्रीकृष्ण संगीत विद्यालयात गायन-शिक्षक म्हणून रुजू झाले.ह्या विद्यालयाचे प्रमुख श्री. न. ना. देशपांडे ह्यांनीच बाबूजींचे ‘सुधीर’ हे नामकरण केले.

हिंदी सिनेमातील बाबूजींच एक अजरामर गीत

१९३६ मध्ये वडिलांच्या निधनानंतर मुंबईत परतल्यावर ते संघाच्या कार्यालयातच राहत.त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा प्रभाव होता. गोवा मुक्ती आंदोलनात त्यांनी सशस्त्र भाग घेतलेला होता.पुढे अनेक राज्यात फिरताना त्यांनी संघाच्या प्रचारकाची भूमिकाही नेटाने पार पाडली. मुंबईत आकाशवाणीवर त्यांना गायक म्हणून कंत्राटी नोकरी मिळाली होती ती सांभाळून ते संघाची अनेक काम करत . १९३९ साली  त्यांना  ‘विझलेली वात’ ह्या नाटकाला संगीत दिग्दर्शन  करायची संधी मिळाली.रसिकांनी त्यांच्या कामाला चांगलीच दाद दिली.पुढे संघातील काही अधिकार्यांनी पैशांच्या बाबतीत फसवणूक केली व त्यामुळेच गैरसमजामुळे मामांच्या घराचे दरवाजेही त्यांच्यासाठी बंद झाले होते .त्यानंतर सुमारे तीन महिने बाबुजींनी  फुटपाथवर दिवस काढले.रेडियोची कंत्राटे मिळणेही खूप कमी झाल्याने त्यांना दोन वेळच्या जेवणाचाही प्रश्न पडायचा.उदरनिर्वाहासाठी गायनाच्या शिकवणीबरोबरच कांदाभजीचा धंदाही त्यांनी करून पाहिला.पण दोन्हीही नीट चालू शकले नाही ते दिवसच वाईट होते.  वर क्षयासारखा  आजार  तरीही त्यांनी न डगमगता मिळेल ती बिदागी स्वीकारून अनेक राज्यांमध्ये भटकंती करून त्यांचे प्रयोग करायला सुरुवात केली.हे दौरे करताना तेथील स्थानिक संगीतातील  नवी नवी शिकवण घेत आपली   संगीत साधनाही त्यांनी  चालूच ठेवली होती .

देशभर भटकंती सुरु असतानाच त्यांना कलकत्त्याला  ‘दि इंडिया रेकॉर्ड कंपनी’त नोकरी मिळाली. मग त्यांनी  तिथेच स्थायिक व्हायचा ठरवल होत.पण नियतीच्या मनात काही औरच होत , भावाच्या आजारपणामुळे त्यांना कोल्हापुरात परताव लागल.त्याचवेळेस मुंबईतील एच. एम. व्ही. कंपनी कोल्हापूरला  रेकॉर्डिंगसाठी आली होती. गदिमांच्या ‘दर्यावरी नाच करी होडी चाले भिरीभिरी’ असे बोल असलेले गाणे गायची संधी त्याना मिळाली व गदिमांशी ओळखही झाली.ज्या ओळखीने पुढे गाढ मैत्रीचे रूप घेऊन इतिहास घडवला.  १९४१  ते १९४५ त्यांनी  ‘एच एम वी ‘ सोबत काम केल. १९४६ साली ‘प्रभात चित्र संस्थे’त   संगीत दिग्दर्शक म्हणून काम करायची संधी मिळाल्यावर खर्या अर्थाने त्यांची स्वतंत्र कारकीर्द सुरु झाली.आणि तिथून त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.गायक आणि संगीतकार ह्या दोन्ही क्षेत्रात त्यांनी आपळी वेगळी छाप सोडली .हिराबाई बडोदेकर, बालगंधर्व हे त्यांचे आदर्श होते.त्यांनी तब्बल १११ चित्रपटांना संगीतबद्ध केले. त्यापैकी २१ चित्रपट हे हिंदी भाषेतील आहेत. बालगंधर्व, पं. भीमसेनजी, हिराबाई बेडोदेकर,किशोर कुमार, मोहम्मद रफी, लता मंगेशकर, आशा भोसले आदी दिग्गज गायक-गायिकांनी बाबुजींनी संगीत दिलेली गीते गायली आहेत.बाबुजींनी दुसर्या संगीतकारांचीही अनेक गीते गायली.आणि ती गाताना समोरील संगीतकाराला जे नक्की हवं ते गळ्यातून आल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे.गाताना भावानांबरोबरच स्पष्ट उच्चार काढणे ते कटाक्षाने पाळत.

बाबुजींच्या पत्नी म्हणजेच ललिता फडकेही उत्तम गायिका होत्या पण बाबुजींच्या संसाराचा गाडा  हाकताना त्यांच गायन हळूहळू  मागे पडत गेल.त्यांची काही गाणी तुम्हाला इथे ऐकायला मिळतील.

श्री व सौ. सुधीर फडके

त्यांनी पाच दशके अथक परिश्रम करत जे संगीतरुपी मंदीर बांधले त्याचा कळस म्हणजे त्यांनी संगीतबद्ध केलेळे गदिमांचे ‘गीतरामायण’ .ह्या गीतारामायाणातूनच बाबुजी घराघरात शिरले.गदिमांच्या शब्दाना ओघवत्या चाली देवून त्यांनी लोकांसमोर रामायण अक्षरशः उभे केले. बाबुजींनी गीतरामायणाचे भारतात व परदेशांत असे मिळून  सुमारे १८०० प्रयोग केले.तसेच १९५५-५६ मधे पुणे आकाशवाणीवर त्यांनी सलग ५६ आठवडे हे  ‘गीत रामायणा’ सादर केल.गीतरामायणाचे पुढे अनेक भाषात भाषांतर झाले पण ही सर्व भाषांतरे बाबुजींच्या मुळ चालीवरच गायली गेली.बाबुजींच्याच दैवी आवाजाने महाराष्ट्रावर जणू मोहिनीच घातली होती. त्या काळी गीतरामायण आकाशवाणीवरून प्रसारित होत असताना लोक रेडिओ संचाची पूजा करायचे आणि गाणी ऐकायचे. रसिकांनी नेहमीच त्यांच्या गायनाला दाद देत पुरस्कृत केले असताना त्यांच्यावर संगीत नाटक अकादमी पुरस्कार,सह्याद्री रत्न,दीनानाथ मंगेशकर पुरस्कार , लता मंगेशकर पुरस्कार  तसेच हा माझा मार्ग एकला  या चित्रपटासाठी मिळालेले राष्ट्रपतीपदक अश्या पुरस्काराची नेहमीच बरसात होत राहिली.

बाबूजींची काही गाणी ह्या  दुव्यावर आपल्याला ऐकायला मिळतील .कदाचित तुमची अनेक आवडती गाणी ह्यात असतील पण ती बाबुजींनी गायलीत हे तुम्हाला माहिती नसेल.

त्यांचे संगीतावर मनापासून प्रेम होते आणि म्हणूनच त्यांनी  मराठी चित्रपट संगीताची अथक  सेवा केली.त्यांचे पुत्ररत्न  म्हणजेच श्री.श्रीधर फडके ही सुद्धा  त्यांनी संगीतसृष्टीला दिलेली अजून एक अनमोल भेट. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे त्यांचे प्रेरणास्थान होते. त्यांच्यावरचा चित्रपट बनवणे हे त्यांच एक मोठ स्वप्न होत .त्यासाठी  बाबूजींनी खूप कष्ट घेतले. लोकांकडून वर्गणी घेऊन  त्यांनी निष्ठेने हा चित्रपट पूर्णही  केला. हा  चित्रपट प्रदर्शित झाल्यावर काही दिवसातच म्हणजे २९जुलै २००२ रोजी त्यांनी इहलोकाची यात्रा संपवली.पण ते आपल्यापासून कधीच दूर होऊ शकणार नाहीत .त्यांच्या गाण्यांतून ते नेहमीच आपल्याला भेटत राहणार आहेत. मंगेश पाडगावकरांच्या आणि बाबुजीनीच स्वरबद्ध केलेल्या  ओळी लिहाव्याश्या वाटतात…

अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती
दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची नाती॥

30 thoughts on “बाबुजी…

  1. बाबुजींसारखी माणसे अमर असतात…
    त्यांच्या गाण्यातून, त्यांच्या जगण्यातुन ! आजच्या दिवसात वाचलेला हा एकमेव नितांतसुंदर लेख !
    बाबुजींना माझीही आदरांजली !

  2. सुंदर आढावा घेतलाय …. !

    बाबुजींच्या गाण्यांनी तर फार लहानपणापासूनच मनावर गारूड केलेले आहे. २/३ वर्षांपूर्वीच त्यांचे ” जगाच्या पाठीवर ” हे अतिशय प्रांजळ आत्मचरित्र वाचनात आले………… त्याच्यांविषयी वाटणार्‍या आदरात प्रचंड वाढ झाली…. त्यांचे ते आत्मचरित्र लिहून पूर्ण होण्या आधीच ते गेले…. त्यांच्या गीतरामायणाच्या नंतरचा आयुष्याचा मोठा भाग लिहायचा राहून गेला ….. पण जितके त्यांनी लिहीले त्यात त्यांच्या कष्टमय आयुष्याचा भाग जास्त आहे…. उर्वरित भाग लिहून पूर्ण झाला असता तर …… ती चुटपूट प्रत्येकालाच लागते……

    ” जगाच्या पाठीवर ” मध्ये फडके कुटूंबियांची काही दूर्मिळ छायाचित्रे आहेत…. त्यात बाबूजींचा मानसपूत्र ” दीपक ” याचेही फडके कुटूंबियांसमवेत असलेले छायाचित्र आहे. … परंतु ते आत्मचरित्र अपूर्ण राहिल्यामुळे त्यात “दीपक ” चा काही उल्लेख नाही… त्यामुळे छायाचित्राने उत्सुकता चाळवली असून … काही कळायला मार्ग नाही….अशी अवस्था !

    पण हे कुतुहल शमले आणि बाबूजींचा एक वेगळा सुंदर पैलूही समोर आला तो श्रीमती भारती ठाकूर यांनी लिहीलेल्या एका लेखामुळे……

    त्या अरूणाचल प्रदेश मध्ये गेल्या होत्या तेंव्हाची गोष्ट …. त्यांच्या ओळखीच्या एका गृहस्थांनी त्यांना एक नाव – पत्ता लिहून दिला आणि सांगितले होते की तिथे जात आहात तर… अमूक एका ठिकाणी ” असे असे गृहस्थ ” मोठ्या सरकारी हुद्द्यावर काम करतात… ( मला आता त्यांचे मूळ अरूणाचली नाव आणि सरकारी हुद्दा दोन्ही आठवत नाहीत.. लेख वाचून बरेच दिवस झालेत. ) त्यांना आवर्जून भेटा…. … त्यांनी अगदी आग्रहाने भारती ठाकूरांना सांगितले ….. त्या त्यांना हो हो म्हणाल्या … पण फारसे औत्सुक्य नव्हते…. नेमके त्या शहरात गेल्यावर…. त्या जिथे उतरल्या तिथल्या माणसाला त्यांना त्या नावाबद्दल विचारले…. तो म्हणाला … हे काय समोरच त्यांचे कार्यालय आहे….. भारतीताई आणि त्यांची मैत्रिण त्यांना भेटायला गेल्या ..त्यांच्या नावाची चिठ्ठी आत गेली .. मराठी नावे पाहून त्यांनी लगोलग आत बोलावले…. या गेल्या बरोबर….. तोंडभरून हसत .” या कसे काय येणे केलेत ? ” …असे स्वच्छ मराठीत स्वागत केले… अरूणाचल प्रदेशात… चक्क मराठी … आणि तेही जराही न अडखळता…. शिवाय एका अरूणाचली माणसाकडून…. त्यांचे गोंधळलेले चेहरे पाहून .. त्या गृहस्थांनीच मग खुलासा केला… की… संघाच्या एका योजने अंतर्गत…. देशाच्या फारशा विकसित नसलेल्या राज्यांमधून लहान मुलांना शिक्षणाकरिता महाराष्ट्रातील कुटूंबांमध्ये सामावून घेतले जायचे…. त्याच योजने मध्ये ते गृहस्थ बाबूजींच्या घरी वाढले होते…. ते फडके पती-पत्नींचाही उल्लेख आई-बाबा असाच करत होते. तेच त्यांचे मानसपूत्र दीपक…!

    त्यांना विनम्र अभिवादन ….!

  3. बाबूजींवर आठवणीने आणि चांगले लिहिले आहे.सुमारे १५ वर्षांपूर्वी ते पार्ल्याला एका समारंभात भेटले असता मी त्यांना नेत्रदानाची माहिती थोडक्यात सांगून माझे छापील माहितीपत्रक दिले होते.त्यावर ‘मी नक्की नेत्रदान करेन’असे ते म्हणाले होते.त्यांनी,त्यांच्या वारसांनी त्यांचा शब्द पाळला आणि त्यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले,दोन भावस्पर्शी नेत्र दोन दृष्टीहीनांना अमूल्य दृष्टी देऊन गेले.

Leave a reply to सागर कोकणे उत्तर रद्द करा.